पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत.
पाच वर्षांतल्या कामाचा लेखाजोखा सांगण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली. तीन टप्प्यांत जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या यात्रेचा आज नाशिकमधे समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम झाला. खुद्द पंतप्रधानांची उपस्थिती असल्याने देशभरातल्या मीडियाने हा कार्यक्रम लाईव दाखवला.
पंतप्रधान मोदी यांनी तब्बल ५० मिनिटांचं भाषण केलं. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची जंत्री मांडली. मोदी सरकार २.० च्या शंभर दिवसाच्या कारभाराबद्दलही सविस्तर बोलले. राजकीय विरोधकांना टार्गेट करताना विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनिती कशी असणार याचे संकेतही त्यांनी आपल्या भाषणातून दिले. या भाषणाचे पाच अर्थ असे आहेत.
हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका दिवसाने काय सांगितलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला लागले की सविस्तर बोलतात. मीडियात त्यांच्या प्रत्येक वाक्याची ब्रेकिंग न्यूज होते. पण मास्टर स्ट्रोक म्हणतात ती हेडलाईन ते शेवटच्या काही मिनिटातच सांगतात. लोकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरणं हे त्यांच्या भाषणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आजच्या भाषणातही ते शेवटच्या काही मिनिटांतच निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या राम मंदिर प्रश्नावर बोलले.
मोदी म्हणाले, `अयोध्येतल्या राम मंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी काही बोलघेवडे लोक काहीबाही बोलत सुटलेत. देशातल्या सर्वच नागरिकांनी कोर्टाचा सन्मान करण गरजेचं आहे. प्रकरण कोर्टात असताना असा बोलघेवडेपणा करणारे लोक कुठून उगवतात? सर्व प्रकरणात अडथळा का आणला जातोय? आपला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, त्या संविधानावर आपला विश्वास हवा. न्यायव्यवस्थेवर विश्वास हवा. राम मंदिरावर सध्या जो काही बोलघेवडेपणा सुरू आहे, तो त्यांनी बंद करावा, अशी माझी त्यांना विनंती आहे.'
पंतप्रधानांचा मूळ हिंदी शब्द होता, बडबोले. ते तीनेक मिनिटं राम मंदिरावर बोलले. पण हे बोलताना त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. मोदींनी नाव घेतलं नसलं तरी ते कुणाबद्दल बोलताहेत हे स्पष्ट आहे. गेल्या सोमवारीच १६ सप्टेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे यांनी काश्मीरसारखंचं सरकारने राम मंदिराच्या निर्णयावर घेण्याची मागणी केली होती.
ठाकरे म्हणाले होते, 'राम मंदिरापासून आम्ही मागं हटणार नाही. हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. १९९० पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. अजून किती काळा थांबायचं? न्यायदेवतेनं लवकरात लवकर आपला निर्णय द्यावा. निर्णय यायला उशीर लागत असेल तर केंद्राने विशेष कायदा करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसं धाडसी पाऊल उचललं तसंच धाडसी पाऊल राम मंदिरासाठीही उचलण्याची गरज आहे.'
भाजप आणि शिवसेनेमधे विधानसभेच्या जागावाटपावरून तसंच मोठा भाऊ कोण यावरून तणातणी सुरू आहे. आता निवडणूक जाहीर व्हायला दोनेक दिवस राहिले असतानाच खुद्द पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता थेट टीका केलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे इन्स्टंट तलाक घेऊन वेगवेगळं लढू शकतात, याचे स्पष्ट संकेतच मोदींच्या भाषणातून मिळतात. किमान युतीत आलबेल नसल्याचं तर नक्कीच दिसतंय.
हेही वाचाः वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?
यात्रेला जाता न आलं तर यात्रेकरूंचा आशीर्वाद घेण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच मीही देवेंद्र फडवणीसांना नमन करण्यासाठी इथे आलोय, असं सांगत मोदींनी आपलं भाषण सुरू केलं. तसंच राज्य सरकारच्या विविध कामांचे दाखले दिले.
ते म्हणाले, ‘गेल्या ६० वर्षांत राजकीय अस्थैर्यामुळे महाराष्ट्राचा ज्या गतीने विकास व्हायचा होता, तो झाला नाही. पण फडणवीस यांनी बहुमत नसतानाही महाराष्ट्राला स्थिर सरकार, प्रगतीशील सरकार, आणि विकासशील सरकार दिलं. आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच स्थिर राजकारणाचा फायदा उठवण्यासाठी भाजपला सत्ता द्या.` पुढची निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वातच, यावर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केलंय.
‘हे फडणवीस सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या उत्थानाची कहाणी आहे. भाजपच्या नेतृत्वातलं प्रत्येक सरकार हे वेळोवेळी आपल्या कामाचं रिपोर्ट कार्ड जनतेला देतं. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाच सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहण्याची संधी मिळाली. आणि ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा वसंतरावांचा रेकॉर्डही मोडतील,’ असं सांगत मोदींनी फडणवीसच पुन्हा एकदा आपले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदीही टीका करताना सध्या तरी कुणाचंही नाव घेत नाहीत. टीका करताना उलटसुलट चर्चेला पूर्ण वाव ठेवतात. आजच्या सभेतही विरोधी पक्षांवर त्यांनी सडकून टीका केली. पण ही टीका करताना नाव घेतलं ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं. गेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदींनी शरद पवारांवरच शरदराव म्हणत आपलं टीकास्त्र सोडलं होतं.
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानविषयी एक विधान केलं होतं. त्यावरून भाजपने पवारांवर टीका केली. आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांनीही त्याचा उल्लेख केला. तोच धागा पकडून मोदी म्हणाले, ‘काँग्रेसचं कन्फ्युजन मी समजू शकतो. पण शरद पवारांसारखा नेताही मतांसाठी चुकीची विधान करतो, तेव्हा खूप वाईट वाटतं. शरद पवारांना शेजारचा देश खूप चांगला वाटतो, तिथलं सरकारही त्यांना खूप चांगलं वाटतं. पण अख्खा भारत, महाराष्ट्र आणि जगाला माहीत आहे, दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे.’
हेही वाचाः पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सरकारची कामगिरी सांगतानाच मोदी सरकार २.० च्या कामकाजाचे दाखले दिले. भाजपचं सरकार म्हणजे देशाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असतं असं सांगत मोदींनी काश्मीरच्या मुद्द्याला हात घातला. कलम ३७० नुसार देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेऊन आता पन्नासेक दिवस होताहेत. पण दीडेक महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून हाच प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, असे संकेत मोदींच्या आजच्या भाषणातून मिळाले.
मोदी म्हणाले, ‘आम्ही महाराष्ट्राबरोबरच देशाला वचन दिलं होतं. जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या अडचणींसाठी प्रयत्न करू. आज आम्ही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाऊल टाकलंय. हा केवळ सरकारचा निर्णय नाही, तर १३० कोटी भारतीयांचा निर्णय आहे. दिल्लीच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरला त्रास झालाय, ते बदलायचंय. तिथले तरुण, माता भगिनी या हिंसेतून बाहेर पडण्यासाठी मनाने तयार झालेत.’
भाजपचे उत्तर महाराष्ट्रातले सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणजे एकनाथ खडसे. ते मंचावर पहिल्या रांगेत बसले होते. पण त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमधे आलेल्या दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांना मात्र भाषणाची संधी देण्यात आली. तसंच माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचंही भाषण झालं. आरपीआयचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही छोटेखानी भाषणं झाली.
कधीकाळी निव्वळ खान्देश, उत्तर महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात भाजपच्या विस्तारासाठी झटलेल्या खडसेंना काही भाषणाचा चान्स मिळाला नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या एकनाथ खडसेंचं आता काय होणार? असा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं. कारण एकीकडे फडणवीसांचं कौतूक सुरू असताना पंतप्रधानांनी खडसेंचा साधा नामोल्लेखही केला नाही.
हेही वाचाः
शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय