जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला.
अमेरिकन कार कंपनी फोर्डनं आता भारतात कार बनवणं बंद करण्याची घोषणा केलीय. फोर्ड कंपनीनं म्हटलंय की, भारतीय बाजारपेठेत स्थिर स्थान निर्माण करण्याचे कंपनीचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे फोर्डकडून हा निर्णय घेण्यात आलाय. १४१ वर्षांच्या या 'ग्लोबल ब्रँड' कंपनीला भारतातून आपला गाशा गुंडाळण्याची वेळ आलीय.
यापूर्वी जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसन या दोन कंपन्यांना भारतातलं आपलं उत्पादन बंद करावं लागलं. फोर्ड ही अशी भारतातली तिसरी कंपनी आहे. देशाला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवायचं स्वप्न दाखवणाऱ्या 'मेक इन इंडियालाही' हा मोठा धक्का समजला जातोय.
कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच अर्थव्यवस्थेला फटका बसलाय. अशात या बंद पडणाऱ्या कंपन्यांमुळे हजारो कर्मचारी बेरोजगार होतील आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. पण फोर्डला भारतीय बाजारपेठांची आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज आला नसल्याचं म्हटलं जातंय. पण ते कितपत खरंय?
हेही वाचाः लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
अमेरिकन फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचं उत्पादन करणारी कंपनी आहे. फोर्ड कंपनीचं मुख्य कार्यालय अमेरिकेतल्या मिशिगनमधल्या डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न भागात आहे. अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी १६ जून १९०३ ला या कंपनीची स्थापना केली.
हेन्री फोर्ड यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. जेमतेम सहावी पर्यंतच शिक्षण घेतलेल्या हेन्रीला मशीन दुरुस्त करायची आवड होती. ज्या वयात मुलं प्लास्टिक आणि रब्बरी खेळण्यांसोबत खेळतात त्या वयात हेन्री फोर्डनं लोखंडाच्या मशीनीसोबत खेळायचा. चार चाकी गाडी बनवण्याचा प्रयोग करायचा.
१८९३ मधे त्यांनी प्रत्यक्षात चार चाकी सायकल बनवली. तीन वर्षांनी या सायकलला एक इंजिन जोडून रस्त्यावर इंजिनची चार चाकी सायकल चालू लागली. त्यानंतर चार चाकी गाडीही बनवली. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात त्याची किंमत ठेवून फोर्डच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरवात झाली.
'जर यशाचं कोणतं एक रहस्य असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्यात आणि त्याच्या आणि आपल्या नजरेतून गोष्टीकडे पाहण्याच्या क्षमतेत आहे.' असं म्हणत कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांच्या कंपनीचा प्रवास सुसाट सुरू झाला.
अमेरिकन जनरल मोटर्सनंतर सर्वांत जास्त प्रसिद्ध मोटार कंपनी म्हणून फोर्डची जगभर ओळख निर्माण झाली. भारतात आज कंपनीकडे जवळपास ४० हजार तर जगात २ लाख १३ हजारच्या आसपास कर्मचारी आहेत. अनेक देशांमधे फोर्ड कंपनी उत्पादनाचं केंद्र बनलंय.
जगातल्या एकूण गाड्यांच्या विक्रीत कोरियन किया मोटर कार्स, टोयोटा, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन या टॉप चार कंपन्या आहेत. त्यांच्या नंतर फोर्ड ही जगातली पाचवी मोठी ब्रँड कंपनी म्हणून ओळखली जातेय. तर अमेरिकेत ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी आहे.
हेही वाचाः मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?
१९३० मधे हेन्री फोर्डनं ऑटोमोबाईल जगाला 'असेंब्ली लाईन' या नावानं एक अनोखी भेट दिली. ही अशी उत्पादन प्रक्रिया आहे ज्यात उत्पादनाशी संबंधित पार्ट पूर्वनियोजित क्रमानं एकत्र केले जातात. जास्तीत जास्त सुविधायुक्त, कमी वेळ, आणि श्रमाच्या बचतीसाठी पार्टच्या क्रमावारीचा यात विचार केला जातो. कामगार, मशीन आणि कन्वेयर बेल्ट यांच्या सुयोग्य रचनेचा महत्वाचा सहभाग दिसून येतो. यामुळे कार निर्मितीला वेग आला आणि उत्पादन प्रक्रियेच्या क्षमतेत वाढ झाली.
कार निर्मितीला वेग आला. गाड्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता वाढवणं शक्य झालं. याचा फोर्ड कंपनीला फायदाच झाला. फोर्डच्या कारचं वार्षिक उत्पादन दुप्पट झालं. कंपनीचा नफा ३ कोटी डॉलरवरून ६ कोटी डॉलरपर्यंत पोचला.
या सगळ्या बदलांमुळे अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर फक्त फोर्ड कंपनीच्या गाड्यांचा डंका वाजू लागला. कंपनीचं सगळीकडे नाव झालं. असं म्हटलं जातं की, १९९८ मधे अमेरिकेतल्या निम्म्याहून अधिक कार फक्त फोर्डच्या होत्या.
१९९० चं दशक होतं. केंद्रात नरसिंहरावांचं सरकार सत्तेत होतं. नरसिंहराव सरकारनं 'खाउजा' म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं. आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम देशात लागू केला. यामुळे जागतिक स्तरावरच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतातल्या मुक्त बाजारपेठेचा मार्ग खुला झाला. या कंपन्याही अशाच संधीच्या शोधात होत्या.
रेनॉल्ट, ह्युंदाईसारख्या अनेक कार कंपन्या भारतात येत होत्या. या रांगेत फोर्ड कंपनीचाही समावेश होता. फोर्ड १९९५ मधे भारतात पोचली. फोर्डनं महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीसोबत १९९६ मधे पार्टनरशिप केली आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. भारतात कंपनीचं मुख्यालय चेन्नई शहरात उभं राहिलं. इथूनच पहिल्यांदा कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाला सुरुवात झाली.
असं म्हटलं जातं की, तेव्हा महिंद्राकडून फोर्ड कंपनीकडे महाराष्ट्रात प्लांट उभा करण्याचा आग्रह धरला गेला होता. तत्कालीन महाराष्ट्र सरकारचाही या प्रकल्पाला पाठिंबा होता. पण यात तामिळनाडूनं बाजी मारली. त्यावेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना असं सांगितलं गेलं होतं की, कोणत्याही किमतीवर फोर्ड कंपनी आपल्याच राज्यात यायला हवी.
फोर्डला तामिळनाडूला जाणं योग्य वाटलं. त्याचं कारणही तसंच होतं. त्यावेळी देशात वाहन निर्मितीसाठी लागणारे एक तृतीयांश ऑटोमोबाईल पार्ट्स तामिळनाडूमधे बनवले जायचे. त्यामुळे फोर्डला हे अनेक अंगांनी सोयीस्कर ठरणारं होतं. अशा प्रकारे फोर्ड कंपनीच्या भारतातल्या प्रवासाला पहिल्यांदा तामिळनाडूतून सुरवात झाली.
हेही वाचाः १५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं
फोर्डनं महिंद्रा कंपनीच्या सोबतीनं पहिली एस्कॉर्ट कार लाँच केली. पण ही कार फार काळ टिकू शकली नाही. यानंतर १९९९ मधे फोर्डकडून आयकॉन कार लाँच करण्यात आली आणि नंतर आणखीन १२ ब्रँडच्या कार लाँच केल्या. यातली अनेक मॉडेल लोकांमधे लोकप्रियही झाली.
भारतात इकोस्पोर्ट्स, फोर्ड फिगो या गाड्या अजूनही रस्त्यावर आरामात बघायला मिळतात. यातल्या काही गाड्यांचा अपवाद सोडला तर फोर्डच्या बहुतेक गाड्यांचा मामला फ्लॉप ठरला. अशातच कंपनीनं या २५ वर्षात भारतीय बाजारपेठांमधे आपलं मजबूत बस्तान बसवण्यात अपयशी ठरली.
गेल्या आर्थिक वर्षातल्या काही आकड्यांवर नजर टाकली तर फोर्डकडून एका वर्षात फक्त ४८ हजार गाड्यांची विक्री झालीय. म्हणजेच देशात विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येच्या १.८४ टक्के इतकं अल्प प्रमाण होतं.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत फोर्डच्या केवळ १५ हजार ८१८ गाड्यांची विक्री झालीय. तर दोन वर्षांपूर्वीच भारतात आलेल्या कोरियन किया कंपनीनं सुमारे ७४ हजार गाड्यांची विक्री केलीय. तर लॉंचिंगपासून आतापर्यंत ३ लाख गाड्या विकल्यात.
भारतासारख्या विकसनशील देशात फोर्ड कंपनीला आपलं मजबूत असं स्थान निर्माण करता आलं नाही. याच कारणही तसंच आहे. कारण फोर्ड ही मुळात अमेरिकन कंपनी आहे. त्यामुळे अमेरिकन आणि भारतीय बाजारपेठांतली नेमकी गरज कोणती? या दोन्ही देशातल्या आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा हा फरक कंपनीला नीट समजू शकला नसावं.
हा फरक समजून घेण्यासाठी हॉलीवूडपटातल्या दणकट गाड्या आणि बॉलीवूड सिनेमातल्या गाड्या बघू शकता. त्या अनुषंगाने आपल्या आणि त्यांच्या विकासात असणारा जमीन आस्मानचं अंतर. अमेरिकन गाड्यांचा आकार, इंजिनची गुणवत्ता आणि पावर, आरामदायी आणि सुरक्षित कारला अधिक मागणी असते. तिथल्या प्रत्येक व्यक्तीनुसारचं उत्पन्नही कितीतरी अधिक आहे. त्यामुळे ते गाड्यांसाठी वाटेल ती किंमत मोजू शकतात. तिथं पैसा महत्वाचा ठरत नाही. पण बहुतांशी भारतीयांचं तसं नाहीय.
अजूनही आपल्याकडे अनेकवेळा १५ हजार आणि ३० हजार रुपयांचा लॅपटॉप ईएमआयवर खरेदी करणं पसंत केलं जातं. ही तर चार चाकी महागडी वस्तू आहे. यातूनच भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेची नीट ओळख होते. नेमकं हेच समजण्यात फोर्ड कंपनी कमी पडली. हे फोर्डला समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता.
फोर्डला मारुती-सुझुकी, किया मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंदाईसारख्या लोकप्रिय गाड्यांसमोर तगडा स्पर्धक बनून बाजारपेठेत टक्कर देण्याच्या सुस्थितीत कधीच नव्हती. कोणत्याही वाहन श्रेणीत 'बेस्ट सेलर कार' म्हणून फोर्डला आपलं मजबूत स्थान निर्माण करता आलं नाही. यामुळे फोर्डला भारतीय बाजारपेठांतून बाहेर पडायची नामुष्की ओढवली.
हेही वाचाः ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?
रॉयटर या संस्थेला फोर्डनं म्हटलंय की, त्यांना गेल्या १० वर्षामधे त्यांना २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागलं. २०१९ मधली त्यांची ८०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती पाण्यात गेली. अशा भयंकर आर्थिक कचाट्यात कंपनी सापडलीय. फोर्डचे भारतातले सीईओ अनुराग मेहरोत्रांनी म्हटलंय की, 'दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी एक स्थिर मार्ग शोधणं आवश्यक होतं, त्यात आम्ही अपयशी ठरलोय.'
भारतात १९९५-९६ मधे आपला कारभार सुरू करणाऱ्या फोर्डनं सुरवातीला १,७०० कोटी रुपये गुंतवून आपला प्रकल्प सुरू केला होता. फोर्ड इंडियाजवळ दरवर्षी ६ लाख १० हजार इंजिन आणि ४ लाख ४० हजार गाड्यांची उत्पादन क्षमता आहे. कंपनीकडून इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर अशा मॉडेल्सच्या गाड्यांना जगभरातल्या ७० हून अधिक बाजारपेठांमधे निर्यात केल्या जातं.
याच वर्षी जानेवारीत फोर्ड कंपनी आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी आपल्या पार्टनरशिपला पुन्हा तिलांजली दिली आणि या दोन कंपन्यांनी स्वतंत्र कारभार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
फोर्डकडून तामिळनाडूतल्या चेन्नई आणि गुजरातमधल्या साणंद प्रकल्पांमधे मोठी गुंतवणूक आहे. कंपनीच्या टॉप मॉडेल कार आहेत फिगो, एस्पायर आणि इकोस्पोर्ट, ज्याचे उत्पादन आता भारतात थांबणार आहे. फोर्ड ही जनरल मोटर्स नंतरची दुसरी मोठी कंपनी आहे जी भारतात प्लांट बंद करतेय.
फोर्ड बंद केल्यामुळे सुमारे ४ हजार कर्मचारी बेरोजगार होतील आणि सुमारे ३०० विक्री केंद्रांचं मॅनेजमेंट करणाऱ्या १५० डिलर्सवर याचा थेट परिणाम होईल. या डिलर्सना एक भिती वाटण्याचं कारण की, फोर्डमधल्या नोकऱ्यांवर संकट तर आहेच पण या व्यतिरिक्त काम करणाऱ्या ४० हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचाः
आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?