फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

०४ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


खुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्या मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय.

मध्यपूर्व आशिया असा शब्द उच्चारला तरी लगेचच डोळ्यासमोर किंवा डोक्यात दहशतवाद येतो. कारण गेल्या काही दशकांपासून आपल्या कानावर, डोळ्यावर आणि मेंदूवर फक्त मध्य पूर्व आशियात होणारे बॉम्बस्फोट, गोळीबार, लष्करी कारवाई, युद्ध, जिहाद यांचा भडिमार होतोय. दहशतवाद आता फक्त मध्यपूर्व आशियाची मक्तेदारी राहिलेला नाही. त्याने आता वैश्विक रुप धारण केलंय. याची दोन ताजी उदाहरणं म्हणजे न्यूझीलंडच्या ख्रिईस्टचर्च इथल्या मशिदीत एका कट्टर ख्रिश्चन माथेफिरूने केलेला नरसंहार. त्यानंतर त्याचा बदला म्हणून श्रीलंकेतल्या उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांनी उडवलेली चर्च.

साधारणतः २०१४ नंतर आयसीस या दहशतवादी संघटनेच्या उदयानंतर हा कट्टर धार्मिक दहशतवाद आपण कल्पनाही करु शकत नव्हतो त्या प्रमाणात युरोपात येवून ठेपला. सध्याच्या घडीला युरोपामधलं वातावरण तणावपूर्ण झालंय. विशेषतः मुस्लिम आणि मध्यपूर्व आशियातून युरोपात गेलेल्या लोकांबद्दल स्थानिक ख्रिश्चन लोकांच्या मनात कायम साशंकता आणि संशय असतो.

हेही वाचाः कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

एका मुस्लिम प्लेअरची कमाल

पण नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल फायनलनंतर एका मुस्लिम प्लेअरनं हे वातावरण क्षणात बदलून टाकलं. हे युरोपियन लोक या खेळाडुच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी चक्क आम्हीही आता मुस्लिम धर्म स्विकारू असं म्हणलंय. या मुस्लिम प्लेअरचं नाव आहे मोहम्मद सालाह. युरोपियन्स या इजिप्शियन फुटबॉलपटूच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी त्याच्यावर स्लोगन वजा कविताच केली.

‘If he scores another few,
Then I’ll be Muslim too…
If he’s good enough for you,
He’s good enough for me,
Then sitting in a mosque, is where I wanna be
Mo Salah-la-la-la-lah! Mo Salah-la-la-la-lah!’   

या कवितेचा अर्थ साधारणतः असा होता.

‘तू अजून काही गोल केलेस
तर आम्हीही मुस्लिम होवू
जर तो तुझ्यासाठी चांगला आहे,
तर तो माझ्यासाठीही चांगलाच आहे,
मग मी मशिदीत बसेन, याच्या शिवाय मी कोठे असेन
मो सालाह ला ला ला ला लाह! मो सालाह ला ला ला लाह!

सालाहच्या कामगिरीनं बदलवला दृष्टिकोन

लिवरपूल आणि टॉटेनहॅम यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या फायनलमधे दुसऱ्याच मिनिटाला मोहम्मद सालाहने पेनाल्टीवर गोल मारत लिव्हरपूलला दणक्यात सुरवात करुन दिली. त्यामुळे लिव्हरपूलच्या चाहत्यांना १४ वर्षानंतर युरोपियन लीगचे टायटल दृष्टीपथात दिसू लागलं. त्यानंतरच लिव्हरपूलच्या चाहत्यांनी सालाहच्या नावाने कसिदे पढायला सुरवात केली. ज्या युरोपात धार्मिक कट्टरतावादानं मूळ धरलंय. त्याच युरोपातले हजारो लोक एका मुस्लिम प्लेअरचे गोडवे गाताहेत हे वाचून विशेष वाटलं. कारण सध्याची वैश्विक परिस्थिती पाहता मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोनच या सालाहने बदलला.

हेही वाचाः पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

मोहम्मद सालाहची क्रेझ का वाढतेय?

सालाहकडे रोनाल्डो आणि मेसी सारखं स्टारडमही नाही. स्टार फुटबॉलरला शोभेल अशा त्याच्या लाईफस्टाईलची चर्चाही कधी ऐकली नाही. मग युरोपातले लोक त्याच्यावर एवढे का फिदा आहेत? याचं कारण त्याच्या चाहत्यांनीच दिलंय. त्याचं साधं राहणीमान, कौटुंबिक अशी असलेली त्याची प्रतिमा आणि त्याचा विनम्रपणा यामुळे त्याची क्रेझ वाढत चाललीय. त्याच्या या प्रतिमेमुळे गेल्या काही काळापासून युरोपात मुस्लिमांबद्दल तयार झालेल्या एकसुरी प्रतिमेला छेद मिळतोय.

एकंदर चाहत्यांच्या बोलण्यावरुन सालाहचं मुस्लिम वर्जन हे जास्त आकर्षक आहे. सालाह हा मध्य पूर्व आशियातल्या अशा मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतोय जो मुस्लिम कधी जगासमोर आलाच नाही. हाच मोहम्मद सालाह सध्या जगात निर्माण झालेले मुस्लिमविरोधी वातावरणाचे ढग दूर करण्यासाठी आशास्थान बनलाय. त्यामुळे खेळाने दोन देशातलं वातावरण बदलत नाही असं वाटतं, त्यांना सालाहने एक आदर्शच घालून दिलाय.

चाहत्यांकडून थेट इजिप्तच्या अध्यक्षपदासाठी मोहोर

मोहम्मद सालाहने हजारो युरोपियनांना त्याच्यावर प्रेम करायला लावले. त्याने युरोपात मुस्लिम धर्माची मलिन झालेली प्रतिमा काही प्रमाणात बदलवली. गेल्यावर्षी फिफाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने त्याला हुलकावणी दिली. पण लिवरपूलच्या युरोपियन चाहत्यांनी त्याला याच्यापेक्षा मोठा प्रेमाचा पुरस्कार दिलाय.

इजिप्तमधे त्याची क्रेझ इतकी आहे की त्याने देशाचा अध्यक्ष व्हावा म्हणून जवळपास १० लाखांच्यावर लोकांनी मतं दिली होती. खरंतर तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभाही नव्हता. याचाच अर्थ की इजिप्तमधली जवळपास ७ टक्क्यांच्यावर लोकांनी प्रस्थापित राजकारणाला नाकारत एका वेगळ्याच आणि खऱ्या मुस्लिम चेहऱ्यावर आपली पसंतीची मोहर उमटवली होती.

कारण इजिप्तमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पारदर्शकता नसल्याचे आरोप झाले होते. त्याने इजिप्तमधे अंमली पदार्थाच्या सेवनाविरोधातील मोहिमेत भाग घेतल्यानंतर इजिप्तमधील अंमली पदार्थ सेवनापासून सुटका करून घेण्यासाठी उपचार करणाऱ्यांमधे जवळपास ४०० पटीने वाढ झाली होती. यावरुन सामान्य मुस्लिमांचा कौल कोणाला आहे? त्यांची मुस्लिम म्हणून कोणती प्रतिमा असावी याचे उत्तर त्यांनी आपल्या क्रियेतून ‘बाद झालेल्या मतांमधून’ दिलंय.

हेही वाचाः 

चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका

वंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं?