पत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं

०३ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.

पांडुरंग रायकर हा सिस्टमचा बळी. व्यवस्थेचा बळी. आज अनेकांकडून ऐकलं. पण मला वाटतं पांडुरंगचा बळी नेमका का गेला याची पाच कारणं आहेत. त्यासाठी काही प्रमाणात आपणही सारे जबाबदार आहोत. मी एक सामान्य पत्रकार. सध्या कोणत्याही प्रस्थापित माध्यमांसोबत नाही. त्यामुळेच आज खूप आतून दाटून आलं. त्यामुळे समाजमाध्यमांच्या मुक्तपीठावर व्यक्त होतोय.

पांडुरंग रायकर. वय वर्ष ३०. माझा दोन चॅनलमधला तरुण सहकारी. सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला. हे वय नव्हतंच जायचं. खूप करायचं होतं त्याला. खूप काही. कधीही न चिडणारा. शांतपणे काम करत राहणारा. कुणी त्रास दिला तरी तक्रारही न करणारा. वेगळाच होता तो. आज सकाळी तो गेल्यावर पुण्यातील पत्रकारांना अश्रू आवरत नव्हते त्याचं कारण पांडुरंगचा स्वभाव. आपुलकीचं वागणं बोलणं. त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. कारण अनेक जवळच्या मित्रांनी, मोठ्या माणसांनी त्याच्याविषयी भरभरून बोलून झालंय. 

काही तर असेही असावेत की आज त्याच्या मृत्यूनंतरच ते बोलते झाले असावे, काल पुण्यातले पत्रकार पांडुरंगला वाचवण्यासाठी झगडत होते तेव्हा मात्र ते कुठेच नसतील. कदाचित पांडुरंग नावाचा एक पत्रकार त्यांच्या दृष्टीनं तेवढा महत्वाचाही नसावा. त्यामुळेच त्याच्या पुढे जात असं पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न आवश्यक! आपला एक पांडुरंग गेला, आणखी कुणाचा पांडुरंग होऊ नये. त्यासाठीच पांडुरंगचा बळी घेणारी कारणं तपासली पाहिजेत. 

कारण १ - जंबो फॅसलिटी म्हणजे पोकळ सांगाडेच!

पुण्यासारख्या महानगरात कोरोना अत्यवस्थ पेशंटला एका कोरोना उपचार केंद्रातून दुसऱ्या हॉस्पिटलमधे हलवण्यासाठी सुसज्ज ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसणं,  त्याचबरोबर कोरोना जंबो फॅसिलिटीच्या नावाखाली उभारली गेलेली मोठी केंद्रं. उद्घाटन झोकात. मिरवतात नेते. असतं काय? जर पुढच्या उपचाराची योग्य सोय नसेल, कोणत्या वॉर्डमधे, कोणत्या बेडवर कोणता रुग्ण आहे, याची धड नोंद नसेल, जर आपत्कालीन स्थिती उद्भवली तर इतरत्र हलवण्यासाठी सुसज्ज ऍम्ब्युलन्स नसतील  तर या तथाकथित जंबो फॅसलिटी म्हणजे पोकळ सांगाडेच! 

बालेवाडीच्याआधी त्याला हिंजवडी कोविड सेंटरला नेण्यात आलं. तिथं हाय प्रेशर ऑक्सिजनच नव्हतं. छातीत सूज असल्यानं फिजिशियननं इंजेक्शन दिलं. या पहिल्याच कारणावर आज सर्व प्रस्थापित माध्यमांचा भर राहिला. पण मुळात पांडुरंग पॉजिटिव असतानाही अहमदनगरहून पुण्यात का यावं लागलं तेही महत्वाचं आहे.

हेही वाचा : सुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं!

कारण २ - हजारो पैसे बळकवणारी धंदेवाईक हॉस्पिटल्स

पांडुरंग त्याच्या गावाकडे कोपरगावला गेला होता. तिथंही त्रास होतच असल्यानं तो कोपरगावच्या हॉस्पिटलमधे गेला. तिथं तपासणीसाठी अँटीजन किटच नव्हतं. कसंबसं ते काही तासांनी मिळालं. टेस्ट पॉजिटिव आली. हॉस्पिटलनं दाखल करून घेण्यासाठी ४० हजार आगाऊ रक्कम मागितली. त्याच्या पत्नीकडे दहा हजारच होते. अखेर त्याची पत्नी पांडुरंगला घेऊन पुण्याकडे निघाली. 

कोपरगावातल्या हॉस्पिटलसारखी हॉस्पिटल जी कंपनीनं दिलेलं कॅशलेस मेडिक्लेमचं कार्ड असतानाही तब्बल ४० हजाराची आगाऊ रक्कम मागतात. हा अनुभव सध्या हजारो जण घेतायत. एकीकडे जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणारे आरोग्यरक्षक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि दुसरीकडे हे धंदेवाईक ! पांडुरंगचा बळी जाण्यासाठी हेही जबाबदार!!

कारण ३ - सुरवातीच्या काळात दुर्लक्ष नको

तिसरं कारण खूपच महत्वाचं वाटतं. प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य सल्ला न मिळणं. योग्य उपचार न मिळणं. आजवर हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी सेवेतल्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की अनेकदा सुरवातीच्या टप्प्यात पेशंट काहीवेळा ज्या डॉक्टरांकडे जातात त्यांनी खूप दक्षता घेतली पाहिजे. जर वेळेत कोरोना टेस्टच्या जोडीनं संशय येत असेल तर छातीचे सिटी स्कॅन केले पाहिजे. 

पांडुरंगला ताप आल्यानंतर सात दिवसांनी एक चाचणी झाली. ती निगेटिव आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो श्रीरामपूरला गेला. तिथं अँटिजन टेस्ट पॉजिटीव आली. हे सारंच विचित्र वाटतंय. चौकशी गरजेची आहे. नेमके हे महत्वाचे दहा दिवस त्याचा संसर्ग जास्त वाढवणारे ठरल्याची शक्यता, वन रुपी क्लिनिकच्या डॉ. राहुल घुले यांनीही व्यक्त केली. ज्याअर्थी ऑक्सिजन पातळी ७८ च्याही खाली गेली त्याचा अर्थ संसर्गानं फुप्फुसाची हानी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त झाली असण्याची शक्यता होती, असंही ते म्हणाले. 

त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक पेशंटकडे जनरल प्रॅक्टिसनरनी संशयानंच पाहावं. तात्पुरती औषधं देऊ नये. त्यामुळे तापासारखं लक्षण जाईल, पण कोरोना संसर्ग मात्र वाढेल, असं ते म्हणाले. सरकारने जनरल प्रॅक्टिसनरसाठी असे पेशंट आल्याची माहिती त्वरित स्थानिक आरोग्य यंत्रणेला कळवणं बंधनकारक असावं. जर नसेल तर त्वरित तसं केलं जावं, अशी मागणीही डॉ. घुले यांनी केली. कोरोना उपचाराच्या दृष्टीनं सुरुवातीचे हे दिवस गोल्डन अवर, पांडुरंगच्या बाबतीत तिथं अक्षम्य दिरंगाई झाली, असं दिसतंय. 

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कारण ४ -  स्पर्धा नसती तर ताणही कमी असता

पांडुरंग रायकरला कोरोना झाला तो धोकादायक परिस्थितीत फिरल्यामुळे हे नाकारताच येणार नाही. टीवी 9 असो किंवा अन्य कोणतंही चॅनल आपल्या कर्मचाऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे प्रयत्न कंपनीचं धोरण म्हणून असतातच. प्रसंगी नुकसान सहन करुनही. मात्र, तरीही पत्रकारांना व्यावसायिक जबाबदारीमुळे धोकादायक स्थितीत फिरावं लागणं, हे अपरिहार्यच असतं. कोणी कितीही नाकारलं तरी दर गुरुवारी येणारे बार्कचे आकडे हे टीवी पत्रकारितेसाठी साप्ताहिक तणावाचं कारण असतंच असतं. अपरिहार्य असं. त्यामुळेच खरं तर कोरोना संकटकाळात बार्कची रेटिंग सिस्टम कोरोना संकट काळापुरती स्थगित करणं आवश्यक होतं. 

अनेकांना बाहेरून वाटतं चॅनलना काय, कोण विचारतंय? मात्र चॅनल ब्रॉडकास्टर्स संघटनांकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारी, अगदी कुसळाचंही मुसळ करणाऱ्याही असतात. त्यांना पुराव्यासह उत्तरं देणं सोपं नसतं. त्याच संघटनांना रेटिंगबाबतीत स्थगितीचा निर्णय घेणं आवश्यक वाटलं नाही. स्पर्धा नसती तर ताणही कमी असता. तशी मागणीही झाली. पण दुर्लक्ष केलं गेलं. चॅनलमधील पत्रकारांना कामाशिवाय पर्याय नव्हता. थोडक्यात चॅनलकडून कितीही काळजी घेतली गेली तरी धोकादायक स्थितीत काम करणं अपरिहार्यच होतं. 

कारण ५ - माध्यमांना लक्ष्य करून बदनामीचे प्रयत्न

मला स्वत:ला पांडुरंग रायकर सारख्या तरुण पत्रकाराचा बळी जाण्यासाठी राजकारण हेही सर्वात महत्वाचं कारण वाटतं. खटकेल, खुपेल अनेकांना पण हे सत्यच आहे. टीवीच्या रेटिंगप्रमाणेच कोरोना संकटकाळात राजकारणही थांबणं गरजेचं होतं. पण ज्या देशात राजकारण हेच अनेकांचा फुलटाइम उद्योग असतो तिथं तसं घडणं अशक्यच होतं. 

जबाबदार राजकीय नेत्यांनी बेजबाबदारीनं गर्दी जमवत आंदोलनं करत धोकादायक परिस्थिती निर्माण करणं कधीच समर्थनीय मानलं जाऊ शकत नाही पण तसं सातत्यानं घडलं. घडतंय. अपवाद कुणाचाच नाही. कुणी आंदोलनांसाठी तर कुणी राजकीय कार्यक्रमांसाठी गर्दी जमवण्याचा बेजबाबदारपणा केलाच केला. त्यामुळे पत्रकारांनाही अशा धोकादायक गर्दीच्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. यूट्युब, फेसबुक लाइवचा पर्याय असतानाही पत्रकार परिषदा घेण्याची हौसही अशीच धोकादायक. पण भागवली गेली. भागवली जात आहे.

दुसरीकडे कोरोना आरोग्य सुविधा नाहीत म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे आपल्या विभागात होऊ घातलेल्या कोरोना सुविधा केंद्रांना विरोध करण्याचेही राजकीय उद्योग बरेच झाले. माध्यमांनी संयम बाळगला. कोरोना जागतिक आपत्ती असल्याची जाण ठेवत गल्लीतील ठाकरे सरकार असो वा दिल्लीतील मोदी सरकार दोष देणं टाळलं. तर माध्यमांनाही लक्ष्य करून बदनामीचे प्रयत्न सुरुच आहेत. 

हेही वाचा : महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

आपणही घेतलाय पांडुरंगचा बळी 

सकाळपासून पांडुरंग रायकरचा बळी कुणी घेतला यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवताना दिसतात तेव्हा मनाला वेदना होतात. किमान तरुण पत्रकाराच्या मृत्यूवर तरी राजकारण नसावं. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन राजकीय पक्षांनी पांडुरंगच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली. किमान एक छोटा दिलासा मिळाला. तेवढ्यानं जीवन निघणार नाही. अजून खूप करावं लागेल. पण काही तरी झालं.

गेलेला पांडुरंग परत येणार नाही. पण किमान आता आणखी एखादा पांडुरंग नको. त्यासाठीच आपण सर्वांनी गंभीरतेनं ही पाच कारणं म्हणजे आपणही सोसलेले, दुर्लक्षानं पोसलेले आपल्याही सर्वांचे दोष असल्याचं समजून घेणं आवश्यक आहे. सकाळपासून सांगितलं जातंय. पांडुरंगचा व्यवस्थेनं बळी घेतला. मग ही व्यवस्था. म्हणजे सिस्टम. असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे. पांडुरंगचा बळी आपणही घेतला असं मी म्हणतो ते त्यामुळेच. जर सिस्टम बदलायची असेल तर आपणच आधी बदलावं लागेल.

हेही वाचा : 

अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!

पोलिस कोठडीत मरणाऱ्या जगन्नाथांच्या पोरांचं काय करायचं, मिलॉर्ड?

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

 

(तुळशीदास भोईटे ज्येष्ठ पत्रकार असून हा लेख त्यांच्या ब्लॉगवरून घेण्यात आला आहे. )