सातवाहनांच्या काळातला गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ मराठीतला आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथातल्या गाथेत म्हणजे कवितेत आधुनिक मराठीच्या पाऊलखुणा दिसतात. आज निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, अभ्यासावेत. तरच भाषा जिवंत राहते. या ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट पत्रकार प्रतिक पुरी यांनी फेसबुकवर लिहिलीय. त्याचा हा संपादित भाग.
गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतला आद्यग्रंथ आहे. अस्सल मराठमोळं नागरी, ग्रामीण आणि वन्य लोकजीवन या गाथेत ललितमधुर सौंदर्यानं नटलंय. शृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण आणि ह्रद्य अशा सगळ्याच बाजू सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलीयत. मानवी जीवनातल्या शाश्वत मुल्यांचा पुरस्कार करणारा हा मराठीतला श्रेष्ठ ग्रंथ आहे, असं म्हटलं तरी चालेल.
कैलासवासी स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना आणि सातशे पानांचा ग्रंथविस्तार असा हा ग्रंथ. संपादन, भाषांतर आणि टीका हे या ग्रंथाचं आणखी वेगळं वैशिष्ट्य आहे. जोगळेकरांचं हे कार्य अनन्यसाधारण आहे. गाथासप्तशतीच्या काळात महाराष्ट्रात संस्कृत, प्राकृत आणि पैशाची या भाषा होत्या हे या ग्रंथामुळे स्पष्ट होतं.
हा मजकूर पद्मगंधा प्रकाशनाच्या ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’ या ग्रंथाच्या मलपृष्ठावर म्हणजे मागच्या पानावर छापलाय. हा ग्रंथ स. आ. जोगळेकर यांनी संपादित केलाय. प्रत्येक मराठी भाषिकाच्या घरांत असायलाच हवीत अशा पुस्तकांत या ग्रंथाचाही समावेश होतो. हाल सातवाहन राजाच्या काळखंडात अनेक कवी-कवयित्री यांच्या गाथा म्हणजेच कविता यांत एकत्रित केल्यात.
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने त्यातील काहींचा परिचय या ग्रंथाच्या आधारेच करुन देतोय. यावर अलिकडच्या काळात कवी संतोष पद्माकर अधिक काम करत आहेत, असं ऐकलं होतं. बहुधा गाथांचं मराठीत भाषांतर ते करतायत. ते काम लवकरात लवकर लोकांपुढे येईल अशी सदिच्छा.
हेही वाचा : मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा
या माझ्या आवडीच्या गाथा आहेत. खरंतर यातल्या शेकडो गाथा कुणालाही आवडाव्या अशाच आहेत. ही फक्त काही उदाहरणं आहेत. प्रेमाशी संबंधित आहेत. म्हणून त्यांचा उल्लेख करतोय.
लेखणी:
जं जं पउत्थपइआ पिअअमणामक्खरं लिहइ लेहे
तं तं तल्लेहणिआणुसारगलिओ पुसइ सेओ
याचा अर्थ असा की प्रवासी पतीची स्त्री त्याला लिहायच्या पत्रांमधे त्याच्या नावाची अक्षरे लिहिते. त्यावेळी तिला घाम येतो आणि तो लेखणीवरून ओघळल्यामुळे लेख अस्पष्ट होतो.
या गाथेतील कल्पना ही नंतरही अनेकांनी आपल्या कवितांमधून मांडलीय. नवरा प्रवासाला गेलाय. त्याला पत्र लिहायला बायको बसलीय. पण त्याचं नाव लिहिण्याची वेळ येते त्यावेळी तिची छाती धडधडायला लागते. कानशिलं तापायला लागतात. हातापायांना कंप फुटतो. ही सारी आत्यंतिक प्रेमाची लक्षणं आहेत. तो जवळ नसतानाही त्याच्या नामरुपानं तो आपल्या जवळ असल्याची ही भावना आहे.
त्याचं उत्कट दर्शनिय रुप म्हणजे तिला फुटलेला घाम. जो तिच्या हातांवरून बोटांवर ओघळतो आणि तिथून लेखणीवर घरंगळत येऊन पत्रावर टपटपतोय. या घामामुळे त्याचं नाव आणि आसपासची अक्षरंही घामेजून जातायत.
ही जवळपास दीड-दोन हजार वर्षांपूर्वीची गाथा आहे. त्या काळी बायका आपल्या नवऱ्याला पत्र लिहायच्या याचा हा पुरावा. शकुंतलेनं दुष्यंत राजाला लिहिलेलं पत्र आपल्या माहितीचं आहेच. पण हे एका सामान्य बाईनं लिहिलेलं पत्र आहे. तो तत्कालीन रिवाज असावा हेही उघडच आहे. यातल्या शब्दांचा प्रवासही मजेशीर आहे. जं जं म्हणजे ज्या ज्या किंवा तं तं त्या त्या. पउत्थ पइआ म्हणजे प्रवासी पिया. पउत्थ हा शब्द पथिकला जवळचाय.
णामक्खर म्हणजे नाम अक्षर तर लेहे म्हणजे लेख. तल्ले म्हणजे तिला, सार म्हणजे घाम आणि गलिओ म्हणजे गळणे. जरा विचार केला तरी त्या प्राचीन मराठीतल्या आपल्या आजच्या आधुनिक मराठीच्या नीजखुणा सहज ओळखता येतात. बाकी त्या विरहणीनं हे पत्र शेवटी कसं लिहिलं असेल आणि पत्रातला हा पुसला गेलेला मजकूर तिच्या पतीनं कसा वाचला असेल हा एक व्यावहारीक प्रश्न येतो. पण प्रियकराला आपल्या प्रेयसीची अवस्था माहिती असेल तर न लिहिला गेलेला मजकूरही त्याला वाचता येतोच. हेच त्यावरचं उत्तर.
हेही वाचा : धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय
शिरीषः
जह दिअहविरामो णवसिरीसगंधुध्दुराणिलग्धविओ
पहिअघरिणीअ ण तहा तवेइ तिव्वो वि मज्झण्हो
शिरीष कुसूमांनी सुंगधित झालेल्या संध्याकाळच्या वाऱ्यामुळे विरहिणीला होतो तेवढा ताप भर दुपारच्या कडक उन्हाने होत नाही.
ही एक दुसरी गाथा. यातल्या कल्पना आजही नवीन नाही. आपण म्हणजे प्रेमात असतील आणि विरहांतही होरपळत असतील ते याचाही नित्य अनुभव घेतच असतो. यातला दिअहविरामो हा शब्द किती सुंदर आहे बघा. दिअह म्हणजे दिवस आणि विराम म्हणजे विश्रांती. दिवसाची विश्रांती होते तेव्हाची वेळ म्हणजेच संध्याकाळची वेळ.
पहिअघरिणी हा दुसरा शब्द आहे. याबद्दल थोडी शंका वाटते. पण याचा अर्थ पहिअ म्हणजे पिया आणि त्याची झुरणी लागलेली म्हणजे विरहिणी असा होईल. मज्झण्हो म्हणजेच माध्यान्ह अर्थात भर दुपारची वेळ. एकूणात प्रेमातला ताप आणि स्निग्धता यांची परिमाणं त्या काळी जशी होती तशीच ती आजच्या काळातही आहेत. प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर सारं विराण वाटू लागतं आणि ती जवळ असेल तर नंदनवनाचा भास होतो हेच खरं.
मागणीः
जइ देव्व! तुं पसण्णो मा करिहिसि मज्झ माणुसं जम्म
जइ जम्मं, मा पेम्मं, जइ पेम्मं, मा जणे दुलहे
दैवा तू माझ्यावर प्रसन्न असलास तर माझं मागणं ऐक. मला पुन्हा मनुष्यजन्म देऊ नकोस. दिलासच तर कुणाच्या प्रेमाच्या गुंतवू नकोस आणि प्रेम द्यायचंच असले तर निदान ते अप्राप्य अशा व्यक्तींबद्दल देऊ नकोस.
ही माझी विशेष आवडती गाथा आहे. याची कल्पनाच सुंदर आहे. ज्यानं प्रेमात अतिव त्रास भोगलाय अशाच व्यक्तीला ती सुचू शकते. प्रेमभंग झालेल्या लोकांना ही कविता खूप जवळची वाटेल. एक तर मनुष्य जन्मच नकोय या कवीला. तोही मिळालाच तर त्याला पुन्हा प्रेमात पडायचं नाही. आणि प्रेम झालंच तर अशा व्यक्तीविषयी व्हावं की जी प्राप्य असेल. हा अनुभवही आपण कधी ना कधी घेतला आहेच. इतक्या हजारो वर्षांत मानवी भावभावना बदललेल्या नाहीत हेच यांतून दिसून येतं.
ज्यांना शक्य असेल त्यांनी गाथासप्तशती नक्की विकत घ्या. वाचा. अभ्यासा. आपल्या जवळच्या लोकांना वाचून दाखवा. भाषा अशीच जिवंत ठेवता येते. आपला इतिहास, साहित्य असंच जिवंत ठेवता येतं. ही शेवटी आपली जबाबदारी आहे. मराठी दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण हा संकल्प करूयात.
हेही वाचा :
साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच!
मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?