आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा

०७ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


सगळं डिजिटल युग हे शून्य आणि एक यांच्या भाषेवरच उभं आहे. कारण मशीनना ही आकड्यांचीच भाषा कळते. पण ती भाषा खरं तर असण्याची आणि नसण्याची आहे. आहे आणि नाही हाच तो संघर्ष आहे. अस्तित्वाचा शोध घेताना बुद्धांपासून मार्क्सपर्यंत द्रष्ट्यांना हीच भाषा सापडत आलीय.

सत्ययुग. त्रेतायुग. द्वापरयुग आणि कलियुग. ही चारच युगं आपल्याला युगानुयुगं माहीत होती. हजारो वर्षं कलियुगही हळूहळू सुरू होतं. विज्ञानाने चावी मारल्यावर मात्र हे कलियुग जोरात पळायला लागलं. गेल्या वीस पंचवीस वर्षातच विज्ञानाने कलियुगाला कितीतरी युगं दाखवलीत. विज्ञान युगानंतर यंत्रयुग, कम्प्युटर युग, इंटरनेट युग आलं. आता त्याला आपण डिजिटल युग म्हणायला लागलोत.    

डिजिट आपले, डिजिटल युग त्यांचं

त्यातलं हे डिजिटल म्हणजे काय, ते लगेच समजत नाही. समजत नसेल तर डोकं लावण्याआधी सर्च करायचा डिजिटल युगाचाच रिवाज आहे. शब्दशः उत्तर मिळतं, डिजिटल म्हणजे डिजिटचं. आता डिजिट म्हणजे काय? पुन्हा सर्च करायचा. केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, कॉलिन्स, वेबस्टर या सगळ्या डिक्शनऱ्या एका सर्चवर आपल्या सेवेत येतात. या डिक्शनऱ्यांत डिजिट या शब्दाचा अर्थ शोधला तर असा सापडतो, ० ते ९ या दहा संख्यांमधली कोणतीही एक किंवा त्यांच्यासाठी असणाऱ्या लिखित खुणा. मध्ययुगीन काळात डिजिट हा शब्द इंग्रजीत आलाय. मूळ शब्द लॅटिन आहे. ज्याचा अर्थ आहे बोटं.

हेही वाचाः पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर

विशेष म्हणजे डिजिटचा अर्थ बोटं असा होता, त्या काळात फिरंग्यांकडे मोजण्यासाठी फक्त बोटंच होती, आजच्यासारखे आकडे नव्हते. आपण भारतीय मात्र आजचे आकडे त्यांच्याही शेकडो वर्षं आधी वापरत होतो. आता जगभर वापरले जाणारे अंक भारतात शोधले गेलेत. ते भारतातून अरबस्थानाच्या मार्गे युरोपात पोचले आहेत. आजही या आकड्यांना हिंदू-अरेबियन न्यूमरल सिस्टम म्हटलं जातं. डिजिट आपले, पण आज आपण डिजिटल युगात पोचलो, ते सगळे उपकार मात्र फिरंग्यांचेच आहेत. आपलं त्यात योगदान जवळपास नाहीच. आपण पणजोबाच्या पराक्रमाची वर्णनं करत मिशीला तूप लावायचं फक्त. 

आचार्य पिंगल यांचा शून्य

डिजिटल युग आकड्यांवर चालतं. आपण डिजिटल युगावर चालतो. म्हणजेच आपण आज आकड्यांवर चालतोय. त्यातही हे फक्त दोनच आकडे आहेत, शून्य आणि एक. शून्य ही भारताची जगाला सर्वात मोठी देणगी आहे. आपण सर्रास म्हणतो, आर्यभट्टांनी किंवा भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला. त्यातले भास्कराचार्य चाळीसगावाच्या जवळचेच असल्याचं मानलं जातं. आर्यभट्ट फारच पोचलेले गणितज्ञ होते. त्यांनी पृथ्वीचा आकार, चंद्रापासूनचं अंतर केवळ आकडेमोडीवर अचूक मोजला होतं. दशमान पद्धतीत शून्याचा वापर करणारा तो आपल्याला माहीत असणारा सर्वात जुना माणूस. 

आर्यभट्ट पाचव्या शतकातले. त्याच्याही पेक्षा किमान सातशे आणि कमाल अकराशे वर्षं जुने आचार्य पिंगल नावाचे आणखी एक शास्त्रज्ञ आपल्याच देशात होऊन गेलेत. ते तर आर्यभट्टापेक्षाही भन्नाट असावेत. ते आपल्यासाठी ऋषीच होते. ते छंदशास्त्राचे अभ्यासक होते. छंदशास्त्र हे सहा वेदांगांपैकी दुसरं. वेदांग या वेदांचा अभ्यास करण्यासाठी मदत करणाऱ्या सहा अभ्यासशाखा आहेत. छंदशास्त्र म्हणजे थोडक्यात काय, तर कविता रचण्यासाठी वृत्तांचा अभ्यास.  

शाळेत मराठी शिकताना आपण कवितेची वृत्तं शिकतो. भुजंगप्रयात, आर्या, मालिनी, शार्दूलविक्रीडित, मंदाक्रांता, वगैरे. आठवत असेल तर ही वृत्त आपण लघु आणि गुरूच्या खुणांनी लिहायचो. पिंगलांनी लघु आणि गुरूच्या खुणांनी वृत्तांच्या मात्रा लिहून ठेवल्यात. छंदशास्त्र नावाचा त्यांचा आठ अध्यायांचा ग्रंथ आहे. त्याला पिंगल सूत्रं असंही म्हणतात. त्यात आपल्याला माहीत असलेली शून्याची पहिली अभिव्यक्ती आहे, यावर आता अभ्यासकांचं एकमत होऊ लागलंय.

पिंगलांच्या खुणांमधे बायनरीची झलक

त्याच पिंगल सूत्रांच्या लघु गुरूच्या खुणांमधे काही अभ्यासकांना बायनरी थिअरमही सापडलाय. त्यातल्या खुणा या टेलिग्रामसाठी वापरल्या जाणाऱ्या मोर्स कोडच्याही जवळ असल्याची मांडणी झालीय. पिंगल प्राचीन काळातले असले तरी बायनरी आणि मोर्स कोड या डिजिटल युगातल्या गोष्टी आहेत. बायनरी म्हणजे शून्य आणि एकाच्या असंख्य कॉम्बिनेशनची भाषा. त्याचे कोड लिहिण्याची एक पद्धत म्हणजे मोर्स कोड. आज शून्य आणि एकावर डिजिटल युगाचा सारा डोलारा उभा आहे. 

हेही वाचाः वेदनेने डोळ्यात अश्रू, तरीही खांद्यावर कॅमेरा सुरूच

पिंगलनी आधुनिक गणितात वापरल्या जाणाऱ्या पास्कल ट्रँगल आणि फिबोनॅसी नंबर पण फार पूर्वीच शोधले होते. पण आपण भारतीय पिंगलांच्या अभ्यासाला अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत नेऊ शकलो नाही. त्याला आपण कवितांच्या रचनेपुरतंच मर्यादित ठेवलं. त्यानंतर तर हजारो वर्षं आपल्या देशात अज्ञानाच्या अंधकाराचंच युग होतं. 

शास्त्रीय दृष्टिकोनाला टाळं लावण्यात आलं. दैववाद फोफावला. कर्मयोगाची जागा कर्मकांडांनी घेतली. पुरोहितशाहीने ज्ञान स्वतःपुरतंच ठेवण्यासाठी बहुसंख्य समाजाचं शोषण केलं. जमिनीवरच्या शास्त्रांना दुय्यम स्थान देऊन कुठल्या तरी स्वर्ग नरकाच्या कल्पनांना डोक्यावर घेतलं. शास्त्रांच्या जागी पुराणांच्या भाकडकथा आणि बिनडोक व्रतवैकल्य सांगण्यात आल्या. शास्त्रीय अभ्यासकांच्या परंपरांचं खच्चीकरण करण्यात आलं. 

पिंगलांच्या अनुयायांचं काय झालं? 

या हजारो वर्षांच्या दमनात कुठेतरी आचार्य पिंगलांचे अनुयायी नाडले गेले असतील. त्यांनी पिंगलांनी दिलेलं अभ्यासाचं व्रत जपण्यासाठी शेकडो वर्षं संघर्ष केला असेल. अंधाराच्या पुजाऱ्यांना सत्याचा शोध घेणारे नकोच असतात. त्यामुळे पिंगलांच्या अनुयायांना गावाच्या बाहेर, समाजाच्या बाहेर हाकलून देण्यात आलं असेल. दिवसा उजेडी त्यांचं दर्शन अशुभ ठरवण्यात आलं असेल. त्यांनी समाजाशी संबंध ठेवायचा तो पहाटे उजाडायच्या आधी. 

पहाटेच्या वेळी शकुन सांगत आजही पिंगळा महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमधल्या अनेक गावांमधे फिरतो. लोकांकडून मिळेल ती भीक घेतो. भटक्या विमुक्तांचं पालावरचं जिणं जगतो. पोटापाण्यासाठी भविष्य सांगून लोकांना फसवतोही. तो पिंगळा आचार्य पिंगलांचा अनुयायी असेल का?  ठामपणे सांगता येत नाही. हे असं घडलं असेलही, कदाचित नसेलही. पण आचार्य पिंगलांचा वारसा आम्ही कायमचा नाकारला, हे मात्र छातीठोक मान्य करावंच लागतं. 

डिजिटल संवादाची दिशा पश्चिमेचीच

काही हजार वर्षांपूर्वी भारतीय संस्कृती विज्ञानाकडे पाठ करून अंधाराच्या दिशेने गेली.  त्यानंतर हजारो वर्षांनी युरोपाला विज्ञानाची दिशा सापडली. त्यातून आज आपलं जग डिजिटल युगात पोचलंय. शून्य आपण शोधून काढलाय. एकही आपण शोधून काढलाय. त्या शून्य आणि एकाचे कॉम्बिनेशनही आपण हजारो वर्षांपूर्वी कागदांवर मांडलेत. पण त्यातून मशीनशी संवाद साधता येईल, हा दृष्टीकोन मात्र आधुनिक पाश्चात्य विज्ञानाने कमावलेला आहे.

हेही वाचाः पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन

मशीनने आपल्या आज्ञा ऐकायला हवेत, असं माणसाला अनेक वर्षं वाटायचं. त्यासाठी त्याने खूप प्रयोग करून पाहिले. चाकं, साखळ्या, पंखे यातून वेग मिळवत अवाढव्य कामं करणारी मशीन बनवली. त्या मशीन माणसाची खूप कामं करत होत्या. पण त्या मशीनशी माणसाला संवाद साधता येत नव्हता. त्या भाषेचा शोध माणूस अनेक वर्षं घेत होता. त्याचा शोध घेत घेत तो शून्य आणि एकापर्यंत पोचला. 

माणसाने शून्य आणि एकाची भाषा बनवली. यंत्राला सांगितलं, खटका पडला तर एक समजायचं आणि नाही पडला तर शून्य. सोपं होतं. खटका आहे म्हणजे एक आणि नाही म्हणजे शून्य. अशा एक आणि शून्याचे असंख्य कॉम्बिनेशन करता येऊ लागले. ०००१११००, ११००११०१ किंवा असे कितीही. अशा प्रत्येक शून्य आणि एकच्या गटाशी एक आदेश जोडला गेला. त्या अंकगटांच्या कॉम्बिनेशनमधून माणसाची भाषा मशीनला  कळू लागली. ही सारी आकड्यांची कमाल होती. डिजिटची कमाल होती. आताची सारी आधुनिक टेक्नॉलॉजी हा मुळात आकड्यांचाच खेळ आहे. 

माणसाची भाषा मशीनला कळली

उदाहरणार्थ, पूर्वी आवाज रेकॉर्ड करताना आवाजाचे तरंग आधी संवेदनशील पडद्यावर पडू दिले जायचे. नंतर ते तरंग इलेक्ट्रिक करंटमधून चुंबकीय क्षेत्रात रूपांतरित केले जायचे. नंतर त्याच्या प्रती फार जुन्या काळात प्लास्टिकच्या तबकड्यांवर, नंतर प्लास्टिकच्या पट्ट्यांवर चुंबकांचे थर चढवून बनवल्या जात. त्यानंतर पुन्हा तीच क्रिया उलट केली की आपल्याला स्पीकरमधून आवाज ऐकू येत असे. आता हे तरंग शून्य आणि एक या दोन आकड्यांच्या कॉम्बिनेशनमधे रेकॉर्ड केले जातात आणि स्पीकरपर्यंत पोचवले जातात.  

फक्त आवाजच नाही, अशी कोणत्याही स्वरुपातली कोणतीही माहिती कितीही प्रमाणात शून्य आणि एकच्या कोडमधे गोळा करता येते. त्यामुळे आपलं जगणं सोपं झालंय. मशीन अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतेय. शेतीपासून शिक्षणापर्यंत आणि आरोग्यापासून संवादापर्यंत सगळं सोपं झालंय. या आकड्यांनी जगणं सोपं केलंय. ही सारी शून्य आणि एकाची किमया आहे. 

शून्य आणि एक म्हणावं तर आकडे आहेत. म्हणावं तर आकडे नाहीतही. कारण शून्य म्हणजे नाही आणि एक म्हणजे आहे. मशीनला खऱ्या अर्थाने आहे आणि नाहीचीच भाषा कळते. त्याला आपण ० किंवा १ अशा खुणेने लिहावं किंवा आणखी कोणत्याही खुणेने, याच्याशी मशीनला घेणंदेणं नसतं. त्यामुळे त्याच्या खुणांचे निरनिराळे कोड तयार करण्यात आलेत. त्यातले आकार वेगवेगळे असू शकतात. खुणांचे आकार हे फार महत्त्वाचे नाहीतच. महत्त्वाची आहे असण्याची आणि नसण्याची भाषा. आहे आणि नाहीची भाषा. यंत्रांना तीच भाषा कळते. 

आहे रे, नाही रे, हीच भाषा

आहे आणि नाही, हीच फक्त यंत्रांनाच नाही तर आपल्या सगळ्यांनाही कळणारी मुळातली भाषा आहे. खोलात खोलात गेलो की आपण आहे - नाहीच्या संघर्षापर्यंतच पोचतो. भगवान गौतम बुद्धही हेच सांगत होते. सर्वम् शून्यम् शून्यम् आणि सर्वम् बुद्धम् बुद्धम्. भारतीय तत्त्वज्ञानाचा वेदांती प्रवाहही अस्तित्वाचं गणित मांडत मांडत सत्य आणि मिथ्यापर्यंत पोचला. कार्ल मार्क्स नावाचा आधुनिक काळातला एक ऋषी तर आचार्य पिंगलांचाच वारसदार शोभवा असा. त्याने जगातल्या लोकांची वाटणी दोन प्रकारांत केली. हॅव्ज आणि हॅव नॉट्स. म्हणजे आहे रे आणि नाही रे. ज्यांनी संपत्ती आपल्याकडे ओरपून घेतली ते हॅव्ज आणि दुसरे ज्यांच्याकडे काहीच नाही ते हॅव नॉट्स. 

अध्यात्म असो वा भौतिक विकास, आहे - नाहीचा संघर्ष संपणारा नाही. विचार करत जावं तसा तो खूप गुंतागुंतीचा होत जातो. आहे - नाहीची असंख्य कॉम्बिनेशन होऊ शकतात. आपलं जग त्यावरच आपल्याही नकळत चालत राहतं. पिंगल, बुद्ध, शंकराचार्य, मार्क्स यांच्या सारखे काही महान द्रष्टेच आहे - नाहीचा संघर्ष शब्दांत पकडू शकले. आजचं तंत्रज्ञानही तेच करतंय. फक्त शब्दांच्या जागी आकडे आहेत. त्यामुळे त्यांचं योगदान माणूसजातीसाठी या महान द्रष्ट्यांच्या इतकंच मोलाचं आहे. 

डिजिटल युग आपल्या सगळ्यांना व्यापून दशांगुळे उरलंय. कारण मुळात आहे नाहीचा संघर्षही असाच आहे. आता तर तो डिजिटल डिवाईडपर्यंत येऊन पोचलाय. ज्यांच्यापर्यंत डिजिटल युगाचे फायदे मिळालेत ते खरे `आहे रे` बनत आहेत. ज्यांना हे डिजिटल युग माहीतच नाही, ते नवे `नाही रे` बनत आहेत.