फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

१५ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज १७५ वी जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं.

सूर्य उगवल्या उगवल्या लगेचच मॅडमॅनने कंदील पेटवला आणि तो हातात घेऊन मॅडमॅन बाजाराच्या दिशेने धावू लागला. बाजारात पोचताच तो जोर जोरात ओरडू लागला. ‘मी देव शोधतोय. मी देव शोधतोय,’ असं म्हणू लागला.

बाजारात अनेक नास्तिक लोकं जमले होते. ते त्याला बघून हसू लागले. एकाने विचारलं, ‘कुठं हरवलाय तुझा देव?’ दुसरा एक जण टोमणा मारत म्हणाला, ‘लहान मुलासारखा हरवला की काय? का लपून बसलाय देव? त्याला आमची भीती वाटते का? तो समुद्रसफारीवर गेला का? का देश बदलला त्यानं?' सारे हसत राहीले. मॅडमॅननं त्यांच्याकडे रागानं पाहिलं.

‘देव कुठे गेला? मी सांगतो. देव मेला आहे आणि आपणं त्याला मारलंय’ मॅडमॅन उत्तरला. तुम्ही आणि मी मारलंय त्याला. पण आपण हे केलं कसं? समुद्राचं सगळं पाणी एकाच घोटात पिण्याची ताकद आपल्यात आली कुठून? क्षितिजच पुसून टाकता येईल असा स्पंज आपण आणला कुठून? पृथ्वीला तिच्या सूर्यापासून तोडलं तेव्हा आपण काय केलं? आता आपण कुठे जाणार?’ मॅडमॅन बडबडत राहिला.

देव मेला आहे

एका गडद, दीर्घ अंधाराची चाहूल त्याला लागली होती. आणि म्हणूनच त्यानं भल्या सकाळी कंदील पेटवला होता. त्याच्या प्रकाशात त्याला एवढंच दिसत होतं की देवाचा आपण खून केलाय आणि ही गोष्ट अजून कुणाला कळलीच नाही. ‘मी फार लवकर आलो. ही योग्य वेळ नव्हती. वादळ यायला अजून वेळ आहे’ असं काहीबाही बडबडत मॅडमॅन निघून गेला.

प्रसिद्ध फिलॉसॉफर फ्रेडरिक नित्शे याने त्याच्या 'द गे सायन्स' या पुस्तकात मॅडमॅनची ही गोष्ट सांगितलीय. ‘देव मेलाय आणि आपण देवाला मारलंय’ असं धक्कादायक विधान नित्शे करतो. आणि त्याला काय म्हणायचंय हे काही केल्या आपल्या लक्षात येत नाही.

हेही वाचा : मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

अठराव्या वर्षी उडाली देवावरची श्रद्धा

आज नित्शेची १७५ वी जयंती. फ्रेडरीक विल्यम नित्शे हा १९ व्या शतकातला जर्मन फिलोसॉफर. १८४४ मधे तेव्हाच्या प्रशियातल्या रॉकेन या गावी त्याचा जन्म झाला. वडलांच्या मृत्यूनंतर आई आणि घरातल्या महिलांच्या लाडाकोडात वाढलेल्या नित्शेच्या बोलण्यात, वागण्यात बायकांसारखा नाजूकपणा असायचा. त्याचवेळी मोठ्या मोठ्या मिशा ठेवण्याची त्याची हौस त्याच्या प्रत्येक फोटोत दिसते.

'पाश्चात्य तत्त्वज्ञानाची कहाणी' या पुस्तकात साने गुरूजींनी नित्शेविषयी लिहिलंय. ते म्हणतात, ‘आदर्श मर्दपणा आपल्या अंगी यावा म्हणून शरीराने आणि विचाराने तो स्वतःची जन्मभर तयारी करत होता. मी जे नाही तो माझा देव, तो माझा सद्गुण असं नित्शे म्हणायचा.’

नित्शेने जगाला अस्तित्ववादाची ओळख करून दिली, असं म्हणतात. असं असलं तरी स्वतः नित्शेनं कधीही स्वतःला अस्तित्ववादी म्हणवून घेतलं नव्हतं. वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या पूर्वजांच्या देवावरची त्याची श्रद्धा उडाली आणि उरलेलं आयुष्य त्यानं नवीन देवतेच्या शोधात घालवलं. पुरुषोत्तम अतिमानव म्हणजेच सुपरमॅन या संकल्पनेत त्याचा हा शोध पूर्ण झाला.

हेही वाचा : मोदी तामिळनाडूला गेल्यावर ट्विटरवर गोबॅकमोदी ट्रेंड का होतो?

देवाचा मृत्यू झालेला काळ

नित्शे ज्या काळात राहत होता तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा काळ होता. भरपूर नवंनवे शोध लागत होते. देवाने सात दिवसांत ही सृष्टी निर्माण केलीय, असं सांगणारं ख्रिश्चन धर्माचं तत्त्वज्ञान चार्ल्स डार्विन नावाच्या माणसानं खोडून काढलं होतं आणि त्या ऐवजी सर्व्हावल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांत मांडला. जगण्याच्या लढाईत जो जीव ताकदवान असतो तोच टिकतो या डार्विनच्या शास्त्रानं नित्शेला पछाडलं होतं.

या सगळ्या  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झगमगाटात ख्रिश्चन धर्माचं काही कामच उरलं नव्हतं. देव नाही किंवा निदान देव नसू शकतो यावर लोकांचा विश्वास बसत होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं धर्माची जागा घेतली होती. या सगळ्यानं नित्शेच्या आसपासचे अभ्यासक फार भारावून गेले होते. या वैज्ञानिक प्रगतीचं त्यांच्या मनात अपार कौतूक होतं.

पण इतकी वर्ष धर्मानं मानवाला दिलेली नीतीमूल्य विज्ञान देऊ शकत नाही हे नित्शेनं बरोबर हेरलं. या सगळ्या प्रसंगाचं तो ‘डेथ ऑफ गॉड’ म्हणजेच देवाचा मृत्यू असं विश्लेषण करतो. देवाचा मृत्यू झालाय म्हणजे माणसांच्या मनातून आणि हृदयातून देव नाहीसा झालाय, असं त्याला म्हणायचं होतं.

नव्या नैतिकतेची गरज

हाच देव जेव्हा त्या पिढीतल्या लोकांच्या मनात आणि हृदयात जिवंत होता तेव्हा तो नैतिकता पुरवत होता. अनैतिक वागणाऱ्याला शिक्षा करत होता. पण देव मेला आहे हे लोकांना कळलं होतं. त्यामुळे आता कसंही वागलं तरी शिक्षा करणारं कुणीही नाही हे माणसाला कळून चुकलं होतं.

सगळ्या अपराधीपणाच्या भावनेपासून मुक्त करणारं एक सुखद ज्ञान देवाच्या मृत्यूनं जगाला झालं होतं. देवाचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता आयुष्यातली नैतिकतेची पोकळी भरून काढायला काहीतरी नवं तत्त्वज्ञान, नवा देव पाहिजे, असं नित्शेला वाटू लागलं.

म्हणून नित्शे प्राचीन ग्रीक साहित्याकडे वळातो. प्राचीन ग्रीसमधल्या दोन गोष्टी नित्शेला नवी नैतिकता उभी करण्यासाठी महत्वाच्या वाटल्या. एक म्हणजे प्राचीन ग्रीक साहित्यातल्या शोकांतिका म्हणजेच ग्रीक ट्रॅजेडी. आणि दुसरी म्हणजे ग्रीसमधल्या अपोलोनीयन आणि डायनोशीयन या देवता.

ग्रीक शोकांतिकांमधला हिरो

प्राचीन ग्रीसमधे अपोलोनीयन आणि डायनोशीयन अशा दोन देवता होत्या. अपोलोनीयन ही हार्मनी म्हणजे ताळतंत्र, निटनेटकेपणा, विवेक आणि न्यायाचं प्रतिक. तर डायनोशीयन हे डिसहार्मनी म्हणजेच स्वैराचार, उधळेपणा आणि अविवेकाचं प्रतिक. नित्शेच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्यभर या दोन प्रतिकांचा संघर्ष होत असतो.

चांगलं आणि वाईट यातला हा संघर्ष असतो. ग्रीक शोकांतिकांमधेही हा संघर्ष सतत दिसतो. या शोकांतिकांमधला हिरो नित्छेला आकर्षित करतो. चांगलं आणि वाईट यांच्यात सतत संघर्ष चालू असल्यानं या हिरोच्या आयुष्यात अनेक संकंटं येत असतात. त्या सगळ्याला हा हिरो ठामपणे सामोरा जात असतो. तो लढतो, मार खातो, कधी कधी तर शोकांतिकांच्या शेवटी मरतो. पण काही केल्या हा हिरो हार मानत नाही.

हेही वाचा : हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

समाजाला तारणारा सुपरमॅन

नित्शेला या हिरोंमधे त्याचा सुपरमॅन दिसतो. नित्शेचा हा सुपरमॅन म्हणजे निळे कपडे घालून हवेत उडणारा, बिल्डिंगवरून उडी मारणारा किंवा १०-१२ गुंडांशी लढून तरुणीला वाचवणारा हॉलिवूडच्या सिनेमांमधला सुपरमॅन नाही.

नित्शेचा हा सुपरमॅन बुद्धीनं चलाख, मनानं स्थिर आणि कणखर आणि शरीरानं ताकदवान आहे. नित्शेचा सुपरमॅन समाजाला नवी दिशा देतो. नवी, चांगली नैतिक मूल्य तो समाजासमोर ठेवतो. समाजात असणारी पक्षपाती नैतिकता नाकारून स्वतःची नवी नैतिकता तयार करण्याची ताकद सुपरमॅनमधे असते.

नित्शेच्या मते, देवाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली ही पोकळी सुपरमॅननं नवी मुल्यं विकसित करून आपल्यासोबतच संपूर्ण जगाला दुःखातून बाहेर काढायचंय. जगाला त्यानंच तारायचंय.

बहिणीनं केली पुस्तकांची पुनर्रचना

आपल्याकडे नित्शेच्या सुपरमॅनचं उदाहरण म्हणून पटकन महात्मा गांधी समोर येतात. नित्शेला अभिप्रेत असलेला, जगाला योग्य मार्ग आणि दिशा दाखवणारा सुपरमॅन म्हणजे गांधींसारखा माणूस. पण नित्शेच्या तत्त्वज्ञानाचं दुर्दैवं असं की गांधींसारखा सुपरमॅन नित्शेला अभिप्रेत असताना त्याचा तत्त्वज्ञानानं तयार झाला तो हिटलरसारखा सुपरमॅन!

नित्शे ४४ वर्षांचं आयुष्य जगला. या काळात त्यानं असंख्य पुस्तकं लिहिली. काही अर्धवट लिहून सोडून दिली. शेवटच्या १० वर्षांत तो डिमेन्शिया या मानसिक आजारासह जगला. त्याला वेड लागलं होतं. त्याच्या या अवस्थेत त्याला बहिण एलिझाबेथ हिनं सांभाळलं.

वेड लागण्याच्या आधी तो लिहित असलेल्या काही पुस्तकांचं लिखाण अधर्वट राहिलं. नित्शेला वेड लागल्यानंतर त्याची सगळी इस्टेट बहिणीनं बळकावली. त्यात त्याची पुस्तकंही होती.

हेही वाचा : गांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना

सुपरमॅन कसा हवाय?

नित्शे जर्मनीचा राष्ट्रीय तत्त्वचिंतक व्हावा, असं बहिणीला वाटत होतं. तेव्हा मुसोलिनी आणि हिटलर हे नित्शेची आयडियॉलॉजी घेऊन उदयाला येत होते. नित्शेच्या बहिणीनं या संधीचा फायदा घेतला. नित्शेची अर्धवट राहिलेली पुस्तकं तिनं पूर्ण केली. त्याची अनेक पुस्तकं तिनं नाझीवादाला उपयोगी पडतील अशा रितीनं पुन्हा लिहिली. आणि नाझीवादाला नित्शेचं तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान मिळवून दिलं.

नित्शेच्या उपलब्ध लिखाणांपैकी त्याचं कोणतं आणि त्याच्या बहिणीनं लिहिलेलं कोणतं हे सांगणं अवघड आहे. पण नित्शेनं स्वतः कधीही नाझीवादासारख्या आयडीयॉलॉजीला पाठिंबा दिला नसता हे नक्की.

१९ व्या शतकातल्या परिस्थितीने देवाचा मृत्यू असं नित्शेनं केलेलं आकलन फार महत्वाचं आहे. याचं कारण असं की नित्शेनं सांगितलेली ही परिस्थिती आजही दिसून येते आणि आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे सतत तपासून घ्यायला हवं.

हेही वाचा : 

मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

स्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय?

जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ