गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

२० डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


संत गाडगेबाबांचा आज स्मृतीदिवस. त्यांंचंं एकच कीर्तन आज पुस्तकाच्या रूपात उपलब्ध आहे. त्यांच्या या एकमेव कीर्तनात अनेक सामाजिक अर्थ दडलेत. सत्यनारायणाच्या पुजेतला थोतांडपणा सांगतानाच गाडगेबाबांनी बहूजन समाजाच्या नेमक्या दुखण्यावरही बोट ठेवलं. माणसात देव शोधणाऱ्या या संताने भक्तीमार्गाने समाजक्रांतीचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनावरचं हे भाष्य.

ज्ञानेश्वर तुकारामांपासून ते गाडगेबाबा यांच्यापर्यंत महाराष्ट्राला थोर संतांची एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला चांगल्या अर्थाने वळण लावण्याचं काम या परंपरेने केलंय. या परंपरेचा न्या. रानडे यांनी ‘शिवाजीच्या राज्यस्थापनेची पार्श्वभूमी मराठी संतानी उभारली’ या शब्दात गौरव केला. तर इतिहासाचार्य राजवाडे यांनी मात्र ‘संतांनी परमार्थाच्या नादी लावून महाराष्ट्राला पंगु करून टाकलं’ अशी कठोर टीका केली.

दोन टोकांच्या विचारधारा

संतांना समजून घेणाऱ्या या दोन टोकाच्या विचारधारा आहेत. दोघांचेही विशिष्ट दृष्टीकोन आहेत. अध्यात्म आणि श्रद्धेचा एक दृष्टीकोन तर दुसरा केवळ भौतिक विकासासात्मक स्थित्यंतराचा. काहीही असलं तरी निश्चितपणे संत परंपरेने महाराष्ट्राच्या समाजजीवनात मोठं ऐतिहासिक काम केलंय. या कार्याचे मूल्यमापन आपण कसं करणार आहोत यावर संतांचं थोरपण अजिबात अवलंबून नाही.

त्याकाळची पार्श्वभूमी आपण समजून घेतली तर निश्चितपणाने संतांनी अवघ्या मराठी समाजाला आत्मिक बळ पुरविल्याचे आपल्या लक्षात येईल. आज हजार-बाराशे वर्षांनंतरही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात संत संप्रदायाचा प्रभाव जराही कमी झालेला दिसत नाही. उलट तो अधिकाधिक वाढता चाललेला आपल्याला दिसेल. यामागची कारणं काय असावीत? याचा शोध आपापल्या परीने घेता येवू शकेल.

‘महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य’ या सुमारे ४० वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या ग्रंथात बा. र. सुंठणकरांनी या परंपरेची फार चांगली चिकित्सा केलीय.

‘महाराष्ट्रीय संतांची परंपरा ही ज्ञानेश्वर तुकारामांपासून विशेष तेजस्वी रुपात आढळते. त्यानंतरचे संत ज्यांना पढिक किंवा पारंपरिक म्हणता येईल अशा स्वरूपाचे झाले. नामदेवांच्या भक्तीतील उत्कटता आणि तळमळ; एकनाथांची मानवजातीबद्दलचीच नव्हे तर अखिल प्राणीमात्रासंबधीची उदात्त समभावना आणि अंतरीची कळकळ; तुकारामांचा भक्तिभावाने ओथंबलेला अंत:करणाचा जिव्हाळा आणि आत्मप्रत्यय हे पुढच्या संतात आढळून येत नाही. पुढच्या संतांनी संत संप्रदाय चालू ठेवला. त्यात मौलिक भर घातली त्यामुळे संतांचा उज्ज्वल संप्रदाय हा तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतच आढळून येतो.’

हेही वाचा : वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग १)

आधुनिकतेचा मंत्र देणारा कर्मयोगी

पण विसाव्या शतकातही असा एक कर्मयोगी महाराष्ट्रात होवून गेला ज्याने सबंध देशाला आधुनिकतेचा मंत्र दिला. समाजजीवनातल्या अनिष्ट रूढी परंपरांवर तुकारामाएवढाच कठोर हल्ला केला. ऐहिक सुखाचा त्याग करून भक्ती मार्गाचा नवा दृष्टीकोन समाजात रूढ केला. आपल्या प्रत्यक्ष कृतीने आणि कीर्तनाने अवघ्या महाराष्ट्राला भारावून टाकलं. गाडगेबाबा हे या आधुनिक संताचं नाव. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं मूळ नाव.

२० डिसेंबर हा गाडगेबाबांचा स्मृतिदिन. जवळपास ६० वर्षापूर्वी त्यांचं निर्वाण झालं असलं तरी त्यांचे विचार आपल्याला आजही दूर लोटता येणार नाहीत इतके ते महत्वाचे आहेत. केवळ पारमार्थिक मोक्ष भरून काढण्यासाठी गाडगेबाबा संत झाले नव्हते. तर समाजक्रांतीचं एक मोठे आव्हान समोर घेवून ते प्रत्यक्ष समाजात उतरले. भक्तिमार्गाचा प्रसार एवढंच त्यांचं ध्येय नव्हते. शिवाय जो भक्तिमार्ग आधीच्या परंपरेने दिला होता. तोच त्यांना पुढे घेवून जायचा नव्हता.

माणसात देव शोधणारा संत

देव नाकारणारा हा आधुनिक संत प्रत्यक्ष माणसात देव शोधत होता. वर्णभेद, जातीभेद, पशुहत्या, व्यसनाधीनता याविषयी जागरुकता निर्माण करणारे गाडगेबाबा खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. शिक्षणाचं महत्त्व जाणून खेड्यापाड्यातल्या निरक्षर बायाबापड्यांच्या डोक्यात उजेड पाडण्याचं काम त्यांनी अहोरात्र केलं. स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. कुणब्याचं दु:खी, कष्टी जीवन संपवण्यासाठी प्रयत्न केले.

संन्यासवादाचा पुरस्कार न करता समाजसेवेचे व्रत घेवून अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करत राहिले. देशभर भ्रमंती करून समाजजीवनातील रूढीपरंपरांचं निरीक्षण केलं. अज्ञानी माणसाला कर्मकांडातून मुक्त करण्याचा जो ध्यास बाबांनी घेतला होता तो अखेरपर्यंत कायम होता. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते सक्रीय राहिले.

शेवटच्या कीर्तनाची गोष्ट

बाबांनी आयुष्यभर हजारो ठिकाणी कीर्तनातून उपदेश केला असला तरी त्यांचं केवळ शेवटचंच एकमात्र कीर्तन आज उपलब्ध आहे. मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर १९५६ रोजी पोलीस विभागाने सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. याठिकाणी गाडगेबाबांनी यावं अशी पोलीस अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. दरम्यानच्या काळात बाबांची प्रकृती खूप खालावली होती. ते कीर्तन करू शकत नव्हते. मात्र असं असले तरी ‘बाबा, तुम्ही फक्त तिथे या, कीर्तन करू नका’ असा आग्रह पोलिसांनी केला. त्यामुळे बाबा तिथे गेले.

समोर अतिविशाल समुदाय बघून त्यांनी कीर्तन करण्याचा निर्णय घेतला. हे कीर्तन आज पुस्तकरुपात उपलब्ध आहे. आपल्याकडची पारंपरिक कीर्तन परंपरा आणि गाडगेबाबांचे कीर्तन यातला फरक सहज जाणकारांच्या लक्षात येवू शकेल. अत्यंत सोप्या भाषेत, खरं तर लोकभाषेत बोलण्याची त्यांची शैली विलक्षण स्वरुपाची आहे.

‘देव पहावायाशी... गे ऽलो ऽ अन् तेथे देव होवोनी... ठेलो...’ या तुकोबांच्या अभंगाचा दाखला देवून ते ज्या पद्धतीने निरुपण करतात ते पाहून कुणीही थक्क व्हावं. लौकिकार्थाने ते निरक्षर. पण अनुभवाच्या शाळेत त्यांनी जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानावरच त्यांनी अज्ञानी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. देवाचं अस्तित्व नाकारणारे गाडगेबाबा तसं बघितलं तर नास्तिक. पण माणसांची सेवा करून त्यांच्यात देव बघा ही त्यांची शिकवण त्यांच्या मानवीय वृत्तीची द्योतक मानता येईल.

हेही वाचा : वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग २)

सत्यनारायणाच्या पुजेचं चिरफाड

‘जतरेमे फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवाणी पैसे की धुलधानी’ हा कबिरांचा दोहा सांगून देवाच्या नावावर सुरु असलेल्या बाजारू थोतांडाला त्यांनी उघडं पाडलं.

गाडगेबाबांचं हे शेवटचं कीर्तन सामाजिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे याची प्रचिती आपल्याला येते. माणसांच्या अहंकारावर ते ताशेरे ओढतात. ‘ज्याचा अभिमान गेला I अन् तुका म्हणे देव झाला’ ही त्यांची उक्ती खूप अर्थपूर्ण वाटते. सत्यनारायण पूजेच्या धर्मभोळेपणावरही ते टीका करतात. लोभी लोकच अशा गोष्टीत गुंतून पडतात हे त्यांचं सांगणं खूप अर्थपूर्ण आहे.

देव विकत मिळत नाही. तो देवळात नसतो आणि मशिदीतही नसतो. ब्रिटिशांनी देशावर पारतंत्र्य लादलं. त्यांच्या पारतंत्र्यातून देशाला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रह केला. मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या या महात्म्याला ‘देव’ म्हणा हे त्यांचं सांगणं होतं. देवाला फळे, फुले वाहून प्रसन्न करण्यापेक्षा गोरगरीबांसाठी हॉस्पिटल्स बांधा. त्यांना औषधं आणि कपडे द्या. त्यांच्यावर दया करा. त्यांच्यात देव बघा. बुवाबाजीविरुद्ध आवाज उठविणारा आणि मूर्तीपूजेचा निषेध करणारा हा आधुनिक संत कोणत्याच धार्मिक शिकवणुकीत गुंतला नाही तर लोकांच्या अंत:करणापर्यंत पोचला.

बहुजनांचं वाटोळं होण्याचं कारण

मारवाडी, गुजराथी, ब्राह्मण समाजातील लोकांजवळ सर्वात जास्त ‘लक्ष्मी’ असते. कारण काय तर त्यांच्याकडे ‘विद्या’ असते. त्याउलट मराठे, माळी, तेली, न्हावी, धोबी, चांभार, कोळी, कुंभार, लोहार, बेलदार, कैकाडी, गोंड गवारी, मांग, महार यांचं आयुष्य म्हणजे जनावरांसारखं असतं. कारण शिक्षणाचा अभाव. त्यांच्या कीर्तनातला हा एक उतारा बघा:

‘महाराज विद्या केवढी मोठी आहे. डॉक्टर आंबेडकरसाहेब, यांच्या पिढ्यानपिढीत झाडू मारायचं काम केलं. त्यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकरसाहेबाले शाळेत घातलं. आंबेडकरसाहेबानं काही लहानसहान कमाई नाही केली. हिंदुस्थानची घटना केली घटना, अन् तेच शाळेत जाते ना, अन् शिकते ना, तर झाडू मारनंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. जेवनाचं ताट मोडा, बायकोला लुगडं कमी भावाचं द्या. मोडक्या घरात रहा. पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू नका.’

डॉ. आंबेडकर यांच्या जातीअंताच्या लढाईला गाडगेबाबांनी सर्वार्थाने पाठिंबा दिला. आपल्या कीर्तनातून अस्पृश्यतेविरुध्द ते सतत बोलत राहिले. डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. कारण समाजपरिवर्तन हे सगळ्यांचंच ध्येय होतं.

संधी द्या, परोपकार करा

धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृह, गोरक्षणे स्थापन करून त्यांनी मोठे कार्य केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पशूहत्येविरुद्ध त्यांनी मोठी जागृती केली. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात होणाऱ्या जत्रेत नवसाच्या नावावरची पशुहत्या भयंकर होती. हजारो कोंबड्या बकऱ्यांचा बळी पाहून ते व्यथित व्हायचे. शेवटच्या कीर्तनात तर ते अत्यंत पोटतिडकीने या विषयावर बोलले. अंत:करणात दया असेल तो सत्पुरुष, ही त्यांची धारणा होती. ‘बकऱ्याला चारा टाकता, पाणी पाजता, घरात बांधता, पोटच्या मुलासारखे वागवता अन् मसाला लावून कापून खाता. माणसं नाहीत तुम्ही.’ हे त्यांचं सांगणं खूप कळकळीचं होतं.

ज्याच्या हाताने दुसऱ्याच्या मानेवर सुरी जात असेल, त्याचा प्राण, कापून आपलं पोट भरत असेल तो माणूस कसा? गुजराती, मारवाडी, ब्राह्मण यांच्यात कोंबड्या कुणी पाळत नाही. मग त्या बहुजनातच कशा आल्या? यामागचं मुख्य कारण अज्ञान आहे ही गोष्ट ते लोकांना पटवून देत. गरीब मुलंही बुद्धिवान असतात. त्यांना संधी द्या. परोपकार करा. जातीभेद मोडून काढा. दारू पिणं बंद करा. अशा साध्यासुध्या कितीतरी गोष्टींचं शहाणपण त्यांनी समाजाला दिलं.

गाडगेबाबांना जाऊन आता सहा दशकांहून अधिक काळ झाला. या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन काळातली संत परंपरा आणि विसाव्या शतकातले गाडगेबाबा यांच्यातल्या वैचारिक नात्यातली प्रासंगिकता, समकालिनता आताच्या काळात समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!’

हेही वाचा : 

गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?

अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

(लेखक हे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)