५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट

२१ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना वायरसचं एक अख्खं कुटुंबं आहे. या कुटुंबात या नव्या वायरससोबत अजून सहा जण आहेत. आणि यातला पहिला वायरस शोधून काढला तो स्कॉटिश शास्त्रज्ञ जून अल्मेडा यांनी. त्यावेळी त्या फक्त ३४ वर्षांच्या होत्या. ५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबातल्या मूळपुरूषाच्या शोधाची ही गोष्ट.

१९६४ ची गोष्ट आहे. जून अल्मेडा या स्कॉटिश शास्त्रज्ञ आपल्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमधून पेशींचं निरीक्षण करत होत्या. तेव्हा त्यांना एक राखाडी रंगाचा, काटे काटे असणारा छोटासा जीव दिसला. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी एका सहकाऱ्याला आवाज दिला आणि त्या जीवाभोवतीच्या काट्यांनी एक गोलाकार वर्तुळ तयार झालं असल्याचं लक्षात आणून दिलं. हे वर्तुळ म्हणजे सूर्याभोवती असतं अगदी तसंच होतं. सूर्याभोवतीच्या या वर्तुळाला इंग्रजीत कोरोना म्हटलं जायचं. जून यांनी शोधलेली ती काट्या काट्यांसारखी गोष्ट म्हणजे जगातला पहिला कोरोना वायरस. मूळ कोरोनापुरुष.

आज जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना वायरसचं एक अख्खं कुटुंबं आहे. या कुटुंबात या नव्या वायरससोबत अजून सहा जणांचा समावेश होतो. प्राण्यांकडून माणसात आलेले, काट्या काट्यांसारखं आवरण असलेले आणि माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करणारे अशी काही कोरोना वायरसची वैशिष्ट्य आहेत. असा हा कोरोना वायरस पहिल्यांदा शोधला तो जून अल्मेडा यांनी. त्यावेळी त्या अवघ्या ३४ वर्षांच्या होत्या.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

शिक्षण अर्धवट सोडून दिलं

‘द अटलांटिक’च्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, जून अल्मेडा म्हणजे लग्नाआधीच्या जून हार्ट. ५ ऑक्टोबर १९३० ला स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहरात त्यांचा जन्म झाला. वडील बस ड्रायवर होते. ग्लासगो शहरात सुशोभीकरणासाठी बांधलेल्या त्या काळातल्या अपार्टमेंट ब्लॉकमधे त्यांचं कुटुंब राहत होतं. वर्गातल्या हुशार मुलांपैकी असूनही जून यांना १६ व्या वर्षानंतर आपलं शिक्षण सोडून द्यावं लागलं. कारण, त्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या वडलांकडे पैसे नव्हते.

शिक्षण सोडल्यावर जून ग्लासगोमधल्या रॉयल इन्फारमरी या भल्यामोठ्या हॉस्पिटलच्या लॅबमधे कामा लागल्या. तिथे त्या मायक्रोस्कोपच्या माध्यमातून माणसाच्या टिश्यूचे नमुने तपासायला शिकल्या. त्यानंतर याच प्रकारचं काम त्यांना लंडनच्या सेंट बार्थोलोमेस या हॉस्पिटलमधे मिळालं आणि त्या इंग्लंडमधे राहू लागल्या.

इंग्लंडमधेच इनरिक्युअस अल्मेडा या कलाकाराशी त्यांची ओळख झाली. ते कॅनेडाच्या वेनेझुलिया इथले रहिवाशी होते. लग्न करून हे दाम्पत्य कॅनडामधे स्थायिक झालं आणि तिथं ओन्टॅरिओ कॅन्सर इन्स्टिट्यूटमधे इलेक्ट्रोनिक मायक्रोस्कोपसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या संस्थेत काम करताना जून यांनी अनेक नवीन संशोधनं केली आणि स्वतःच्या नावावर अनेक शोधनिबंध म्हणजे रिसर्च पेपर प्रसिद्ध केले. आधी कधीही बघितलं नव्हतं अशा अनेक वायरसचा शोध त्यांनी लावला.

वायरस शोधण्याचं नवं तंत्रज्ञान

जून यांनी शोध लावलेल्या वायरसमधे रुबेला वायरसचं नाव घेतलं जातं. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन या संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, रुबेला वायरस शोधण्यासाठी अल्मेडा यांनी एक खास तंत्रज्ञान विकसित केलं. मायक्रोस्कोपमधून असे सुक्ष्म कण बघताना आपण नेमकं कशाकडे बघतोय हे सांगणं अवघड असतं.

पण मायक्रोस्कोपमधे वायरस नेमका कुठला याचा अंदाज आणखी अचूक येण्यासाठी अल्मेडा यांनी त्या नमुन्यात अँटीबॉडी सोडण्याची युक्ती लढवली. अँटीबॉडी म्हणजे एखाद्या वायरसची लागण झाल्यावर शरीराने साठवून ठेवलेले काही वायरस. या अँटीबॉडी शरीरात दाखल झाल्या की त्या वायरसभोवती जमा होतात आणि त्यामुळे नमुन्यात कुठला वायरस आहे हे ओळखता येतं.

हे तंत्रज्ञान वापरून रुबेला वायरस कसा दिसतो हे पाहणाऱ्या जून या पहिल्या शास्त्रज्ञ ठरल्या. हे तंत्रज्ञान वायरससाठी तयार केलेलं असलं तरी त्यामुळे इतर अनेक वायरस शोधणं शक्य झालं. त्याचाच वापर करून त्यांनी पहिल्या कोरोना वायरसचाही शोध लावला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

प्राण्यामधल्या वायरशी मिळताजुळता वायरस

रुबेला वायरसच्या शोधानं जून यांचं जगभरात नाव झालं. त्यानंतर लगेचच त्यांना इंग्लडच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. इंग्लडला परत आल्यावर त्यांची डॉ. डेविड टायरेल यांच्याशी भेट झाली. त्यावेळी फ्लू सारखा एक वायरसमुळे अनेक लोक आजारी पडत होते. त्यांच्या सर्दी पडश्यामागे नेमका कोणता वायरस आहे याचा शोध डॉ. टायरेल घेत होते.

त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीमनं अनेक लोकांच्या नाकातल्या पाण्याचे नमुने घेतले होते. त्याला त्यांनी बी८१४ असं नाव दिलं होतं. पण काही केल्या त्यांच्या टीमला या वायरसचं निदान करता येत नव्हतं. तेव्हा हा नवीच वायरस असला पाहिजे, अशी शंका टायरल यांना आली. टायरल यांनी काही नमुने अल्मेडा यांच्याकडे पाठवले.

अल्मेडा यांनी आपल्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा नवा वायरस १९६४ मधे शोधून काढला. त्याचं काट्यांचं आवरण दिसावं इतका स्पष्ट फोटो त्या घेऊ शकल्या. इतकंच नाही, तर त्यांनी त्या आधी कोंबड्यांमधे आणि उंदरांमधे निरिक्षण केलेल्या  वायरसशी हा नवा वायरस मिळताजुळता होता. आणि त्यालाच त्यांनी कोरोना वायरस असं नाव दिलं. याच सेंट थॉम्स हॉस्पिटलमधे इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर कोविड-१९ आजार बरा करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं.

म्हणून संशोधन फेटाळलं

या नव्या वायरसबद्दल अल्मेडा यांनी रिसर्च पेपर लिहिला आणि तो सादर केला. पण अल्मेडा या नव्या वायरसचं चांगलं चित्र सादर करू शकल्या नाहीत. या कारणावरून हा रिसर्च पेपर फेटाळला गेला. हे चित्र म्हणजे एन्फ्ल्युएन्झा वायरसचीच खराब दर्जा असणारी चित्रं आहेत, असं त्यांचं म्हणणं पडलं.

नंतर १९६५ मधे हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमधे प्रकाशित करण्यात आलं. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा जर्नल ऑफ जनरल वायरॉलॉजीमधे या वायरसच्या फोटोसोबत ते प्रकाशित झालं. आणि जून यांनी शोधलेल्या जगातल्या पहिल्या कोरोना वायरसला मान्यता मिळाली. १ डिसेंबर २००७ ला जून अल्मेंडा यांचं निधन झालं. पण आत्ता नव्या कोरोनाचं जन्म झाला तेव्हा मूळ पुरुष शोधून काढणाऱ्या जून अल्मेडा यांचं नाव कुठंच चर्चेत नाही.

हेही वाचा : 

कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

१०० वर्षांपूर्वी शाहू महाराजांच्या विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!