सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय.
कुलाब्याच्या दांडीपासून दहीसरच्या खाडीपर्यंतच्या मुंबईत दिसतात ती फक्त माणसं, माणसं आणि फक्त माणसंच. नाही म्हणायला काही पाळीव प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी सोडले तर हे शहर माणसांनी भरून गेलेलं आहे. आधुनिक काळात उभारल्या गेलेल्या या शहरात पूर्वी प्रचंड जैवविविधता नांदत होती, यावर आज आपला विश्वासच बसणार नाही. मुंबईत सध्या सुरु असलेल्या सोनेरी कोल्ह्यांच्या शोधामुळे अनेकांना असाच धक्का बसला आहे.
तर ही गोष्ट फार पूर्वीची नाही. अगदी शंभरएक वर्षांपूर्वी आज दक्षिण मुंबई आहे त्या सिमेंटच्या जंगलामधे प्रचंड खारफुटीचं जंगल होतं. तिथं असलेल्या झाडाझुडपांमधे अनेक पाणथळीजवळ राहणारे प्राणीपक्षी राहत होते. त्या सगळ्या वनसंपदेवर डोंगर फोडून काढलेली माती ओतली गेली. त्यामुळे ओबडधोबड डोंगर संपले आणि त्याखाली जैवविविधताही गाढली गेली. मुंबई बंदरासाठी विकसित केल्या गेल्या. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत सपाट जमिनासाठी निसर्गाचा बळी देण्यात आला.
हेही वाचा: पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!
आज जिथं चर्नीरोड स्टेशन आहे तिथून मरिन लाइन स्टेशनपर्यंतच्या भागात १०९ वर्षांपूर्वी गोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी किल्ले दिसले होते असा उल्लेख, भारतातल्या वनसंपत्तीबद्दल 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'ने प्रसिद्ध केलेल्या कोठारी आणि छापगर यांच्या एका पुस्तकात आहे. तसंच काही दिवसांपूर्वी उरण आणि नवी मुंबईतल्या खारघर इथं हे सोनेरी कोल्हे दिसले होते. त्यामुळे आजही मुंबईतल्या खारफुटीच्या परिसरात त्यांचं अस्तित्व आहे.
गोल्डन जॅकल हा श्वान कुळातला देखणा प्राणी आहे. जॅकल या प्राण्याच्या तीन प्रजाती आहेत. इंडियन जॅकल, गोल्डन जॅकल आणि ब्लॅक बॅक्ड जॅकल. आशिया खंडातल्या भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश या देशात या प्राण्याचा अधिवास आहे. साधारणतः कुत्र्यासारखा दिसत असल्यामुळे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. पण हा प्राणी आज खरंच आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे.
हा २०१८ मधे विक्रोळीच्या फिरोजशहानगरातल्या एका खड्यात पडलेला आढळला होत. प्राणीमित्र आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने तिथल्या नागरिकांना त्याला वाचवलं. पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या कांदळवनामधून हा जॅकल वाट चुकला होता. त्याच्यावर किरकोळ उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. मुंबईत आजही अनेक ठिकाणी डोंगराळ जागा आणि कांदळवनं आहेत. त्यात या अशा प्राण्यांचा अधिवास आजही आहे, याचं प्रत्यंतर विक्रोळीसारख्या घटनांमधून दिसतं.
आज या सोनेरी कोल्ह्यांबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती साधारणतः हौशी निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक, फोटोग्राफर यांच्यामार्फतच मिळालेली आहे. नक्की कोणत्या भागात किती सोनेरी कोल्हे आहेत, याबाबतची अधिकृत आकडेवारीही वनविभागाकडे नाही. ती मिळावी आणि या प्राण्याच्या जीवनपद्धतीवर माहिती मिळावी, यासाठीच खारफुटी आणि सागरी जौवविविधता संवर्धन प्रतिष्ठान आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया यांच्यातर्फे सोनेरी काल्ह्यांचं मुंबईतलं पहिलं सर्वेक्षण होणार आहे.
महामुंबई परिसरातल्या खारफुटींमधे डिसेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे. महामुंबईतल्या खारफुटींमधे सोनेरी कोल्ह्यांसह असलेल्या इतर प्राण्यांबद्दलही अधिक माहिती यामुळे उपलब्ध होऊ शकेल. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातूनही हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. हा दुर्मिळ प्राणी काय खातो, स्थानिक कुत्रे आणि सोनेरी कोल्ह्यांमधे नेमका काय फरक असतो, माणसाशी त्याचे संबंध कसे असतात, या प्रजातीतल्या प्राण्यांचे एकमेकांशी कसे संबंध असतात याही गोष्टींवर या अभ्यासामुळे प्रकाश पडू शकेल.
खारफुटीच्या परिसंस्थेतल्या अन्नसाखळीचा सोनेरी कोल्हे हा महत्त्वाचा भाग आहेत. राज्याच्या खारफुटी जंगलातल्या मांसभक्षक प्राण्यांमधे यांचा समावेश होतो. या अभ्यासामुळे सोनेरी कोल्ह्यांची परिसंस्था अधिक चांगल्या पद्धतीने समोर येईल. तसंच शहरीकरणाच्या नव्या प्रक्रियेत या प्राण्यांचे अधिवास टिकवण्यासाठी नक्की काय योजना आखाव्या लागतील, यासाठी आवश्यक माहितीही या सर्वेक्षणातून मिळेल असा विश्वास निसर्गमित्रांना वाटतोय.
हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया
खारघर खाडीत सक्शन पंपांच्या आधारे रेती उपसा केला जातो. त्यामुळे खारफुटीची कत्तल होत असून त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो आहे. याबाबत अनेकदा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आवाज उठवलाय. पण तरीही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे त्यांच्यामधे नाराजीचा सूर उमटतो आहे. याच खारघरच्या खारफुटीमधे गेल्या महिन्यात सोनेरी कोल्ह्यानं दर्शन दिलं होतं. वन्यजीव फोटोग्राफर प्रदीप चौधरी हे पक्षीनिरीक्षण करण्यासाठी गेले असताना हे सोनेरी कोल्हे त्यांना दिसले होते.
उरणमधेही जेएनपीटी कामगार वसाहतीचा परिसर, डोंगरी, पाणजे इथल्या खारफुटीच्या भागात हे सोनेरी कोल्हे आढळले होते. उरण आणि जेएनपीटी बंदराच्या परिसरात सुरू असलेल्या औद्योगिकीकरणामुळे हे कोल्हे दिसेनासे झाले होते. पण प्राणीमित्र पराग घरत यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची पिल्लं शेजारच्या गवतात असावीत अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर घेतलेल्या शोधात हे कोल्हे पुन्हा दिसले.
या सगळ्या घटनांचा अन्वयार्थ लावताना, पुन्हा एकदा माणूस, शहरीकरण आणि प्राणी यांच्यातल्या संघर्षाचा अभ्यास करावा लागणार आहे. मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून बाहेर पडणारे बिबटे असोत किंवा घोडबंदरच्या सोसायट्यांच्या सीसीटीवी कॅमेरामधे दिसणारी विविध जंगली श्वापदं असोत. माणसांने प्राण्यांच्या अधिवासात किती आक्रमण करायचं हे ठरवायची वेळ आता आली आहे. या अशा सर्वेक्षणामुळे या अभ्यासाला पुन्हा एकदा चालना मिळेल, अशी आशा आहे.
विसाव्या शतकाच्या मध्यात शहरीकरणाचा दर आणि औद्योगिकीकरणाचा दर यांची वाढ दाखवण्यासाठी ओवरअर्बनायझेशनची संकल्पना मांडली गेली. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांबाबत ही प्रक्रिया आज अतिरेकी पद्धतीने विस्तारताना दिसते. या शहरातला माणूस आणि मोकळ्या जागा, निसर्ग आणि माणूस या सगळ्या गणितांमधे प्रचंड विसंगती असून अतिशहरीकरणामुळे इथली निसर्गसंपदा धोक्यात आली आहे. एवढंच नाही तर त्यामुळे एकंदरीत माणसाचं जीवनमानही कमालीचं धकाधकीचं आणि चिंताजनक ठरलंय.
ओवरअर्बनायझेशन म्हणजेच अतिशहरीकरणाची व्याख्या विविध पद्धतीने केली गेली आहे. त्यात लोकसंख्यावाढ, बिगरकृषी व्यवसाय, स्थलांतराचं प्रमाण, नैसर्गिक साधनांची उपलब्धता असे अनेक निकष त्यासाठी वापरले जातात. त्याच्या सैद्धांतिक मांडणीवर फार जोर न देताही आपल्याला एवढं नक्कीच कळू शकतं की, माणूस निसर्गाच्या सर्वच सीमा ओलांडून दिसेल तिथं स्वतःच म्हणणं पुढे करण्यासाठी धडपडतोय, तिथं निसर्ग त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही.
मुंबईत आज सोनेरी कोल्ह्यांच्या निमित्तानं हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. समुद्रात हवी तशी भर घालत, डोंगर फोडत, खारफुटी नष्ट करत आज मुंबई शहर उभारलं गेलंय. तिथं उरलेल्या किरकोळ जंगलातही सोनेरी कोल्ह्यांसारख्या प्राण्याने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. पण, कदाचित आणखीही काही प्रजाती तेव्हा अस्तित्वात असतील, पण आज त्या नामशेष झाल्या असतील. सर्वेक्षणानंतर कदाचित हे लोकांपुढे येईलही. पण, माणसाने त्याआधी शहाणं होऊन शहरातला निसर्ग तरी जपला पाहिजे, वाढवला पाहिजे.
हेही वाचा:
वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं
आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?
जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट
मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?