ऐश्वर्या, तू आमच्या स्वप्नांना चेहरा दिलास

०१ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


ऐश्वर्या रायला लोक प्लास्टिकची कचकडी बाहुली म्हणोत. पण आमच्या रोमँटिक भावनांना तिने तिच्या सौंदर्याइतकंच सुंदर आणि लोभस बनवलेलं आहे. हेच आमच्यासाठी सत्य आहे. रखरखीत जगण्यात तिच्याबाबतच्या याच सत्याने अजूनही `महिवरून` जाता येतं.  भले मग ती कितीही वर्षाची होऊ दे आणि आम्ही कितीही म्हातारे होऊदेत. ह्याप्पी बड्डे, ऐश्वर्या!

नववीला असेन त्या वेळची गोष्ट. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर टीनएजच्या वेळची. आमच्या कर्नाटक सीमेवरच्या छोट्याशा गावात तेव्हा टीवी, सिनेमे हे जीवनाचे तसे अविभाज्य घटक वगैरे झाले नव्हते. रोजची वर्तमानपत्रं हेच काय ते ज्ञानार्जन प्लस मनोरंजनाचं मुख्य साधन.

त्यावेळी ऐश्वर्या राय या मंगळुरूमधल्या एका विशीतील मुलीला विश्वसुंदरीचा किताब मिळाल्याची बातमी वाचली. तशी फारशी गरज नसताना देशाभिमान जागृत झाल्याचं अंधुकसं आठवतंय. आपल्या देशातील एक तरुणी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे वगैरे काहीतरी त्यात असावं. खरंतर तारुण्यसुलभ भावनांनी काहीतरी नाजूक धडधड झाली होती, हे मात्र ठसठशीत आठवतंय. 

ती बातमी आणि त्यातला तिचा तो फोटो पाहून त्यापूर्वी कधीही न बघितलेली ऐश्वर्या रोज स्वप्नात येणाऱ्या त्या मुलीसारखी वाटायला लागली होती. रोज आपल्याला स्वप्नांत कोणीतरी सुंदर मुलगी दिसते. पण तिचा चेहरा सकाळी जाग आल्यावर आठवत नाही. ती मुलगी म्हणजे ऐश्वर्या तर नाही ना? असं वाटू लागलं. त्या मुलीचा चेहरा शोधू बघणाऱ्या आम्हाला, त्या आमच्या स्वप्नसुंदरीला ऐश्वर्याने पहिल्यांदा चेहरा दिला. 

तोवर जगात विश्वसुंदरी वगैरे काही भानगडी असतात हे मुळात आमच्या गावीही नव्हतं. पुढे ऐश्वर्या केवळ स्वप्नांचाच नाही, तर तारुण्यसुलभ प्रेम भावनेचा एक चेहरा होत गेली. तोवर मधुबाला, माधुरी, दिव्या भारती इत्यादी नट्या वेगवेगळ्या वयोगटातील रसिकांसाठी सौंदर्याचे मापदंड होत्या. पण त्या सर्वार्थाने नट्या वाटायच्या. म्हणजे नटायच्या म्हणून सुंदर वाटायच्या. ऐश्वर्याचं तसं नव्हतं. तिच्या सौंदर्याचा स्वतःचा ब्रँड निर्माण झाला. त्याला बुद्धिमत्तेची जोड होतीच. 

बहुतांश भारतीयांना ऐश्वर्यापूर्वीच्या विश्वसुंदरी माहीत नव्हत्या किंवा त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आजही विश्वसुंदरी स्पर्धा होत असतात, मीडिया-सोशल मीडिया- इंटरनेट यामुळे जग ग्लोबल विलेज पेक्षाही 'बटाट्याची चाळ' बनलेलं असतानाही ऐश्वर्याच्या वेळी जे वातावरण तयार झालं होतं तसं आता होत नाही. विश्वसुंदरीबाबत जी क्रेझ निर्माण झाली, ती आता होताना दिसत नाही. आमच्या ऐशची बातच न्यारी होती हो.

तिची क्रेझ वेगळीच होती. त्या काळी शाळेत, कॉलेजात कोणी मुलगी उगाच तोरा दाखवू लागली की  `स्वतःला काय ऐश्वर्या समजते का?' प्रश्नाने तिचा उपमर्द व्हायचा. ते करताना नकळत ऐश्वर्याच्या सौंदर्यावर शिक्कामोर्तब होत होतं. पुढे तिच्या जाहिराती यायला लागल्या. तिच्यावर लेख येऊ लागले. अगदी कोण्यातरी बुद्रुक गावच्या हौशी संपादकाने काढलेल्या दिवाळी अंकापासून ते अगदी दर्जेदार दिवाळी अंकापर्यंत सगळ्या कवरांवर ऐश्वर्या होती.

ती दीड दोन वर्ष पूर्णपणे ऐश्वर्यामय होती. तिच्याबद्दलचे लेख, तिच्या मुलाखती यातून तिच्याविषयी बरीचशी माहिती मिळवू लागलो. शाळेत अगदी हुशार असणारी ही मुलगी अगदी आरस्पानी सौंदर्य घेऊन आली होती. तिचे डोळे. अहाहा, काय सांगू महाराजा. डोळे भरून बघावे असे डोळे. त्या निळ्या डोळ्यांच्या डोहात बुडून जायला व्हायचं.

मग तिचा सिनेमा आला. 'इरुवर' की काहीतरी नावाचा तामीळ सिनेमा होता. पुढे हिंदी सिनेमा आले. त्यावेळच्या प्रस्थापित माधुरी, श्रीदेवी वगैरेंच्या भक्तांनी टीका सुरू केली, 'ही तर प्लॅस्टिकची बाहुली', 'अभिनय कशाशी खातात हे तरी कळतंय का हिला?' पण तिने या सगळ्यांना पुरून उरून स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. ती उत्कृष्ट अभिनेत्री होती, असं बिलकुल नाही. तिचा डान्स अफलातून होता, असंही नाही. पण ब्रँड ऐश्वर्या हेच तिचं भांडवल होतं आणि ते पुरेसं होतं.

'ताल' मधला तिचा अभिनय सुरेख होता. 'हम दिल दे चुके सनम' मधे तिने तिच्या सोबतच्या दोन्ही सुपरस्टार्सना झाकोळून टाकलं होतं. पुढे अनेक सिनेमे आले. काही फ्लॉप ठरले काही हिट झाले. पण ऐश्वर्याची क्रेझ तशीच होती. 'कजरारे'ने ते सिद्ध केलं.

ऐश्वर्या त्या वेळची सर्वात सुंदर स्त्री होती का? अर्थातच होती. पण सोबत अतिशय हुशार आणि अगदी प्रोफेशनल अप्रोच असणारी एक वेगळ्या अर्थाने उद्योजिका होती. आम्ही ग्लोबलायझेशन आधीच्याच जगात घुटमळत होतो. तिने मात्र ग्लोबलायझेशनच्या नव्या युगातले कॉर्पोरेटी करियरिस्ट मंत्र आत्मसात केले होते. तिने तिचा स्वतःचा ब्रँड तयार केला. तो सतत चर्चेत राहील, हे बघितलं. मोठाल्या बॅनर्सचे सिनेमे पटकावले. अगदी लग्नानंतर सिनेमे जवळपास बंद केले असले, तरी ऐश्वर्या हे नाव सतत चर्चेत राहतं, हे त्या ब्रँडचं अफलातून यश आहे. 

सलमान सोबतच्या नात्याच्या बाबतीत तिने दाखवलेला संयम कौतुकास्पद होता. 'हम दिल दे चुके सनम' मधली त्यांची केमिस्ट्री बघून लोकांना वाटायला लागलं होतं की ती खरंच सलमानच्या प्रेमात आकंठ बुडालीय. ते जर खरं असेल तर मग सलमानसारख्या विक्षिप्त माणसासोबत प्रेम होणं. पुढे ब्रेकअप होताना स्वतःला सावरणं. त्याचा आपल्या करियरवर परिणाम होऊ न देणं. त्यातून बाहेर पडणं. हे सगळं घडताना त्याची कुठेच वाच्यता न करणं. हे सगळं ऐश्वर्याने व्यवस्थित हाताळलं असंच म्हणावं लागेल.

त्या तथाकथित नात्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला, अगदी सलमानने तिला मारहाण केल्याच्या बातम्यादेखील आल्या. पण तिने कधीच त्यावर अवाक्षर काढलं नाही. पुढे विवेक ओबेरॉयसोबत नाव जोडलं गेलं तेव्हाही तिने त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. आपला ऐश्वर्या ब्रँड सतत टॉप वर कसा राहील याकडे लक्ष देत राहिली.

आयुष्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली. तेव्हाही तिने अतिशय शांतपणे आणि ठामपणे अगदी योग्य निर्णय घेतला. तिने नवरा नाही, घराणं निवडलं. मोठी स्पर्धा असताना बच्चन घराण्याची सून होणं, हे खायचं काम नव्हतं. पण तिने ते अतिशय शांतपणे आणि कुठेही तोंडाची वाफ न दवडता केलं. आमच्या आजीच्या भाषेत सांगायचं तर 'नटमोगऱ्या नट्या' आणि ऐश्वर्या यांच्यात असणारा ठळक फरक अधोरेखित करणारी ही सगळ्यात मोठी घटना होती. वर्षभर संसार न टिकणाऱ्या बॉलिवूडमधे आज अभिषेक आणि ऐश्वर्या हे एक आदर्श जोडपं मानलं जातं. यातही तिचा वाटा मोठा आहे. 

पुढे लग्नानंतर करियरला बाजूला ठेऊन सून, बायको आणि एका मुलीची आई या सगळ्या भूमिका तिने अतिशय जबाबदारीने पार पाडल्या. अगदी आपल्या भारतीय सो कॉल्ड आदर्श बाईसारख्या. या सगळ्यात तिचं सौंदर्य तीळभर देखील कमी झालं नाही. उलट वय वाढत गेलं आणि तिचं सौंदर्य मुरत केलं. लोणचं म्हणा किंवा मुरांबा म्हणा, काही म्हणा, पण तिचं सौंदर्य आजदेखील भुरळ पाडतं.

'कान्स' हे अजून एक प्रकरण ऐश्वर्यामुळेच बहुतांश भारतीयांना कळलं. 'कान्स' म्हटलं की ऐश्वर्या, हेच डोळ्यांसमोर येतं. त्यातले तिचे झगे आणि मेकअप हल्ली टिंगलीचे विषय होतात. तरीही तिच्या सौंदर्याला आजही तोड नाही. ते सौंदर्य रासवट नाही की मादक नाही. पण तिच्या डोळ्यांत, तिच्या सुंदर चेहऱ्यात काहीतरी गूढ आहे. जे सतत तिच्याकडे ओढून नेतं. चेहऱ्यावर सहसा मंद हसू ठेऊन ती बोलते. तेव्हा बघत राहावंसं वाटतं. 

आजही गुगलवर, सोशल मीडियावर तिचा फोटो दिसला की क्षणभर रेंगाळायला होतं. तिच्या डोळ्यांत गेल्या २०-२५ वर्षांचा आपला सगळा चित्रपट दिसू लागतो. फ्लॅशबॅकमधून बाहेर यायला थोडा उशीर होतो. `ती आपल्यापेक्षा वयाने ५-६ वर्षांनी मोठी का आहे?`  हा प्रश्न 'ती आपल्यापेक्षा खरचं ६-७ वर्षांनी मोठी आहे का?` या प्रश्नामधे रूपांतरित होतो. क्षणभर तिच्या त्या डोळ्यांच्या निळ्याशार डोहामध्ये झोकून देऊन टीनएजमधल्या आपल्या या स्वप्नसुंदरीला डोळ्याआड करताना अजूनही रुखरुख लागून राहते.

पुलंच्या नाथा कामतच्या भाषेत सांगायचं तर टीनएजमधे तिला पाहून एकदम `महिवरून` जात होतो. त्या स्वप्नवत दिवसांपासून आजच्या वास्तवातल्या आणि वपुच्या कथेप्रमाणे बायकोला 'तूच माझी ऐश्वर्या' म्हणण्यापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात आजही ऐश्वर्या तिचं स्थान अबाधित ठेऊन आहे.

लोक म्हणोत तिला प्लास्टिकची कचकडी बाहुली. पण आमच्या मोहक आणि रोमँटिक भावनांना ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याइतकंच सुंदर आणि लोभस बनवलेलं आहे. हेच आमच्यासाठी सत्य आहे. हल्लीच्या रखरखीत जगण्यात तिच्याबाबतच्या याच सत्याने अजूनही `महिवरून` जाता येतं.  भले मग ती कितीही वर्षाची होऊ दे आणि आम्ही कितीही म्हातारे होऊदेत. 

स्त्रियांना, त्यातही सुंदर स्त्रियांना वय विचारू नये म्हणतात. हे झालं साधारण मत. पण ऐश्वर्याच्या बाबतीत आमचं जरा वेगळं मत आहे. म्हणजे तिचं वय माहीत असूनही आम्ही ते कोणालाही सांगायला धजावत नाही. खरंतर तिचं वय सांगायला आवडत नाही. दरवर्षी न चुकता चार गुलाबजामून खाऊन आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो. आजही तेच करू.

ऐश्वर्या, वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा गं पोरी. दरवर्षी अशीच तरुण होत जा. जसजसे आम्ही म्हातारे होत जाऊ तसतसे तुझ्या सौंदर्याच्या मुरांब्याने ते आमचं म्हातारपण अधिकाधिक सुंदर आणि गोड करत जा.

तुझ्या निस्सीम चाहत्याकडून तुला पुन्हा एकदा 'ह्याप्पी बड्डे!'