जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटाताईची गोष्ट

२१ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे.

युरोप खंडातल्या पूर्वेकडचा स्वीडन देश. या देशातल्या एका चिमुरडीला जे लहान वयात कळलं ते आपल्या प्रत्येकाला समजलं तर? जगावरचं संकटच संपेल. पण जगावर असं कोणतं संकट आलंय? पर्यावरण आणीबाणी. आपण विकासाच्या नावाखाली जे काही करतोय ना त्याने आपण आपल्यालाच मारतोय.

ग्रेटाने जागतिक चळवळ उभारली

पर्यावरणाचं महत्त्व ग्रेटा थुनबर्गला १५ व्या वर्षी समजलं. ती २०१८ पासून दर शुक्रवारी शाळा बुडवायची. आणि संसदेसमोर जगात 'पर्यावरणीय आणीबाणी' घोषित करा असा फलक घेऊन बसायची. नंतर लोकही तिच्याबरोबर बसू लागले. हळहळू तिला जगातून पाठिंबा मिळू लागला. इंग्लंडने तर 'पर्यावरणीय आणीबाणी' घोषितसुद्धा केली. तिच्या या आंदोलनाला २० सप्टेंबरला १ वर्ष पूर्ण होतंय. आजच जगभरातली तब्बल ५० लाख मुलं या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली. आणि याचं नेतृत्त्व ग्रेटानं केलं.

ग्रेटा ८ वर्षांची असताना पहिल्यांदा क्लायमेट चेंज वर ऐकलं. मग तिने त्याबद्दल जास्तीत जास्त वाचलं, अभ्यास केला. माणसाच्या आघातामुळे दररोज किमान २०० वनस्पती आणि कीटकांच्या प्रजाती नामशेष होतायत. आणि हे असंच चालत राहिलं, तर मानवजात लवकरच नष्ट होईल. म्हणून तिने ही मोहिम सुरू केली जी आज जागतिक चळवळ बनलीय. याच ग्रेटाला लिहिलेलं हे पत्र.

हेही वाचा: जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?

प्रिय ग्रेटा,

तू एक चक्क वेडी मुलगी आहेस. निवांत मित्र मैत्रिणी, गेम्स, भटकंती, वस्तूंसाठी हट्ट करायचं सोडलंस. आणि तू शाळेत पाहिलेल्या 'हवामान बदल'संबंधीच्या सिनेमामुळे अस्वस्थ काय होतेस, त्याविषयी अधिक वाचू काय लागतेस? हा प्रश्न खूप बिकट आहे. तरी यावर मोठी माणसं भाषणंच करतायत. पुरेशी प्रत्यक्ष कृती करत नाहीयत हे समल्यावर डिप्रेशनमधे जातेस.

त्या डिप्रेशनमधून बाहेर पडताना ‘माणूसच टिकणार नसेल तर शाळेत तरी कशाला जाऊ?’ असा प्रश्न घेऊन शाळेला चक्क संप पुकारते. 'पर्यावरणीय आणीबाणी घोषित करा' असा फलक घेऊन पार्लमेंटच्यासमोर ठिय्या देऊन बसतेस. अनेक महिने एकटीच बसून राहिलीस. याला वेड नाही तर काय म्हणणार?

पण खरं सांगू, जग बदलणारी माणसं अशीच वेडी असतात. स्वत:ला उलगडलेल्या सत्यासाठी आग्रही असतात. त्यांना अशीच आणखी वेडी माणसं जोडली जातात. आणि तो माणसांचा महासागर बदलाची लाट बनतो. तसंच काहीसं आता घडू पाहतंय.

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

मी अशा पिढीची आहे ज्यांनी निसर्गाचं सुंदर रूप प्रत्यक्ष अनुभवलंय. ज्यांचं लहानपण निसर्गाच्या सानिध्यात गेलंय. सोबतच आम्ही तंत्रज्ञानाची फळंही चाखली. पण त्याच्या परिणामामुळे अनेक नद्या, जंगलं, टेकड्या डोळ्यासमोर मरताना आमच्या पिढीने लहानपणीच पाहिलं. शहरांतून विस्थापित होत जाणारा निसर्ग पाहिला. आधी वाहत्या नदीचं कॅनालचं पाणी आम्ही पित होतो. आणि आता प्यायचंही पाणी विकत घेऊ लागलो.

हे बदल इतक्या वेगाने होत गेले की ते थांबवता येईल असं आम्हाला वाटेचना. कारण हे घडवणारी माणसं खूप ताकदवान होती किंवा आहेत. त्यांच्याकडे महासत्तांच्या चाव्या आहेत, पैसा, संसाधन, न्यायव्यवस्था, माध्यमं आणि सर्वात महत्वाचं जनसमुहांच्या आकांक्षा. ते मानवी विकासासाठी हा सगळा निसर्गाचा डोलारा कोसळवत आहेत.

जेव्हा केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर महासत्ता कोण हे ठरतं, तेव्हा माझ्यासारख्या 'विकसनशील' देशात 'तंत्रज्ञान विकासापेक्षा पर्यावरणाला प्राधान्य द्या!' ही मागणीही भाबडेपणाची वाटते. जंगलांवर आधारित जनसमूह आपल्या जंगलांचं रक्षण करतात तेव्हा 'नक्षली' ठरवले जातात. त्यांच्या हत्या होतात. जल-जंगल-जमीन जपण्यासाठी लढणाऱ्यांना 'विकासविरोधी' लेबल लावलं जातं. 'पर्यावरणवादी' ही एक शिवी बनते.

तू सांगत असलेले प्रश्न आम्हा सर्वांना आकडेवारीसकट तोंडपाठ आहेत. पण आम्ही अशा काही चक्रव्युहात अडकून जातो की विकासाला धक्का न लावता पर्यावरणाचं जतन करावं? मग आम्ही 'शाश्वत विकास' वगैरे गोड शब्द वापरू लागतो. निसर्गाला विकासाच्या मखरात बसवून सर्कस करतो.

पण तू आणि तुझे करोडो मित्र बेधडक सांगता ‘हा फाल्तूपणा खूप झाला. यांनी काही कोणाचं भलं होत नाही. तुम्ही आम्हाला 'सुरक्षित पृथ्वी' देणं लागता ते द्या.’ मानलं.

हो. आम्ही तुम्हाला देणं लागतो. केवळ पृथ्वी आहे त्या स्थितीत देणं नाही. तर आमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी या जीवसृष्टीच्या  नाशाला सुरवात केली रोकून. मरणासन्न अवस्थेत गेलेले जलस्त्रोत, परिसंस्था जागृत करून. विनाश झालेल्या ठिकाणी निसर्गाला अंगीभूत सृजनाची संधी देऊन. आम्ही बालपणी अनुभवलेली सुंदर पृथ्वी आम्ही तुम्हाला आणि  पुढच्या पिढ्यांना देणं लागतो. त्यासाठी आपण सर्वांनी काम करायला हवं.

हेही वाचा: `आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय

विकासाच्या, महासत्तेच्या व्याख्या बदलायला हव्यात. वैयक्तिक पातळीवरून जागतिक, राजकीय धोरणांच्या पातळीवर बदल घडवायला हवेत. ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ या न्यायाने निसर्ग राखणाऱ्यांना संसाधनांवर अधिकार मिळवून द्यावे लागतील. निसर्ग राखणाऱ्यांचे आवाज बुलंद करावे लागतील. खूप खूप काम करायचंय. आपण सारे मिळून करूया. तुझ्या या थेट भूमिकेमुळे आम्हाला खरंच खूप बळ मिळालंय.

तुझी गोष्ट माझ्या चार वर्षाच्या मुलाला रोज एकदा तरी सांगावीच लागते. कारण त्याची ती सर्वात आवडती 'ग्रेटा ताईची गोष्ट' आहे.

नेहमी गोष्ट संपताना तो विचारतो- ‘मग त्या मोठ्या माणसांनी धूर करायचा आणि झाडं कापायची आणि जंगलं जाळायची आणि नदी खराब करायची थांबवली का?’

मी म्हणते. ‘नाही अजून. पण ते होईपर्यंत ग्रेटाताई लढत राहणार आहे. सगळी लाखो मुलं लढत राहणार आहेत आणि मी पण.’

मग तो मोठ्या उत्साहात म्हणतो, ‘मी पण.’

हेही वाचा: 

दिल क्यों पुकारे आरे आरे?

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?

पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ

(लेखिका ओजस सुनिती विनय यांच्या फेसबूक पोस्टवरच्या पत्राचा संपादित अंश.)