गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय.

गुढीपाडवा म्हटल्यावर आपल्याला डोळ्यासमोर घरासमोर उभी असलेली गुढी आणि किचनमधली श्रीखंडपुरी आठवते. पण आता त्याच्याही आधी आपल्या डोळ्यासमोर गुढीपाडव्याच्या शोभायात्रा येऊ लागल्या आहेत. आजही गुढीपाडव्याचं प्रतीक म्हणजे गुढीच आहे. पण हळूहळू त्याची जागा नथ आणि नऊवारी लेवून सजलेल्या बाईकस्वार महिला घेत आहेत. कारण गुढीपाडवा आता मराठी नववर्ष म्हणून साजरा होत नसून हिंदू नववर्ष म्हणून साजरा होऊ लागलाय.

विविधता ही हिंदूंची ताकद, एकसाचीपणा नाही

हिंदू नववर्ष ही संकल्पना तशी एकदम नवी आहे. पहिली शोभायात्रा डोंबिवलीत सुरू झाली. त्यानंतर गिरगावात त्याचं लोण आलं. त्याला फार तर पंचवीस वर्षं झाली असतील. बाबरी मशीद पाडण्याच्या आधी देशभर एक सांस्कृतिक उन्माद साजरा करण्यात आला होता. त्यात हिंदुत्वाच्या नावाने अनेक नव्याजुन्या संकल्पना नव्याने ‘कलम’ करण्यात आल्या. हिंदू नववर्ष त्यातलीच एक.

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. कारण हिंदू म्हटल्यावर असं काही एक एका साच्यातलं काहीच नाही ठरवता येत. इथे एक भाषा नाही, एक देव नाही, एक धर्मग्रंथ नाही आणि खरं तर एक धर्मही नाही. त्यामुळे एक पंचांग आणि एक नवं वर्ष असण्याची दूरदूरवर शक्यताही नाही. त्यामुळे सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. पण इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांपासून घाबरलेल्या हिंदुत्ववाद्यांनी इथे प्रत्येक गोष्ट एकसाची करण्याचा प्रयत्न केला. त्यात हे हिंदूंचं तथाकथित नवं वर्षंही होतं.

सातवाहनांना सलाम करण्यासाठी गुढीपाडवा हवाच

हिंदू नववर्षावर आक्षेप आहे म्हणजे गुढीपाडव्याला नाकारणं बिल्कूल नाही. गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा, पण तो फक्त गुढीपाडवा म्हणून. गुढीपाडवा आपल्याला शालिवाहन शकाची आठवण करून देतं. परकीय शकांची सत्ता उलथवून लावत महाराष्ट्रात राहणाऱ्या सातवाहनांनी स्वराज्य उभं केलं, त्यांना कसं विसरायचं? पुराणांमधला अर्थ शोधला तर ज्यांनी पुतळ्यांसारख्या बनलेल्या माणसांमधे प्राण फुंकले. शांत बसलेल्यांना देशासाठी लढायला शिकवलं. त्या सातवाहनांना कसं विसरायचं? 

पण आज आपल्याला सातवाहनांचा इतिहासही नीट ठाऊक नाही. हा खरा मराठी वारसा समजून घेण्यासाठी संशोधन करण्याची आपली तयारीही नाही. आज मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणारे भरपूर आहेत. पण कुणीच कधी देशभर पसरलेलं साम्राज्य उभं केलेल्या या मराठी राजांची आठवण का काढत नाही?  त्यांनी उभारलेली लेणी, गुंफा आज अत्यंत दूरावस्थेत आहेत. तरीही आम्ही स्कूटरवर मिरवून फक्त मिरवणुका काढण्यात धन्यता मानतो.

हेही वाचाः गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

गुढीपाडवा हा आपला मराठी नववर्षदिन. एकाच दखनी सांस्कृतिकतेचा भाग असणाऱ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि नव्या तेलंगाणा या राज्यांमधेच गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष साजरं होतं. कारण या भागावरच सातवाहनांचा प्रभाव होता. आंध्रात आणि कर्नाटकच्या काही भागांत त्याला उगादी म्हणतात. गुढी हा शब्दच मुळात कानडी आहे. देशभर बाकी कुठेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षं साजरं होत नाही. 

फक्त एक मणिपूर त्याला अपवाद आहे. सिंधी लोक चेटीचांद म्हणून हा दिवस साजरा होतो. महान सिंधी संत झुलेलाल म्हणजेच मस्त कलंदर यांचा जन्मदिवस या दिवशी आला म्हणून या दिवसाचं महत्त्व वाढलं. नाहीतर त्यांनीही उत्तरेतल्या परंपरेनुसार बैसाखीला नवीन वर्षं साजरं केलं असतं. थपना, चैत्ती अशा या दिवसाच्या नवीन वर्षाचे संदर्भ पुस्तकांत सापडतात. पण प्रत्यक्षात ते साजरे होताना आढळत नाहीत. 

प्रत्येकाची आहेत वेगवेगळी कॅलेंडर

सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं, की नर्मदेच्या उत्तरेला विक्रम संवत मानलं जातं तर दक्षिणेला शालिवाहन शक. काहीजण ही सीमा तापी नदी सांगतात. पण हे विभाजन तितकंसं खरं नाही. दक्षिणेत तमिळींचं स्वतःचं वेगळं कॅलेंडर आहे. ते जगभर आपलंच कॅलेंडर घेऊन जातात. मल्याळींचंही स्वतःचं कोल्लावर्षम नावाची कालगणना आहे. त्यात आणि आपल्या शालिवाहन शकात जवळपास ४५ वर्षांचं अंतर आहे. शककर्ते शिवरायांनी त्यांच्या राज्यभिषेकानंतर शिवशकाची घोषणा केली. 

तिथे उत्तरेतही विक्रम संवत वापरलं जातं, असं आपण सर्रास म्हणतो. आजच्या मध्यप्रदेशातल्या माळव्याचा राजा विक्रमादित्याच्या नावाने सुरु झालेली ही कालगणना देशात सर्वात जास्त वापरली जाते. बंगाल्यांचं स्वतःचं वेगळं कॅलेंडर आहे. राजा भास्करवर्मनाची आठवण म्हणून ओरिसा, त्रिपुरा, बंगाल आणि बांगलादेशात हे वर्षं वापरलं जातं. 

हेही वाचाः युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

शिवाय गौतम बुद्धांच्या निर्माणानंतर सुरू झालेलं बुद्धनिर्वाण पंचांगही आहे. पारशांचं वेगळी कालगणना तर आहेच. मुस्लिमांची वेगवेगळी पंचांगं तर शेकडो वर्षं सगळ्या भारताने सरकारी कॅलेंडर म्हणून वापरलीत. एवढंच कशाला स्वतंत्र भारताचं एक सरकारी कॅलेंडरही आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक मेघनाद साहा यांनी हे राष्ट्रीय पंचांग तयार केलंय. पण ते कागदावरच राहिलंय. आकाशवाणीवर आजही तारीख सांगताना या कॅलेंडरचा उपयोग केला जातो. त्याचं नवं वर्षं २१ मार्चला सुरू होतं. 

शिखांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्यासाठी नानकशाही कॅलेंडर सुरू केलंय. ते तर आता १९९८ साली सुरू झालंय आणि जगभरातल्या ९० टक्के गुरुद्वारांनी ते स्वीकारलंयदेखील. इस्कॉनने देखील चैतन्य महाप्रभूंच्या नावाने गौराब्द नावाची कालगणना सुरू केलीय. आणि याशिवाय या सगळ्यांना पुरून उरलेलं ख्रिस्ताब्द, म्हणजे आपण नेहमी वापरतो, ते जानेवारीपासून सुरू होणारं कॅलेंडर तर आहेच आहे.

कालगणना वेगळ्या, आणि नवीन वर्षंही

आता एवढ्या कालगणना असल्या अनेकांची नवीन वर्षं सारखी आहेत. तर अनेक ठिकाणी एकच कालगणना वापरत असूनही वेगवेगळ्या प्रांतानुसार नवं वर्षं वेगवेगळ्या दिवशी येतं. उदाहरणार्थ विक्रम संवत. वैशाखाच्या पहिल्या दिवसाला म्हणजे बैसाखीला विक्रम संवताचं नवं वर्षं सर्वसाधारणपणे सुरू होतं. पंजाब, काश्मीर, राजस्थानसह जवळपास सर्व उत्तर भारत या दिवशी नववर्ष साजरा करतं. 

हेही वाचाः गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

त्यातल्या काही ठिकाणी या दिवसापासून चक्क चैत्र सुरू होतो. म्हणजे त्यांच्या आणि आपल्या मराठी चैत्रात पंधरा दिवसांचा फरक असतो. आता हेच विक्रम संवत मानणाऱ्या गुजरातेत मात्र कार्तिक महिन्यात म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला साल मुबारक होतं. दुसरीकडे विक्रम संवतापेक्षा वेगळी कालगणना असूनही बंगाल, आसाम, ओरिसा, तामिळनाडू, केरळ इथलं नवं वर्ष बैसाखीच्याच दिवशी येतं. म्हणजे खरं तर कुणाला बहुसंख्य हिंदूंचं नववर्ष शोधायचं झालं तर बैसाखी शोधावी लागेल. गुढीपाडवा नाही.

१ जानेवारीचा द्वेष कशासाठी?

नवीन वर्षं म्हटल्यावर आपल्याला आठवते ती एक जानेवारीच. कारण ही आपण रोज वापरत असलेली ही कालगणना आहे. परंपरावादी जसे दावे करतात, तशी ही भारतीय कालगणनेइतकी परफेक्ट वगैरे नसेलही. पण ती खूपच सोपी आहे. जगभरातल्या विविध कालगणनांमधलं चांगलं स्वीकारत ही मोकळीढाकळी कालगणना आकाराला आलीय. म्हणूनच स्वीकारली गेलीय. 

पण ही कालगणना येशू ख्रिस्तांशी जोडलेली आहे. त्यांचं नवं वर्षं येशूंच्या जन्मदिनाशी म्हणजे नाताळाच्या सेलिब्रेशनशी जोडलेलं आहे. एक जानेवारीला नवं वर्षं साजरं करणाऱ्यांपैकी कुणाच्याही डोक्यात नसतं. पण अशा प्रत्येक सेलिब्रेशनला भारतीय संस्कृतीवरचं आक्रमण समजणाऱ्यांना ते खटकतं.

हेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव

त्यांना वाटतं अशा कथित आक्रमणांनी भारतीय संस्कृती संपेल. पण प्राचीन भारतीय संस्कृतीने जगभरातले असे कित्येक सोहळे आपले बनवले आहेत. आता त्यापैकी कित्येकांचं मुळं आज कुणाला माहीतही नाहीत. भारतीय संस्कृतीनुसार चालायचं तर न्यू इयरचा विरोध करण्याऐवजी त्याला आपलं वळण देऊन कधीच आपलंसं करून टाकायला हवं. 

प्राचीन भारतीयांचा स्वतःवर विश्वास होता. जगातलं जे काही चांगलं आहे ते स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. म्हणून ते हे करू शकले. आता स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणा-या भेदरटांना ते कसं शक्य आहे? त्यामुळे ते एक जानेवारीला स्वीकारू शकलेले नाहीत आणि गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष बनवण्याचा त्यांचा खटाटोपही यशस्वी झालेला नाही. शोभायात्रांमधे फिरणारे तरुण थर्टी फर्स्ट अधिक उत्साहाने साजरा करत आहेत, हे वास्तव कुणालाच नाकारता येणारं नाही.

युगाब्दाचा नवा लोच्या

एक जानेवारीच्या न्यू इयरला घाबरलेल्यांनी त्याला उत्तर देण्यासाठी युगाब्द शोधून काढलाय. आंध्रप्रदेशात गुढीपाडव्याला उगादी म्हणतात. तो शब्द युगादी म्हणजे युगाची सुरवात यावरून आलाय. ते सूत पकडून लोकांनी युगाब्दाचा स्वर्ग गाठलाय. गुढीपाडव्याला थेट सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुगाच्या गणिताशी जोडलंय. या दिवसापासून म्हणे कलियुग सुरू झालं. महाभारतातल्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक गुढीपाडव्याला झाला त्या दिवसापासून आता म्हणजे ५११९ वर्षांपासून ही कालगणना सुरू झाल्याचं सांगितलं जातं. 

पुराणात शोधायला गेल्यास याचं किचकट गणित शोधता येईलही. पण हे गणित शोधलेल्याला शंभरच्या वर वर्षं निश्चितच झालेली नाहीत. कारण त्यापूर्वी पुराण अभ्यासण्यासाठी नाही, तर पूजण्यासाठी आणि मनोरंजनासाठी वापरली जायची. पुराणांचा अभ्यासच मुळात शंभर वर्षांपेक्षा जुनी नाहीय. आणि ही कालगणना वापरात तर नक्कीच नव्हती. संवत किंवा शकच आपण सर्रास वापरत होतो आणि आहोत.

आपण एखादा धार्मिक विधी करत असतो. त्यात संकल्प घेताना वेळ तारीख सांगावी लागते. त्यात कलियुगाचा संदर्भ येतो पण तो बुद्धावतारे वगैरे सांगतो तसाच. कालगणना म्हणून संवत आणि शकेच येतात. पण गेल्या पंचवीस वर्षात जाणूनबुजून युगाब्द थोपण्यात आलंय. आणि आपणही त्याला डोळे झाकून हिंदू नववर्ष म्हणून स्वीकारू लागलोय.

आता जे आपापल्या परंपरेप्रमाणे गुढीपाडवा सोडून इतर कोणत्याही दिवसांत नवीन वर्षं साजरे करतात ते काय हिंदू नाहीत? मग हिंदूंचा एकच दिवस असायला तरी कशाला हवा?

हेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन