हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं

११ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. 

पुण्यात मी असताना दुसऱ्या वर्षी आणखी एका व्यक्तीनं माझ्या जीवनात अनपेक्षितपणे प्रवेश केला. जया चक्रवर्ती. हेमामालिनीची आई. आधी पुण्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमधून मला निरोप आला. कारण होतं त्या निर्माण करत असलेल्या ‘स्वामी’ चित्रपटात मी प्रमुख भूमिका करेन का, असं विचारण्यासाठी.

पण पुन:पुन्हा आमंत्रण येऊ लागलं, तेव्हा त्या मागचा हेतू स्पष्ट होऊ लागला. त्या आपली मुलगी हेमामालिनी हिच्यासाठी नवरा मुलगा शोधत होत्या. त्याकाळी हेमामालिनी-धर्मेंद्र यांचं प्रेमप्रकरणं सगळ्यांच्या तोंडी होतं. काहीतरी करुन त्याचा अंत करुन हेमासाठी एका शिस्तबद्ध जीवनाची सुरवात करुन देणं, ही त्या आईची अपेक्षा होती. मला तिची भावना समजत होती.

आपल्या चित्रपटसृष्टीत मुली नायिका व्हायचं वय साधारणत सोळा ते सत्तावीसमधे. त्यावेळी त्यांच्या सानिध्यात पस्तीसच्या जवळपासचे, लैंगिक अनुभव घेतलेले, अनेकदा विवाहित असे पुरूष नायक म्हणून येतात. चित्रीकरणाच्या प्रक्रियेमधे बराच काळ सोबत राहणं, प्रवास करणं, दूरच्या रम्य स्थळी दोघांनी सोबत राहणं, गाणी-नाचणं-शारीरिक जवळीक या सगळ्याचा परिणाम म्हणून अनेकदा प्रौढ वयाचा दिग्दर्शक अशा संबंधांमधे पुरुषाची भूमिका निभावत असतो.

हेही वाचा: गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

एकंदरीत विवाहित पुरुषाबरोबर भावनात्मक संबंधांमधे अडकून, त्यातून बाहेर पडायचा मार्ग न सापडल्यामुळे त्या तडफडत असतात. चित्रपटसृष्टीत त्यांना त्यांच्या तोलामोलाचा पुरुष नवरा म्हणून मिळणं कठीण होऊन जातं. त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या बाहेरच्या जगात यशस्वी ठरलेल्या एखाद्या पुरुषाला नवरा म्हणून शोधणं अधिक योग्य ठरतं.

हेमामालिनी त्या काळातली अतिशय यशस्वी तारका होती. भारतातले तमाम पुरुष तिची कामना करतात, असं तेव्हा मासिकांमधे म्हटलं जात होतं आणि त्यात काही अतिशयोक्ती नव्हती. धर्मेंद्र विवाहित होता. त्याच्या आणि हेमाच्या नात्याविषयी त्याच्या बायकोला काही हरकत नसली तरी लग्नाचा विषय आला असता तर त्याचे आई-वडील-भाऊ-बहिणी या सगळ्यांनीच विरोध केला असता, यात शंका नाही, कारण लग्न म्हटलं की कोट्यवधींच्या संपत्तीचा प्रश्न येतो. पण हेमानंही भरपूर संपत्ती मिळवलेली असल्यामुळे तिच्या बाबतीत हा प्रश्न आलेला नसावा.

शेवटी हेमाच्या घरी जेवणासाठी निमंत्रणं येऊ लागली. तिचे दोन्ही भाऊही मला भेटू लागले. ‘स्वामी’च्या अभूतपूर्व यशाचा परिणाम म्हणून जया चक्रवर्तींनी ‘रत्नदीप’ चित्रपटाचा प्रारंभ करुन त्यात प्रमुख जोडी म्हणून मी आणि हेमाची योजना केली. आम्ही खजुराहोमधे चित्रीकरण करत असताना एक दिवस संध्याकाळी हेमानं मला फिरायला बोलावलं आणि मुख्य प्रश्न विचारला, ‘आपण दोघं लग्न करणारं आहोत, असं वृत्तपत्रांमधे छापून येतं. यावर तुझं काय म्हणणं आहे?’

हेही वाचा: गिरीश कर्नाड या ग्रेट कलाकाराविषयी इतकं वाचायला हवंच

मी सांगितलं, ‘थँक्स. हे बघ, वृत्तपत्र असं काही लिहिताहेत हे माझ्या दृष्टीने महत्त्वाच नाही. पण मी ‘नाही’ म्हणायला माझं असं कारणं आहे. माझी वाग्दत्त वधू अमेरिकेत आहे. आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे!’

हे त्यावेळी अर्धसत्य होतं. कारण त्यावेळेपर्यंत मी सरस्वतीला लग्नाविषयी विचारलं असलं, तरी तिनं अजूनही होकार दिला नव्हता. अर्थात, सरस्वतीनं नकार दिला असता, तरीही मी हेमाबरोबर लग्नाचा विचारसुद्धा करणं अशक्य होतं. त्यासाठी एक किस्सा सांगितला, तर पुरेसा ठरेल. 

मी एकदा तिला विचारलं, ‘तू मद्रासच्या तमिळ सिनेमांमधे कधीच का काम केलं नाहीस?’

हेमा म्हणाली, ‘अय्यो, तिथली माणसं किती काळी असतात!’ आणि खुदखुदू हसली. 

तिथेच हेमा प्रकरण संपुष्टात आलं होतं.

हेही वाचा: लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

साभारः राजहंस प्रकाशन, पुणे (फोन ०२०-२४४७३४५९)
खेळता खेळता आयुष्य
मूळ कन्नड लेखकः गिरीश कर्नाड
अनुवादः उमा कुलकर्णी
पानं ३०४, किंमत ३००