गिरीश कर्नाड: आधुनिक विचारांचा अभिजात नाटककार

११ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो.

पत्नीचा गर्भपात करण्यासाठी म्हणून पतीनं तिला हॉस्पिटलमधे नेलं. ऐन वेळी तिनं गर्भपाताला नकार दिला. नंतर तिनं एका मुलाला जन्म दिला. हे मूल पुढे जाऊन भारतीयच नव्हे तर जागतिक रंगभूमीवरचं श्रेष्ठ नाटककार झालं. गिरीश कर्नाड हे त्या मुलाचं नाव. आपल्या जन्माची कथा खुद्द कर्नाड यांनीच त्यांच्या ‘खेळता खेळता आयुष्य’ या मराठी अनुवादीत आत्मचरित्रात सांगितलीय.

सुमारे दहा दशकांपूर्वी एका मुलाला जन्म देण्याचा आईने घेतलेला निर्णय किती अटीतटीचा असेल, याची आपण फक्‍त कल्पनाच करू शकतो. पुत्रप्रेमापोटी आईने हा निर्णय घेतला असेल; पण खरंतर रंगभूमीवरचे हे खूप मोठ उपकार आहेत.

खरी ओळख ही बहुभाषिक नाटककाराची

गिरीश कर्नाड हे कन्‍नड नाटककार असले, तरी मराठी मातीशी आणि भाषेशी त्यांचं जास्त सख्य होतं. त्यांचे वडील त्यावेळी मुंबई प्रांताचे वैद्यकीय अधिकारी होते. त्यामुळे लहानपणीचा त्यांचा काही काळ पुणे, बेळगाव शहरात गेला. त्यांचा जन्म माथेरानला झाला. शिक्षण धारवाडमधे झालं. गिरीश कर्नाड यांनी चित्रपट आणि रंगभूमीवर विविध प्रकारच्या भूमिका केल्या; पण त्यांची खरी ओळख आहे ती नाटककार म्हणूनच.

त्यांनी सर्व नाटकांचं लेखन कन्‍नड भाषेत केलं. त्यातील बहुतांश सर्व नाटकं मराठी रंगभूमीवर सादर झाली आणि लोकप्रिय ठरली. जवळपास सर्व भारतीय भाषांमधून इतकंच नाही तर इंग्रजी, जर्मनीसह अनेक परदेशी भाषांमधून त्याचे प्रयोग झाले. त्यांची नाटकं अभिजात भारतीय परंपरेशी घट्ट नातं सांगणारी आणि भारतीय रंगभूमीची जगाला नव्याने ओळख करून देणारी आहेत.

हेही वाचा: हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं

कर्नाडांचं ‘ययाती’ अस्तित्वशोधाचा विषय बनलं

लौकिक अर्थाने कर्नाडांनी जगाच्या रंगभूमीवर कायमची एक्झिट घेतली आहे; पण त्यांची नाटकं चिरंतन राहतील. त्यांच्या काही महत्त्वाच्या नाटकांचं वेगळेपण समजून घेतलं, तर त्यांचं मोठेपण लक्षात येईल. ‘ययाती’ हे कर्नाड यांचं पहिलं नाटक. मराठी साहित्याला पहिलं ज्ञानपीठ मिळवून देणारे वि. स. खांडेकर यांचा ‘ययाती’ आणि कर्नाडांचा ‘ययाती’ यात मूलभूत फरक आहे. खांडेकरांनी ‘ययाती’ कादंबरी लिहिली तेव्हा ते आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वळले होते.

उलट, कर्नाड यांनी अगदी तरुण वयात ‘ययाती’ हे नाटक लिहिलं. ‘ययाती’चा नाट्य माध्यमातून शोध घेण्यासाठी व्यक्‍तिगत जीवनातले काही संघर्ष कारणीभूत ठरल्याचं कर्नाड सांगतात. कर्नाड ‘ययाती’ला अस्तित्वशोधाचा विषय बनवतात.

हेही वाचा: गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

त्यांचं ‘तुघलक’ हे नाटकं सत्तेमधल्या चिरंतनपणाला भिडतं

नाटककार म्हणून कर्नाडांची लेखणी वारंवार इतिहास, लोककथा, दैवतकथांचा आधार घेताना दिसते. तुघलक हे त्यांचं गाजलेलं आणखी एक नाटक. वेडा मोहम्मद तुघलक म्हणून ज्याला इतिहासात ओळखलं जातं, त्या दिल्लीच्या सुलतानाच्या जीवनावरचं हे नाटक सत्तेच्या अमानुषतेचा खेळ तर मांडतंच. त्याचबरोबर समाजव्यवस्थेत चांगल्या निर्णयांचीही कशी विल्हेवाट लागते, याचं अप्रतिम चित्रण करतं.

तुघलकाचे दोन निर्णय वादग्रस्त ठरले. दिल्लीहून दौलताबादला राजधानी हलवणं आणि तांब्याची नाणी चलनात आणणं. दोन्ही निर्णय फसले. खोट्या नाण्यांचा सुळसुळाट झाला. दौलताबादला राजधानी हलविताना यंत्रणेने जनतेवर अमानुष अत्याचार केले.

कर्नाड यांनी हे नाटक लिहिलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. काहींना तुघलकमधे पंडित नेहरू दिसले, पण हे नाटक कोणत्याही काळापुरतं, व्यक्‍तीपुरतं मर्यादित राहात नाही. ते सत्तेमधल्या चिरंतनपणाला भिडतं. मराठीत विजय तेंडुलकर यांनी या नाटकाचा अनुवाद केला. तीस ते पस्तीस पात्रांचं हे नाटक अत्यंत ताकदीने मराठी रंगभूमीवर सादर केलं. आविष्कारच्या अरविंद देशपांडे, दामू केंकरे यांचे परिश्रम त्यामागे होते.

अरुण सरनाईक यांनी तुघलकाची भूमिका केली होती. आपण पाहिलेल्या वेगवेगळ्या भाषांतल्या तुघलकामधला अरुण सरनाईक यांचा तुघलक हा सर्वश्रेष्ठ होता, असे कर्नाड म्हणाले होते. दुर्दैवाने पन्‍नास वर्षांपूर्वीच्या या प्रयोगाची कुठेही चित्रफीत नाही.

हेही वाचा: गिरीश कर्नाड या ग्रेट कलाकाराविषयी इतकं वाचायला हवंच

वेगळ्या जाणिवांचा शोध घेणारी नाटकं

‘नागमंडल’ आणि ‘हयवदन’ ही कर्नाड यांची आणखी दोन अव्वल दर्जाची नाटकं. या दोन्ही नाटकांना लोककथांचा आधार आहे. मराठी रंगभूमीवर या दोन्ही नाटकांना विजया मेहता, सत्यदेव दुबे दिग्दर्शक लाभले. ‘हयवदन’चा अनुवाद चिं. त्र्य. खानोलकर यांनी केला आहे. तर कन्‍नड भाषेच्या अभ्यासक उमा कुलकर्णी यांनी ‘नागमंडल’ मराठीत आणलं. स्त्री आणि पुरुष संबंधातल्या वेगळ्या जाणिवांचा शोध घेणारी ही नाटकं आहेत. दोन पुरुष आणि एक स्त्री यांच्याभोवती नाटकाची बांधणी केली आहे. वासनेची, आकर्षणाची नवी रूपं ते शोधतात. शरीर आणि मनाच्या संघर्षाचा नाट्यमय खेळही ते घडवून आणतात. नाट्यतंत्राचा, लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांनी दोन्ही नाटकांमधे केला.

महात्मा बसवेश्‍वर यांचे क्रांतिकारक विचार हा तर कोणत्याही लेखकाला आव्हान वाटणारा विषय. कर्नाटकात वाढलेल्या कर्नाड यांनी या विषयाला हात घातला नसता तरच नवल. ‘तलेदंड’ हे त्यांचं नाटक त्या अर्थाने अभ्यासनीय आहे. कर्नाड यांचे ‘बली’ हे नाटक मानवी हिंसा आणि अहिंसेच्यासंदर्भाने वेगळाच वैचारिक अनुभव देते. जैनधर्मीयांचा प्रभाव ज्या काळात भारतीय मनावर होता, तो काळ त्यांनी या नाटकासाठी निवडला आहे. प्रत्यक्ष हिंसाच नव्हे, तर हिंसेचा विचार हीसुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, असं मानलं जात होतं. तो काळ या नाटकात आहे.

‘अग्‍नी आणि वर्षा’ या नाटकात कर्नाड आपल्याला वैदिक कालखंडात घेऊन जातात. अभिजात नाटकांचं लेखन करणारे कर्नाड नंतरच्या काळात नाटकातून वास्तवाला भिडताना दिसतात.

हेही वाचा: भारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो?

वास्तवाला भिडणारं लेखन केलं

बंगाली रंगभूमीवर बादल सरकार, मराठीत विजय तेंडुलकर, हिंदीत मोहन राकेश आणि कन्‍नडमधे गिरीश कर्नाड हे एकाच कालखंडात कार्यरत होते. हे चौघेही भारतीय रंगभूमीला समृद्ध करणारे लेखक. कालखंड एकच असला तरी जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगवेगळी होती. पुण्याच्या एफटीआयचे प्रमुख होते तेव्हा नसिरुद्दीन शाह, ओमपुरी त्यांचे विद्यार्थी होते. पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ अशा श्रेष्ठ पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला; मात्र पुरस्कारासाठी म्हणून सत्ताधारी नेत्यांचं लांगूलचालन त्यांनी कधी केलं नाही.

विचारांशी बांधिलकी मानूनच त्यांनी आपलं लेखन केलं. समाजवास्तवाविषयी जे वाटतं ते थेटपणे मांडलं. आपलं आणि समकालीनांचं जगणं त्यांनी संपन्‍न आणि समृद्ध केलं. त्यांनी आपल्या जगण्यातून, लेखनातून काळावर उमटवलेला ठसा मात्र अमीट असणार आहे.

हेही वाचा: पुस्तक माणसाला कसं घडवतं?

( साभार: दैनिक पुढारी )