अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा पाहिला. सिनेमाकडून अर्थातच फार अपेक्षा होत्या. थिएटरमधे जेमतेम लोक होते. त्यातले अर्धे गोडसेवादी होते, हे स्पष्ट होतं. पण सिनेमा कशारीतीने साकारला आहे, याची उत्सुकता मला होती. माझा पुरता भ्रमनिरास झाला. 'गांधी आणि गोडसे पुन्हा आमने-सामने आले तर? त्यांच्यात संवाद झाला तर तो कसा होईल?' अशी कल्पना निश्चितच आकर्षक आहे.
याच संकल्पनेवर आधारित 'ओह माय गोडसे' ही माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यामुळे इथून पुढे मी जे लिहतोय, तो काहींना सिनेमाचा रिव्यू वाटणारही नाही किंवा काहींना फक्त तुलना वाटेल. ज्याला जे वाटेल ते वाटो. माझे मुद्दे मला मांडणं महत्त्वाचं वाटतं.
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. मी नाटक पाहिलेलं नसलं तरी त्याची संकल्पना मी आधी वाचली होती. ती अर्थातच इंटरेस्टींग वाटली होती. कदाचित नाटकाची म्हणून ती मजा असेल. पण हा सिनेमा पूर्णपणे फसला आहे. यामधे सर्वाधिक अपयश दिग्दर्शक म्हणून राजकुमार संतोषी यांचंच आहे, हेही तितकंच खरं.
सिनेमाच्या नावात 'गांधी-गोडसे विचार युद्ध' असा उल्लेख आहे. पण तो तेवढाच नाहीय. आणि जेवढा आहे, तेवढा पुरेसाही नाही, हे खरं. यामधे सावरकरांसारखा महत्त्वाचा माणूस कुठेच नाही. उल्लेख येतो तो एकदाच आणि ओझरता... नेहरु आणि इतर काँग्रेस नेत्यांचं सध्याचा वातावरणाला साजेसं चित्रण आहे. गांधी कसे हेकेखोर होते, हे फारच गडद केलं गेलंय. महिलांबाबत, प्रेमाबाबत, लग्न आणि विवाहसंस्थेबद्दलची त्यांची मतं फारच विचित्र पद्धतीने आणि फारच ठळक होतील, अशी मांडली आहेत.
नावातल्या उल्लेखाप्रमाणे बिचाऱ्या नथुरामला फिफ्टी-फिफ्टीही फुटेज मिळत नाही, अर्थात, हा तक्रारीचा मुद्दा नाहीय, पण काहींना असंही वाटू शकतं. पण नथुराम या पात्रालाही पूर्ण न्याय दिला गेला आहे, असं वाटत नाही. थोडक्यात, दोन्हीही पात्रांना पूर्णांशाने न्याय दिल्यासारखा वाटत नाही.
हेही वाचा: नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता
स्वातंत्र्यापासून सिनेमाची सुरवात होते. गांधींच्या हत्येच्या घटनेपर्यंत हा सिनेमा उत्कंठावर्धक वाटतो... त्यानंतर गोडसेनं केलेल्या हल्ल्यातून गांधी वाचतात आणि हीच या कथेची मेख आणि शक्तीस्थानही आहे. पण ते दृश्य रुपात मांडण्यात दिग्दर्शक अयशस्वी झाला आहे, असं जाणवत राहतं. मला स्वत:ला या विषयात इतका रस असूनही सिनेमा पाहण्यातला इंटरेस्ट मधेच निघून गेला असेल तर इतरांची अवस्था काय झाली असेल याचा विचार मला करवतच नाही.
सर्वांत जास्त भ्रमनिरास होतो तो गोडसेवाद्यांचा... पण, गांधींना मानणारे जे लोक भाबडे नाहीयेत, त्यांचाही माझ्यासारखाच भ्रमनिरास होईल. पण, 'गांधी-गोडसे' या सिनेमाचा शेवट थोडा हास्यास्पद आणि अतिशयोक्त वाटतो. 'ओह माय गोडसे' कादंबरीवेळीही माझ्यासमोर 'शेवट कसा असावा?' हा प्रश्न होताच.
मी या कादंबरीच्या प्राथमिक टप्प्यावर मानसोपचारतज्ज्ञ हमीद दाभोलकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी त्यावेळी दिलेला एक सल्ला मला उपयोगी ठरला होता. 'आणि त्यांनी सुखाने संसार केला...' अशा स्टेरिओटाईपचा शेवट टिपीकल बॉलिवूड फिल्म टाईप आहे. वास्तवात असं होत नसतं. 'गांधी कभी मरते नहीं' ही भाबडी समजूत आपली आहे. पण 'नथुराम संपलाय, असं समजून कसं चालेल?' ही या द्वंद्वाची दुसरी बाजू आहे, जी मी माझ्या कादंबरीत मांडली आहे.
'ओह माय गोडसे' या कादंबरीचा प्लॉट हा 'गांधी आणि गोडसे' दोन प्रवृत्तींमधल्या द्वंद्वाचा आहे. हे द्वंद्व चिरंतन आहे. ते पूर्वापार चालत आलंय आणि ते इथून पुढेही चालतच राहिल, हे अधोरेखित करणारं आहे. इथंही गांधी-गोडसे आमनेसामने येणार आहेत. संवाद करणार आहेत. त्याचा बेस 'सायकॉलॉजिकल ड्रामा' आहे.
'गांधीहत्या' याच एका विषयापुरती ही कादंबरी मर्यादीत आहे. त्यामुळे गांधीहत्येच्या अनुषंगाने गोडसे आणि गांधी अशा दोन्ही बाजूंचे बऱ्यापैकी सगळेच युक्तीवाद त्यात येतात. अर्थात, इतिहासावर आधारित कथा-कादंबरी-नाटक-सिनेमा या कोणत्याही प्रकाराकडे प्रेक्षकांनी निव्वळ मनोरंजन म्हणून पहावं, असं माझं स्पष्ट मत आहे. मग ते माझ्या इतिहासाधारित कादंबरीकडेही...
'ओह माय गोडसे' हा इतिहासच आहे आणि माझ्या लेखकीय निष्ठेला स्मरुन मी सत्य तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही, लोकांना इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्यांनी मूळ संदर्भांकडे जावं... स्वत: वाचावं आणि जाणून घ्यावं सत्य काय आहे ते.
हेही वाचा:
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट