विठुराय भक्तांना म्हणतात आषाढी, कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका

१२ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात.

वैशाख वणवा संपता संपता शेतीची मशागत सुरू होते. रान नांगरून तयार केलं जातं. तापलेल्या भुईला पावसाची ओढ असते. ज्येष्ठात पेरणीची लगबग आणि पाऊस सुरू होतो. आषाढात बाळकोळपण होतं. पीक तरारतं. वीत दीड वीत वर येतं. कामाची धांदल थांबते. त्याचवेळी महाराष्ट्र, कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या श्री विठ्ठलाच्या वीर वारीकरांना आषाढी वारीचे वेध लागतात.

लगबग पंढरपूरला जायची

माणसांची जमवाजमव, साधनांची जुळवाजुळव सुरू होते. नव्या चैतन्याने लोकसखा विठ्ठलाच्या भेटीची आस मनामनात दुणावते. 'चल गं सखे चल गं सखे पंढरीला' अशी साद एकमेकींना घातली जाते. आणि अंतराचा, मुक्कामांचा अंदाज घेत एक एक दिंडी पंढरीच्या दिशेने निघू लागते. 'जय जय राम कृष्ण हरी', या नामघोषात संतांचा गौरव करत एका लयीत पावलं उचलली जातात. टाळमृदंगाचा नाद घुमू लागतो. 'माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी', म्हणत लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या भेटीला वारकरी धावू लागतात.

महाराष्ट्रात दरवर्षी दिसणारं हे चित्र. दरवर्षी लाखो भाविक चालत पंढरीच्या दिशेने निघतात. ना कुणाचं बोलावणं, ना सांगावा. पण जिवाच्या जीवलगाला भेटण्याची आर्त ओढ मनामनात दाटते. आणि म्हातारपणामुळे थकलेली पावलंही नव्या उमेदीने पुढे होतात. मग प्रश्न पडतो, का बरं हे लोक या भेटीला आतुर होतात? कोणी सुरू केली वारी? कधीपासून?

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

संत नामदेवांच्या आधीपासून वारी सुरुय

इ. स. ५१६ च्या ताम्रपटात पांडरंगपल्ली असा उल्लेख असणारं हे खेडं होतं. इ.स. १२३७ च्या शिलालेखात याच खेड्याचा उल्लेख महाग्राम असा झालेला दिसतो. म्हणजे ६व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत पंढरपूरचा विकास होत गेला. इ. स. १२७० च्या शिलालेखात मंदिराला दिलेल्या देणग्या आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी नंतर काल्याचा दिवस साधून दिलेल्या दिसतात. वारकरी संप्रदायाचे प्रथम संत नामदेवांचा जन्म इ. स. १२७० चा. याचा अर्थ इतकाच की नामदेव, ज्ञानदेव आदी संतांच्या अगोदर पासून पंढरपूरात वारी सुरू होती. तिचा थेट संबंध मेंढपाळ धनगरांच्या येरजारीशी होता. माणदेशात वसलेलं पंढरपूर हे कमी पावसाचं ठिकाण.

कोकणात गेलेले मेंढपाळ पाऊस सुरू होताच देशावर परततात. मग आषाढी वारी सुरू होते. तर पूर्वेकडे परतीच्या मान्सूनला तोंड देत तिकडे गेलेले लोक दिवाळीच्या दरम्यान परततात. तेव्हा कार्तिक वारी सुरू होते. अर्थात पंढरपूर, श्रीविठ्ठल, वारी या गोष्टी संतांच्या आधीपासून चालत आल्यात. तरी या उपासनेला खरं सांप्रदायिक रूप दिलं ते संतांनीच. नामदेवांनी विठ्ठलाला बसवंत करून त्याच्याभोवती भजन कीर्तनाचा खेळ मांडला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.

हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

देव पहावया गेलो, देव होऊनि ठेलो

आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीविठ्ठल बनलंय. कारण संतांनी देवाला सखा सांगाती, मायबाप केलं. अनेक अभंगातून विठ्ठलाला साजिवंत केलं. भक्ती सुखाला भाळून हा पंढरपुरी अवतार घेता झाला, असं संतांनी म्हटलं. असा हा विठ्ठल भावाचा भुकेला आणि भक्त वेल्हाळ झाला तर काय नवल! म्हणूनच संत नामदेवांच्या अभंगात सर्वप्रथम आपणास विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले भक्त आणि भक्ताच्या भेटीसाठी आसुसलेला देव, अस चित्र दिसू लागतं. भक्तांना जितकी पंढरपुरात जाऊन मायबाप विठ्ठलाला भेटण्याची ओढ आहे, तितकीच ओढ, आतुरता विठ्ठलाच्या मनात देखील आहे. म्हणूनच नामदेवांच्या अभंगाद्वारे हा विठ्ठल असे म्हणतो की,

आषाढी कार्तिकी विसरूं नका मज|

सांगतसे गूज पांडुरंग||

पतितपावन मी तो आहे खरा|

तुमचेनि बरा दिसतसे||

तुम्ही जाता गांवा हुरहुर माझे जिवा|

भेटाल केधवा मजलागी||

धावुनिया देव गळा घाली मिठी|

स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे||

तिन्ही त्रिभुवनीं मज नाही कोणी|

म्हणे चक्रपाणि नामयासी||

हेही वाचा: संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

इथे विठ्ठल स्वतःच मनीचे हितगुज सांगताना असं म्हणतो की, आषाढी-कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका. मी पतितपावन आहे खरा, परंतु तुमच्यामुळेच मला हे बिरूद शोभून दिसते. तुम्ही स्वतःच्या गावी गेला की माझ्या मनाला हुरहूर लागते. असं म्हणत नामदेवाच्या गळ्यात पडून देव स्वतः हुंदके देत म्हणतो, तिन्ही त्रिभुवनी मला कोणी नाही. असा लडिवाळआणि भक्तवेल्हाळ देव दुसरा कोणी नाही. म्हणूनच सगळ्या वारकऱ्यांची अशी मान्यता आहे की पालखी सोहळा सुरू झाला, दिंड्या निघू लागल्या की देव मंदिरातून बाहेर पडतो. दिंड्यांमधल्या कथा कीर्तनात रंगून जातो. पंढरीच्या वाटेवर चालणारे वारकरी संत सज्जन होऊन जातात. 'नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे', हा जनाबाईचा उपदेश प्रमाण मानून वारकरी चालत राहतात. मग

'संतभार पंढरींत| कीर्तनाचा गजर होत||

तेथे असे देव उभा| जैसी समचरणांची शोभा|

हा जनाबाईचा अनुभव सर्वांना येऊ लागतो. चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो, जगायला नवी उमेद, नवे बळ मिळते, तसे होते. 'देव पहावया गेलो, देव होऊनि ठेलो', अशी अनुभूती घेऊन, तृप्त समाधानी मनाने वारकरी घरी परततो. त्याच्या जीवनाला भक्तीची नवी झळाळी आलेली असते. घराघरात विठ्ठलनामाचा गजर घुमू लागतो.

हेही वाचा: 

वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

(लेखक हे साताऱ्याच्या मायणी इथल्या कला, वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)