पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे.
पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. कला, संगीत, साहित्य, पत्रकारिता अशा २२ कॅटेगरीसाठी पुलित्झर दिला जातो. यातले १४ पुरस्कार हे पत्रकारितेत अतुलनीय काम करणाऱ्यांना दिले जातात. अशाच भारतातल्या चार पत्रकारांना कोरोना काळात केलेल्या फिचर फोटोग्राफीसाठी यंदाचा पुलित्झर मिळालाय. पुलित्झरच्या परंपरेला साजेसं काम या पत्रकारांनी आपल्या फोटोग्राफीतून केलंय.
१८६१मधे अमेरिकेत अंतर्गत युद्ध झालं होतं. अमेरिकेतल्या उत्तर-दक्षिण राज्यांमधला संघर्ष म्हणूनही त्याच्याकडे बघितलं गेलं. गुलामगिरीची प्रथा हा या संघर्षातला एक महत्वाचा मुद्दा होता. उत्तरेकडच्या राज्यांनी या प्रथेला कडाडून विरोध केला. आंदोलनं झाली. १८६४ला हंगेरियन असलेल्या जोसेफ पुलित्झर यांची या आंदोलनात एण्ट्री झाली.
युद्ध थांबलं तसं जोसेफ यांनी न्यूज पेपरच्या प्रकाशनांचा सपाटा लावला. एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे पत्रकारिता. वेगवेगळ्या मुद्यांवरून जोसेफ चर्चेत येऊ लागले. त्यांच्या प्रकाशनांमधल्या शोध पत्रकारिता, भ्रष्टाचारासारख्या मुद्यांमुळे पत्रकारितेला एक वेगळी दिशा मिळाली. जोसेफ यांचं कौतुक झालं तितकीच कठोर टीकाही झाली.
जोसेफ इथपर्यंत थांबले नाहीत. त्यांनी पत्रकारांना चांगलं ट्रेनिंग मिळावं म्हणून कोलंबिया युनिवर्सिटीला भरघोस फंड दिला. त्यातून जर्नालिझम स्कुल उभं राहिलं. स्कॉलरशिप सुरू झाल्या. १९११ला जोसेफ यांचा मृत्यू झाला. ४ जून १९११पासून त्यांच्या नावाने पुलित्झर पुरस्कार द्यायला सुरवात झाली.
हेही वाचा: रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार
रॉयटर ही जगातली एक महत्वाची न्यूज एजन्सी आहे. दानिश सिद्दीकी, अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे हे चार भारतीय पत्रकार रॉयटरचे फोटो जर्नालिस्ट. त्यांनी भारतातली कोरोना काळातली परिस्थिती अगदी संयत पद्धतीने आपल्या फोटोग्राफीतून जगासमोर आणली. त्याचाच हा सन्मान असल्याचं पुलित्झरच्या वेबसाईटवर म्हटलंय.
दानिश सिद्दीकी
दानिश सिद्दीकी रॉयटरचे भारतातले मुख्य फोटोग्राफर होते. त्यांनी फोटोग्राफीचं कुठंही ट्रेनिंग घेतलेलं नव्हतं. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेऊन पुढं मास कम्युनिकेशन केलं. इथून बाहेर पडल्यावर त्यांनी वेगवेगळ्या न्यूज एजन्सीमधे काम करायला सुरवात केली. हिंदुस्तान टाईम्स, इंडिया टुडे अशा ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग केलं. तोच त्यांचा फोटोग्राफीचा अभ्यास.
दानिश यांनी रॉयटरसाठी भारत आणि भारता बाहेरही काम केलंय. म्यानमार इथल्या रोहिंग्या शरणार्थींचं दुःख त्यांनी आपल्या फोटोग्राफीतून जगासमोर आणलं. त्यासाठी त्यांना २०१८ला पहिला पुलित्झर मिळाला होता. कोरोना काळातली त्यांची भारतातली फोटोग्राफी विशेष गाजली. त्यांच्या फोटोंनी अनेकांना अस्वस्थ केलं. गेल्यावर्षी अफगाण सैन्य आणि तालिबानीमधे टोकाचा संघर्ष चालला होता. तो संघर्ष कवर करत असताना १६ जुलै २०२१ला तालिबान्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा: पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन
अदनान आबिदी
रॉयटरच्या अदनान आबिदी यांना पुलित्झर मिळायची ही तिसरी वेळ. विशेष म्हणजे त्यांनीही दानिश सिद्दीकी यांच्यासारखं फोटोग्राफीचं कुठंही ट्रेनिंग घेतलेलं नाही. शिकत शिकतच आपण फोटोग्राफी केल्याचं त्यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका इंटरव्यूमधे म्हटलं होतं. त्यांनी आयुष्यातला पहिला कॅमेरा वडलांच्या पीएफमधून घेतला होता.
१९९७मधे फोटोग्राफीकडे करियर म्हणून वळलेले अदनान आबिदी सध्या रॉयटरमधे सिनियर फोटोग्राफर आहेत. नेपाळ भूकंप, ओडिशातलं वादळ, २००४ची त्सुनामी अशा अनेक घटना त्यांनी कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या. त्यांना २०१८मधे दानिश सिद्दीकी यांच्यासोबत पहिल्यांदा तर २०२०ला हॉंगकॉंगमधे झालेल्या चीनविरोधी आंदोलनाच्या कवरेजसाठी दुसऱ्यांदा पुलित्झर मिळाला होता.
अमित दवे
गुजरातच्या अहमदाबाद इथले अमित दवे तिथल्याच एका स्थानिक मॅगझीनमधे काम करायचे. त्यांचे वडील फोटोग्राफर होते. त्यांना वेगवेगळे कॅमेरा गोळा करायची आवड होती. तेच बघत बघत त्याची गोडी पुढे अमित यांना लागली. त्या गोडीमुळेच अमित यांनी फोटोग्राफी, पत्रकारिता हाच करियरचा मार्ग म्हणून निवडला.
२००२ला अमित दवे यांनी रॉयटरसोबत काम करायला सुरवात केली. त्याआधी काही काळ त्यांनी इंडियन एक्सप्रेसमधेही काम केलं होतं. खेळाच्या स्पर्धा कवर करण्यामधे त्यांना विशेष आवड आहे असं त्यांनी रॉयटरच्या आपल्या प्रोफाईलमधे म्हटलंय. २००२चे गुजरात दंगे, गुजरातमधल्या कच्छचा भूकंप अशा अनेक घटना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून कवर केल्यात.
सना इरशाद मट्टू
सना या जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या रहिवासी आहेत. काश्मीरच्या सेंट्रल युनिवर्सिटीतून त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. काही काळ त्यांनी काश्मीरवाला या मॅगझीनमधे कामही केलं होतं. त्यानंतर त्या मुक्त पत्रकारितेकडे वळल्या. मागच्या दोन वर्षांपासून त्या रॉयटर न्यूज एजन्सीसोबत काम करतायंत.
सना यांनी काढलेले फोटो हे कारवाँ मॅगझीन, द नेशन, अल जजीरा, टाईमसारख्या प्रतिष्ठित वेबसाईट, मॅगझीनमधे छापून आलेत. फोटो जर्नालिस्ट मुख्तार खान आणि दार यासिन यांच्यानंतर पुलित्सर मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या काश्मिरी ठरल्यात. जगप्रसिद्ध फोटो जर्नालिस्ट आणि डॉक्युमेंटरी फोटोग्राफर म्हणून पुलित्झरनं त्यांचा सन्मान केलाय.
दानिश सिद्दीकी, अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे यांनी कोरोनाच्या पडद्यामागचं वास्तव मांडलं. त्यांनी केलेली फोटोग्राफी केवळ बातम्यांसाठी नव्हती तर त्यामागचा नवा दृष्टिकोन देणारी होती. कॅमेऱ्याचा अँगल नेमका पकडला तर हा नवा दृष्टिकोन जगापर्यंत पोचवता येतो हेच त्यांनी जगाला दाखवून दिलंय.
आज भारतात पत्रकारांची एक नवी भाट संस्कृती निर्माण झालीय. अशा सगळ्या काळात पुलित्झरनं केलेल्या पत्रकारांची निवड महत्वाची आणि वेगळी ठरतेय. भारतातल्या या पत्रकारांनी कोरोना काळात केलेल्या फोटोग्राफीत दुःख होतं, वेदना होत्या, अस्वस्थता होती तितकीच ही व्यवस्था आपण नीटशी उभी करू शकलो नाही याबद्दलची चीडही होती.
दानिश सिद्दीकी यांच्या कोरोना काळातल्या फोटोग्राफीनं एकप्रकारे सरकारला जाब विचारला होता. त्यांचे भारतातल्या स्मशानभूमींमधले फोटो, गंगेच्या पाण्यात तरंगणारे मृतदेह इथलं भयाण वास्तव जगासमोर आणणारे होते. त्यावरून त्यांना धमक्याही दिल्या गेल्या. त्यांनी अशा धमक्यांना भीक घातली नाही. आताचा पुलित्झर अशाच पत्रकारांचा खरंतर सन्मान आहे.
हेही वाचा:
नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय
प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?
पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच