तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.
हैदराबाद महानगरपालिकेसाठी १ डिसेंबरला मतदान झालंय. उद्या निकाल लागेल. टीआरएस, एमआयएम, भाजप आणि काँग्रेस हे पक्ष वेगवेगळे लढलेत. मतदानही ३५ टक्क्यांच्या आसपास झाल्यामुळे कुणाला फटका आणि कुणाचा फायदा झाला हे उद्याच कळेल. भाजपनं आपले बडे नेते प्रचारात उतरवत आपली पूर्ण ताकद निवडणुकीत लावली. मोदी-शहा यांच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे प्रत्येक निवडणूक पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने लढवली जाते. ती जिंकण्याचे पक्षाचे स्वतःचे असे फॉर्म्युले आहेत.
कर्नाटक सोडलं तर दक्षिणेकडे मात्र हवा तितका विस्तार भाजपला करता आलेला नाही. तिथले तिथले प्रादेशिक पक्ष, नेते प्रबळ असल्यामुळे हा प्रयत्न फसला. त्यामुळे हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक आपल्यासाठी संधी असल्याचं नेतृत्वाला वाटतंय. धार्मिक ध्रुवीकरणाची स्ट्रॅटेजीही आखण्यात आलीय. त्यात यश मिळालं तर त्याचाही फायदा येणाऱ्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत होईल असंही नेतृत्वाला वाटत असावं. त्यामुळे ही निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केलीय.
हेही वाचा: आता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा
११९ सदस्य असलेल्या तेलंगणा विधानसभेत भाजपचे केवळ दोन आमदार आहेत. तर लोकसभेत १७ पैकी ४ खासदार. अशी परीस्थिती असताना नेहमीप्रमाणे भाजपच्या नेतृत्वानं आपली पूर्ण ताकद निवडणुकीत लावली. अर्थात भाजप नेतृत्वाला प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते. तशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखली जाते. कार्यकर्त्यांना रसद, बळ दिलं जातं. पण तेलंगणातल्या एका पोटनिवडणुकीतल्या विजयानं भाजपमधला हुरूप आणखी वाढवला. आपण जिंकू शकतो ही आशा निर्माण केली.
मागच्याच महिन्यात तेलंगणाच्या दुब्बाक विधानसभा जागेसाठी पोटनिवडणुकीत झाली. मुख्यमंत्री असलेल्या चंद्रशेखर राव यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची होती. कारण चंद्रशेखर राव यांच्या मतदारसंघाला लागून हा मतदारसंघ आहे. त्यामुळे सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती अर्थात टीआरएसचा हा गढ समजला जातो. पोटनिवडणुकीत मात्र भाजपच्या के एम रघुनंदन राव यांनी टीआरएसच्या उमेदवाराचा पराभव केला. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या पक्षाची निवडणुक स्ट्रॅटेजी ठरवणारे त्यांचे भाचे हरीश राव यांच्यासाठी हा धक्का होता.
अर्थात या एका जागेमुळे सरकार पडेल असं नाही पण विजयामुळे भाजपची ताकद वाढलीय. मागच्या वेळी दुब्बाक या मतदारसंघात भाजपला १३.७५ टक्के मतदान झालं होतं. पोटनिवडणुकीत मात्र एकूण मतदानापैकी ३८.५ टक्के मतं भाजप उमेदवाराच्या पारड्यात पडलीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते दोघांचा आत्मविश्वास वाढवणारी घटना आहे. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वानं ही निवडणूक म्हणजे तेलंगणा विधानसभेतला मार्ग असल्याचं म्हटलं होतं.
देशात ज्या काही मोठ्या महापालिका आहेत त्यात हैदराबाद महापालिकेचाही नंबर लागतो. या महापालिकेत हैदराबाद, मेडचल-मलकजगिरी, रंगारेड्डी, संगारेड्डी असे एकूण चार जिल्हे येतात. या जिल्ह्यांमधे तेलंगणा विधानसभेचे २४ मतदारसंघ तर ५ लोकसभेच्या जागा आहेत. हैदराबाद महापालिकेचे एकूण १५० वॉर्ड आहेत. ५ हजार कोटीचं भरभक्कम वार्षिक आर्थिक बजेट असलेली ही महापालिका आहे. त्यामुळे टीआरएस, एमआयएम, भाजप, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांसाठी ती महत्वाची ठरतेय.
तेलंगणा राज्याच्या जीडीपीचा मोठा हिस्सा ही महापालिका देते. त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळवणं म्हणजे तेलंगणाच्या विधासभेत बहुमताच्या आकड्या पर्यंत पोचणं आहे असं मानलं जातं. याआधी २०१६ ला झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या एकूण १५० जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समितीला ९९ जागा, एमआयएम ४४, भाजप ४, आणि काँग्रेसला २ जागांवर विजय मिळाला होता. तर पुढच्या विधानसभेला तेलंगणा राष्ट्र समिती आणि एमआयएम यांची सत्ता आली होती.
हेही वाचा: भेकडाचे शौर्य सांगणाऱ्या मंदिर निर्माणाच्या आठवणींनी सत्य लपवता येतं
हैदराबाद महापालिकेच्या निवडणूकीत आपल्या नेहमीच्या अंदाजात भाजपने आक्रमकपणे प्रचार केला. अनेक स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली. भाजपचे 'राजकीय चाणक्य' म्हणून ओळख असलेले गृहमंत्री अमित शहा थेट प्रचारात उतरल्यामुळे एक वेगळा माहोल तयार झाला. त्याची देशभर चर्चा झाली. ध्रुवीकरणाची गणित मांडून योगी आदित्यनाथ यांच्या सारखा आक्रमक चेहरा मैदानात उतरवला गेला. त्यांनी आपल्या प्रचारसभेत सत्तेत आलो तर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्याची घोषणाही केली.
दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर पासून भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेल्या तेजस्वी सूर्या यांच्या पर्यंत सगळेजण प्रचारात उतरले. त्रिपुरासारख्या राज्यात जे घवघवीत यश मिळालं तसं काही होण्याची अपेक्षा भाजप नेतृत्वाला आहे. पक्षाचे महासचिव असलेल्या भुपेंद्र यादव यांच्याकडे या निवडणुकीची सूत्र देण्यात आली. महापालिकेसारख्या निवडणुकांमधे स्थानिक मुद्दे असायला हवेत पण स्टार प्रचारक मैदानात आणून त्याला राष्ट्रीय निवडणुकीचा फील देण्यात आला.
तेलंगणा राष्ट्र समिती आणि एमआयएम सध्या राज्यात सत्तेत आहेत. या दोघांनाही शह देणं तितकं सोप्प नाहीय याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळे पद्धतशीर स्ट्रॅटेजी आखून आपले पाय तेलंगणात कसे रोवता येतील आणि आपलं केडर उभं करता येईल याकडे भाजपचं लक्ष आहे. २०१८ मधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एका जागेवर विजय मिळाला होता. तर लोकसभेत भाजपला ४ जागा, काँग्रेसला ३, एमआयएम १ जागा मिळाली. तर पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे आत्मविश्वास वाढला.
अशातच टीआरएस आणि एमआयएम सत्तेत असल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि भाजप असे दोघेच उरतात. नेते, कार्यकर्ते यांच्यातल्या समन्वयाच्या अभावामुळे काँग्रेसची सध्याची स्थिती देशभर अतिशय निराशाजनक आहे. दुब्बाक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या नंबरवर होती. ती स्पेस भरून काढण्यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून भाजप जागोजागी उभी राहतेय. तेलंगणा त्याला अपवाद नाही. हरलो तरी मुख्य विरोधी पक्षाची जागा आपण घेऊ असा विश्वास नेतृत्वाला वाटतोय.
दुसरीकडे मागच्या हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने टीआरएसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपला मुलगा केटी रामा राव याला पुढं आणलं. महापालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. पक्षात केटी रामा राव यांचं महत्व वाढावं यासाठीच ही स्ट्रॅटेजी होती असं म्हटलं जातं. दुसरीकडे टीआरएसमधे चंद्रशेखर राव यांचे भाचे हरीश राव यांचा दबदबा अधिक आहे.
दुब्बाक विधानसभेच्या पोटनिवडणुकीची जबाबदारी हरीश राव यांच्याकडे देण्यात आली होती. टीआरएसच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे हरीश आपोआप बाजूला पडले. त्यामुळे भविष्यात काही झालं तर जिथं बंडाळी तिथं आम्ही या धोरणाप्रमाणे आपली स्पेस तयार करायचा प्रयत्न भाजप करेल. त्यातून काँग्रेस, टीआरएसमधलं अंतर्गत राजकारण आपल्या पथ्यावर कसं पडेल अशा प्रयत्नात पुढच्या काळात भाजप नेतृत्व असेल.
हेही वाचा: मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?
धार्मिक, जातीय ध्रुवीकरण घडवण्यात भाजपचा हातखंडा आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा आक्रमक चेहरा मैदानात उतरवून धार्मिक अजेंडा रेटण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या प्रचाराच्या भाषणात आदित्यनाथ यांनी सत्ता आली तर हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करू असं म्हटलंय. हैदराबाद महापालिकेची एकूण लोकसंख्या ८२ लाख इतकी आहे. त्यात ६५ टक्के हिंदू तर ३० टक्के मुस्लिम आहेत. या आकड्यांमुळे भाजपचा आत्मविश्वास दुप्पट झाला.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, एकट्या हैदराबादमधे १० विधानसभेच्या जागा आहेत. इथं ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा हा गढ समजला जातो. मागच्या विधानसभेत त्यांचे इथून १० पैकी ७ आमदार निवडून आले होते. आताच्या निवडणुकीत ओवेसी यांनी केवळ हैदराबादमधल्या ५१ जागेंवरच आपले उमेदवार उभे केलेत. तर भाजप आणि टीआरएसही स्वतंत्र लढतायत.
अनेक ठिकाणी टीआरएस आणि एमआयएम एकमेकांच्या विरोधात आहेत. मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा थेट आपल्याला होईल असं भाजपला वाटतंय. त्यामुळे प्रचारात स्थानिक मुद्यांपेक्षा बांगलादेश, रोहिंग्या मुसलमान, पाकिस्तान असे मुद्दे आणण्यात आले. या मुद्यांभोवती निवडणूक कशी फिरेल याचा प्रयत्न भाजप नेतृत्वानं केला. पण केवळ ३५ टक्के मतदान झाल्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाच्या डावात भाजप यशस्वी होतंय की टीआरएस आणि एमआयएम आपले गड राखतायत ते पहावं लागेल.
हेही वाचा:
जो बायडन टीमवर ओबामा काळाचा प्रभाव?
कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं?
इम्रान खान यांचा राजकीय बळी देणार पाकिस्तानी लष्कर?
कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय
डॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते