गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं.

 

आज गुढीपाडव्याला नेमकं कोणतं नवीन वर्षं सुरू झालं?

आपण सध्या वापरतो ते इसवी सनाच्या कॅलेंडरची सुरवात जानेवारी महिन्याच्या एक तारखेपासून होते. हे कॅलेंडर आपण इंग्रजांनी दिलंय. त्याआधी आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक नावाचं कॅलेंडर सर्रास वापरायचो. त्याचा पहिला महिना चैत्र असतो. महाराष्ट्रात त्याचा पहिला दिवस शुद्ध प्रतिपदा असतो, म्हणजे अमावस्येनंतरचा पहिला दिवस.

शालिवाहन शक आताच्या कॅलेंडरनंतर ७८ वर्षांनी सुरू झालंय. आता २०१९ सुरू आहे. म्हणजेच आज गुढीपाडव्याला शालिवाहन शकाचं २०१९ - ७८ = १९४१ इतकं वर्षं सुरू झालंय.

या दिवशी श्रीराम रावणाला मारून अयोध्येला पोचले, म्हणून तिथल्या लोकांनी गुढ्या उभारून स्वागत केलं. तेव्हापासून गुढी पाडवा सुरू झाला का?

रामायण आणि त्यातून उभं राहिलेलं प्रभू रामचंद्राचं अलौकिक चरित्र याचा प्रभाव संपूर्ण भारतावर आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला आपण रामायणाशी जोडतो.

पण रामाने रावणाला मारलं ते दसऱ्याला. अगदी चालत जरी निघालो तरी श्रीलंका ते अयोध्येला पोचायला इतके महिने लागणार नाहीत. आणि राम तर रावणाला मारल्यानंतर लगेचच पुष्पक विमानाने सहकुटुंब अयोध्येला गेले होते. त्यामुळे त्याचा काही संबंध नसावा. गुढीपाडवा तर महाराष्ट्रात साजरा होतो, अयोध्येत आज कुणीच गुढी उभारत नाही. पूर्वी तिथे कुणी उभारत असल्याचा दाखला नाही.

आता शोधलं तर आढळतं की अयोध्येत या दिवशी देवीची नवरात्र उत्साहात सुरू होते. देवीभागवत नावाच्या पुराणात सुदर्शन राजाची फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती अयोध्या आणि वाराणसी इथे घडते. या कथेत देवी तिचं नऊ दिवसांचं व्रत करण्याचा आदेश देते. तो आदेश तिथे आजही पाळला जातो.

रामाने याच दिवशी वालीला मारल्याचंही सांगतात. आपलं संरक्षण करणाऱ्याला आजही आपण वाली म्हणतो. त्यामुळे वालीला मारल्याचा उत्सव लोकांत रूढ होईल अशा पद्धतीने साजरा केला जात असेल, हेही पटायला अवघड आहे.

 

मग गुढीपाडव्याच्या आणखी कोणत्या कथा आहेत?

एक कथा नारदाची आहे. त्याला ६० मुलगे झाले. त्या प्रत्येकाच्या जन्माचा आनंद त्याने सगळ्या देवांसह साजरा केला. आपली ६० संवत्सरं मानली जातात. त्यातून प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला उत्सव साजरा केला जातो. ही गोष्ट अगदीच बिनबुडाची आहे.

दुसरी कथा महाभारतातली आहे. वसू राजाच्या तपाने इंद्र प्रसन्न होऊन बांबूची काठी दिली. वर्ष संपताना ती त्याने जमिनीत रोवली. वर्षाच्या पहिल्या दिवशी फुलं, दागिने लावून सजवली. शंकराची पूजा केली. या कथेत गुढीपाडव्याची मुळं शोधता येतात. पण ही कथा आपल्याला कुणी सांगत नाही.

 

शालिवाहन राजाने मातीचे सैनिक बनवून शत्रूला हरवल्याचीही कथा आहे ना?

ही पुराणातली अतिशयोक्ती असलेली कथा असली तरी इतिहासात त्याचा अर्थ सापडतो. शालिवाहन हा शब्द प्राकृत सालाहन या शब्दावरून आलाय. सालाहन हे सातवाहन राजांचं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि शेजारच्या परिसरावर ४५० वर्षं राज्य केलं. महाराष्ट्राला ओळख मिळवून दिली.

त्यांच्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने इसवी सनाच्या ७८व्या वर्षी नहपान या शक सरदाराला हरवून महाराष्ट्राला पुन्हा स्वतंत्र केलं. त्यासाठी त्याने पुतळ्यासारख्या निस्तेज झालेल्या लोकांत स्वाभिमान भरून स्वातंत्र्यासाठी लढायला शिकवलं, असा या कथेचा अर्थ शोधता येईल. गौतमीपुत्राच्या नहपानावरच्या विजयाच्या निमित्ताने शालिवाहन शक सुरू झाला. तो आपला स्वातंत्र्योत्सव आजही आपण साजरा करतो. म्हणूनच सातवाहनांचं राज्य असलेल्या प्रदेशातच नवं वर्ष साजरं होतं.

हेही वाचाः युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

या दिवशी झाडांना नवी पालवी फुटते का?

गुढीपाडव्यावर काही तरुणांची चर्चा दाखवलेला एक वीडियो सध्या वायरल झालाय. तो हिंदूजागृती या वेबसाईटने बनवलाय. मान्यवरांचे खून आणि काही ठिकाणच्या बॉम्बस्फोटांसाठी ज्यांच्यावर वारंवार आरोप झालेत अशा सनातन संस्थेची ही वेबसाईट आहे. यात असा दावा केलाय की या दिवशी झाडांना नवी पालवी फुटते. अर्थातच या दाव्याला काहीच अर्थ नाही.

आपला प्रत्येक सण निसर्गाशी संबंधित आहेच. गुढीपाडव्याच्या काळात झाडांना नवी पालवी फुटते. पण त्यासाठी झाडं गुढीपाडव्याचा मुहूर्त पाहण्याची वाट बघत राहत नाहीत. आजकाल तर सगळं निसर्गचक्रच बिघडून गेलंय.

त्यामुळे निसर्गात जाऊन चैत्र महिन्याच्या आसपास वसंताच्या जादूचा आनंद लुटणं हा गुढीपाडवा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरावा.

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

पण हे तर हिंदू नववर्ष असल्याचं सांगतात?

गुढीपाडवा हा हिंदूंचा उत्सव आहे, हे तर उघडच आहे. पण हा कालगणनेशी संबंधित दिवस आहे. आता जसा थर्टी फर्स्ट किंवा न्यू इयर कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाहीत. तसाच हा नव्या वर्षाचा सण शालिवाहन शक वापरात असेल, तेव्हा सगळ्याच धर्माचे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साजरे करत असतील.

पण हा आज महाराष्ट्र, गोवा, तेलंगाणा तसंच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा उत्तर भाग, मणिपूर अशा प्रदेशातच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षं असतं. बाकी सगळ्या देशात नवीन वर्षाचे दिवस वेगळे आहेत. गुजरात्यांचं नवं वर्षं दिवाळीत येतं तर पंजाब्यांचं बैसाखीला. आता ते हिंदू नाहीत का?

पण त्याऐवजी सगळ्याच हिंदूंचं एकच नवीन वर्षं असावं, असा काही हिंदुत्ववाद्यांचा आग्रह आहे. कारण त्यांना वाटतं हिंदू धर्मातल्या विविधतेमुळे हिंदू विभागलेला राहतो. त्यामुळे ते त्यांना आपल्या एकाच साच्यात घुसवण्याचा प्रयत्न करतात. हिंदू नववर्षंही असंच एक थोतांड आहे. असं सगळ्याच हिंदूंचं एकच नवीन वर्षं असू शकत नाही. हे हिंदू नववर्षाचं फॅड पंचवीसेक वर्षांपेक्षा जुनं नाही.

कारण विविधता हीच हिंदू धर्माची ताकद आहे. त्यातून आलेल्या लवचिकतेच्या आणि सहिष्णुतेच्या शेकडो वर्षं दुसऱ्या धर्माच्या राजांची सत्ता असतानाही हा धर्म टिकून राहिला. आता तर हिंदू धर्माला कोणतीच आडकाठी नाही. तो जगभर पसरतोय. जगाला आकर्षून घेतोय. जवळच्या इतिहासात कधीच नव्हता, इतका हिंदू धर्म आज सुरक्षित आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या नावाने त्यात हिंदू नववर्षासारख्या नको त्या गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न हिंदू धर्माच्या मूळ धारणांच्या विरोधीच आहे.

हेही वाचाः गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली होती?

कर्नाटक आणि विशेषतः आंध्र तेलंगणात गुढीपाडव्याला नवीन वर्षं साजरा होतं. हा परिसर सातवाहनांच्या प्रभावात असल्याने इथेही वर्षानुवर्षं शालिवाहन शक चाललं. त्यामुळे तिथे नवं वर्षं स्वाभाविकच आहे. या नववर्षाच्या सणाचं नाव उगादी असं आहे. हो शब्द युगादि म्हणजे युगाचा आरंभ अशा अर्थाचा आहे. ते रबरासारखं ताणून त्याला पुराणातल्या युगाच्या गणिताशी जोडण्यात आलं. तसे व्हॉटसअप मॅसेजही आपण वाचतो.

पुराणात सत्ययुग ते कलियुग अशा युगांचं, त्यापुढे मन्वंतरांचं लांबलचक गणित आहे. त्याला आधार काय, तर काहीच नाही. ही पुराणं बिनबुडाची असल्याचं स्वामी दयानंद सरस्वती ते प्रबोधनकार ठाकरे या हिंदुत्ववाद्यांच्या आदर्शांनीच ठासून सांगितलंय. आता त्या पुराणांतल्या गणितावर विश्वास ठेवून युगाब्द नावाची इतिहासात कधीच नसलेली कालगणना मांडायची आणि त्याचा गुढीपाडव्याशी नसलेला संबंध जोडायचा म्हणजे अतीच झालं.

आणि जगाची निर्मिती कुणी केली, कशी केली, कधी केली हे पुराणांत बघून ठरवायचं असेल तर डार्विनपासून स्टीफन हॉकिंग्जपर्यंत शेकडो वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास निरर्थकच मानावा लागेल.

हेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने खून केला, त्याचा गुढी उभारण्याशी काही संबंध आहे का?

औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना अत्याचार करून मारलं. तो दिवस ११ मार्च १६८९ असा होता. तिथीनुसार तो दिवस फाल्गुन वद्य अमावस्येचा होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुढीपाडवा होती. त्यामुळे त्याचा गुढीपाडव्याशी संबंध लावून संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राह्मणांनी महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरू केला, असा दावा काही आधुनिक इतिहास संशोधकांनी केला.

त्याचा सोशल मीडियावरून प्रसार झाला. त्यामुळे अनेकांनी गुढी उभारणं सोडलं. त्याऐवजी ते भगवा झेंडा लावू लागले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कुणी शंभूराजांच्या हौतात्म्याची आठवण दरवर्षी काढणार असेल, तर चांगलंच आहे. भगवा झेंडा हा भगवान बुद्धांपासून वारकरी परंपरेपर्यंत महाराष्ट्राचा अभिमान राहिलेला आहे. तो फडकवणं केव्हाही चांगलंच. तरीही यात एक मोठीच गडबड आहे.

ब्राह्मणांच्या सांस्कृतिक वर्चस्वाचा विरोध करण्यासाठी वर्षानुवर्षं इथल्या परंपरेने लादलेले सण उत्सव नाकारण्याचा बंडखोर विचार महाराष्ट्रात अनेकांनी मांडला. संभाजी महाराजांच्या मृत्यूशी गुढीपाडव्याला जोडणं, हा त्याचाच एक भाग आहे. पण त्याला ऐतिहासिक आधार नाही. शिवाय त्यामागचा एका समूहाचा द्वेष हा समाजाची एकंदर हानी करणाराच आहे.

हेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव

संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीही महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा असल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यात लिंगायत, महानुभाव आणि वारकरी संतांच्या साहित्यातलेही दाखले आहेत. गुढीपाडव्याचा इतिहास तर त्यापेक्षाही जुना आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जोडणं इतिहासाला धरून नाही.

 

त्यामुळे कुणी जातीच्या आधारावर आपली चळवळ वाढवण्यासाठी गुढीपाडवा नाकारत असेल आणि कुणी धर्माच्या आधारावर आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष ठरवत असेल, तर आता त्या दोघांनाही नाकारण्याची ही वेळ आहे. आपले सण, उत्सव, परंपरा, संस्कृती ही कुणाला स्वार्थासाठी वापरायला देणार असू, तर आपण आपल्याच हातांनी स्वतःलाच बेड्या ठोकल्यासारखं होईल. त्यामुळे आपल्या परंपरांकडे डोळसपणे बघायला लागणं, हाच आपला नव्या वर्षाचा संकल्प असायला हवा.  

हेही वाचाः 

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत