अरुण जेटलींना पत्रकार ब्युरो चीफ म्हणायचे!

२५ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश.

एखादा नेता जेव्हा विद्यार्थी असताना राजकारणाचा पर्याय निवडतो तेव्हा त्याचा सन्मान करायला हवा. सुरक्षित जीवन सोडून एका अनिश्चित क्षेत्रात येणं नक्कीच सोप्पी गोष्ट नाही. अरुण जेटली हे त्यातलंच एक नाव आहे. १९७४ मधे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात जेटली सामील झाले. आणीबाणीदरम्यान त्यांना अटकही झाली. कारण आणीबाणीत त्यांनी रामलीला मैदानावर जयप्रकाशजींच्या आंदोलनात सहभाग घेतला होता.

बोलण्यातले फिरकीपटू

सुरवातीच्या बंडखोर स्वभावापासून आपल्या शेवटच्या राजकीय प्रवासापर्यंत जेटली आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले. एकच निवडणूक लढले पण तीही हरले. राज्यसभेचे खासदार होते. आपल्या योग्यतेच्या बळावर ते जनतेचे लोकप्रतिनिधी राहिले. त्यांना कोणाच्या कृपेनं राज्यसभेची खुर्ची मिळतेय असं कधी झालं नाही. भलेही जनतेमधून निवडून आले नसतील पण ते राजकीय नेते होते.

त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता होती. तशीच विनम्रता होती. जसं ते हुशार होते अगदी तसंच चतुरही होते. त्यांच्यामधे एका वेगळ्या प्रकारचा अभिमानही होता. तरीही त्यांनी कधी आपल्या बोलण्यातलं वजन हलकं होऊ दिलं नाही. अरुण जेटली वक्तृत्वातले फिरकीपटू होते. त्यांचं बोलणं थांबवता येऊ शकत होतं, पण ते खास असायचं.

वाजपेयी आणि अडवाणींचे समकालीन

दिल्लीतले अनेक पत्रकार त्यांच्यासाठी खास होते. आणि असंख्य पत्रकारांसाठी ते रॉयल होते. लोक त्यांना मजेत ब्युरो चीफ म्हणायचे. त्यांनी वकिलीमधे आपलं नाव कमावलं. इतकंच नाही तर या क्षेत्रालाही त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. अनेक वकील राजकारणात येऊन जेटलींसारखं बनण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी अनेकांना वैयक्तिक मदत केली.

हा माणूस कंटाळवाणा कधीच वाटला नाही. जवळपासचे मित्र सांगतात, जेटलींनी आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणं कधी सोडलं नाही. अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, अनंत कुमार, गोपीनाथ मुंडे ही सगळी मंडळी भाजपमधल्या दुसऱ्या पिढीचं नेतृत्व करत होती. यातले जेटली आणि सुषमा स्वराज तर वाजपेयी आणि अडवाणी यांचे समकालीन वाटावे असे नेते होते.

जेटलींचं जाणं हे लोकांचं दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून जेटली त्यांचे दिल्लीतले वकील होते. नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना अनेक दशकांची सोबत असलेला मित्र गेल्याचं म्हटलंय. अरुण जेटलींना अमित शहासुद्धा विसरणार नाहीत. एक चांगला वकील हा चांगला मित्र असेल तर प्रवास अधिक सुखकर होतो. जेटली अशांमधले एक होते.

अरुण जेटलींचं बघणं आणि हसणं काही वेगळंच होतं. त्यांच्यातल्या बऱ्याच गोष्टी आणि त्यांची एक वेगळी शैली हाच त्यांच्या राजकारणाचा गाभा होता. याच पठडीतलं राजकारण त्यांनी केलं. राजकारणी माणूस लोकांमधे राहतो. त्यामुळे जेटलींचं जाणं हे लोकांचं स्वत:चं दु:ख आहे. अगदी तशाच पद्धतीने याकडे बघायला हवं. आजचा दिवस भाजपमधल्या सभ्य आणि उत्साही नेत्यांसाठी मोठ्या दुखाचा दिवस आहे.

हेही वाचा: 

मंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी

नरेंद्र मोदींना खलनायक करुन हाती काहीच लागणार नाही

सुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या लेखवजा फेसबूक पोस्टचा अक्षय शारदा शरद यांनी अनुवाद केलाय.)