सलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत

२० जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही.

भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांना १९९९ मधे नाशिक भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळेस त्यांची एक छोटेखानी मुलाखतही घेण्यात आली होती. या छोट्याशा मुलाखतीत त्यांच्या आयुष्याचा आणि क्रिकेटमधल्या त्यांच्या वाटचालीचा पट उलगडवून दाखवण्यात आला होता. स्तंभलेखक संजीव पाध्ये यांच्या भेटी ‘चालिसा’ या पुस्तकात त्यांची ही मुलाखत आहे. लेखकाच्या परवानगीने त्या पुस्तकातली ही छोटेखानी मुलाखत. 

 

आजकाल वेगवेगळे भूषण पुरस्कार आलेत. पण वीसेक वर्षांपूर्वी एका क्रिकेटपटूला एखाद्या शहरातला सर्वोत्कृष्ट व्यक्ती ठरण्याचा मान मिळणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. ४ एप्रिल १९३३ ला नाशिकमधे जन्मलेल्या बापू नाडकर्णी यांना नाशिक भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ४१ टेस्ट मॅचमधे १४१४ रन आणि ८८ विकेट घेणाऱ्या बापूंनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधे १७ वर्षात ८६९६ रन आणि ४७६ विकेट घेऊन भारतीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवला होता. अष्टपैलू म्हणून त्यांची ख्याती पसरली होती.

प्रश्न: नाशिक भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दलचा आनंद तुम्ही नेमका कसा सांगाल?

एखाद्या क्रिकेटपटूला हा पुरस्कार द्यायचं ठरल्यावर नाशिककरांनी माझं नावं सुचवलं ही बाब मला उल्लेखनीय वाटते. या आधी विनायक पाटील, डॉ. वसंत पवार, वसंत गुप्ते, राठीसाहेब, दादासाहेब पोतनीस, वसंत कानेटकर यांच्यासारख्या बुजुर्गांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात घेता मलाही तो मान मिळाला याचा आनंद वाटतो.

प्रश्न: नाशिकमधे तुम्ही लहानाचे मोठे झालात ना?

हो. माझा जन्मच मुळी नाशिकचा. तिथल्या वकिलवाडीत आमचं घर होतं. मला इंटर सायंस होईपर्यंत नाशिकला राहायला मिळालं. त्यावेळी इंटरच्या पुढे शिकायची तिथं सोय नव्हती. नंतर नाइलाजाने पुण्याला कॉलेजात शिकण्यासाठी जावं लागलं. मी एस. पी. कॉलेजमधून बी. एस्सी. झालो.

प्रश्न: तुम्हाला क्रिकेटची गोडी कशी लागली?

आमच्या घरी खेळाचं वातावरण होतं. खुद्द माझे वडील गंगाधर नाडकर्णी चांगले क्रिकेट खेळायचे. हॉकी आणि टेनिसमधेही त्यांना गती होती. माझे चारही भाऊ चांगल्यापैकी क्रिकेट खेळायचे. मी सर्वात धाकटा. त्यामुळे मला क्रिकेटची गोडी लागणं स्वाभाविक होतं. रुंगठा हायस्कूलमधे आम्ही शिकलो. तेव्हाही क्रिकेट खेळायचो. पण तेव्हा अभ्यासही करावा लागायचा. अर्थात नाशिकला तेव्हा खेळाविषयी जाण असलेली मंडळीही खूप होती. पुढे मुंबईत हिंदू जिमखान्याकडे खेळली.

प्रश्न: रणजी पदार्णण महाराष्ट्राकडून केलंत?

हो. १९५१ ते १९६० मी महाराष्ट्राकडून खेळलो. पुढे १९६८ पर्यंत मी मुंबईकडून आणि या दोन्ही दोन्ही संघाचं मला नेतृत्वही करायला मिळालं.

प्रश्न: त्यावेळचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट तसंच त्यावेळचं नाशिक आणि आताचं नाशिक या फरक काय वाटतो?

क्रिकेट काही बदललेलं वगैरे नाही. फक्त ते अधिक व्यावसायिक, धंदेवाईक झालंय असं म्हणता येईल. प्रसिद्धी माध्यमांनी ते उचलून धरल्याने त्यातल्या छोट्या मोठ्या घटना तपशीलवार पोचायला लागल्यात इतकंच. हा बदल मला तरी चांगला वाटतो. नाशिकबद्दल बोलायचं तर आता आमचं तिथं घर वैगरे नाही. अधूनमधून जाणं होतं. पूर्वी नाशिक एक पवित्र धार्मिक स्थळ म्हणून अधिक प्रसिद्ध होतं. आज हे औद्योगिक शहर होऊ पाहतंय. हा बदलही मला खटकत वगैरे नाही. आणि नाशिकची हवा अजूनही चांगली आहे. तिथे प्रदूषण फारच कमी आहे.

हेही वाचा: टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

प्रश्न: इंग्लंडविरुद्ध मद्रासला १९६३ - १९६४ च्या मोसमात आपण सलग २१.५ षटकं निर्धाव टाकून विश्वविक्रम केलात त्याबद्दल काही सांगा.

हा एक विश्वविक्रम झालाय हे मला पॅवेलियनमधे परतल्यावर समजलं. बस आणखी काय सांगणार?

प्रश्न: तुम्हाला गोलंदाज म्हणून अधिक वाव मिळाला, फलंदाज म्हणून तेवढा मिळाला नाही असं वाटतं का?

हो. माझा फलंदाज म्हणून तेवढा कुणी उपयोग केला नाही हे खरंय.

प्रश्न: आजच्यासारखं वन डे क्रिकेट तुमच्या काळी असतं तर?

हो. मला ते एक आव्हान वाटलं असतं आणि वन डे क्रिकेट खेळायलाही आवडलं असतं. पण शेवटी बरंच काही नशिबावर अवलंबून असतं. आपला जन्म, आजूबाजूची परिस्थिती सारं काही ठरवत असते.

प्रश्न: आता आपण निवृत्तीचं आयुष्य जगताहात?

मी क्रिकेपासून १९८७ मधे सर्वार्थानं निवृत्त झालो आणि १९९३ मधे एसीसीच्या नोकरीतूनही. पण आताही मी पटनी कम्प्युटर्स सर्विसमधे सात युनिटस् सांभाळण्यासाठी एडमिनिस्ट्रेटिव मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. एकूण काय मेहनतीला पर्याय नाही. मी इथं येऊन कॉम्प्युटरचं ज्ञान घेतलं. तेव्हा अभ्यासूवृत्ती आणि मेहनत घेण्याची वृत्ती तुम्ही ठेवलीत की कधीच निवृत्त झाल्यासारखं वाटत नाही, असं मला वाटतं.

हेही वाचा: 

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

इम्रान खानला मोदींनी निमंत्रण दिल्याने भारत-पाक वाद संपणार?

घटता जीडीपी, वाढत्या महागाईने अर्थव्यवस्थेची स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल

वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

(कोमल प्रकाशनने काढलेल्या भेटी ‘चालिसा’ या संजीव पाध्ये यांच्या पुस्तकातून साभार.)