गोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ

१७ जुलै २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


गोल्डा मेअर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान. अल्पसंख्यांक असलेल्या ज्यूंचा आवाज त्यांनी जगभर पोचवला. पुरुषांच्या बरोबरीने आपणही काम करू शकतो हा विश्वास त्यांनी त्यावेळच्या ज्यू स्त्रियांना दिला. 'गोल्डा - एक अशांत वादळ' हे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं पुस्तक या अशांत व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतं.

इतिहासाला नवं वळण देण्याची क्षमता काही प्रत्येकात नसते. ज्या लोकात असे वळण देण्याची क्षमता असते त्यांची संख्या ही नेहमी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असते. आणि जगाचा नकाशा बदणाऱ्यांची संख्या तर ती त्याहूनही कमीच! अश्या कमी असणऱ्यांच्या यादीतील एक ठळक नाव म्हणजे इस्त्रायल च्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेअर.

गोल्डावर झायाॅनवादाचा प्रभाव

गोल्डाचा जन्म ३ मे १८९८ ला युक्रेनमधे झाला. तिचं बालपण तसं हलाखीतच गेलं. घरी झायाॅनवादी श्रमिक चळवळीचे लोक येत. त्यामुळे आपणही या चळवळीत सामील व्हावं हे बालपणीच गोल्डाला वाटू लागलं. लहानपणापासून गोल्डावर तिच्या मोठ्या बहिणीचा शेयना प्रभाव होता. शेयनासुद्धा झायाॅनवादी होती.

रशियन लोकांकडून ज्यूंवर होणारे 'प्रोग्रोम' हल्ल्यांना कंटाळून गोल्डाचे वडील आपल्या कुटुंबकबिल्यासह अमेरिकेत स्थाईक झाले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीला जागत एकदा गोल्डाच्या लहानपणी ती प्राथमिक शिक्षण घेत असताना सिनेगाॅगच्या चौकात झायाॅनवादी श्रमिक संघटनेच्या मोर्चात तिने केलेलं भाषण, तिच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळावीत म्हणून तिने शाळेच्या मंचावरुन उपस्थितांच्या हृदयालाच साद घातली.

चांगला फंड गोळा करुन मुलांच्या पुस्तकांचा प्रश्न सोडवला. या प्रसंगातूनच कदाचित गोल्डाला स्वतःलाच समजायला सुरवात झाली असावी की आपल्यात नेतृत्वाचे गुण आहेत म्हणून. पुढे तिचा मित्र माॅरिस मेअरसन याच्याबरोबर तिने विवाह केला तो एका अटीवर, की विवाहानंतर दोघांनी पॅलेस्टाईन मधल्या ज्यूंच्या किबुत्झमधे रहायला जायचं.

हेही वाचा: गडाफी जिवंत असता तर जग आणखी चांगलं झालं असतं?

ज्यू स्त्रियांना आत्मविश्वास दिला

ज्यूंचं स्वतंत्र राष्ट्र असावं या विचारसरणीला झायाॅनवाद असं म्हणतात. त्याचा उद्गाता होता थिओडोर हर्झल. पुढे नोव्हेंबर १९१७ ला ब्रिटिशांनी  'ज्यूंची स्वतंत्र भूमी पॅलेस्टाईनमधे असावी याला मान्यता दिली.'

माॅरिस आणि गोल्डा मेहरावियातल्या किबुत्झमधे राहू लागले, मुलंही तिथंच झाली. मेहरावियात ती सुधारणा करू लागली. तिचे गुण ओळखून डेविड रेमेज यांनी डब्ल्यूडब्ल्यूएलसीची सचिव होशील का म्हणून विचारलं तर तिनेही ती जबाबदारी सहज स्वीकारली.

गोल्डाने पुरुषांच्या बरोबरीने आपणही काम करू शकतो हा विश्वास त्यावेळच्या ज्यू स्त्रियांना दिला. असं असतानाही ती स्त्रीवादी स्त्रिया, संघटनांशी जोडून घेऊन स्वतःला मर्यादा घालून घेत नव्हती. उलट स्त्रीवादी संघटनांना तिचं जगणं आदर्शवादी वाटत होतं.

स्वतंत्र भूमीसाठी संघर्ष

१९२१ नंतर जगभरातले ज्यू स्थलांतरित होऊन पॅलेस्टाईनमधे येत. अरब ज्यूंच्या या येणाऱ्या लोंढ्यांवर योजनाबद्धपणे हल्ला करत. वाढत चाललेली ज्यूंची संख्या आणि त्यामुळे ज्यूंच्या हाताला काम मिळावं म्हणून अरबी मजुरांना काढून टाकू लागले. यावर चिडून अरब हे घातपात घडवत. तसंच आपल्या जमिनीवर हे ज्यू आक्रमण करत आहे ही भावनाही होती त्यामागे.

हे हल्ले थांबवावे आणि ज्यूंना स्वतंत्र भूमी मिळावी म्हणून १९३२-३३ मधे डेविड बेन गुरिअाॅन आणि सहकाऱ्यांनी झायाॅनवाद्यांचं पाठबळ मिळवून 'मापाइ' पक्ष वाढवला. पक्ष सोपवत असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे गोल्डाची कामं वाढत होती म्हणून काही तिने कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ती त्यांच्या खाण्यापिण्याचं व्यवस्थित पहायची.

गोल्डा आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल ठाम असायची. स्वभावच होता तिचा आधी सर्वांचं ऐकून घ्यायचं आणि एकदा का निर्णय झाला की मग तो तडीस नेल्याशिवाय तिला चैन पडायची नाही. वेळ आली तर ती आपले गुरू बेन गुरिअाॅन यांचा विरोधही सहन करायची.

ज्यूंचा आवाज जगभर पोचला

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातला कोणताही देश अरबांना उघड विरोध करत नसायचा याचं उत्तर एका शब्दात द्यायचं ठरलं तर ते आहे 'खनिजतेल'. तेल हे प्रत्येक राष्ट्राची उर्जा आहे. म्हणून तर ब्रिटिशही ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्राच्या स्थापनेला उघड दुजोरा द्यायचे नाहीत.

ज्यू हे अल्पसंख्यांक होते. जगाच्या व्यासपीठावर त्यांना आवाज नव्हता. तो आवाज भविष्यात गोल्डा या नावाने बुलंद ठरणार होता. गोल्डा विचाराने समाजवादी होती. त्याची तत्वं ती व्यक्तीगत जीवनात कसोशीने पाळायची. पण व्यक्तीगत जीवनात टोकाची समाजवादी असलेली गोल्डा पॅलेस्टाईन बाहेर जात तेव्हा तिथल्या ज्यूंना कळकळीनं आवाहन करायची की, काहीही करा. पैसे कमवा. आणि इकडे पॅलेस्टाईनकडे पाठवा.

हेही वाचा: मोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची

इंग्लंडच्या सत्ताधीशांना आव्हान

राजकीय जबाबदारी सांभाळणाऱ्यांना बऱ्याच वाटाघाटी कराव्या लागतात असं म्हटलं जातं. गोल्डा मात्र याला अपवाद आहे. गोल्डा वाटाघाटीत फार वेळ दवडत नसायच्या. वाटाघाटींमधे फार काही निष्पन्न होणार नसेल तर बाई त्या बैठकीतून तडकाफडकी निघून जात.

ज्यूंसाठी काढलेल्या स्थानांतरनाच्या श्वेतपत्रीकेनुसार जगभरातल्या ज्यू स्थानांतरीत होऊन पॅलेस्टाईनमधे येत होते. तेव्हा ब्रिटिश मात्र श्वेतपत्रिकेत सांगितलेल्या ७५ हजार परवाना पत्रांचा आकडा पार केल्यावर नवीन परवाने देत नव्हती.

त्यावेळी इंग्लंडमधे मजूर पक्ष सत्तेत होता. त्यांना गोल्डाने अगदी ठणकावून सांगितलं की, नवीन वाढीव परवाने द्या नाहीतर जगभरातल्या ज्यूंना पॅलेस्टाईनमधे कसंही करून आणल्याशिवाय आमच्या समोर 'पर्याय नाही'. 'पर्याय नाही' हा त्यावेळी जणूकाही वाकप्रचार झाला होता.

ज्यूंयेतर तर मदतीला सर्वबाजूने नकार देत होतेच खुद्द जे ज्यू होते ते जगविख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांनीही ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्र संकल्पनेला दुजोरा दिला नाही. ते या संकल्पनेच्या समिती समोर कधीच आले नाही.

जाॅर्डनच्या राजाला प्रश्न विचारायचं धाडस

बेन गुरिआॅन आणि डाॅ. वाईझमन हे दोघेही थोर होते. डाॅ. वाईझमने अॅसिटोन तयार करण्याची सोपी पद्धत शोधून ती ब्रिटिशांना दिली ज्याचा वापर ब्रिटिशांनी बाँम्ब बनवण्यासाठी केला होता महायुद्धात. त्याबदल्यात आपण ब्रिटिशांकडुन आपल्या राष्ट्रांचा प्रश्न मार्गी लावून घेऊ अशी वाईझमन यांची योजना होती. त्यावेळी इंग्लंडमधल्या झायाॅनवाद्यांना बेन गुरिआॅन आणि गोल्डाने सावध केलं की, 'हे ब्रिटिश आपल्याला दिलेला शब्द पाळणार नाहीत.'

कोणत्याही परिस्थितीत ज्यूंचं राष्ट्र असलंच पाहिजे ही झायाॅनवाद्यांची भूमिका होती. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. एकदा तर गोल्डा एकटी सिमा ओलांडून जाॅर्डनचे राजे अब्दुल्ला यांना भेटायला गुप्तपणे गेली होती. अब्दुल्लांच्या एका दुसऱ्या भेटीत अब्दुल्ला गोल्डाला म्हणाले की 'स्वतंत्र राष्ट्राची इतकी घाई का आहे तुम्हाला?' तेव्हा गोल्डा उसळलीच ती म्हणाली, '२००० वर्ष कमी झालेत की काय अजून आम्ही गुलामीत रहायचं.'

अमेरिकेतली पहिली वारी

अरबांसोबत असलेल्या तेल संबंधामुळे इस्त्रायलला फार मदत मिळत नव्हती मग आता काय करायचं, राष्ट्रासाठी पैसा कुठुन आणायचा तर गोल्डासमोर एकच मार्ग होता तो म्हणजे अमेरिकेतले श्रीमंत ज्यू.

गोल्डाने अमेरिकन ज्यूंना आवाहन केलं. पण पैश्यासाठी त्यांच्यासमोर ती लाचार होऊन कधीच गेली नाही. उलट तुम्ही अमेरिकी ज्यूंनी पैसा देणं हे तुमचं कर्तव्यच आहे असं म्हणायलाही तिची अडखळली नाही.

अमेरिकेत ज्यूंकडून मोठा निधी जमा करवून देतो काही कमिशन द्याल का असं विचारणाऱ्याला ती साफ नकार द्यायची. फसवणूक करुन उभारलेला पैसा मला नकोय हे ठणकावची. तिचा हेतू आणि कार्यपद्धती फार शुद्ध असायची. या पहिल्याच अमेरिकावारीत गोल्डाने तब्बल ५० मिलियन डाॅलर निधी गोळा केला होता.

हेही वाचा: १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

गोल्डाची कित्येक आघाड्यांवर लढाई

इस्त्रायलच्या स्थापनेनंतर गोल्डाने आपल्या आडनावाचं हिब्रूकरन केलं. मायरसनची ती मेअर झाली. गोल्डाने बराच काळ इस्त्रायलचं परराष्ट्रमंत्रीपद भुषवलं. गोल्डाला कामाचा इतका उरक होता की तिने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक प्रस्ताव मांडला की आपल्याला वर्षभरात तीस हजार घरकुल उभारायची आहेत.

गोल्डाला जगात ज्या कुणा ज्यूला इस्त्रायलमधे स्थाईक व्हावंस वाटत असेल त्याने यावं खुशाल. त्यासाठी १९४९ ला नव्याने आलेल्या साडेतीन लाख निर्वासित ज्यूंचं पुनर्वसन करायचं होतं म्हणून ही योजना होती. त्यासाठी पैसा? मग पुन्हा अमेरिकावारी म! गोल्डा एकाच वेळी कित्येक आघाड्यांवर लढाई खेळत होती.

लोकप्रियतेत प्रचंड घसरण

परराष्ट्रमंत्रीपद स्वीकारल्या स्वीकारल्या ईजिप्तच्या नासेर यांनी सुएझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण केलं. या कामाला फुस होती सोविएत युनियनची. या राष्ट्रीयीकरणामुळे इस्त्रायलचा युरोपशी संपर्क तुटणार होता. नाईलाजास्तव सिनाई प्रदेशावर प्रथम स्वतः आक्रमण करून तो प्रदेश इस्त्रायलच्या सैनिकांनी ताब्यात घेतला. शेवटी अमेरिकेच्या दबावामुळे तिथून इस्त्रायली सैन्याने माघार घेतली.

नासेरला इस्त्रायलचा येनकेन प्रकारे नायनाट करायचा होता तो प्रयत्न इथं फसला. या युद्धाचा गोल्डाच्या मन बुद्धीवर प्रचंड ताण पडत होता. नंतर गोल्डा लेवी एश्कोलच्या आग्रहावरून मापाइ पक्षाची अध्यक्ष झाली. गोल्डाने पडझड झालेल्या या पक्षाला पुन्हा बांधलं.

सिनाई प्रदेशातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयात एश्कोलचा वाटा मोठा होता. या माघार घेण्याच्या निर्णयाचे वाईट परिणाम गोल्डा आणि मापाइ पक्षाला भोगावे लागले. लोक तिच्या नेतृत्वावर शंका घेऊ लागले. तिची लोकप्रियतेत प्रचंड घसरण झाली होती.

पहिली पंतप्रधान होण्याचा मान

गोल्डाला राजकारणातून निवृत्त व्हायचं होतं की लगेच तिच्यावर 'पंतप्रधान' होण्याची जबाबदारी चालून आली. जगातली तिसरी आणि इस्त्रायलची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान गोल्डाच्या नावे आहे. काळासोबत मात्र गोल्डा आपल्या समाजवादी विचारसरणीत बदल करत नव्हती. कामगारांच्या पगारवाढीला तिने नकार दिला. त्यासाठी तिला बऱ्याच जणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

'सिक्स डे वाॅर', 'ब्लॅक पँन्थरांचा उठाव', 'ब्लॅक सप्टेंबर', 'म्युनिक हत्याकांड' या प्रकरणात तिने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. उतारवयात गोल्डाच्या मनावर अनेक आघात झाले. 'योम किपूर' मधे ईजिप्तसोबतचे हरलेले. युद्धाची ही जखम तर ती आपल्या सोबतच घेऊन गेली. या युद्धात इस्रायलचे २५०० सैनिक मारले गेले.

या युद्धात ईजिप्त आणि इस्त्रायलमधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मीच कसा जबाबदार आहे आणि त्याचं श्रेय आपल्याला मिळावं यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हेन्री किसिंजरांचा चाललेला प्रयत्न पुस्तकात फार छान प्रकारे समजावलं आहे.

गोल्डा पंतप्रधानकाळात शेवटी हुकूमशाहीकडे झुकलेली होती. आपल्या निर्णयाच्या विरोधात बोललेलं तिला सहन होत नव्हतं. गोल्डाचे हे असे विविध पैलू वीणा गवाणकरांनी गोल्डाचं लिहिलेलं चरित्र 'गोल्डा - एक अशांत वादळ' या पुस्तकात वाचायला मिळतात.

पुस्तक -  गोल्डा, एक अशांत वादळ
लेखिका - वीणा गवाणकर
प्रकाशक - इंडस बुक सोर्स
किंमत - ४९९ /-

हेही वाचा: 

कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?