माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो.
आप्पा आमदार झाले, तेव्हा ‘कुटुंबाच्या नावाला कुठंही धक्का लावणार नाही’, असं वचन त्यांनी आपल्या वडलांना दिलं होतं. अर्थात हे वचन आप्पा आमदार होण्याच्या आधीपासूनच पाळत होते. पुढच्या राजकीय प्रवासातही त्यांनी ते अखंडपणे पाळलं. इतकं की स्वतःच्या तत्त्वांसाठी त्यांनी मंत्रीपदाच्या ऑफर्सही धुडकावल्या. या सगळ्या तत्त्वांची पेरणी झाली आप्पांच्या कुटुंबातूनच.
आमच्या दोन्ही मुलांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वडलांपेक्षा गुरू म्हणूनच जास्त होता. कारण पैलवानकी ही गुरू परंपरेनं चालते. आमच्या दोघांपैकी एकानं तरी नामवंत पैलवान व्हावं, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळंच आमचा शिक्षणावर जोर कमी होता. पैलवानकीसाठी 'दंगल' सिनेमात दाखवलं गेलं, तसंच आम्ही जीवन जगलो. तशाच पद्धतीनं आप्पा आमच्याशी वागले.
घरात फक्त कुस्ती आणि पैलवानकी हेच वातावरण असायचं. आम्हाला अनेक वेळा वाटायचं की आपले वडील आपल्याशी जास्तच कडक वागतायंत; पण वय वाढत गेलं तशी त्यांची भूमिका समजत गेली. त्यांना आपल्या आयुष्याला एक दिशा द्यायची आहे, ही त्यामागची तळमळही समजत गेली.
तर अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना मार्गावर ठेवण्याचं काम आप्पांनी केलं. यातल्या एकाही व्यक्तीला चुकीच्या दिशेनं त्यांनी जाऊ दिलं नाही. ही सगळी जबाबदारी त्यांनी अगदी व्यवस्थितपणे पार पाडली. ती पार पाडताना कधीही कुठलाही स्वार्थ ठेवला नाही. कुणालाही चुकीच्या कामांसाठी प्रवृत्त केलं नाही.
'मी आमदार आहे, तर माझ्या जीवावर हे कर’, असंही त्यांनी कधी कुणाला सांगितलं नाही. कधी कधी त्यांनाच खंत वाटते की, मी माझ्या मुलांसाठी काही मिळवलं नाही, काही केलं नाही. मी पूर्णपणे समाजाला वाहून घेतल्यामुळे कुटुंबाकडे कमी लक्ष देता आलं.' असं त्यांना राहून राहून वाटतं.
त्यावेळी त्यांना मी उत्तर देतो, ‘एवढी राजकीय पुढाऱ्यांची मुलं आहेत. त्यात कोण तुम्हाला असा दिसतो की, त्यांच्या वडलांनी करोडो रुपयांची इस्टेट मिळवून दिलीय आणि तो कुठं नावाजला गेलाय. असा एकही मुलगा नाही. पण एखादं सरकारी ऑफिस असू दे. एखाद्या मंत्र्याचं कार्यालय असू दे. एखादा आमदार-खासदार असू दे. किंवा अगदी सर्वसामान्याचं घर असू दे. या ज्या ज्या ठिकाणचा दरवाजा मी वाजवतो आणि मदत मागतो, तेव्हा संभाजी पवार यांचा मुलगा म्हणून तो दरवाजा माझ्यासाठी खटकन् उघडतो. यापेक्षा मोठी विरासत काय असू शकते? यापेक्षा मोठी देणगी काय असू शकते?’ हीच गोष्ट मी आप्पांना नेहमी पटवून देतो
संभाजी पवार या नावातच इतकी ताकद आहे, की ती ताकदच आम्हाला कर्तृत्व सिद्ध करायला भाग पाडेल. वडलांच्या कर्तृत्वाचा वारसा असावा. पण त्यांच्या कर्तृत्वावर सात पिढ्या जगाव्यात, अशी आमचीही इच्छा नाही. संभाजी पवार या नावामुळं पुढच्या दोन-तीन पिढ्यांसाठी तरी कुठलाही दरवाजा बंद राहणार नसला तरीही तो वारसा टिकवणं, ही खूप मोठी जबाबदारी आमच्यावर राहणार आहे, याचीही मला जाणीव आहे.
ही जाणीव सुद्धा अगदी नकळतपणे आप्पांनीच आमच्यात पेरलीय. वडलांच्या आणि मुलांच्यात ‘जनरेशन गॅप’ असतो. तसा तो आमच्यातही होता. अगदी लहानपणी त्यांच्यापुढं नजर वर करून बघण्याचीही हिंमत आमची व्हायची नाही. पण आम्ही मोठं होऊ लागलो, तसं या धाकाचं रूपांतर मैत्रीत झालं. कडक भूमिकेत वागणारे वडील मित्राच्याही पलीकडं जाऊन आमच्या पाठीशी उभे राहिले. असे अनेक प्रसंग सांगता येतील.
आम्हाला काही लागलं, तर ते स्वतः बसून आमची मॉलिश करायचे. आमच्यावर उपचार करायचे. आमदार असताना मातीत उतरून आम्हाला कुस्तीचे डाव शिकवायचे. वेळ द्यायचे. आमचा व्यायाम घ्यायचे. आमच्यासोबत तालमीतल्या सगळ्यांचाच ते व्यायाम घ्यायचे. कुटुंबाशी जोडले गेलेले आप्पा असे होते. अगदी मातीत उतरून मदत करणारे. शिकवणारे. त्यांची ही वृत्ती सार्वजनिक जीवनातही कायम राहिली.
हेही वाचा: कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?
पैलवानकी हा त्यांचा प्रेमाचा विषय! सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर वाढल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर मरगळलेल्या कुस्तीला उमेद दिली. तेव्हा कुस्ती परंपरा अगदी मरगळलेली होती. मैदानं होत नव्हती. पैलवानाला खुराकपाणीही मिळणं मुश्किल झालं होतं. त्यावेळी आप्पांनी दिल्ली आणि हरियाणातले पैलवान आपल्याकडे आणले. त्यांना चांगला खुराक दिला. त्यांना पगार सुरू केला.
या पैलवानांना घेऊन जेवढे मंत्री, साखर कारखाने आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या वाढदिवसाला, कार्यक्रमांना कुस्ती मैदानं करण्याची गळ घातली. संभाजी पवार सांगताहेत म्हणून कुणीही टाळलं नाही. या कुस्ती मैदानावर हरियाणाचे कुस्तीपटू खेळू लागले. बंद पडलेली कुस्ती पुन्हा उर्जितावस्थेत येऊ लागली.
संपत चाललेल्या आणि ऱ्हास होत असलेल्या कलेला त्यांनी असं जीवनदान देण्यासाठी त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं. वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वतःही कुस्ती मैदान सुरू केलं. कुस्तीला किती प्रतिसाद मिळतोय, ते दाखवण्यासाठी नेत्यांना आवर्जून ते मैदानात घेऊन यायचे.
बघता बघता पश्चिम महाराष्ट्रातले शे-सव्वाशे मैदानं आप्पांमुळं सुरू झाली. पंजाब-हरियाणामधले पैलवान महाराष्ट्रात आणून, त्यांच्या कुस्त्या लावून इथल्या मातीत कुस्तीचा शौक पुन्हा जागृत केला. आप्पांचं कुस्ती क्षेत्रातलं हे योगदान फार मोठं आहे. ‘फक्त संभाजी पवार होते, म्हणून मातीतली कुस्ती आज जिवंत राहिली.’ असं कुस्ती निवेदक शंकर पुजारी प्रत्येक मैदानात जाहीर सांगतात.
कुस्तीतल्या आप्पांच्या या योगदानामुळं दुसरं कुटुंब आप्पांच्या आयुष्यात जोडलं गेलं, ते म्हणजे पैलवानाचं. कुस्ती या खेळावर प्रेम करणाऱ्यांचं. मल्ल म्हणून आप्पांच्या कुस्ती कारकिर्तीमुळं आणि सार्वजनिक आयुष्यात वावर सुरू झाल्यावर कुस्ती या खेळात आप्पांनी दिलेल्या भरीव योगदानामुळं आप्पा पैलवानांचे तर झालेच; पण त्याच बरोबर कुस्ती खेळावर अतोनात प्रेम करणाऱ्यांचेही झाले.
हेही वाचा: डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही त्यांनी माणसं जोडण्याचा धागा जपला. उलट त्यामुळेच त्यांच्याकडे आपोआप राजकीय नेतृत्व आलं. आप्पा स्वतः तर खंदे कार्यकर्ते होतेच; पण आपल्यातलं जे जे आहे, ते ते समोरच्याला द्यावं आणि त्याला ‘तयार’ करावं, ही अनोखी वृत्ती त्यांच्यात होती. त्यामुळंच एखाद्यामधे जराही संघटन कौशल्य दिसलं, तर आप्पांनी त्याला हेरलंच म्हणून समजा.
आप्पांना एखादा कार्यकर्ता पटला तर आप्पा त्याला जवळ करायचे आणि त्याला सगळी ताकद द्यायचे. बाळासाहेब गोंधळे हा पतसंस्थेत शिपाई होता. आप्पांनी त्याला हेरलं आणि त्याला निवडणुकीत उभं केलं. पहिल्यांदा तो हरला. आप्पांनी त्याला पुन्हा बळ दिलं. तो निवडून आला. आज तो दोन वेळा नगरसेवक झाला आहे.
आप्पांची कार्यकर्ता तयार करण्याची पद्धत ही अशी आहे. कधीही कुठल्या तयार कार्यकर्त्याला आप्पांनी प्रवेश दिला नाही. स्वतः कार्यकर्ते घडवले. त्यांनी घडवलेले कार्यकर्ते विरोधकांनी पळवले. पण त्यांनी पुन्हा नवे कार्यकर्ते तयार केले.
एक कार्यकर्ता काय असतो, तर त्याच्या संपर्कात वीस-पंचवीस लोक असतात. त्या व्यक्तीला बळ मिळालं, तो लोकांच्या मदतीला येऊ लागला, तर त्याचा लोकसंग्रह वाढतो. अशा दीडशे-दोनशे कार्यकर्त्यांचा संच आप्पांच्या पाठिशी असतो. म्हणजेच एखाद्या विधानसभा मतदारसंघातल्या नेतृत्वाकडे असतो. असे शंभर-दीडशे कार्यकर्ते मिळून एखादा महाराष्ट्र पातळीवरचा पक्ष उभा राहतो. आणि राज्याराज्यात असलेलं हे जाळं म्हणजे एक राष्ट्रीय पक्ष तयार होतो.
राजकीय पक्ष बांधणीचं हे नेमकं सूत्र आप्पांनी ओळखलं होतं. या सूत्रात समाजवादी विचारांचा प्रभाव होता. आप्पांनी हे संघटन आर्थिक बळावर केलं नव्हतं, तर त्यांच्या संघटन कौशल्यावर ते उभं केलं होतं. हे संघटन त्यांनी उभ्या केलेल्या रिक्षा संघटना, हमालांची संघटना, झोपडपट्टी धारकांची संघटना यातून आणखी मजबूत होत गेलं. पिचलेल्या वर्गाला आप्पांनी हाक दिल्यामुळं, साद घातल्यामुळं व्यापारी-सत्ताधारी यांचं राजकारण आपोआपच मोडीत निघालं.
हेही वाचा: यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
आप्पांनी अगदी रस्त्यावर चाकूला धार लावणाऱ्या, फळविक्री करणाऱ्या अशा कित्येक हातावर पोट असणाऱ्यांना हात दिला. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी मोर्चे काढले, आंदोलनं केली, त्यांचे प्रश्न सोडवले. या सगळ्याचा परिणाम समाजमनावर आपोआप होत गेला. संभाजी पवार ज्यांच्यासोबत आहेत, त्यांचा प्रश्न सुटला नाही, असं कधीही झालं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.
ज्या मतदारांनी विश्वास देत आप्पांना निवडून दिलं, त्यांच्यासाठी आप्पा कायम जागे राहिले. रिक्षावाले, माथाडी कामगार, शेतकरी वर्ग. अशा प्रत्येक वर्गासाठी आप्पा सातत्यानं झगडत राहिले. मग ते शेतकरी वर्गासाठी आप्पा सातत्यानं झगडत राहिले. मग ते शेतकरी वर्गासाठी केलेलं झोनबंदी उठवण्याचं काम असो, की दुधाच्या दरासाठी उभं केलेलं आंदोलन असो.
केबिनमधे बसून प्रश्न सोडवण्यापेक्षा आप्पांनी शेतकऱ्यांच्या थेट रानात जाऊन प्रश्न सोडवले. आज आमदारांसाठी गावं दत्तक घेण्याची योजना सुरू केली आहे. पण आप्पा तर सुरवातीपासून थेट गावांसाठी राबत होते. ज्यावेळी ते निवडून आले, तेव्हा आमदार निधी काय असतो, शासनाच्या योजना काय असतात, हे सगळं गावागावात जाऊन सांगत होते.
सांगलीतले कार्यकर्ते जेव्हा मुंबईत जायचे तेव्हा त्यांना रस्त्यावर झोपावं लागायचं. आधीचे आमदार, आमदार निवासात आणि कार्यकर्ते रस्त्यावर अशी स्थिती होती. आप्पा आमदार झाल्यावर आमदार निवास कसं असतं ते कार्यकर्त्यांना बघायला मिळालं. नुसतंच बघायला नाही तर तिथं राहायलाही मिळालं. ‘आम्ही फूटपाथवर झोपायचो पूर्वीच्या काळी पण आप्पा आमदार झाल्यावर आम्हाला आमदार निवासात आप्पांच्या शेजारी झोपायला मिळालं’ असं सांगणारे कित्येक कार्यकर्ते आजही भेटतात.
कार्यकर्त्यांमधे, जनमानसामधे मिसळलेला सर्वसामान्यांचा आमदार कसा असू शकतो, याचा पायंडा आप्पांनी निर्माण केला. या सगळ्या प्रक्रियेत ‘लोकप्रतिनिधी’ या शब्दातला खराखुरा अर्थ आप्पा जगले. एखाद्या शहराचा विकास होतो, तो सरकार राबवत असलेल्या धोरणांचा परिपाक असतो. ही धोरणं सरकारच्या वतीनं समाजात रुजवण्यासाठी लोकप्रतिनिधी दुवा म्हणून काम करत असतो.
सरकारी ध्येय धोरणांमुळं जनतेवर कुठं अन्याय होत असेल, तर तो अन्याय लोकप्रतिनिधीनं सरकार समोर आणला पाहिजे आणि सरकारकडून दुर्लक्ष होत असेल, तर सरकारला जागं केलं पाहिजे. एक प्रकारे सरकारची संवेदनक्षमता जागृत ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधी करत असतो. हेच काम आप्पांनी आयुष्यभर केलं! आप्पा कुटुंबात कुटुंबप्रमुख म्हणून वावरले, ते हीच संवेदनशीलता घेऊन.
हेही वाचा: शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
आप्पा कुस्ती खेळताना जितके शरीरानं कणखर होते, तितकेच मनानंही संवेदनशील राहिले, त्यामुळंच कुस्ती परंपरा टिकवण्यात ते भरीव योगदान देऊ शकले. जनमानसात राहून राजकारण करताना तर हीच संवेदनशीलता आणखी विस्तारत गेली, त्यामुळंच आप्पा आमदार असूनही जनतेला ते कधी केबिनमधले आमदार वाटले नाहीत. ते वाटले, त्यांच्यामधलेच एक. तुमच्या-आमच्यासारखेच.
जाणतेपणापासून मी आप्पांचा सगळा प्रवास बघत आलो. आप्पांना अनुभवत आलो आहे. आम्ही लहान होतो, तेव्हा आप्पांचा आप्पांचा सार्वजनिक जीवनातला व्याप खूप होता. त्यामुळं आमच्यासाठी ते वेळ देऊ शकायचे नाही. लहानपणी आप्पा भेटल्यावर मी त्यांच्याशी खूप भांडायचो. त्यांना चावायचो. त्यांच्यावर रूसायचोही. कारण एकच, आप्पा मला हवे असायचे.
वय वाढत गेलं, तसं कळत गेलं, आपले आप्पा आपले तर आहेतच. पण ते सगळ्या समाजाचेही आहेत. ते बाहेर असतात, तेव्हा सगळ्या समाजासाठी राबत असतात. झटत असतात. हे कळलं तेव्हा माझं त्यांच्यावरचं रूसणं कमी झालं. आपल्या वडलांकडे समाज किती आदरानं आणि आपुलकीनं पाहतो, हे वारंवार अनुभवायला मिळालं, तेव्हा वाटलं, ‘आपण संभाजी पवार व्हायला हवं!’
आज सगळा समाज आप्पांकडे वडीलकीच्या भूमिकेतून पाहतो, तेव्हा भारावून जायला होतं. हे वडीलकीच्या भूमिकेतून पाहणं फक्त त्यांच्या बाजूच्या लोकांचं नाही, तर त्यांच्या विरोधकांमधेही हीच भावना आहे. आप्पांसाठी विरोध, पक्षभेद हे सगळं विसरू आणि काहीही करू. ही भावना त्यांचे विरोधक बोलून दाखवतात तेव्हा कळतं, संभाजी पवार या नावाची जादू!
आप्पांनी त्यांच्या आयुष्यात काय मिळवलं? असा प्रश्न मी स्वतःला विचारतो, तेव्हा आप्पांनी हे ‘अजातशत्रू’पण मिळवलं. आप्पा त्यांचं आयुष्य स्वच्छंदपणे जगले, जगत आहेत. जगता जगता त्यांच्या आयुष्यात जे जे भेटले, त्या सगळ्यांशी त्यांनी आपुलकीचं नातं जोडलं. ते नातं जपलं आणि टिकवलंही.
माझं नाव गौतम संभाजी पवार. संभाजी पवार यांचा कुस्तीचा, राजकारण, समाजकारणाचा वारसा मला मिळालाय. वाटतं, आपण संभाजी पवार व्हावं. का व्हावं, तर संभाजी पवार या माणसानं जे पेरलं, ते टिकवण्यासाठी. ते वाढवण्यासाठी. पुढं जाऊन असंही वाटतं, संभाजी पवार या माणसाचा स्पर्श झालेल्या प्रत्येकानं ‘संभाजी पवार’ व्हावं.
तुमच्या-आमच्यात जे आप्पा दडलेले आहेत, ते आप्पा आपल्या कृतीतून आपण टिकवले पाहिजेत. आणखी पुढं नेले पाहिजेत. आप्पा त्यांच्या कामातून सगळ्यांचे झाले, ते सगळ्यांच्यात पाझरावेत, हीच आपली मोठी जबाबदारी आहे.
पुस्तक - राजकीय पैलवान संभाजी पवार
लेखक - गौतम संभाजी पवार
प्रकाशक - अंजली संभाजी पवार, पृथ्वीराज संभाजी पवार
पानं - १५२
प्रकाशन - मे २०१७
किंमत - २५० रुपये
हेही वाचा:
अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील
शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय