आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे

११ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे  लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या.

बाईचं झालेलं वस्तुकरणं, तिला समाजाकडून मिळणारी दुय्यम वागणूक सत्तर-ऐंशीच्या दशकात  अधिक तीव्र होती. याच काळात स्त्री प्रश्नांवरच्या चर्चेला सुरवात झाली होती. हा सगळा स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. आजूबाजूला विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक चौकटीत  लिखाणाची मांडणी करणारा लेखक वर्ग होता. अशा काळात गौरी देशपांडे नावाच्या बाईने मराठी साहित्याविश्वात आपल्या लिखाणाने एकच खळबळ उडवली.

सुधारकी परंपरेचा समर्थ वारसा

गौरी देशपांडे या एका सुधारकी वातावरणात वाढल्या. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचे आजोबा. हा वारसा पुढे गौरी देशपांडे यांचे वडील डी. डी. कर्वे आणि काका र. धों. कर्वे यांनी पुढे नेला. लैंगिकता हा विषय सार्वजनिक चर्चेचा बनवला तो र. धों. कर्वेंनी. ज्या विषयावर बोलणं महापाप मानलं जायचं अशा काळात हा विषय चर्चेत येणं ऐतिहासिक होतं. यात त्यांना साथ लाभली ती इरावती कर्वेंची. 

महर्षी ते गौरी अशा तीन पिढ्यांचं वैचारीक नेतृत्व महाराष्ट्राला पाहता आलं. अनुभवता आलं. सुधारकी वातावरणात वाढलेल्या गौरीची स्वतःची एक दृष्टी होती. ती त्यांच्या साहित्यातही दिसते. आजूबाजूची स्थित्यंतर त्यांनी अधिक सजगपणे टिपली. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा निर्णायक टप्प्यात असताना १९४२ मधे ११ फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला.

साहित्यातली चौफेर भ्रमंती

गौरी देशपांडे यांचा साहित्यिक वावर भंडावून सोडणारा आहे. बिटवीन बर्थस्  या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांच्या लिखाणाला सुरवात झाली. १९६८ मधे त्यांचा हा काव्यसंग्रह प्रकाशित आला. वेगवेगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. कथा, कादंबरी, कविता, अनुवाद, भाषांतर, ललितलेखनात भ्रमंती केली. त्यांचं सर्व साहित्य हे आज इंग्रजीसह इतर अनेक भाषांमधे अनुवादीत झालंय.

सात युगोस्लावच्या लघुकथा तसंच अरेबियन नाईट्सचे १६ खंड त्यांनी मराठीत अनुवादीत केले. कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, एकेक पान गळावया, मुक्काम, तेरूओ आणि काही दूरपर्यंत, गोफ अशा अनेक पुस्तकंही त्यांच्या नावावर आहेत.

आधुनिक, सुधारकी, समतेचा विचार भल्याभल्यांच्या पचणी न पडण्याचा तो काळ होता. त्यामुळेच गौरीचा साहित्याच्या दुनियेतला मुक्त वावर हा एक वेगळी उंची गाठणारा, बंडखोर आणि सुधारकी परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारा होता. बाईच्या स्वतंत्र असण्याची जाणीव त्यांनी मुख्य परिघात आणली आणि त्यावर समाजाला विचार करायला भागही पाडलं. बाईचं माणूस असणं केंद्रस्थानी ठेवतं तिला तिच्या स्वत्वाची जाणीव करून देण्यात त्यांचं लिखाण मोलाची भूमिका अदा करतं.

बाईचं स्वतंत्र असणं कथाविषय

आज आपण ज्या काळात उभे आहोत हा काळ आणि सत्तर-ऐंशीच्या दशकातला काळ यात प्रचंड अंतर आहे. त्याच काळात गौरीचं लिखाण आलं. सत्तर-ऐंशीचं दशक काही बदलांसाठी तितकं अनुकूल नव्हतं. साहित्यावरही त्याचा परिणाम झालेला होता. थेट भूमिका घेऊन लिहिणं मोठ्या धाडसाचं, जीव धोक्यात घालण्यासारखं होतं. त्यामुळे गौरी देशपांडे यांचं मोकळंढाकळं लिहिणं हे पुढच्या काळातल्या अनेकांना बोलतं करणार ठरलं.

त्यांच्या कादंबऱ्यांची नाव एका वेगळ्याच पठडीतली आहेत. त्यांचं लिखाण काळाच्या पुढचा विचार करणारं होतं. कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, एक एक पान गळावया या कादंबऱ्या एखाद्याच्या आयुष्यातल्या तीन टप्यांसारख्या समोर येतात. आणि एका वळणावर विचार करायला भाग पाडतात. कुणाचीही भीडभाड न ठेवता थेट भिडण्याचं, प्रश्न विचारण्याचं, निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या कथानकांमधे आहे.

निरगाठी आणि चंद्रिके गं सारिके गं, मुक्काम, गोफ या त्यांच्या कादंबऱ्यामधून शरीर प्रेमाची स्वतंत्र परिभाषा अधोरेखित झालीय. त्यात केवळ संभोग नाहीये तर बायांच्या मुक्त अभिव्यक्तीचा विचारही आलाय. समाजात पुरुषांच्या शारीरिक गरजांवर चर्चा होते. मात्र बाई ही केवळ बाई आहे म्हणून तिच्या गरजा दुर्लक्षित केल्या जातात. मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या या कोंडीला फोडण्याचं काम गौरी देशपांडेंच्या कथांनी केलंय.

कथांमधे जगण्याचे संदर्भ

मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांच्या कथांमधून उमजत जातं. आपल्या स्वतंत्र असण्याविषयी आणि त्यातून निर्माण झालेल्या गरजांविषयी थेट भाष्य त्यांनी आपल्या कथांमधून केलंय. प्रेम, संसार, नाती यामधे बाई कुठेही कमी नाहीये आणि या पलीकडेही तिला तिचं जग आहे. स्वतःची स्पेस आहे. ती काही लेचीपेची नाहीये हे त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसतं.

त्यांच्या कथांमध्ये सर्वसामान्यांच्या धारणांना अधिक विचारपूर्वक चितारण्यात आलंय. जे आहे ते खुल्लमखुल्ला. त्यात कुठलाही बडेजाव नाही. आपल्या पारंपरिक सामाजिक चौकटीला छेद देत लोकांचं आयुष्य त्यात मांडल गेलंय. ज्या काळात शरीरसंबंधासारखा विषयांना कुणी हात लावायलाही धजावत नव्हत. त्यावेळी कोणतीही भीडभाड न ठेवता त्यांनी हा विषय आपल्या कथेचा भाग बनवला.

जे आहे ते खुल्लमखुल्ला

त्यांची स्त्रीविषयक आणि एकूणच माणूसपणाच्या जाणिवांविषयी असलेली तळमळ हा त्यांच्या कथाविषयांचा गाभा होता. त्यांच्या लिखाणात येत असलेला माणसांच्या जगण्याचा संदर्भ जितका विचार करायला लावतो. तितकाच तो त्यांनी धीटपणे केलेल्या मांडणीबद्दल आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडतो.

प्रस्थापित साहित्यातल्या जगण्याच्या संदर्भांना गौरी देशपांडेंनी चांगलेच हादरे दिले. कालबाह्य झालेल्या कथाविषयांच्या मांडणीलाही आव्हान दिलं. लोकांच्या जगण्याचे खरेखुरे संदर्भ देत त्यांनी आपल्या कथा उभ्या केल्या. पुरुषांचं ढोंगी रुप समोर आणलं. ‘मध्य लटपटीत’मधला नाना  असो की ‘दुस्तर हा घाट’मधला हरिभाई यासारखे समजून उमजून घेणारे पुरुषही त्यांच्या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.

त्यांच्या नायिका या पुरुषाला समजून घेणाऱ्याही आहेत. सवंग टीका हा त्यांच्या कथांचा भाग नाहीय. निरनिराळं जगण्याचं विश्व त्या शोधत राहिल्या आणि हेच जगणं त्या मांडतही होत्या. आज मोकळेपणाने बोलू, लिहू, वावरू पाहणाऱ्या बाईला गौरी देशपांडे चाळीसेक वर्षांपूर्वीच चांगली जमीन तयार करून दिलीय. त्यासाठी त्यांना थँक्स म्हटलं पाहिजे.
हॅप्पी बड्डे गौरी.