हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
गणपतीच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतील. गणपतीच्या जन्माच्या आणि इतरही अनेक गोष्टी आहेत. एकूण या गोष्टींवरून असं लक्षात येतं की गणपतीने अनेकांना अनेक प्रकारची मदत केलीय. देवांना मदत केलीय, तशी ऋषींनाही मदतीचा हात दिलाय. स्वतःच्या आईची तर अनेकवेळा मदत केलीय. गणपतीचं त्याच्या आईबाबांवर किती प्रेम होतं, हेही यातून दिसून येतं. अशा काही खास गोष्टी.
आपल्याला माहिती आहे की शनी हा एक ग्रह आहे. त्याच्याभोवती कडी असतात. अशा या शनीचं चित्र तुम्ही भूगोलाच्या पुस्तकात नक्कीच पाहिलं असेल. अशा या शनीविषयी एक गोष्ट सांगतात. शनीने एकदा वाईट नजरेने गणपतीकडे पाहिलं. त्याची नजर इतकी वाईट होती की गणपतीचं तोंडच गळून पडलं. गणपती तर शंकर-पार्वतीचा मुलगा. पार्वतीला काय करावं ते सुचेना.
आता गणपतीला तोंड कुठलं? तिने ब्रह्मदेवाला सल्ला मागितला. ब्रह्मदेवानं सांगितलं की, तुला सर्वात आधी ज्या प्राण्याचं तोंड सापडेल ते तू याला लाव, म्हणजे हा पुन्हा जिवंत होईल. त्याला तोंड मिळेल त्यानुसार पार्वती जंगलात गेली. तिथे तिला हत्तीचं तोंड सापडलं. हे तोंड तिनं आणलं आणि गणपतीच्या धडाला लावलं. अशाप्रकारे तिचा मुलगा जिवंत झाला आणि गणपतीला नवं रूप मिळालं.
आपल्याला असं माहिती आहे की, गणपती हा शंकर, पार्वतीचा मुलगा आहे. मात्र नेपाळमधे आई बाबा आणि मुलाचं हे नातं मानत नाहीत. त्यांच्या मते, गणपती हा कोणापासूनही जन्माला आलेला नाही. तर सूर्यकिरणांच्या तेजापासून त्याचा जन्म झालेला आहे. म्हणूनच तिथे त्याचं नाव सूर्यविनायक असं आहे. तिथे नृत्य गणपती, गोरखा गणेश अशी गणपतीची रूपं आहेत.
हेही वाचाः देश का नेता कैसा हो, गणपती बप्पा जैसा हो!
एकदा पार्वतीने पाच ऋषींना जेवायला बोलावलं होतं. त्यांना जेवायला वाढलं तरी कोणी जेवायला सुरवात करेनात. पार्वतीने कारण विचारलं तेव्हा, एकाने सांगितलं की मी विष्णूचं दर्शन झाल्याशिवाय जेवणार नाही. दुसऱ्याने सांगितलं, मी सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय जेवणार नाही. तिसऱ्याने ब्रह्माचं, चौथ्याने देवीचं आणि पाचव्याने सांगितलं की शिवाचं दर्शन झाल्याशिवाय जेवणार नाही.
पार्वतीला काय करावं हे कळेना. या सगळ्या देवांना आत्ताच्या आत्ता बोलावणं कसं शक्य आहे, असा प्रश्न तिला पडला. ती देवघरातील ओंकाराकडे बघू लागली. तर तिथून गणपती बाहेर आला. तर एकाला त्याच्या विष्णूचं, दुसऱ्याला सूर्याचं, तिसऱ्याला ब्रह्माचं, चौथ्या आणि पाचव्याला शिवाचं दर्शन घडलं. ज्याला जो हवा होता, त्याचं दर्शन घडलं. त्यामुळे ऋषींना खूप आनंद झाला. आणि ते जेवले अशी कथा आहे.
शंकर, पार्वतीने एकदा गणपती आणि कार्तिकेय या दोन मुलांमधे श्रेष्ठ कोण? हे बघायचं ठरवलं. त्या दोघांना सांगितलं की तुम्ही पृथ्वीप्रदक्षिणा करून या. जो कोणी आधी येईल तो सर्वात श्रेष्ठ, असं आम्ही समजू. हुकुमानुसार कार्तिकेयाने आपलं मोराचं वाहन घेतलं. आणि तो खरंच पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाला. गणपतीने थोडा विचार केला.
तिथे जवळच असलेल्या शंकर, पार्वतीला म्हणजे आपल्या प्रिय आईबाबांना त्याने पटकन एक प्रदक्षिणा घातली. म्हणाला, हीच माझी पृथ्वीप्रदक्षिणा. माझं जग म्हणजे तुम्हीच. यावर शंकर, पार्वतीला गणपतीचं कौतुक वाटलं. इकडे कार्तिकेयाला हे कळलं. तो रागावला. आणि पुन्हा शंकर, पार्वतीकडे गेलाच नाही. तो रुसून थेट क्रौंच पर्वतावर जाऊन बसला.
आपल्या सगळ्यांनाच रावण माहीत असतो. पण रावणाच्या मुलीचं नाव माहीत नसतं. तर तिचं नाव आहे सुभगा. रावणाने सीतेला पळवून आणलं आणि एका उपनगरात बंदी बनवून ठेवलं. त्यावेळी सुभगेला खूपच वाईट वाटलं. तिनं सरळ गणपतीची आराधना केली. तिनं गणपतीला सांगितलं की, सीतेला इथे, आमच्या राज्यात बंदी बनवून ठेवलं आहे, ते मला मुळीच आवडलेलं नाही. यातून तू तिला सोडव.
खरंतर सुभगा ही रावणाची म्हणजे एका राक्षसाची मुलगी होती. पण तिची बाजू योग्य होती. म्हणून गणपतीनं तिचं ऐकलं. तुझ्या मनासारखं होईल, असं सांगितलं. सुभगेची इच्छा पूर्ण झाली.
हेही वाचाः
गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच
'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न
मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला?