आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त हा खास रिपोर्ट.
यात्रा आणि उत्सव साजरे करण्यात भारताचा जगात नक्कीच पहिला क्रमांक लागेल. प्रसंगी कर्ज काढुनही सण, उत्सव, यात्रा साजरे करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अगदी मरीआई, सटवाईसारख्या पिशाच्च देवता म्हणून ओळखल्या जाणार्या देवतांपासून ते बालाजीसारख्या अब्जोंपती देवांपर्यंत, शेकडो देवदेवतांच्या, साधुसंताच्या नावाने कुठे ना कुठे यात्रा चालू असतात.
हे सगळं माहीत असल्यामुळे कुणी आपल्याला महात्मा गांधींसारख्या एका महापुरुषाच्या नावाने यात्रा भरते म्हटलं तर त्यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे. लातूरपासून ४० किलोमीटरवर असलेल्या शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या उजेड गावात गांधीबाबाच्या नावाने यात्रा भरते. तीही तब्बल ७० वर्षांपासून.
उजेड या गावाच्या नावाचीही खूप इंटरेस्टिंग आख्यायिका आहे. गावात स्वातंत्र्यानंतर तीसेक वर्षांनी १९७८ ला गावात वीज मंडळाची लाईट आली. त्याआधी गावात जनरेटरचा उजेड पडायचा. गावातले चाँद पाटील हे १६०० एकर जमिनीचे मालक, श्रीमंत आणि दिलदारही. त्यांनी एक मोठा जनरेटर आणून रस्त्यावर पोल उभे करून गावात उजेड पाडला. म्हणून या गावाला उजेड हे नाव पडले. ही गोष्ट आहे १९५० ची. त्याआधी हिसामाबाद असं गावाचं नाव होतं.
या यात्रेबाबत असं सांगितलं जातं, की सुरवातीला इथे महादेवाची यात्रा भरायची. काही कारणाने ती बंद पडली. त्यानंतर मोहिमसाब खादरी यांची यात्रा भरू लागली. १९४८ ला निजाम संस्थानविरोधी पोलीस ऍक्शननंतर ही यात्रासुद्धा बंद पडली. पाचेक वर्ष गावात कसलीच यात्रा भरली नाही. उजेडचे पहिले सरपंच आणि स्वातंत्र्य सैनिक शिवलिंग स्वामी, जमीनदार चाँद पटेल, राजाराम कांबळे, मुख्याध्यापक रामराव रेड्डी यांनी गावातल्या प्रमुख मंडळीना सोबत घेवून नव्याने यात्रा सुरु करण्याबाबत चर्चा केली.
अनेकांनी अनेक सुचना केल्या. मात्र रेड्डी गुरुजींनी एक भन्नाट सल्ला दिला. ते म्हणाले, ‘आता आपण सर्व जातीधर्माच्या लोकांना मान्य होईल अशा एकाच देवाची यात्रा भरवू.’ यावर सगळ्यांनी मोठ्या उत्सुकतेने, कौतुकाने असा कोणता देव आहे, अशी त्यांना विचारणा केली. तेव्हा गुरुजींनी महात्मा गांधी हे नाव सांगितलं. सर्वांनाच ही कल्पना आवडली आणि दरवर्षी प्रजासत्ताकदिनी ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय झाला.
यात्रा, जत्रा म्हटलं की तिथे कुठला तरी पुतळा, मूर्ती लागते. पण उजेडमधे तर गांधीजींचा पुतळाच नव्हता. आसपासच्या कुठल्या गावातून पुतळा आणावा म्हटलं तर तशी कुठली सोयही नव्हती. मग लोकांनी पट्टी गोळा करून आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याहून महात्मा गांधीचा पूर्णाकृती पुतळा आणला. त्यावेळी तो केवळ ८० रुपयात गावात आला, असं गावकरी सांगतात.
मारुती मंदीरासमोरच्या मोकळ्या जागेत गांधीबाबांचा पुतळा उभारण्यात आला. मात्र तिसर्या वर्षी यात्रेत दोन उंटाच्या भांडणात पुतळ्याचा हात मोडला. पुतळ्याची आकर्षकता गेली. मग ग्रामस्थांनी कोल्हापुरच्या मुर्तीकाराकडे पंचधातुच्या गांधीजींच्या पुर्णाकृती पुतळ्याची मागणी नोंदवली. त्यावर्षी तो वेळेत तयार न झाल्याने मुर्तीकाराकडचा गांधीजींचा अर्धपुतळा तात्पुरता म्हणून आणण्यात आला.
हेही वाचाः भवरलालजींनी माळरानावर साकारले गांधीविचार
पुढे कोल्हापुरहून तो पुतळा आणायला कुणी गेलं नाही. त्यामुळे तो अर्धपुतळाच कायम झाला. महात्मा गांधीचा हा अर्धपुतळा वर्षभर ग्रामपंचायतीमधे असतो. यात्रेनिमित्ताने २३ तारखेला गावात साफसफाई होते. २४ जानेवारीला वाजतगाजत मिरवणुकीने तो पुतळा मारुती मंदिराजवळच्या चबुतर्यावर बसवण्यात येतो.
२६ जानेवारीला शाळेच्या प्रभातफेर्या निघतात. त्यात पालखीत गांधीबाबांची तस्वीरही असते. या पालखीतल्या गांधीजींच्या प्रतिमेला महिला हळदकुंकू, बेलफुलं वाहून पूजा करतात. मिरवणुकीत ‘गांधीबाबा की जय’ हा नारा हमखास असतो. अगदी सुरवातीच्या काळात नाटक, तमाशा आणि सर्कस ही यायचे. यात्रेसाठी सगळी नातेवाईक मंडळी आवर्जून यायची. पण सध्या हे प्रमाण कमी झालंय.
सध्या यात्रेत रहाटपाळणे, विविध मिठाईची दुकानं, खेळ आणि मनोरंजनाची साधनं येतात. दुष्काळ असूनही यात्रेचं आकर्षण कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून यात्रेत विविध उपक्रम राबवले जाताहेत. पुर्वी ही यात्रा २३ ते २६ जानेवारी अशी व्हायची. आता हा कालावधी ३० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलाय. ३० जानेवारी हा महात्मा गांधीजींचा स्मृतिदिन असल्याने, त्यांना अभिवादन करून ही यात्रा संपते. यावर्षीची गांधीबाबाची यात्राही उत्साहात साजरी होत आहे.
गुरुवारी २४ जानेवारीला पशुपालकांसाठी पशूरोगनिदान आणि उपचार शिबीर घेण्यात आलं. तज्ज्ञ पशुवैद्यकांमार्फत अनेक जनावरांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शुक्रवारी २५ जानेवारीला तालुकास्तरीय पशुप्रदर्शन घेण्यात आलं. यामधे देवणी, कंधारी, संकरीत गायी, बैल, घोडे हे पशु सहभागी झाले होते. यातल्या निवडक पशुंना बक्षीसंही देण्यात आली.
शनिवारी २६ जानेवारीला शालेय प्रभात फेर्यात विद्यार्थ्यांनी विविध कवायती आणि योगासनांचं सादरीकरण केलं. २७ जानेवारीला जिल्हाभरातल्या आणि बाहेरच्याही नामवंत मल्लांनी कुस्त्यांमधे भाग घेतला. रुई रामेश्वर इथल्या भरत कराड या नामवंत मल्लाने मानाची कुस्ती जिंकली.
यंदा यात्रेतली विशेष नोंदवण्याजोगी बाब म्हणजे अंबाजोगाई इथाल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी या यात्रेत सक्रीय सहभाग नोंदवला. संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी गावात श्रमदान करून १०० रोपटी लावली. शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत परिसरात ही रोपटी लावण्यात आली.
माऊली हॉस्पिटल, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मल्लिकार्जून धनासुरे, डॉ. संतोष बिराजदार यांच्या पुढाकाराने सर्वरोगनिदान आणि नेत्रतपासणी शिबीरही घेण्यात आलं. या दरम्यान विविध लोकप्रतिनिधींनी यात्रेला भेट दिली.
महात्मा गांधी हे राष्ट्रपिता. स्वातंत्र्य लढ्याला सामान्य माणसांचं व्यापक पाठबळ मिळवून देणारा नेता. यालाही उजेडकरांनी देव बनवलंय. सगळेजण गांधीबाबाला देव मानतात. नवसही करतात. गांधीबाबा मला पावले म्हणूनही सांगतात. या यात्रेमुळे गाव परिसरातल्या वातावरणात सामाजिक सौहार्द तयार झालंय.
उच्चवर्णीय, दलित सगळे एकाच पंक्तीला बसून जेवण घेतात. मंदिरात सर्वांनाच मुक्त प्रवेश आहे. शिवाय सर्वणांप्रमाणेच गावातल्या दलितांचा नवरदेवही शेवंतीसाठी मारुती मंदिरावर जातो. हा सगळा गांधीबाबाच्या यात्रेचा परिणाम म्हणावा लागेल.
गांधी हे गावचं दैवत असल्याने स्वातंत्र्यानंतर सुमारे ६५ वर्ष उजेडमधे दारुचं अधिकृत दुकान नव्हतं. बिअरबार नव्हता. मात्र दोन वर्षांपासून गावात दोन बिअरबार आणि एक देशी दारुचं दुकान सुरू झालंय. गांधींच्या नावानं यात्रा भरवणं सोपं आहे. मात्र गांधी गावात रुजवणं अवघड आहे, हे ठळकपणे अधोरेखित करणारी ही बाब आहे.
बाकी महाराष्ट्रातल्या इतर हजारो गावांसारखीच उजेडचीही अवस्था आहे. नाव उजेड आहे म्हणून त्या गावात सगळा ‘उजेडच’ आहे असं मानण्याचं कारण नाही. तरीही इतक्या वर्षांपासून ग्रामस्थ गांधीबाबांची यात्रा उत्साहाने साजरी करताहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आपण सगळ्यांनाही या यात्रेला जाऊन गावकऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे.
हेही वाचाः
खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)