२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना

३१ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


जगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांचा जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख.

जागतिकीकरणामुळे कुठल्याही देशाने घेतलेल्या राजकीय भुमिकेचा परिणाम जगभर होतो. प्रत्येक देशाची एक राजकीय भूमिका आहे, आणि तीच महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या त्या देशाच्या त्या त्या भूमिकेचा परिणाम जगावर होणार आहे. सरत्या वर्षात रोजच काही ना काही घडत होतं. पण काही अशा घटना घडल्या ज्यांची नोंद घेणं आवश्यक आहे. या घटना जगाच्या भविष्याच्या वाटचालीसाठी यू टर्न ठरणार आहेत.

१) रशिया, चीन आणि पाकिस्तान मैत्रीचा नवा अवतार

युरोपियन देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या निर्यात व्यापारात घट झालीय. परिणामी रशियात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. यातून बाहेर येण्यासाठी रशिया नवीन बाजारपेठेच्या शोधात होता. त्याचसाठी रशियाने गेल्या काही वर्षात चीन आणि पाकिस्तानकडे लक्ष केंद्रीत केलं होतं. याच रणनीतीचा भाग म्हणून २०१९ मधे रशियाने पाकला शस्त्रात्र पुरवठा करण्यास दुजोरा दिला.

चीनसोबतही व्यापारी करार अमलात आणण्यास सुरवात झाली. साऱ्या जगाचं लक्ष या नव्याने उदयास येणाऱ्या चीन-रशिया मैत्रीकडे आहे. कारण हे दोन बलाढ्य देश भविष्यात एकत्र आले तर ती नव्या राजकीय समीकरणांची नांदी असेल.

हेही वाचाः राष्ट्रपती राजवटीसाठी तत्पर असणारे राष्ट्रपती सिनेमाबद्दल उदासिन का?

२) युद्धखोर उत्तर कोरियाची चर्चेची तयारी

रशिया आणि चीन यांच्यात मैत्री आकार घेत असतानाच अमेरिकाही आपलं महाशक्तीपण दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर मोर्चेबांधणी करत आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात फरवरी २०१९ मधे चर्चेचा नवा अध्याय सुरु झाला. आपल्या हुकुमशाही वृत्तीसाठी जगविख्यात असणारे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन हे नेहमीच युद्धाची भाषा बोलत असतात. या पार्श्वभुमीवर किम जोंग आणि डोनॉल्ड ट्रम्प यांच्यात विएतनामच्या होनईमधे उच्चस्तरीय बैठक झाली.

उत्तर कोरियाबाबत यंदा आणखी एक विशेष घटना घडली. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोघं सख्खे शेजारी, सख्खी भावंड. पण दुसऱ्या महायुद्धाने विभागलेल्या या देशांमधे एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू असते. पण यंदा अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या देशांच्या बॉर्डरवर या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांची भेट घेतली. साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या या घडामोडींतून फार काही हाती लागलं नाही. पण युद्धखोर उत्तर कोरियाची चर्चेसाठी तयारी असते हा बाब जगासाठी दिलासा देणारी आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरिया, अमेरिका आणि भारत या चौकोनाचा पाचवा कोन आहे चीन. चीन यासाठी की उत्तर कोरिया संपूर्णतः चीनच्या कह्यात गेलाय. आज उत्तर कोरियामधे ९० टक्के वस्तू चीनी असतात. उत्तर कोरियाचा वापर चीनला लष्करी ठाण म्हणून करायचाय. आपल्या मांडलिक असणाऱ्या देशाच्या शेजारी म्हणजे दक्षिण कोरियात अमेरिकेने जास्त लक्ष घालू नये, असं चीनला वाटतं. यासाठी चीनने भारताला आपल्याजवळ घेण्याचे प्रयत्न चालवलेत. जगाच्या भौगोलिक नकाशावर नव्या समीकरणांची सुरू आहे.

३) ब्रिटनने लावला ब्रेक्झिटचा निकाल

युरोपमधला अत्यंत महत्त्वाचा देश ब्रिटनमधे डिसेंबर २०१९ मधे सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ब्रेक्झिटचे अडकलेले हाडूक अजूनही ब्रिटनला आपल्या गळ्यातून नीट काढून घेता आलेलं नाही. त्यामुळे ब्रिटीश जनतेचे प्राण कंठाशी आल्याची स्थिती तयार झालीय. आता लोकांनी मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पक्षालाच बहुमत देत एका अर्थाने ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिलाय. तरीही युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही.

हेही वाचाः फुटीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान आंदोलनांनी अस्वस्थ

४) अमेरिका आणि चीनमधलं राष्ट्रवादी व्यापार युद्ध

२०१९ मधलं बरचंसं जागतिक राजकारण हे अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध म्हणजेच ट्रेड वॉरभोवती फिरत राहिलं. भारतात पुन्हा एकदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या ट्रेड वॉरचा लाभ घेण्यासाठी दोन्ही देशांना चुचकारण्याचं धोरण अवलंबलं. दोन देशांतल्या हाणामारीत भारताने कुणाचीही बाजू न घेता आपला फायदा करून घेण्याचं धोरण राबवलं.

अमेरिका आणि चीन यांनी परस्परांच्या आयात वस्तूंवर २५ ते ५० टक्के सीमा शुल्क आकारणी सुरु केली. आणि इथून ट्रेड वॉरला सुरवात झाली. जागतिक व्यापार समीकरणं या ट्रेड वॉरमुळे बदलत आहेत. अनेक अमेरिकी कंपन्या या चीनमधून आपले उद्योगधंदे इतरत्र हलवत आहेत. अमेरिका फर्स्ट धोरणानुसार ट्रम्प हे चीनी मालच्या आयातीवर सीमा शुल्क वाढवताहेत. या धोरणाआडून ते चीनला आव्हान देत आहेत.

कारण चीन ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्याचप्रमाणे तिचा राजकीय, आर्थिक, लष्करी विकासाचा वेग भविष्यात अमेरिकेला आव्हान उभं करण्याची शक्यता आहे. चीननेही त्याला जशासतसं उत्तर देत आहे. यात ‘अमेरिका फर्स्ट’ या मुद्दावरून ट्रम्प पुन्हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न बघत आहेत. २०२० मधे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाची निवडणुक होऊ घातलीय. ट्रम्प यांनी पुन्हा सत्तेत यायचंय. त्यासाठी ते काही मुद्दे अमेरिकी राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करत आहेत.

५) इंटरनेटवर आता सरकारी डोळा

सरत्या वर्षात जगाला अचंबित केलंय रशियानं. इंटरनेटच्या महाजालातून अलिप्त होत रशियाने स्वतः स्वतंत्र वेगळं इंट्रानेट रूनेट २०२० मधे सुरू करत असल्याची घोषणा केलीय. एकप्रकारे सरकारी नियंत्रणाखाली रशियन लोक इंटरनेटचा वापर करणार अशी ही व्यवस्था आहे. लोकांच्या मानवी अधिकारावर, त्यांच्या व्यक्त होण्याच्या अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या या निर्णयाच्या यशस्वी चाचण्यांनी जगाला अचंबित केलंय.

हेही वाचाः 

उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

२०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

अर्थव्यवस्थेचं चाक मंदीच्या चिखलातून कधी बाहेर निघणार?

२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?

मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?