महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय.

निवडणुकीच्या राजकारणातली घराणेशाही ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. पण महिलांच्या राजकारणातल्या सहभागातही घराणेशाहीचीच चलती आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट देताना घराणेशाहीचं सर्टिफिकेट असलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात आलंय. असं प्राधान्य देण्यात सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकही मागे नाहीत.

सतरा महिला लोकसभेच्या रिंगणात

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांनी १७ महिलांना रिंगणात उतरवलंय. यामधे सत्ताधारी भाजपने सगळ्यात जास्त सहा जणींना तिकीट दिलंय. त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीने पाच जणींना उमेदवार केलंय. काँग्रेसने तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका महिलेला तिकीट दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीतला घटकपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीला अमरावतीची जागा सोडलीय. त्या जागेवर नवनीत कौर उमेदवार आहेत.

भाजपने खान्देशात तब्बल चार जागांवर महिलांना उमेदवारी दिलीय. पण जळगावच्या जागेवर उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार स्मिता वाघ यांचं तिकीट कापून पुरुषाला देण्यात आलंय. त्यामुळे तिथे आता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत. वाघ यांचे पती उदय वाघ हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्या असलेल्या वाघ यांना गेल्या विधानसभा निवडणुकीतही अमळनेर मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती.

खान्देशात चार महिलांना उमेदवारी

खान्देशात जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपने खासदार रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट दिलंय. खासदार खडसे या माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांची सून आहे. पती निखील खडसे यांचं निधन झाल्याने रक्षा यांच्या खांद्यावर खडसे घराण्याच्या राजकारणाची धुरा आलीय. डॉ. हीना गावित यांच्यासारखंच खडसे यांनाही वयाच्या २६ व्या वर्षी खासदार होण्याची संधी मिळाली होती. सरपंच म्हणून राजकारणात उतरलेल्या रक्षा यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केलंय.

नंदूरबारहून विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांनाच उमेदवारी मिळालीय. गेल्या लोकसभेतल्या सगळ्यात तरुण खासदार असलेल्या डॉ. हीना यांचं तिकीट कापण्याची चर्चा होती. पण माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची मुलगी असलेल्या डॉ. हीना यांनाच भाजपने पुन्हा मैदानात उतरवलंय. भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेले डॉ. गावित गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमधे गेले होते.

दिंडोरीच्या जागेवर भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना तिकीट दिलंय. माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या सूनबाई असलेल्या डॉ. पवार यांच्यासाठी भाजपने तिथे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना डावललंय. भाजपमधे येण्याआधी डॉ. पवार राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष तसंच नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. पण राष्ट्रवादीने शिवसेनेतून आलेल्या धनराज महाले यांना तिकीट दिल्याने त्या भाजपात गेल्या. गेल्यावेळी राष्ट्रवादीने त्यांना दिंडोरीतून उमेदवारी दिली होती.

मराठवाड्यात एकाच महिलेला तिकीट

मराठवाड्याच्या बीडमधून भाजपने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मैदानात उतरवलंय. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपने मुंडे यांची मुलगी डॉ. प्रीतम यांना तिकीट दिलं होतं. डॉ. प्रीतम यांची बहीण पंकजा मुंडे सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत.

मुंडे घराण्याशी संबंधित असलेल्या पुनम महाजन यांनाही भाजपने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून तिकीट दिलंय. पुनम या माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची मुलगी आहे. गोपीनाथ मुंडे हे त्यांचे आतेमामा म्हणजेच आतोबा. महाजन यांचं निधन झाल्यावर पूनम यांचा भाऊ राहुल यालाही राजकारणात उतरवण्याची तयारी सुरू होती. पण तो प्लॅन काही प्रत्यक्षात आला नाही. नंतरच्या काळात पूनम यांच्याकडेच महाजन घराचा वारसा आला.

महाजन, मुंडे घराण्याचा वारसा असलेल्या पुनम सध्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. खानदेश, मुंबई आणि मराठवाड्यात उमेदवार देणाऱ्या भाजपने आपला बालेकिल्ला असलेल्या विदर्भातून मात्र एकही महिलेला उमेदवारी दिली नाही.

बारामतीत रंगणार पवार विरुद्ध कुल सामना

बारामती मतदारसंघात भाजपने कुल घराण्यातल्या सूनेलाच मैदानात उतरवत थेट पवार कुटुंबाला आव्हान दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कांचन कुल भाजपच्या तिकीटावर लढताहेत. आमदार राहुल कुल यांची बायको असलेल्या कांचन कुल यांचे सासू-सासरेही वीसेक वर्ष आमदार होते.

सासरे सुभाष कुल यांच्या अकाली निधनाने सासू रंजना कुल दौंडच्या आमदार राहिल्या. आता राहुल कुल आमदार आहेत. राहुल यांचे आजोबा बाबूराव कुल हे दौंड पंचायत समितीचे सभापती होते. कुल घराणं जिल्ह्याच्या राजकारणात पवार विरोधक म्हणून ओळखलं जातं.

वंचित बहुजन आघाडीच्या पाच उमेदवार

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रयोग म्हणून उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच झटक्यात पाच महिलांना उमेदवारी दिलीय. या आघाडीकडून वेगवेगळ्या जातीधर्मांतल्या महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यात कोल्हापुरातून अरुणा माळी, जळगावमधे अंजली रत्नाकर, रायगडमधून सुमन कोळी, ईशान्य मुंबईत निहारिका खोंदले आणि नागपूरजवळच्या रामटेक मतदारसंघातून प्रसिद्ध कव्वाल किरण रोडगे पाटणकर यांना उमेदवारी दिलीय.

भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने भावना गवळी यांच्या रुपाने आपला एकमेव उमेदवार रिंगणात उतरवलाय. यवतमाळ वाशिम मतदारसंघातून खासदार असलेल्या भावना या माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांची मुलगी आहे. गवळी यांच्या अकाली निधनानंतर शिवसेनेने या मतदारसंघातून १९९९ मधे भावना यांना मैदानात उतरवलं. तेव्हापासून त्या सलग तीनवेळा खासदार झाल्या. यंदा शिवसेनेतूनच गवळी यांचं तिकीट कापण्याची मागणी होत होती.

शिवसेना, राष्ट्रवादीकडे तगडं संघटन, तरीही

महाराष्ट्रात शिवसेनेकडे सर्वसामान्य घरातून आलेल्या महिलांचं चांगलं संघटन आहे. शिवसेनेच्या निवडणुकीतल्या विजयात या संघटनाचा फार मोठा वाटा आहे. शिवसेनेतून  पण उमेदवारी देताना महिला आघाडीला डावललं जातंय. खांद्यावर घराणेशाहीचा झेंडा असलेल्या महिलेलाच उमेदवारी दिली जातेय.

महाराष्ट्रात शिवसेनेसारखंच संघटन राष्ट्रवादी काँग्रेसने उभं केलंय. खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रोजेक्ट असलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसने महाराष्ट्रभरात आपलं तगडं नेटवर्क उभारलंय. पण या नेटवर्कमधून आलेल्या युवतींना राष्ट्रवादीने अजून तरी लोकसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचं हे नेटवर्क अजून संधीअभावी कोमेजून गेल्यासारखं झालंय.

बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे यांनाच पुन्हा उमेदवारी दिलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलगी असलेल्या सुप्रिया त्यांच्या वारसदार म्हणून ओळखल्या जातात. काँग्रेस महाआघाडीचा घटकपक्ष असलेल्या युवा स्वाभिमानी पक्षाने अमरावतीतून नवनीत कौर राणा यांना उमेदवारी दिलीय. गेल्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. एक्ट्रेस असलेल्या राणा त्यांचा नवरा रवी राणा हे आमदार आहेत.

निवडून येण्याचा निकष धोक्याचा

महिलांना उमेदवारी देताना काँग्रेसनेही घराणेशाहीचं कार्डच वापरलंय. काँग्रेसने महाराष्ट्रात तीन महिलांना उमेदवारी दिलीय. वर्ध्यातून काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या मुलीला उमेदवारी मिळालीय. एड. चारुलता टोकस इथून लढवताहेत. तसंच राव यांचे भाचे रणजित कांबळे हे आमदार आहेत.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसने पूनम महाजन यांच्याविरोधात माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेदवारी दिलीय. प्रिया यांचे वडील माजी खासदार सुनील दत्त यांनीही या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केलंय. प्रिया दत्त यांनी यंदा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण काँग्रेसने दत्त कार्ड वापरण्यासाठी त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे इथे दत्त विरुद्ध महाजन घराण्यात फाईट होणार आहे.

देशाच्या राजकारणात आशावादी चित्र

वंचित बहुजन आघाडी वगळता भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना घराणेशाहीचा निकष तंतोतंत पाळलाय. पण या सगळ्याला अपवाद ठरलाय तो उर्मिला मातोंडकरचा. काँग्रेसने उर्मिलाला उमेदवारी देताना घराणेशाहीचा निकष बाजूला ठेवलेला असला तरी तिच्यामागे सिनेमातला करिश्मा आहे. असा करिश्मा असल्यामुळे तिला उमेदवारीची वाट मोकळी झाली.

निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारीसाठी निवडून येण्याला खूप महत्त्व आहे. आणि सर्वच पक्षांनी उमेदवारी देताना निवडून येण्याचा हा निकष काटेकोरपणे लागू केलाय. पण निवडून येण्याच्या या निकषामुळे महिलांना आपला वाटा मिळत नाही. त्यामुळे मतदार म्हणून महिलांची संख्या वाढत असली तरी त्यांना त्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दिलं जात नाही. 

पण देशाच्या राजकारणात यंदा दोन महत्त्वाच्या आशावादी गोष्टी घडल्यात. पश्चिम बंगालमधे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या तृणमूल काँग्रेसकडून महिलांना उमेदवारीत ४१ टक्के वाटा देण्याचा निर्णय लागू केलाय. ओडिशातही सत्ताधारी बिजू जनता दलाने महिलांना ३३ टक्के जागा देण्याचा निर्णय जाहीर केलाय.