लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी.
२४ मार्चला संध्याकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आणि किराणा मालाच्या दुकानासमोर हीss मोठी गर्दी झाली. २१ दिवस सगळा देश बंद राहणार म्हणजे किराणा मालाची दुकानंही बंद राहणार. त्यामुळे घरात पुरेसं अन्न, भाजीपाला, धान्य, साखर मीठ, चहा पावडर वगैरे सगळं आपण आत्ताच विकत आणून ठेवलं म्हणजे कसली चिंता नाही, असं लोकांच्या मनात असावं. पण लोक एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊननंच लोकांना गर्दी करायला भाग पाडलं. कोरोनाचा धोका वाढवणारी ही घटना होती.
लोकांचा गोंधळ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू राहतील, असं ट्विट करून दिलासा दिला. त्यामुळे किराणा माल, भाजीपाला वगैरे खरेदी करता येणं आपल्याला शक्य झालं. पण खरंतर, या किराणा मालाच्या दुकानात वस्तूंसोबत कोरोना वायरसही फ्री मिळण्याची शक्यता आहे बरं का!
हेही वाचा : सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!
मध्यंतरी, किराणा मालाची दुकानं २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे आता अशा दुकानातली किंवा भाजीपाल्याच्या मार्केटमधली गर्दी जरा कमी झाली. तरीही रोज किमान शंभर लोक तरी तिथं येतातच. त्यातले सगळेच तिथल्या वस्तूंना हात लावतात.
आपण सुपरमार्केटमधे जात असू तरी तिथल्या शॉपिंग कार्ट आपल्या आधी हजारो लोकांनी वापरलेल्या असतात. आपल्यासारखंच कित्तीतरी लोकांनी जाम, सॉस वगैरे गोष्टींच्या बाटल्यांना हात लावून त्यावरच्या किमती, एक्सपायरी डेट वगैरे बघत असतील. खरंतर, बाहेर जाऊन भाजीपाला आणि किराणा माल विकत घेण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीचा वापर करून सगळं सामान घरीच मागवणं हा जास्त सुरक्षित मार्ग असू शकतो.
पण अनेकांना हे शक्य होत नाही. शिवाय, ऑनलाईन किंवा फोन करून सामान मागवल्यावर घरी पोचायला दोन दिवस लागतील असंही सांगितलं जातं. सध्या तर मुंबईसारख्या शहरात ऑनलाईन ऑर्डर्स घेणारी अनेक शॉपिंग अॅप्स तात्पुरती बंद आहे. तिथं दुसऱ्या शहरांची, गावांची बातच गेवळी. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडून सामान आणणं गरजेचं बनलंय. अशावेळी वस्तू विकत घेताना थोडी काळजी घ्यायलाच हवी.
अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्यायची याबद्दल अनेकांना माहीत नसतं. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेन्शन म्हणजे सीडीसी आणि इतर आरोग्य तज्ञांसोबत बोलून टाईम मासिकानं एक सविस्तर स्टोरी पब्लिश केलीय. या स्टोरीत आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात.
हेही वाचा : कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
आपल्या आजूबाजूचे अनेकजण आपण मास्क वापराला, हॅण्डग्लोव वापरले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, अशा थाटात वावरत आहेत. अनेक दुकानदारही या दोन गोष्टी घालूनच सामानाचं वाटप करत असतात. या दोन्ही गोष्टी घालण्याची खरंतर काहीच गरज नाहीय, असं सीडीसीतल्या एका अधिकाऱ्याने या ‘टाईम’शी बोलताना सांगितलंय. ‘हे केल्यानं आपण सुरक्षित आहोत, अशा गैरसमजूतीत लोकांनी राहू नये,’ असा सल्लाही त्यांनी दिलाय.
‘आत्तापर्यंत अन्नपदार्थ किंवा त्यांच्या पॅकेट्सच्या माध्यमातून कोरोना वायरसची लागण झाल्याचा एकही पुरावा आलेला नाही,’ असंही टाईमला या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. पण तरीही हे अन्नपदार्थ हातळण्याआधी आणि नंतरही आपण आपले हात साबणाने धुतले पाहिजेत, अन्न पदार्थ घरी आणल्यावर पिशवीतून बाहेर काढल्यावरही आपण आपले हात धुतले पाहिजेत, असा सल्ला सीडीसीकडून देण्यात आलाय.
एखाद्या किराणा मालाच्या दुकानात आपण गेलो तरी कोरोनाची लागण होण्याचा धोका हा तिथल्या वस्तूंपासून नाही तर तिथं जमलेल्या माणसांपासून सर्वाधिक असतो, असं हॉपकिन्स मेडिकल स्कूलमधल्या प्राध्यापिका डॉक्टर लॉरेन सेऊर ‘टाईम’शी बोलताना सांगतात.
हेही वाचा : कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?
किराणा मालाच्या किंवा भाजीपाल्याच्या दुकानात गेलो तर दोन गोष्टींपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. एकतर, तिथल्या वस्तू आणि तिथं जमलेली माणसं. पण वस्तूंपेक्षा माणसांमुळे कोरोनाचं संक्रमण सहज होतं असं सीडीसीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गेलात इतर माणसांपासून कमीतकमी ६ फुटांचं अंतर ठेवणं गरजेचंय, असं सीडीसीचे अधिकारी सांगतात.
प्रत्येकवेळी हे फिजिकल डिस्टंन्सिंग पाळलं जात नाही. आपण पाळलं तरी इतर लोक पाळत नाहीत. पण आपल्या फिजिकल डिस्टन्सिंगची जबाबदारी आपणच घ्यायला शिकलं पाहिजे, असं डॉक्टर लॉरेन सेऊर म्हणतात. दुकानात गेल्यावर अनेकदा गर्दी असते. अशावेळी ६ फुटाचं अंतर ठेवणं शक्य होत नाही. त्यामुळे गर्दी कमी होईपर्यंत थांबणं किंवा अशी दुकानं टाळून दुसरीकडे जाणं असे काही उपाय करायला हवेत, असंही त्या म्हणाल्यात.
बाहेर कुठलंही सामान आणायला जाताना दोन किंवा तीन घरातल्यांनी मिळून एकालाच कुणाला तरी पाठवावं. सारखं सारखं बाहेर जाण्यापेक्षा एकाच फेरीत सगळं सामान घेऊन यावं अशा अनेक सूचना आपल्याला सध्या वॉट्सअपवरून मिळत आहेत. डॉक्टर सेऊरही हेच सांगतायत. विशेषतः बाहेर जाताना लहान मुलांना अजिबात सोबत घेऊन जाऊ नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे, आजारी नसलेल्या माणसानेच घराबाहेर पडा असंही त्यांचं सांगणं आहे.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही
लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
माणसांबरोबच दुकानातल्या वस्तूंपासूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कोरोनाचा संसर्ग झालेलं कुणाच्याही खोकण्या किंवा शिंकण्यामुळे दुकानातल्या वस्तूंवर, तिथल्या टेबलवर किंवा वस्तूंच्या कपाटावर कोरोना वायरस असण्याची शक्यता असते. त्याला आपण हात लावला आणि तोच हात न धुता डोळ्यांना किंवा नाकाला लागला तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते, असं बोस्टन युनिवर्सिटीतल्या सार्वजनिक आरोग्य विभागातले प्राध्यापक डॉक्टर क्रिस्टोफर गिल यांनी सांगितलंय.
किराणा मालाच्या दुकानात कुठेही हात लावण्याआधी निर्जंतुक औषधांच्या कापडानं ती जागा पुसून घ्यायला पाहिजे, असंही डॉक्टर गिल सांगतात. ‘दुकानात वायरस असेलच असं काही नाही. पण सुरक्षेखातर वायरस तिथे असू शकतो असं आपण गृहीत धरलं पाहिजे. त्यामुळे कमीतकमी गोष्टींना स्पर्श करणं आणि घरी जाऊन हात धुवत नाही तोपर्यंत आपलं तोंड, नाक आणि डोळे यांना हात लावणं टाळणं या दोन गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. शिवाय, आपल्याजवळच्या एखाद्या पिशवीत उघड्या भाज्या, फळं ठेवावी,’ असा सल्ला गिल देतात.
शिवाय, घराबाहेर जाताना फोन घेऊन जाणं टाळावं असंही वारंवार सांगितलं जातं. फोनऐवजी वस्तूंची यादी कागदावर लिहावी. वापर झाल्यावर ती यादी फेकून दिली तरी चालते. त्यामुळे वायरसशी त्याचा संपर्क झाला असेल तरी आपल्याला फारशी चिंता करायची गरज राहत नाही. शिवाय, दुकानातून बाहेर पडल्या पडल्या सॅनिटायझर हातांना लावलं तर गाडीला, गाडीच्या चावीला सुरक्षितपणे हात लावू शकू.
हेही वाचा : युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
कोरोना वायरसचा हा काळ म्हणजे कॅशलेस राहण्याचा सगळ्यात बेस्ट काळ आहे, असंही म्हणता येईल. कारण, पैशांच्या देवाणघेवाणीतूनही वायरसचं संक्रमण होऊ शकतं. त्यातही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा गोष्टींचा वापर करण्याऐवजी घरी जाऊन किंवा सॅनिटायझर वापरून आपल्या फोनमधल्या अॅपमधून पैसे पे करणं जास्त सुरक्षित असेल.
अशा प्रकारे थोडी काळजी घेऊन आपण सुरक्षित रहायला हवं. पण यातलं काहीही शक्य नसेल तरी घाबरून जायचं कारण नाही. बाहेरून घरात आणलेली प्रत्येक गोष्ट धुवून किंवा पुसून वापरायची आणि बाहेरून घरी आल्यावर हात धुतल्याशिवाय इतर कुठंही हात लावायचा नाही, एवढे दोन साधे नियम आपण पाळले तरी किराणा दुकानात होणारं कोरोना वायरसचं होलसेल संक्रमण आपण बऱ्यापैकी थांबवू शकू.
हेही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?