डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

०२ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


भारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचं हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या पाच महिन्यात त्यांचा खून झाला. गांधींच्या खूनाच्या या दुर्दैवी घटनेला आता ७० वर्षं होतील. अवघ्या ७० वर्षांत गांधी नावाचा महात्मा या देशात खरोखरच अप्रस्तूत ठरलाय का असा प्रश्न पडावा अशी भारतातली सद्यस्थिती आहे.

गांधी विचारांचा वारसा क्षीण

गांधी देशाचे राष्ट्रपिता म्हणून गौरवान्वित आहेत. गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या साधनांनी साम्राज्यवादाविरूद्ध लढणाऱ्या देशांना प्रभावित केलं. गांधींनी आफ्रिका, अमेरिकेतल्या वर्णभेदाविरूद्धच्या लढ्यांना प्रेरणा दिली. आजही आंतरराष्ट्रीय राजकारणात जागतिक शांततेच्यासंदर्भात गांधी विचारांना प्रस्तूत समजलं जातं. मात्र भारतात गांधी विचारांचा वारसा कमालीचा क्षीण झाल्याचं चित्र आहे.

गांधींच्या भारतात गांधीवादाप्रमाणे सेक्युलर शब्दही शिवी बनलाय. गांधींच्या उदारमतवादी राष्ट्रवादाऐवजी प्रच्छन्न राष्ट्रवादाची पेरणी केली जातेय. गांधींचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र नेस्तनाबूत करून हिंदूराष्ट्राच्या उभारणीचं राजकारण भयंकर तेजीत आहे.

महात्मा गांधींनी ज्या हिंदुत्ववादी विचारधारेला आयुष्यभर विरोध केला त्याच विचारधारेच्या शक्तींनी राज्यशकट ताब्यात घेतलंय. गांधींच्या स्वप्नातल्या भारताच्या विपरित गोळवलकरांचा हिंदुत्ववादी भारत घडवण्याचा प्रयोग केला जातोय. गांधींच्या उदारवादी विचारधारेच्या प्रभावातून बहुसंख्यांक हिंदूंची सोडवणूक करण्याच्या प्रयत्नातून नथूराम गोडसेने गांधींचा खून करून जमातवादी हिंदू राजकारणाचा पहिला अध्याय यशस्वी केला. आता सत्तेवर राक्षसी बहुमताची मांड ठोकून देशाला हिंदू राष्ट्राच्या दिशेने नेण्यासाठी संघपरिवाराने केलेली आगेकूच हा गांधींचा पराभव आहे.

हेही वाचाः महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

गांधींचा पराभव कुणी केला?

महात्मा गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत. असं असलं तरी आंबेडकरवादी आणि भारतातल्या डाव्यांपेक्षा संघ परिवारासाठीच गांधी कायम शत्रूस्थानी राहिलेत. गांधींनी भारतीय समाजाला विशेषत: हिंदी समाजाचं भान उदारमतवादाच्या चौकटीत घडवण्याचा जो यशस्वी प्रयोग केला, यामुळेच हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्रस्त होता.

गांधीविचारांचा भारतीय मनावर असलेला प्रभाव हिंदुत्ववादी राजकारणासमोरचा पेच होता. त्यामुळे हिंदू राष्ट्राच्या संदर्भात गांधींना अप्रस्तूत ठरवण्यासाठी संघपरिवाराची दीर्घकालीन राजकीय खेळी राहिली. संघपरिवाराला त्यासाठी ७० वर्षं वाट बघावी लागली. मात्र गांधींचा प्रभाव निष्प्रभ करण्यात केवळ संघ परिवार स्वत:च्या बळावर यशस्वी होऊ शकला नाही. तर धर्मनिरपेक्षतावादी शक्तीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली.

डाव्यांची परंपरा संघाला पूरक

भारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला परत्वे बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे.

डाव्यांनी मार्क्सवादाला भारताच्या संदर्भात पोथी ठरवून गांधींना आणि आंबेडकरांनाही निकालात काढलं. समाजवादी आणि गांधीवाद्यांनी गांधींना सार्वकालिक सर्वज्ञ मानून मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाशी कायम अंतर ठेवलं. समाजवादी, गांधीवादी आणि डाव्यांच्या या खेळात आंबेडकरवादीही मागं नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी कडवट राजकीय टीका मार्क्स आणि गांधींवर केली त्याचीही पोथी करून आंबेडकरवाद्यांनी गांधी आणि मार्क्सवादविरोधी पराकोटीचा द्वेष रुजवण्यात अग्रेसर राहिले.

आज कोणत्याही आंबेडकरवादी कार्यकर्त्याला गांधींबद्दल सकारात्मक विचार करण्याचा अवकाशच शिल्लक राहिला नाही. मार्क्सवादी आणि आंबेडकरी परंपरेत अशा कार्यकर्त्याला बुर्झ्वा ठरवून निकालात काढण्याचीच भीती असते. डाव्या परंपरेचा हा खेळ संघ परिवाराच्या रणनीतीला पुरकच ठरला. २०१४ चे संघपरिवाराचे सत्तारोहण या व्यापक खेळाचा परिणाम होता.

हेही वाचाः भाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा

मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, पण अस्पृश्यांसाठी नको

भारतातल्या तथाकथित कम्युनिस्टांनी गांधींना सुधारणावादी ठरवलं. भारतातल्या डावे गांधीनाच काय, आंबेडकरांनाही सुधारणावादीच मानतात. मार्क्सने धर्माला अफुची गोळी मानल्याने स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणारे गांधी इथल्या डाव्यांना पचणं कठीणच. गांधी ग्राम स्वराज्याचे प्रवक्ते तर डावे औद्योगिक क्रांतीला पुढारपण देणारे होते.

डॉ. आंबेडकर गांधींच्या वैचारिक आणि हिंदू समाजासंदर्भातल्या मर्यादा जाणून होते. त्यामुळे आंबेडकरांची गांधींवरची टीका व्यावहारिक आणि राजकीय रणनीतीचा भाग होती. म्हणूनच ती अधिक तीव्र आणि कडवट होती. गांधीं अस्पृश्यतेच्या विरोधात असले तरी त्यांनी वर्णव्यवस्थेची तरफदारी केली. डॉ आंबेडकर आणि त्यानंतरच्या आंबेडकरी प्रवाहाच्या टीकेचे ते लक्ष्य राहिले. राष्ट्रीय सभेच्या सदस्यत्वासाठी चरख्यावर सूत कातण्याची अट ठेवणाऱ्या गांधींनी अस्पृश्यतेचा मुद्दा का उचलून धरला नाही ही आंबेडकरांची तक्रार होती.

मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला मान्यता देणारे गांधी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला कडाडून विरोध करतात. त्यासाठी आमरण उपोषणाचं हत्यार उपसतात. गांधींच्या या भूमिकेमुळे आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून द्यावी लागली. आणि राखीव जागांच्या तडजोडीला मान्यता द्यावी लागली.

एकमेकांचे महापुरूष मोडीत कशाला काढायचे?

डॉ. आंबेडकर आणि गांधी यांच्यात आधी गोलमेज परिषदेत आणि नंतर पुणे कराराच्याप्रसंगी जोरदार चकमक झाली. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्काच्या संदर्भाने आखलेल्या रणनीतीच्या विरोधात गांधींनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे आंबेडकरी विचारप्रवाहांमधे आजही नाराजी आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नावर हिंदू समाजाच्या ह्र्दयपरिवर्तनाचा गांधींचा आग्रह हा अस्पृश्यांची दिशाभूल करणारा आहे, असा डॉ. आंबेडकरांचा आरोप होता.

कोणताही महापुरूष हा परिस्थितीचं अपत्य असतो. त्यांच्या व्यावहारीक भूमिका आणि कृतींना परिस्थितीच्या मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर सार्वकालिक सर्वज्ञतेचा अध्यारोप करणं त्यांच्या असामान्य योगदानावर अन्याय करणारं असतं.

मार्क्स, गांधी आणि आंबेडकर हे काळ आणि परिस्थितीचं अपत्य आहेत. हे भान ना डाव्यांना राहिलं ना गांधीवाद्यांना, ना आंबेडकरवाद्यांना. परिणामी आपण एकमेकांचे महापुरूष मोडीत काढण्याचा खेळ करत राहिलो. महात्मा गांधींच्या भूमिका आणि व्यवहार यात अंतर जरूर होतं. पण यात परिस्थितीचा तकाजा किती होता याचा विचार न करताच गांधींना निकालात काढण्याची चूक गंभीर होती

हेही वाचाः नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!

जैन विचारवंत रायचंदभाईंचा गांधीवर प्रभाव

गांधींचा जन्म गुजरातच्या काठेवाड इथल्या मोढ वाणी जातीत झाला. ते ज्या घरात जन्मले ते घर श्रद्धाळू होतं, पण पुराणमतवादी नव्हतं. त्यांची आई प्रणामी पंथाची होती. हा पंथ हिंदू असला तरी या पंथाला कुराणविषयी आदर होता.

शाळेत गांधींच्या जवळच्या मित्रांत मुस्लिम होते तर दक्षिण आफ्रिकेत काम करत असताना ज्यू आणि ख्रिश्चन आणि पुढच्या आयुष्यात त्यांचे सर्वांत निकटचे मित्र ख्रिस्ती धर्मगुरू चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज होते. तरूण वयात गांधींवर साधेपणा आणि अहिंसा तसंच ईश्वरविषयक दृष्टीकोनाचे संस्कार जैन कवी आणि विचारवंत रायचंदभाई यांनी केले.

गांधींची रायचंदभाईंशी भेट १८९४ ला मुंबईत झाली. त्याच वर्षी गांधींनी २७ प्रश्नांचं एक पत्र रायचंदभाईंना लिहिलं. या पत्राला दिलेल्या उत्तरात रायचंदभाईंनी गांधींना ईश्वरविषयक दृष्टीकोन आणि आध्यात्मिक मुक्ती कशात आहे याबद्दल मार्गदर्शन केलं. कृष्ण किंवा विष्णू यांसारख्या धार्मिक वाड्.मयातल्या देवतांची पूजा केल्यानं मोक्ष लाभत नाही. आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग ज्ञानार्जन आणि नैतिक कृती यातून जातो असं त्यांनी गांधींना बजावलं.

अस्पृश्यतेला कडाडून विरोध

रायचंदभाईंच्या या संस्कारांचं दृढीकरण करण्याचं काम टॉलस्टॉय यांच्या ‘किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू’ या ग्रंथानं केलं. सेवा हेच व्यक्तीचं मुख्य कर्तव्य असल्याचा बोध या ग्रंथानं गांधीजींना दिला. गांधी या संस्कारात घडल्यामुळेच ते जरी स्वत:ला सनातन हिंदू म्हणत असले तरी हिंदू धर्माकडे पाहण्याची स्वत:ची एक दृष्टी विकसित केली.

या धार्मिक दृष्टीला त्यांनी नैतिकतेचं अधिष्ठान दिलं. एकाकडे गांधींनी वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं तर दुसरीकडे अस्पृश्यतेला त्यांनी कडाडून विरोध केला. अस्पृश्यतानिवारण आपल्या जीवीत कार्याचा भाग बनवला. अस्पृश्यता ज्या स्मृतीनं घडवली ती वेदांचा प्रक्षिप्त भाग असल्याचं गांधी निक्षून सांगतात. 

गांधी भारतातील विविध धर्मांच्या सहअस्तित्वाचे पुरस्कर्ते होते. मात्र कोणत्याही धर्मातील धर्मांतराला त्यांनी तीव्र विरोध केला.

हेही वाचाः साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

गांधींची हिंदू – मुस्लिम ऐक्याची शपथ

अस्पृश्यता निर्मुलन हा गांधींच्या चिंतनाचा विषय जसा होता तसा हिंदू-मुस्लीम तणाव हादेखील त्यांच्या चिंतेचा विषय होता. हिंदू-मुस्लिम संघर्ष हा भारताच्या एकसंधतेला खिळखिळा करू शकतो याची भीती त्यांना तीव्रतेनं जाणवत होती. हा तणाव कायमस्वरूपी संपुष्टात यावा यासाठी त्यांनी एप्रिल 1919 ला हिंदु-मुस्लिम ऐक्याची शपथ लिहिली आणि दोन्ही समुदायांना त्यांनी एकत्रित घ्यायला लावली. ती शपथ अशी,

‘परमेश्वराच्या साक्षीने आम्ही हिंदू आणि मुसलमान असं जाहीर करतो की, आम्ही एकाच आईबापाची लेकरं असल्यासारखं एकमेकांशी वागू. आमचं सुखदु:ख एक असेल आणि आमचं दु:ख दूर करण्यासाठी आम्ही एकमेकांना मदत करू. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर राखू. धार्मिक भावनांचा आदर राखू. धार्मिक आचरणांच्या बाबतीत आम्ही एकमेकांच्या आड येणार नाही. धर्माच्या नावावर आम्ही कधीही एकमेकांवर हिंसाचार करणार नाही.’

महात्मा गांधींच्या या पत्राच्या लाखो प्रती छापून सत्याग्रह पत्रक म्हणून ते देशभरात वाटण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम तणावासंदर्भात गांधी कायम संवेदनशील राहिले. ज्या ज्यावेळी हिंदू-मुस्लिम दंगे उद्भवले त्या त्यावेळी गांधींनी प्रसंगी उपोषणाच्या हत्याराचा प्रयोग करून दंगे शांत केलेत. हिंदू-मुस्लिम सलोख्याबाबतची गांधींची ही भूमिका स्वातंत्रोत्तर कालखंडात त्यांच्या राजकीय वारसदारांना ना पेलता आली ना त्यांना तशी इच्छाशक्ती दाखवता आली. संघपरिवाराला तर ही भूमिका त्याच्या जमातवादी राजकारणाला सोईची नव्हतीच.

अस्पृश्यतेचं पाप धुवून टाकल्याशिवाय स्वराज्य नाही

गांधी वेदांचे पुरस्कर्ते होते. भगवतगीतेने टिळकाप्रमाणे तेही प्रभावित झाले होते. वर्णव्यवस्थेचं त्यांनी अखेरपर्यंत समर्थन केलं. जातीव्यवस्थेच्या संदर्भातही सुरवातीच्या काळात त्यांची भूमिका समर्थनाचीच राहिली. नंतरच्या काळात जातीव्यवस्थेबद्दलची त्यांची भूमिका क्षीण झाल्याचं दिसून येते.

१९२० मधे एकत्र पेयपान, एकत्र भोजन, आंतरजातीय लग्न हे काही लोकशाहीच्या चैतन्यासाठी आवश्यक नाही असे म्हणणारे गांधी १९४६ पर्यंत मला शक्य असेल तर मी माझ म्हणणं ऐकणाऱ्या सगळ्या सवर्ण मुलींनी हरिजन पती निवडावा यासाठी त्या मुलींचं मन वळवायचा प्रयत्न करेन, या भूमिकेपर्यंत येतात.

अस्पृश्यतेच्या प्रश्नावर मात्र गांधींची भूमिका स्पष्ट आणि ठाम होती. हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्यासोबत अस्पृश्यतेचं पाप धुवून टाकल्याशिवाय स्वराज्य हे एक अप्राप्य लक्षण ठरणार आहे. त्यामुळे अस्पृश्यता निर्मुलनाच्या भूमिकेशी ते कायम प्रामाणिक आणि आग्रही राहिले.

हेही वाचाः नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

सगळ्या धर्मातल्या लोकांचा एकत्र सत्याग्रह 

गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या असहकार आंदोलनात सहभागी स्वयंसेवकांवर, ‘एक हिंदू म्हणून मी अस्पृश्यतेचा राक्षस नष्ट करण्याची गरज आणि त्या भूमिकेची न्याय्यता मानतो. पीडीत वर्गाची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क येण्यासाठी मी सदैव सज्ज असेन’ या प्रतिज्ञेला बांधिल राहण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 

वायकोम सत्याग्रहात गांधींनी केलेल्या हस्तक्षेपाचं डॉ. आंबेडकरांनीही स्वागत केलं. त्रावणकोर संस्थानात १९२४-२५ या काळात झालेल्या वायकोम सत्याग्रहामधे गांधींनी पहिल्यांदाच अस्पृश्यांच्या बाजूने यशस्वी हस्तक्षेप केला. वायकोम इथं मंदिरासमोरच्या रस्त्यावरून जायला अस्पृश्यांना बंदी करणाऱ्या प्रथेविरूद्ध दक्षिण भारतातले काही सवर्ण हिंदू, एक सिरियन सनातनी ख्रिश्चन आणि समाजसुधारक नारायण गुरू यांनी हा सत्याग्रह सुरू केला होता.

हिंदूंच्या हृदयपरिवर्तनावर गांधींचा विश्वास

हा सत्याग्रह जेव्हा सुरू होता त्याच काळात डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून आपल्या राजकीय जीवनाला सुरवात केली होती. वायकोम सत्याग्रह ही देशातली सर्वात महत्त्वाची घटना असल्याचं नोंदवून ते म्हणाले, देशातला तणाव आणि संघर्ष दूर करण्यासाठी इथला सामाजिक अन्याय हटवण्याची गरज आहे. असं प्रतिपादन महात्मा गांधींपूर्वी या देशातल्या कोणत्याही राजकीय नेत्यानं केलं नव्हतं.

शिवाय प्रत्येक भारतीयाने हा अन्याय हटवण्यासाठी पुढे यायला हवं असंही गांधींपूर्वी कुणी म्हटलं नव्हतं. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे या भूमिकेवर गांधी-आंबेडकरांचं एकमत असलं तरी ती नष्ट करण्याबाबतचे मार्ग दोघांचेही भिन्न होते. गांधींचा हिंदूंच्या ह्रदयपरिवर्तनावर विश्वास होता. त्या मार्गावरून ते अखेरपर्यंत ढळले नाहीत. तर डॉ.आबेडकरांचा हिंदूंचे अस्पृश्यांसाठी ह्रदयपरिवर्तन होईल यावर विश्वास नव्हता.

हेही वाचाः बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

गांधींना आक्रमक होणं परवडलं नसतं

अस्पृश्यतेच्या प्रश्नावर गांधींच्या विचारधारेवर आणि व्यक्तिमत्त्वावर डॉ. आंबेडकरांनी दीर्घकाळ कडवट हल्ले केले. गांधी आंबेडकरांचा भूमिकेच्या पातळीवरचा वैचारिक संघर्षाचं तटस्थपणे आकलन न केल्यामुळेच आंबेडकरी प्रवाहाचा गांधीद्वेष वाढत गेला. स्यूड्यो आंबेडकरी शक्तींनी जोपासलेला गांधीद्वेष गांधीवाद अप्रस्तूत ठरवण्यासाठी संघपरिवाराच्या राजकारणाला सोईचा होता.

खरं तर अस्पृश्यतेच्या प्रश्नावर दोन्ही नेते परिस्थितीीवश बरोबर होते. गांधींकडे स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व होतं. गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचा विस्तार सर्व जनतेपर्यंत केला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांची भागीदारी होण्यासाठी त्यांच्या आकांक्षा जागृत केल्या. हे करत असताना बहुसंख्यांक हिंदू समुहाचं नेतृत्व म्हणूनही स्वत:ला प्रस्थापित केलं. अस्पृश्यतेच्या प्रश्नावर डॉ. आंबेडकरांप्रमाणे आक्रमक आणि संघर्षाची भूमिका घेवून बहुसंख्यांक हिंदू जनतेला दुखावणं गांधींना सोयीचं वाटत नव्हतं.

कारण देशात आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण करणारी हिंदू महासभेसारखी चळवळ सक्रीय होती. गांधींची ही रणनीती एका अर्थाने योग्यच म्हणावी लागेल. अन्यथा हिंदूंच्या जमातीकरणाची प्रक्रिया स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातच पूर्ण झाली असती.

आंबेडकरांची टीकाही गरजेची

आंबेडकरांना गांधींच्या मर्यादेची जाणीव निश्चित होती. तरीही गांधींच्या धोरणावर डॉ. आंबेडकर कडाडून टीका करत राहिले. यामागे डॉ.आंबेडकरांच्याही रणनीतीचा भाग होता. भारतातील अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी कोण हा ब्रिटीशांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न होता.

महात्मा गांधींनी आपल्या नेतृत्वाचा दावा ठोकला होता. या प्रश्नाचा निकाल आपल्या बाजूने होण्याच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी गांधींच्या धोरणांवर प्रखर हल्ला करणं स्वाभाविक होतं. अस्पृश्यतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भाने या दोन नेत्यांमधे पराकोटीचे मतभेद राहिले असले तरी अस्पृश्यतेची समस्येवर भारतीय विवेक जागृत करण्याच्या बिंदूवर ते एकजूट असल्याचं दिसतात. भारतीय राज्यघटना त्याची साक्ष आहे.

हेही वाचाः 

बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी