महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!

२१ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!

महादेव हा सगळ्यांचाच अत्यंत आवडता देव! मस्तकावर चंद्र. चेहऱ्यावर मंद स्मित. हलाहल पिऊन पण त्याचं अवडंबर न करणारा, त्याच्या गणांवर मुलासारखं प्रेम करणारा आणि त्यांची काळजी घेणारा देवांचा देव महादेव!

महादेव या देवतेविषयी असणारं आकर्षण आणि आदर कधीही कमी होत नाही. उलट मानवी मनवर्तणूक म्हणजेच ह्युमन बिहेविअर आणि समूह मानसशास्त्र म्हणजे कम्युनिटी सायकोलॉजीचा अभ्यास करताना महादेव हे दैवत आणि त्याची लौकीक प्रभावळ आपल्या अभ्यासाचा केंद्रबिंदू बनते.

महादेव म्हणजे सर्वसामान्यासारखा ‘भोळा सांब’

मुळातच अवैदिक असणारा महादेव म्हणजे देवांचा देव! म्हणूनच महादेव हे नाव त्याला अगदी शोभून दिसतं. महाराष्ट्रात लोकप्रिय असणारे खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा, भैरोबा, विठोबा ही शिव या दैवताचीच अनेक रूपं आहेत. महाराष्ट्राची भावभूमी शिव म्हणजे महादेवाने व्यापून टाकली आहे. महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असणारा वारकरी संप्रदाय मुळात शैव संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाची लोकप्रिय आवृत्ती म्हणावी लागेल.

निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई हे संत मुळात नाथ संप्रदायीच आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी ही मूळ शैव आहे. शाक्त संप्रदायही शैव संप्रदायातली उपशाखा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राची ओळख ज्या गणेश या देवतेने केली जाते तो तर प्रत्यक्ष शिवाचा मुलगा आहे. तर खंडोबा हा स्कंद कार्तिकेय असल्याचं हिंदू परंपरेत मानलं जातं.

पण या सगळ्यात महादेवाबद्दल आपल्याला जास्त आपुलकी वाटते. कारण तो सर्व सर्वसामान्य माणसांसारखा आहे. तो सर्व शक्तिमान असूनही त्याला कसला गर्व नाही की अहंकार नाही. तो निस्वार्थी आणि अल्पसंतुष्ट आहे. म्हणूनच त्याला आशुतोष असंही म्हटलं जातं. तुमच्या माझ्यासारख्या माणसांच्या मनात असणाऱ्या भावनांचा तो समुच्चय आहे. सर्व सामान्य माणसांसारखा तो भोळा, ‘भोळा सांब’ आहे.

हेही वाचा : महाशिवरात्री कशासाठी साजरी केली जाते?

अस्पृश्यांचाही देव म्हणजे महादेव

समतेचा पुरस्कर्ता म्हणूनही महादेवाकडे पाहता येतं. तो सगळ्यांकडे समदृष्टीने पाहतो. देव असो किंवा दानव त्याची दृष्टी सर्व भक्तांसाठी समसमान आहे. त्याच्या मनात कपट नाही, मत्सर नाही, द्वेष नाही. तो मनाने उदार आहे. प्रसन्न झाला की भक्तांना भरभरून देतो.

जगातलं द्वेष, मोह ,मत्सर, लोभ,क्रोध याचं विष संपावं म्हणून तो विष पिऊन नीलकंठ होतो. त्याला काहीही वर्ज्य नाही काहीही अनिष्ट नाही! तो विटाळ, चांडाळ, स्पृश्य, अस्पृश्य देखील मानत नाही. शैव-शाक्त उपासनेत भेदाभेद मानणाऱ्या वैदिक चातृवर्ण्याला जागा नाही. म्हणूनच सिंधू संस्कृतीच्या काळापासून त्याचा भक्तसंप्रदाय प्रबळ आहे.

शिव सत्यान्वेषी आहे. पृथ्वीवरचं सर्व काही सत्य आहे. मर्त्य म्हणजे आपण जगतो त्या जगाचा तो तिरस्कार करत नाही. निवृत्तीपर तत्त्वज्ञानाचा म्हणजेच मेल्यानंतर प्राप्त होणाऱ्या स्वर्ग, नरक या जगाचा तो गवगवा नाही. निश्रेयस-सिद्धी, मोक्ष या कल्पनांपेक्षा या भूतलावरचं जीवन हे सर्वात पवित्र आहे, मंगल आहे, शिव आहे आणि म्हणून सर्व काही सुंदर आहे, याची जाणीव शिवाकडे पाहिल्यावरच होते.

पार्वतीला समतेचा दर्जा आहे

तो योग्यांसाठी योगी आहे, तर भोग्यांसाठी भोगीदेखील आहे. तो गृहस्थाश्रमी आहे आणि गृहस्थी जीवनातल्या प्रत्येक इच्छा, आकांक्षांनासुद्धा मुक्त रुपात प्रकट करतो. त्याच्या देवत्वात दंभ नाही. गंगेला मस्तकावर धारण करतो त्याचवेळी पत्नी पार्वतीला अर्धनारी नटेश्वर म्हणून समतेचा दर्जादेखील देतो.

सर्वसामान्य माणसारखी त्यालाही बायको आंघोळ करत असताना चेष्टा करण्याची इच्छा होते. तो पत्नीसोबत सारीपाट खेळतो. पण लावतो आणि हरतो सुद्धा! बायकोवर तेवढंच प्रेमही करतो आणि कधी कधी क्रोधीतदेखील होतो. बायको पार्वतीकडून पाय चेपून घेताना तो आढळून येत नाही. तर तो पार्वतीस अर्धांगीनीचा दर्जा देऊन अर्धनारीनटेश्वरदेखील होतो.

नैसर्गिक भावनांच्या प्रकटीकरणाला तो तिरस्काराने पाहत नाही. तो सृजनाचा प्रमुख देव आहे. लिंग स्वरुपात भक्तांना तो दर्शन देवून सृजनाची, नव निर्मितीची प्रेरणा देणारा तो चिरंतन स्रोत म्हणून भक्तांसमोर येतो. काम या मानवी प्रेरणेला तो इतर देवतांप्रमाणे अमंगल, अपवित्र मानत नाही. तर त्या प्रेरणेचं मांगल्य, पावित्र्य तो जनसामान्यांसमोर स्पष्ट करतो. तिसरा नेत्र आहे म्हणून उगाच थोडा विरोध झाला तरी कुणाला समूळ नष्ट करत नाही. तो दमनकारी असूनही दमनशक्तीचं नियमन करू शकतो.

हेही वाचा : पाकिस्तानातही महाशिवरात्रीला घुमतो ‘बम बम भोले’चा गजर!

महादेवाला सोन्या चांदीचाही लोभ नाही

तो साधा भोळा तर आहेच. पण वृत्तीने आणि राहणीमानातदेखील साधाभोळा आहे. अवडंबर, मिजास, श्रीमंती त्याच्या स्वभावात कुठंही नाही. त्याला मोत्यांचा दागिन्यांचा सोस नाही. निसर्गात आढळणाऱ्या रुद्राक्षाच्या माळेत तो सौंदर्य पाहतो. चंदन, केशर यांचा श्रीमंतीपेक्षा त्याने अंगाला फसलेल्या भस्मात त्याचं सौंदर्य खुलून दिसतं. रेशमी वस्त्रांपेक्षा त्याचं व्याघ्रचर्म उठून दिसतं.

त्याला सोन्या चांदीचाही लोभ नाही. इतर देवाप्रमाणे तो सोन्या चांदीचे मुकुट किंवा शिरोभूषण घालत नाही. तर त्याच्या जटा बांधून नैसर्गिक सौंदर्य भक्तांसमोर प्रकट करतो. तो कलेचा भोक्ता आहे. नटराज होऊन तो कलाविष्कार घडवतो! गायन, नृत्य, अभिनय यातही तो निपुण आहे. 

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत, हिमालयाच्या सर्वोच्च शिखरापासून रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत निस्वार्थी मनाने जीवन जगत असताना निसर्गावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य माणसांचे भावविश्व या देवतेनं व्यापून टाकलंय. कित्येकांना तर महादेव म्हणजे एक अलौकिक शक्ती किंवा दिव्य अस्तित्व असलेला असा कुणी वाटतच नाही. त्यांच्यातलाच एक सर्वसामान्य व्यक्ती वाटतो. याच भावनेतून लोक महादेवाकडून प्रेरणा घेतात आणि हीच प्रेरणा लोकांना असामान्य किंवा अलौकिक कार्य करण्यास उद्युक्त करते.

मशिदीवरची चंद्रकोर पाहून महादेव आठवतो

सर्वसामान्य भक्ताच्या आशा, आकांक्षा, इच्छा, तृष्णा यांचं प्रतिबिंब त्याच्या व्यक्तिमत्वात आणि कार्यकर्तृत्वात दिसून येतं. म्हणूनच तो जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवू शकतो. म्हणूनच तो लोकप्रिय होतो. त्याला महान म्हणून संबोधलं जातं. म्हणूनच त्याला सगळे महादेव म्हणत असावेत.

मानवी मन, मानसिकता यांच्या समुहाचं मानसशास्त्र अभ्यासण्यासाठी शिव या देवतेची संकल्पना आणि तिची लोकप्रियता अभ्यासाणं गरजेचं आहे ते याच कारणामुळे! तो भालचंद्र आहे. कारण त्याच्या भाळी शीतल चंद्र आहे. मशिदीवर असलेली चंद्रकोर पाहूनही आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.

एकदा गांधीजींवर लेख लिहिताना त्यांची तुलना नीळकंठ महादेवाशी केली होती. त्यांना नीळकंठ गांधीजी असं म्हटलं होतं. सर्वांचं हित पाहणं हेही दुधारी शस्त्र असतं. सर्वांचा होण्याच्या प्रयत्नात असलेला नेता काळाच्या ओघात कुणाचाच राहत नाही. सर्वांच्या रोषाचं तो कारण बनतो. पण महादेवाबाबत मात्र हा तर्क जरा वेगळा आहे.

मंथनाच्या काळात बहुसंख्य बहुजन जनतेच्या मनातल्या रोषाचं विष स्वत: पिऊन समस्त समाजाला विषमुक्त करणारा ‘सत्य शिव आणि सुंदर' असा महादेव असतो. सत्य आणि ईश्वर एकाच ठिकाणी दिसतील असा तो तो 'निळकंठच' असतो!

हेही वाचा : बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत

गांधी म्हणजे आधुनिक निळकंठ

गांधीजी असेच 'निळकंठ' होते! सनातनी समाजातल्या अनेक लोकांच्या रोषाचं विष त्यांनी स्वत: प्राशन केलं! ते ही या देशातल्या सर्व समाज एकात्म रहावा म्हणून! अनेक समाज समूह वेगवेगळी कारणं पुढे करत गांधीजींवर विष ओकत असतात! त्यात गांधीजींच्या विचारांमुळे आधुनिक काळात अवतरलेल्या सामाजिक राजकीय व्यवस्थेत आपण उपेक्षित झालो असं मानणारे उच्चवर्णीयही असतात.

तर गांधींनी आमच्यासाठी पाहिजे तेवढा प्रखर लढा लढला नाही, असं मानणारे मागासवर्गीयही असतात. शिवाय गांधींजी म्हणजे सनातनी हिंदू. या कारणामुळे त्यांना आपला नेता म्हणून नाकारणारे काही अहिंदूही असतात. शेवटी गांधी कोणालाच कधी आपला वाटत नाही. कारण त्यांच्या वाट्याला फक्त द्वेषरूपी विषच येतं!

गांधीजींनी सर्वांचं विष स्वत: स्वीकारलं आणि अजूनही ते नीळकंठ महादेवाप्रमाणे विष स्वीकारायला सदैव तयार असतातच. पण ते त्यांना देताना एवढं भरभरून द्यायला हवं की स्वत:जवळ विष शिल्लकच राहू नये! समाजाला विषमुक्त करण्यासाठी हा आधुनिक 'निळकंठ' सर्व विष पचवायला सक्षम आहे!

शिवाचं, महादेवाचं, शंकराचं दर्शन घेताना आपल्या मनातला सर्व रिपू, दुर्गुण, द्वेष अर्पण करणं महत्वाचं आहे. कारण तेच शिवभक्तीची खरी फलश्रुती आहे. पुन्हा आपल्याकडे काहीही शिल्लक असता कामा नये. आपलं डोकं युद्धखोरीनं, हिंसेनं, क्रोधानं संतप्त होऊ नये. यासाठी सद्सद्विवेकाची ज्ञानगंगा डोक्यावर धारण करणारा ' गंगाधर' होणं गरजेचं आहे. तसंच लोभ, आसक्ती, तृष्णा हे सगळं दु:खाचं मूळ आहे हे सांगणाऱ्या गौतम बुद्धाच्या अल्पसंतुष्टततेची जाणीव करून देणारा 'आशुतोष' ही आपल्याला व्हावं लागेल. तरच आपल्याला महादेव समजू शकेल.

महादेवापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण तो देवाधिदेव आणि भक्तोत्तमही आहे. आजच्या काळात ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांची निवडणूक घेतली तर विष्णू आणि ब्रह्मा यांचं डिपॉझीट नक्की जप्त होईल. महादेव प्रचंड बहुमताने विजय होतील!

हेही वाचा : 

स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत

कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?

गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात

(राज कुलकर्णी हे पेशाने वकील असून ते लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांचा हा लेख त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरही उपलब्ध आहे.)