बोरिवलीच्या आजीबाईच्या बटव्यात दडलंय काय?

०९ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.

राजा आणि राणीची, गोष्ट ऐकू या आजीची
आजी आली घेऊन गोष्टींचा हा ठेवा
म्हणतो आम्ही त्याला आजीबाईचा बटवा

आकाशवाणीवरचं हे गाणं अनेकदा आपण ऐकलं असेल. आजी ही घराघरातली अशी एक व्यक्ती आहे की जिच्याकडं अनुभवाचं भलं मोठं गाठोडं असतं. अनेक उन्हाळे पावसाळे तिनं बघितलेले असतात. अनेक गोष्टींचा तिच्याकडे ठेवा असतो. यातलाच एक समृद्ध ठेवा म्हणजे तिचा बटवा. आजीबाईच्या बटव्याचा औषधी गुण ओळखून त्याला आपण आता घरचा वैद्यदेखील म्हणत असतो.

नेमका कसा असतो हा बटवा, काय असतं या बटव्यात. तो आपल्याला उपयोगी पडतो तरी कसा. त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा काय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा लहान मुलांच्या आरोग्याच्या, पोषणाच्या दृष्टीने उपयोग कसा, हे आपण जाणून घेऊ या.

आज झालंय असं की घरात कुणाला छोटासाही आजार झाला. अगदी सर्दी खोकला आला तरी आपण लगेच आपल्या डॉक्टरांकडे धाव घेतो. घरातल्या लहान मुलांच्या बाबतीत काही झालं तर लगेच आपण चाईल्ड स्पेशालिस्टकडे जातो आणि हजारभर रूपये खर्च करतो. खरंतर स्वत:ची, कुटुंबाची, लहानग्यांची काळजी म्हणून डॉक्टरांकडं जायला काही हरकत नाही. पण साधी शिंक आली तरी लगेच धावाधाव करणं हेही काही बरं नाही.

काही प्राथमिक उपचार आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो. ह्या उपचारांचा संबंध आपल्या आजीबाईच्या बटव्याशी येतो. हे उपचार अगदी घरगुती, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असतात. ज्या घरात आजी आहे आणि तिचं ऐकलं जातं तिथं आजीबाईचा बटवा अनुभवता येतो. अशाच एका घरच्या आजीबाईंशी संवाद साधला. आज त्यांनी पंचाहत्तरी ओलांडलीय.

या आजीबाई सध्या राहतात मुंबईच्या बोरिवलीत. त्यांचं नाव राजश्री गजानन जोशी. या जोशी आजी मुळच्या कोकणातल्या. अण्णासाहेब कर्वे हे त्यांचे पणजोबा. लग्न झालं तेव्हा त्यांच्याशेजारी एक आजी राहत. त्या आजीकडून त्यांनी अशा अनेक गोष्टी शिकल्या. या गोष्टींचाच त्या आपल्या घरात प्राथमिक उपचार म्हणून वापर करतात. त्यांचा बटवा म्हणजे केवळ प्राथमिक उपचार नाही, तर आजार होऊच नये यासाठी काळजी करणाऱ्या गोष्टीदेखील त्यांच्याकडं आहेत.

विशेष म्हणजे पोषण आहाराबद्दल खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या बटव्यात दडलेल्या आहेत. खेडोपाडी शेतांतून अशा अनेक गोष्टी सहज मिळतात ज्या बाळाच्या आणि मोठ्यांच्याही आरोग्याला उपयुक्त आहेत. पण मुंबईसारख्या महानगरात राहूनही राजश्री आजींनी त्यांचा बटवा जपून ठेवलाय. त्यांच्या घरातली, आजूबाजूची आणि नातेवाईक मंडळी सदैव याचा लाभ घेत असतात.

'लहानग्यांच्या खायच्या सवयी आता बदलल्यात', 'लहान मुलं फास्ट फुड खायला मागतात', 'घरचं काही खातच नाही', 'नेमकं काय म्हणून करावं घरगुती जे लहान मुलांना खायला देता येईल', 'असे नेमके कुठले पदार्थ आहेत जे पौष्टिक आहेत' अशा अनेक प्रश्नांची उत्तर या बटव्यात दडलीयंत.

काही किरकोळ आजारांबद्दल घरगुती उपाय करण्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘आजूबाजूच्या वातावरणामुळे आपल्याला, आपल्या घरातल्या लहान बाळाला सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणं असे आजार होतात. या आजारांची सुरवातीची लक्षणं दिसतातच आपण काही घरगुती उपाय करायला हवेत. आजाराची तीव्रता अधिक असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. पण आजारच प्राथमिक अवस्थेत असेल तर घरगुती प्राथमिक उपचार केव्हाही चांगले.’

आजींनी सांगितलेले काही किरकोळ आजारांवरील उपाय

- सर्दीवर चांगला उपाय म्हणजे काढा करून पिणं. तुळस, बेल, लवंग यांच्या मिश्रणाचा काढा दिवसातून तीनवेळा घेतल्यास सर्दी बरी होऊ शकते.

- खोकल्यावर तुळस गुणकारी आहे. तुळस ही औषधी वनस्पती आहे. कुंडीतही लावता येते. खरंतर प्रत्येक घरात तुळस असावी. ती पर्यावरणपूरक आहे. भरपूर ऑक्सिजन देते.

- सर्दी, खोकला, घशात खवखवणं यावर दूधहळद हा उत्तम उपाय आहे. अनेक वेळा डॉक्टरही गोळ्या औषधांबरोबर दूध हळद घ्यायला सांगतात.

- अनेकदा बाहेरचं अन्न खाल्लं की पोट बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी भाजलेली खसखस आणि जायफळ समप्रमाणात घेऊन, किंचितशी साखर घालून ते तुपासोबत खावं. दिवसातून अर्धा चमचा तीनवेळा घेतलं तरी बरं वाटू लागतं.

- अनेकांना अपचनाचा त्रास होतो. करपट ढेकरा येतात. बदलत्या आहार शैलीचा हा परिणाम आहे. अद्रक आणि लिंबाचा रस यावर उपयुक्त ठरतो. असा रस आपण घरी तयारही करून ठेऊ शकतो. दोनेक महिने या रसाला काहीही होत नाही.

- बाळाला, घरातल्या कुणालाही ताप आल्यावर बऱ्याचदा आपण घाबरून जातो. ताप जास्त असेल तर जरूर डॉक्टरांकडे जावं. थोडा असेल तर थंड पाण्यात मीठ टाकून त्यात कपडा भिजवून त्याची पट्टी डोक्यावर, पोटावर ठेवावी. ताप कमी होतो.

असे अनेक प्राथमिक उपाय आहेत. अलोपॅथीच्या औषध गोळ्यांसारखा याचा लवकर परिणाम दिसून येत नाही. पण हळूहळू, कुठल्याही साईड इफेक्टविना आपण बरे होऊ शकतो. आजीबाईंचा हा बटवा अनेकार्थाने गुणकारी आहे. आजार झाल्यावर तर याचा उपयोग होतोच. पण आजार होऊच नयेत म्हणूनही फायद्याचा आहे.

वेळेवर जेवणाचा आग्रह करणं, जेवणात अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं, आहाराबरोबर फिरण्याचा-व्यायामाचा आग्रह करणं, हवामानानुसार वेगवेगळे पदार्थ बनवणं, स्वच्छतेच्या सवयी लावणं अशा अनेक गोष्टींचा आजी आग्रह करते.

लहानग्यांचं घरात आगमन होणार असेल तर आजीबाईला किती मोठा आनंद होतो. बाळाच्या आईला हवं ते खाऊ घालणं, तिला चौरस आहार देणं, पौष्टिक आहार बनवून देणं, तिचं वेळेवर लसीकरण करून आणणं अशा अनेक गोष्टी आजी आवर्जून करते. 

लहान बाळाच्या काळजीबद्दल, त्याच्या पोषणाबद्दल जोशी आजी म्हणाल्या, ‘नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या वाढीसाठी अत्यंत चांगला पदार्थ म्हणजे त्याच्या आईचं दूध. ते त्याच्या सर्वांगाचा विकासासाठी महत्त्वाचं आहे. या काळात आईच्या खाण्यावर आपण घरी खूप लक्ष द्यायला हवं. तिला आपण चौरस आहार दिला. तिच्या खाण्यात फळं, पालेभाज्या, डाळी यांचं प्रमाण नीट असेल तर त्याचा फायदा तिचं दूध पिण्याऱ्या बाळाला होतो. बाळ एक वर्षांचं किंवा वयाने वाढू लागतं तेव्हा त्याला मऊ भात, शिरा, वरणभात असे पदार्थ देता येऊ शकतात. बाळाला थोडं थोडं चार-पाच वेळा खायला द्यावं. लहान मुल खातचं नाहीत असं नाही. आपण त्याला द्यायला कमी पडतो.’

एखाद्या बाळाचं वजन उंचीच्या मानानं, वयाच्या मानानं कमी असतं. त्यावेळी आपण त्याला कुपोषित बालक म्हणतो. अशी मुलं सधन घरातही दिसतात. बऱ्याचदा तेच तेच खायला देऊन आयांना आणि खाऊन खाऊन बाळांना कंटाळा येतो. पण पोषक आहार तर द्यावाच लागतो. अशा वेळी काय करायचं, असं विचारल्यावर त्यांनी पोषणाविषयी बटव्यातली उपयुक्त माहिती दिली.

‘आपण कुपोषित बाळांना वेगवेगळ्या पद्धतीचं सत्व देऊ शकतो. गव्हाचं, तांदळाचं, नाचणीचं, ज्वारीचं सत्व बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यापैकी रोज वेगवेगळं सत्व आपण देऊ शकतो. हे घरी पण तयार करता येतं. पिठ उकडवायचं. त्यात मीठ, जिरे टाकायचे. त्याची पेस्ट बाळाला खायला द्यायची. रोज अर्धी वाटी सत्व दिलं, तर बाळ कुपोषित होणारच नाही. थंडीच्या दिवसात नाचणीचं सत्व देऊ नये. कारण नाचणी ही थंड असते. कधी कधी टोमॅटोचं सूपपण दिलेलं चांगलं. घरी बनवायला ते सोपंपण आहे,’ असं त्या म्हणाल्या.

बाळ जेव्हा वाढीस लागतं तेव्हा त्याच्या खाण्यापिण्याकडं जाणूनबूजून लक्ष द्यायला हवं. फास्टफूड चवीला छान लागतं. जीभेला त्याची चटक लागते. मग मुलं पोळीभाजीकडं दुर्लक्ष करतात. अशा वेळी आजीबाईंच्या बटव्यात अनेक प्रकारचे लाडू सापडतात. गुळ शेंगादाण्याचे, रव्याबेसनाचे, अगदी गव्हाच्या पिठाचे सुद्धा.

तहानलाडू, भूकलाडू हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. गुळशेंगदाण्याचे हे लाडू. सदैव घरी असावेत. आयर्न वाढीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत. जोशी आजी असे कितीतरी पदार्थ सांगतात जे आपण मुलांना करून देऊ शकतो. घावण, धिरडी, तांदळाच्या पिठाची उकड, घाऱ्या, शिरा, तिखटमिठाची पुरी हे घरच्या घरी बनवायला सोपे पदार्थ आहेत. त्यांनी स्वत: त्यांच्या नातीला लहानपणापासून पोळी भाजी, आमटीभात खायची सवय लावली. आज ती कॉलेजाला जाते. पण आजीच्या हातचा डबा घेऊनच जाते. अशी घरगुती पदार्थ खायची सवय लहानपणी मुद्दामहून लावावी लागते.

युनिसेफच्या आरोग्य विषयाच्या राज्य सल्लागार राझी म्हणाल्या, ‘आता बाळाच्या पोषणासाठी आजीबाईच्या बटव्याकडे आपल्याला मुद्दामहून वळावं लागणार आहे. आपल्या घरात अनेक गोष्टी अशा असतात त्यांचा उपायोग करून आईबाबा मुलांना कुपोषणापासून वाचवू शकतात. फास्टफूड ही जिभेची चटक आहे. आपल्या घरी अनेक चविष्ट पण आरोग्यदायी पदार्थ बनवून आपण लहानग्यांना फास्टफुडच्या चक्रातून बाहेर काढू शकतो. खेळणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या मुलांना भूक लागते तेव्हा अचानक काही बनवायला वेळ लागतो. पण आजीच्या बटव्यातले लाडू किंवा इतर पदार्थ त्याची भूकपण भागवतात. त्याच्या शरीराला आवश्यक असलेल्या आयर्न प्रोटीनची गरजपण भागवतात. आहाराबद्दल घरच्या घरी आजी आपल्याला अनेक गोष्टी सांगते, त्या आवर्जून कराव्यात.’

आज आरोग्याचे छोटे छोटे वाटणारे प्रश्न उद्या केव्हा मोठं रूप घेतील हे सांगता येत नाही. आहार विहाराच्या सवयी बदलत चालल्या आहेत. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. धावपळीच्या काळात हा आरोग्यदायी बटवा म्हणजे जणू सखा सोबतीच.

 

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)