पावसात भिजावं की नाही?

१३ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात.

ये रे ये रे पावसा असं मे महिन्यात आपण मनातल्या मनात कित्येकदा म्हटलं असेल. अखेर पावसाला सुरवात झालृ. आणि काय मस्त वातावरण तयार झालं. एकतर मागच्या वर्षी ऑगस्टनंतर नावाला पाऊस पडला आणि त्यानंतर परतीचा पाऊसही आला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त उकाडा सहन करावा लागला.

पण काही नाही आता पाऊस परत आलाय. मग काय पहिल्या पावसात लहान मुलं एवढी भिजली ते बघून आपल्यालाही एकदा भिजावसं वाटलं. छत्री, रेनकोट नसल्यामुळेही थोडं भिजणं झालं पण मनसोक्त, पावसाच्या सरींचा आनंद घेत भिजता आलं नाही. पण मोठं झाल्यावर आपण या ना त्या कारणाने पावसात भिजणं टाळतोच.

पावसाच पाणी शुद्ध असतं

आजारी पडू, ऑफिस आहे, कपडे घराब होतील वगैरे वगैरे अशी कारणं देऊन आपण मोठे झालो आता भिजणार नाही असं सांगतो. पण मनातून मात्र खूप भिजायचं असतं. आपण लहानपणी तर ऐकलंय उन्हाळ्यात जर मुलांना घामोळं आलं असेल तर पहिल्या पावसात भिजावं. आणि आपली आजीसुद्धा म्हणायची की पावसात भिजणं चांगलं असतं.

पण पावसाळ्यात तर आपल्याला सारख्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी होतात. पण त्या तक्रारी सूक्ष्म जंतू आणि विषाणूंमुळे होतात. पावसाचं पाणी हे सगळ्यात पाण्याचं सगळ्यात शुद्ध स्वरुप असतं. त्यात कोणतेही खनिजं, जंतू, कचरा नसतो. अशा पाण्यात आपण भिजलो तर आपल्याला त्याचे फायदेच होतात.

हेही वाचा: भज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता

पावसाच्या पाण्याचे फायदे काय?

हे पावसाचं पाणी आपल्य त्वचेवरचे व्रण, घामोळं, एलर्जी जाते. तसंच पाऊस हा स्ट्रेस बस्टरसुद्धा आहे. पावसाच्या पाण्यात भिजल्यावर केस शॅम्पूने धुतल्यावर जेवढे स्वच्छ होत नाहीत त्यापेक्षा जास्त स्वच्छ होतात. पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते त्यामुळे बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो. पण आपल्याला माहिती आहे का, जर आपण पावसाचं शुद्ध पाणी २ ते ३ चमचे प्यायलो तर आपला पित्ताचा त्रास कमी होतो.

थायलंड युनिवर्सिटीतल्या आयुर्वेदीक विभागाच्या रिसर्च मॅगझिनमधे आलेल्या रिसर्च पेपरमधे असं म्हटलं होत की पावसाचं पाणी कॅन्सग्रस्त लोकांना बरं होण्यासाठी काही अंशी उपयुक्त ठरतं. तसंच गरोदर महिलांनीसुद्धा पावसाचं पाणी पिणं चांगलं असतं, असंही त्यात लिहिलं आहे, ही माहिती डॉ. राजेश जोशी यांनी दिली.

हेही वाचा: उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?

पावसात का भिजू नये?

पावसात भिजा, पावसात भिजणं चांगलं असतं असं आपण कितीही म्हटलं, डॉक्टरांनी सांगितलं तरी आपला पावसात भिजण्याचा अनुभव बघता आपण प्रत्येकवेळी आजारी पडलो आहोत. यामुळेच आपण भिजणं टाळतो आणि मुलांनाही पावसात भिजायला मनाई करतो. पण आपण का आजारी पडतो?

यावर डॉ. अविनाश फडके सांगतात की, पाऊस कसा पडतो याची प्रक्रिया आपण शाळेत असताना शिकलो आहोत. नद्या, समुद्रातल्या पाण्याचं बाष्पिभवन होतं आणि मग पाऊस येतो. बाष्पिभवन ज्याचं होतंय त्यातले घटक नक्कीच त्यातून बनणाऱ्या समाविष्ट असतात. आपल्या आजूबाजूचं प्रदूषण, नद्या, समुद्रात कसली कसली घाण असते.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

पावसामुळे आपण आजारी पडू शकतो

अशावेळी अनेक ठिकाणी आम्ल पाऊस पडतो. अजूनतरी महाराष्ट्रात दोन वेळाच आम्ल पाऊस पडला आहे. पण जो पाऊस आता पडतोय तो काही शुद्ध पाणी असलेला नाही आहे. पण अगदीच नद्या, समुद्राएवढा खराबही नाही आहे हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. पावसाच्या पाण्याचे खूप फायदे आहेत मात्र सध्याच्या प्रदूषणयुक्त परिस्थितीत फायदे फक्त ऐकण्यापुरताच राहतात.

या पावसात धोकादाय टॉक्सिन असतात, आर्द्रता जास्त प्रमाणात वाढलेली असते, तापमानात बदल होतो. यामुळे आपल्या पचनक्रिया, त्वचा, केस इत्यादींना त्रास होतो. यातल्या जंतूंमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला होतो. म्हणून सर्दी, खोकला, ताप सारखे आजार होतात, असं डॉ. फडके म्हणाले.

हेही वाचा: आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

आपण काय काळजी घ्यावी?

फक्त प्रदूषणाची चूक आहे असं नाही. आपण पावसात भिजण्यासाठी खास वेळ काढून किंवा सुट्टी घेऊन पावसात फिरायला जातो. कुठे जातो तर धबधब्याखाली. म्हणजेच ज्यात माती, खनिजं, क्षार असे वेगवेगळे घटक असताता. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. तसंच भिजताना झाडाखाली भिजलो किंवा कशावरुन पाणी पडत असेल त्याखाली भिजलो, डबक्यात उड्या मारतो यामुळे आपण जास्त जंतूंच्या संपर्कात येतो आणि आजारी पडतो.

अशावेळी आपणच आपली काळजी घेणं आवश्यक आहे. पावसात अगदीच न भिजण्यापेक्षा मोकळ्या ठिकाणी पावसात भिजावं. भिजल्यावर लगेच साबण न लावता आंघोळ करावी. त्यानंतर टॉवेलने शरीर आणि डोकं कोरडं करून घ्यावं. म्हणजे आर्द्रतेमुळे होणारे संसर्गजन्य आजार होणार नाहीत. त्याचबरोबर मस्किटो प्रोटेक्शन क्रिम लावून बाहेर पडावं, खाण्या पिण्याची काळजी घ्यावी. विशेषत: तेलकट, शिळं, आंबवलेले आणि उघड्यावरचे पदार्थ टाळावेत, असं डॉ. जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा: पीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट