छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
१८०६ साली विल्यम कॅरेचं `ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज` हे देवनागरी लिपीतल्या पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं. तेव्हापासूनचा इतिहास शोधून पाहिला तर मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक महात्मा जोतीराव फुलेंचंच असल्याचं लक्षात येतं.
हेही वाचा : महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख
`पवाडा छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा` हे पुस्तक जून १८६९ मधे प्रसिद्ध झालं. मुंबईतल्या ओरिएण्टल छापखान्यात छापलेलं हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतल्या पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेलं होतं. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती. हे पुस्तक जोतीरावांनी परमहंस सभेचे अध्यक्ष दिवंगत रामचंद्र बाबाजी राणे यांना अर्पण केलं होतं.
हे पुस्तक म्हणजे सुमारे एक हजार ओळींचा प्रदीर्घ पोवाडा आहे. महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या आणि मी संपादित केलेल्या महात्मा फुले समग्र वाङ्मयात तसंच इंटरनेटवरही हा पोवाडा उपलब्ध आहे. शिवराय एवढे मोठे होते की इतर कोणीही व्यक्ती उपेमेसाठी समोर दिसत नाही, असे फुले या पोवाड्यात सांगतात. छत्रपतींचं जीवन आणि कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपली कार्यप्रेरणा आहेत असेही जोतीराव सांगतात.
हेही वाचा : बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवराय शतपट श्रेष्ठ
या पुस्तकाच्या लेखनासाठी आपले ब्राह्मण बालमित्र भांडारकर यांनी आपल्याला सहकार्य केलं, अशी कृतज्ञतापूर्वक नोंद जोतीरावांनी प्रस्तावनेत आवर्जून केलेली आहे. `ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी जोती म्हणे` या त्यांच्या ब्रिदाला हे धरून होतं. हे शिवचरित्र लिहिण्यासाठी जोतीरावांनी अनेक संदर्भ साधनांचा धांडोळा घेतला.
मराठीतल्या विविध बखरी, फारशीमधल्या तवारिखा, इतिहासग्रंथ, इंग्रजी भाषेतली नानाविध ऐतिहासिक पुस्तकं यांचा सखोल व्यासंग करून जोतीरावांनी मोठ्या तयारीनिशी हा ग्रंथ सिद्ध केला होता. गेली १५१ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे. किती शिवप्रेमींनी तो वाचलाय? उलट बहुतेक सगळेच उच्चभ्रू शिवचरित्रकार आणि शिवशाहीर ठरवून या पुस्तकाची उपेक्षा करतात.
अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी।
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी।।
शिवराय देशासाठी लढत होते असं सांगणारे पहिले इतिहासकार, पहिले शिवशाहीर हे महात्मा जोतीराव फुलेच होते. तरीही त्यांना हा मान का नाकारला जातो?
हा चरित्रपर पोवाडा असल्याने यात तोवर उपलब्ध असलेल्या सर्व ऐतिहासिक संदर्भांचा त्यांनी वापर केलाय. यात इतिहास असला तरी तो कोरडा आणि नीरस नाही. त्यात रसरशीत काव्य आहे. जोतीरावांच्या प्रतिभेचा आणि धगधगत्या शिवनिष्ठेचा हा ताम्रपट आपण सगळ्यांनी एकदा वाचायलाच हवा. बहुजन समाजाला एक महानायक, महापुरुष देण्याचा जोतीरावांचा उद्देश होता.
कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर पाच गोष्टींची गरज असते.
१. एक आदर्शः त्याच्या पावलावर पाऊल टाकून प्रगती करण्याची प्रेरणा सामान्य माणसाला मिळेल.
२. कार्यक्रमपत्रिका अर्थात परिवर्तनाचा कृतिकार्यक्रमः जोतीरावांनी ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, नैसर्गिक संसाधनांचे फेरवाटप ही विषयपत्रिका दिलेली होती.
३. संघटनाः जोतीरावांनी सुरवातीला शिक्षणसंस्था आणि नंतर सत्यशोधक समाजामार्फत संघटित कार्य केलं.
४. नेतृत्वः जोतीराव, सावित्रीबाई यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही चळवळ पुढे लहुजी वस्ताद साळवे, नारायण मेघाजी लोखंडे, कृ.पां. भालेकर, ताराबाई शिंदे, डॉ. विश्राम रामजी घोले, तान्हुबाई बिर्जे, धोंडीराम कुंभार, सावित्रीबाई रोडे, गंगाधरभाऊ म्हस्के, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, गोपाळबाबा वलंगकर, केशवराव विचारे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, सी.के. बोले, कृष्णाजी अर्जुन केळूसकर अशा असंख्य मान्यवरांच्या सहभागाने आणि नेतृत्वाने मोठी होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिला वैश्विक उंची प्राप्त करून दिली.
५. तत्वज्ञानः जोतीरावांनी सनातन संस्कृती नाकारून पर्यायी भारतीय संस्कृती निर्माण करण्याचं सत्यशोधकी तत्वज्ञान विकसीत केले.
हा ग्रंथ लिहिताना शिवरायांच्या इतिहासाच्या माध्यामातून वरील सगळी उद्दीष्टे गाठण्यासाठी जोतीरावांनी मांडणी केलेली आढळते.
हेही वाचा : ग्लोबल लोकल मेळ घालायचा असेल तर महात्मा फुले हवेत
शहाजी महाराजांना विजापूरमधे कैद करण्यात आले तेव्हा शिवरायांच्या पत्नी सईबाई वयाने खूप लहान होत्या. शिवराय अडचणीच्या प्रसंगी आपल्या या पत्नीशी विचारविनिमय करत असत, हे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी फुले सांगतात, सईबाईंनी मसलत सुचवली, तसं महाराज वागले आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली.
ऐतिहासिकदृष्ट्या हे खरं की खोटं हे महत्वाचं नाही. आपल्या आदर्शांचं अनुकरण समाज करत असतो आणि म्हणून आदर्श काय करत होते, हे लोकांपुढे उलगडून दाखवणं गरजेचं असतं. बहुजन समाजात स्त्रियांचा सन्मान वाढवायचा असेल तर शिवाजी महाराज असं करायचे, तुम्हीही करा हे सांगण्याचा या मागचा हेतू उघडच दिसतो. शिवाजी महाराज हे आपले तमाम भारतीयांचे आदर्श होत हे पटवून देणारे महात्मा फुले पहिलेच आहेत.
हे पुस्तक लिहून आणि प्रकाशित करूनच जोतीराव थांबले नाहीत. त्यांनी शिवचरित्रावर व्याख्यानं द्यायचा, पोवाडे गायचा धडाका लावला. १८८०मधे जोतीराव रायगडावर गेले. महाराजांच्या समाधीची त्यांनी पूजा केली. पुण्यात येऊन स्वारगेटजवळच्या हिराबागेत म्हणजे आजच्या शिवाजी मराठा शिक्षण संस्थेजवळ त्यांनी गंगारामभाऊ म्हस्के आणि चाफळकर स्वामी या मित्रांच्यासोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. त्यातले म्हस्के हे मराठा तर चाफळकर ब्राह्मण होते.
तिथून ही जयंती मुंबईला लालबाग परळला रावबहादूर नारायम मेघाजी लोखंड्यांनी नेली. त्यानंतर १५ वर्षांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला हजेरी लावली. इतिहास लिहिणार्या उच्चभ्रूंनी मात्र शिवजयंतीचं सगळं श्रेय एकट्या टिळकांना देऊन टाकलं. खरा इतिहास सांगतो, महात्मा फुलेंनीच सार्वजनिक शिवजयंती सुरू केली होती. लो. टिळकांनी ती पुढे नेली. टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांना याचं भान होतं. त्यामुळे आपल्या आत्मचरित्रात टिळकांनी ती सुरू केल्याचा दावा न करता त्यांनी ती पुढे आणली अशी कबुली जयवंतराव देतात.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?
महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
लोकमान्य टिळकांच्या केसरीने फुल्यांच्या रायगड भेटीच्या आणि शिवजयंतीच्या बातम्या तत्कालीन केसरीने दिलेल्या नाहीत, पण त्या दिनबंधूने दिलेल्या आहेत. दिनबंधूच्या जुन्या फायलींमधे आजही त्या आहेत. शिवाय माधवराव बागल, वि.द. घाटे, फुले चरित्रकार पंढरीनाथ पाटील, धनंजय कीर, आचार्य अत्रे, मुकुंदराव पाटील, गुरुवर्य केळुसकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे, जागृतिकार पाळेकर, श्रीपतराव शिंदे आदी मान्यवरांनी त्याच्या नोंदीही केलेल्या आहेत.
तरीही काही सनातन्यांना हे पुरावे मान्य नाहीत. का तर केसरीत तशी नोंद नाही ना! हे नासक्या आमराईतले रेशीमकिडे हा वायरस भयंकर आहे. त्यांचे मानायचे तर केसरीने जोतीराव आणि सावित्रीबाई यांच्या मृत्यूच्या बातम्या दिलेल्या नाहीत, म्हणजेच ते वारलेच नाहीत, असंही मानावं लागेल.
हा अफवाबाज विषाणू सातत्याने बुद्धिभेदाचा रणगाडा चालवत असतो. बहुसंख्य बहुजन तिला बळी पडत असतात. जातीविद्वेषाने सडलेल्या या प्रतिगामी मेंदूंनी आजपर्यंत जोतीरावांच्या या आद्यशिवचरित्राची वा जयंतीकार्याची दखलच घेतलेली नाही. याउलट जोतीरावांच्या अन्य लेखनातल्या नोंदी संदर्भापासून तोडून, विकृत करून जोतीरावांनी शिवरायांची बदनामी केलीय अशा आवया उठवल्या.
आजही त्यांचा हाच उद्योग चालू आहे. १८६९पर्यंत शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातलं एकही पत्र उपलब्ध झालेले नव्हतं. स्वाभाविकच उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे शिवरायांचं औपचारिक शिक्षण झालेलं नसावं, अशा समजुतीने त्या अर्थाची नोंद जोतीरावांनी केली.
हेही वाचा : महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही
मात्र अफवागॅंगकडून हा एकच शब्द तेवढा निवडून विकृतपणे पेश केला जातो. त्याच्या आधारे फुलेबदनामीचं दुकान चालवलं जातं. एखाद्या लेखकाचा एखादा सुटा शब्द नुसता बघून उपयोग नसतो, तर त्याचा काळ, संदर्भ, हेतू आणि त्या लेखकाचं इतर लेखन हे सारं एकत्रितपणे बघावं लागतं. अंडरवर्ल्डच्या टोळ्या जशा देशासाठी घातक आहेत, तशाच या अफवागॅंग समाजशत्रू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक बाळ गांगल हे डबल पीएचडी होल्डर या बदनामीत आघाडीवर होते. त्यांचा बुरखा मी ३२ वर्षांपूर्वीच माझ्या `महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन` या ग्रंथात सप्रमाण फाडला होता. हिंदुत्ववादी बेहर्यां च्या `सोबत`मधे गांगलांनी १९८८ साली महात्मा फुल्यांवर भयंकर गरळ ओकली होती.
फुल्यांनी शिवरायांची बदनामी केल्याचा धादांत खोटा आरोप गांगलांनी केलेला होता. आजही काही सडक्या आंब्यातले किडे हीच गोबेल्सची मोहीम चालवित असतात. देव, धर्म, देश यांचं नाव घेत बहुजनांचा बुद्धिभेद करून इतिहासाचा गैरवापर करत ही विषवल्ली फोफावत राहते.
हे नको असेल, तर सतत संदर्भसाधनांच्या शोधात राहावे लागते. त्यांच्या प्रकाशात इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागतं. संदर्भसाधनांचा शोध आणि सत्यशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती अथकपणे सुरूच ठेवावी लागते. बहुजनांना या कामात फारसा रस नसतो. वाचन, चिंतन, संशोधन यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अर्थात तशी गोडीही नसते. ते प्रतिगामी विद्वानांना रखेल्या ठेवाव्यात तसे आपल्या पदरी ठेवतात.
हे बाळगलेले कावेबाज सनातनी इतिहासाचा विपर्यास आणि विकृतीकरण यात तरबेज असतात. प्रबोधन, परिवर्तनपर उपक्रमांना अदखलपात्र मानणं हा त्यांचा पहिला कट असतो. तरीही चळवळी, नेते वाढतच राहिले तर त्यांच्यावर हल्ले करणं, नेतृत्वाचं चारित्र्यहनन करणं, नेत्यांच्या हत्येच्या सुपार्या् देणं, हत्या करणं, ही दुसरी पायरी असते.
तरीही ते संपले नाहीत, उलट वाढतच राहिले, समाजमान्य होत गेले तर त्यांचे अपहरण करणं, ही तिसरी पायरी असते. या अवस्थेत सध्या शिवराय, बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुष सापडलेले आहेत. अर्थात अपहरण करण्यामागे स्वीकारण्याचा प्रामाणिक हेतू नसतो. त्यांच्या क्रांतिकारक विचारात भेसळ करून ते विकृत करत राहणं, हे मुख्य अभियान असतं.
मधूनमधून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मानणारे लोक झोपलेत की जागे आहेत, याचाही अंदाज घेतला जातो. तो अंगलट आला तर प्रसंगी माघार घेऊन तह केला जातो. विकृतीकरण मात्र जारीच राहते. २०१४ पासून या शक्तींनी पुन्हा उचल खाल्लेली आहे. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववाद्यांची सत्ता आल्याबरोबर या आमराईतील रेशीमकिड्यांना रसद मिळू लागली. हे घाशीराम कोतवाल पुन्हा मस्तवाल झाले आहेत.
हेही वाचा :
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत
आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा
शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
(लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत असून त्यांच्या ब्लॉगचा संपादित भाग आहे. संपूर्ण लेख harinarake.blogspot.com इथे वाचावा.)