वाराणसी भेटीतला हर हर मोदीचा जोर

०५ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ९ मिनिटं


संविधानावरच्या एका प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लेखक सुरेश सावंत वाराणसीमधे गेले होते. सुभाष वारे, नागेश जाधव आणि निलेश खानविलकर असे काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वाराणसी शहर फिरले. ते फिरत असताना त्यांना आलेले अनुभव, तिथल्या माणसांशी झालेली चर्चा, निरीक्षणं याच्या त्यांनी नोंदी केल्यात. त्या सगळ्या भटकंतीचा हा कॅनव्हास.

मागच्या महिन्यात आम्ही आठवडाभर वाराणसीत होतो. देशपातळीवरच्या एका प्रशिक्षण शिबिरात संविधानाच्या वेगवेगळ्या पैलूंवर बोलण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. गंगेच्या काठावर अतिशय रम्य आणि शांत अशा जे कृष्णमूर्ती फाऊंडेशनमधे आमचा रहायची आणि प्रशिक्षण व्यवस्था होती. हा भाग राजघाटाचा. तिथून पुढे रांगेत वेगवेगळे घाट आहेत. दिवसभर सत्रं असायची. पण सकाळी आणि संध्याकाळनंतर रात्री उशीरापर्यंत आम्ही फिरु शकत होतो.

देवदिवाळी हा इथला मोठा उत्सव. देशभरच्या भाविकांची मोठी गर्दी असते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. गंगेच्या काठावर त्यांनी लावलेल्या पणत्यांची दुसरी गंगा वाहत असते. तिथली आरास, आतषबाजी डोळे दीपवून टाकते. हा सगळा भव्य, विलोभनीय देखावा आम्हाला बोटीतून हिंडत पाहता आला. त्यानंतर एके दिवशी अस्सी घाटावरची गंगा आरती, अंत्यविधी होणारा मणिकर्णिका घाट तसंच इतर घाट, काशी विश्वनाथ मंदिर, पूर्ण होत आलेला कॉरिडॉर, त्यात घेरलेली मशीद, घाटाकडे जाणाऱ्या तसंच बनारसच्या इतर भागातल्या गल्ल्या पाहिल्या.

अशाच एका गल्लीतली संत कबीर यांची मूळ गादी म्हणजे घर, बुद्धाचं पहिलं प्रवचन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन जिथं झालं ते बनारसपासून जवळच असलेलं सारनाथ, तिथला सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप, विहारांचे अवशेष, भारताने राजमुद्रा म्हणून स्वीकारलेला चार सिंह असलेला प्रसिद्ध अशोक स्तंभ असं बरंच काही पाहता आलं. बनारसची कचोरी, वेगवेगळ्या मिठाया, दूध यांचा आस्वाद घेता आला.

कोणत्या परिसरात, वातावरणात आम्ही लोकांशी बोलत होतो, त्याचा हा कॅनवास. तो अर्थातच मर्यादित आहे. जे बोललो, निरीक्षणं केली, अंदाज बांधले त्यावरून सरसकट काही ठरवणं योग्य होणार नाही, हे उघडच आहे. पण पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेलं, प्राचीन आणि आजही महत्वाचं असलेलं उत्तर प्रदेशातलं हे शहर काय विचार करतंय, या संदर्भाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचाः भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!

रिक्षावाल्याशी झालेला संवाद

कोरोनाने थैमान घातलेला, सामान्य तसंच पद्मश्री-पद्मभूषण मिळालेली माणसं त्यात गमावलेला हा भाग आता बिनमास्कचा आहे. आपण मास्क लावला तर लोक काय म्हणतील असं इथल्या लोकांना वाटतं. ४० वर्षांपूर्वी बिहारमधून इथं आलेल्या एका रापलेल्या चेहऱ्याच्या, बहुतेक दलित किंवा अतिमागास वर्गातल्या रिक्षावाल्याशी झालेला हा संवाद:

‘कोरोनामुळे तुमची कमाई कमी झाली असेल ना?’
‘हो साहेब. त्यावेळी बराच त्रास झाला. पण आता ठीक चाललंय.’
‘नोटबंदीमुळंही बराच त्रास झाला असेल?’
‘हो. झाला जरासा. पण लपवलेला पैसा बाहेर काढला मोदीजींनी. किती काळा पैसा होता. सगळा बाहेर आला.’
‘तरीही महागाई किती वाढलीय..’
‘ती तर वाढणारच ना! एवढं सगळं मोदी करतायत लोकांसाठी. कुठून आणणार पैसे? काय चांगलं करायचं म्हणलं तर खर्च हा आलाच. महागाई तर वाढणारच.’
‘काय केलं मोदीजींनी?’
‘हे बघितलं नाही का तुम्ही? हे नवीन रस्ते मोदी आल्यानंतर झालेत. घाट, मंदिरांची डागडुजी त्यांनीच केलीय. या जागेवर आधी कधीच इतकी स्वच्छता नव्हती.’

रिक्षावाल्याची अशीही खंत

पुढचा संवादही एका दुसऱ्या रिक्षावाल्याशीच झाला. पण हा शिबिरार्थींच्या व्यवस्थेत होता. मनात सद्भावना असलेला, संवेदनशील रिक्षावाला. त्याला हे प्रशिक्षणाचं काम भावलं होतं. ही मंडळी खूप चांगलं काम करतात. त्याला मदत म्हणून नेहमीच्या दरांपेक्षा कमी दरात आणि बोलावू तेव्हा तो येत असे. तो ओबीसी किंवा मध्यम जातीतला असावा. मूळचा बनारसचा. पण जमीनजुमला नाही. रिक्षा हेच त्याच्या उत्पन्नाचं साधन होतं. महागाई, नोटबंदी, कोरोना, रस्ते यावरची त्याची मतं आधीच्या रिक्षावाल्यासारखीच. काहीही फरक नाही. दोघं एकमेकांशी ठरवून बोलल्यासारखे. त्यामुळे संवादातले वेगळे मुद्दे इथं पाहू.

‘काल काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर बघितला आम्ही. आजच्या घडीला एवढा खर्च करायची काय गरज होती?’
‘इथली आधीची परिस्थिती माहित नाही तुम्हाला. सगळा गचाळ कारभार. ही जागा फक्त बनारसवाल्यांचीच नाहीय. देशातल्या तमाम हिंदूंचा अभिमान आहे ही जागा. आजपर्यंत कुठल्या सरकारने केलं नाही, ते मोदींनी करून दाखवलं. ‘त्यांच्या’साठी बरेच देश आहेत, आमच्यासाठी तर हा एकच आहे.’
‘भैय्या, तुमच्या शेजारचे मुसलमान इथंच जन्माला आले, इथंच मरतील’ कोण जाणारेय दुसऱ्या देशात. आपल्या सगळ्यांचा आहे हा देश’
‘बरोबरच आहे तुमचं.’
मग मी काशी विश्वनाथ मंदिराजवळच्या मशिदीचा विषय काढला.
‘आम्ही काल बघितलं तर ती मशीद पूर्ण घेरलीय आता. अजूनही हाच वाद चालूय?’
‘हे बघा. तुमच्या घरात घुसून कुणी तुमची भिंत तोडली तर काय कराल?’
औरंगजेबाने मंदिर तोडून तिथे मशीद बांधली हा आक्षेप.
‘इतिहासात खरं-खोटं जे काय घडलं, त्यावरून आज का भांडायचं? आणि आता तर १५ ऑगस्ट १९४७ला अश्या वादग्रस्त इमारती ज्या स्थितीत होत्या, त्याचं स्थितीत ठेवायचा आदेशही आलाय.’
‘ते तर आहेच. पण लोकांच्या मनात हे राहणारच की!’
मी दुसरा मुद्दा काढला.
‘सध्या लव जिहाद, गोहत्येवरून मुसलमानांना मारहाण केली जाते, त्याचं काय?’
तो थोडा थांबला. म्हणाला, ‘हे बरोबर नाहीय. पण दोन्ही बाजूंची कारणं असतात.’
यावर त्याला अजून बोलायचं नव्हतं. आमचा रिक्षाचा प्रवास सुरु होता. थोड्या वेळानं तो म्हणाला,
‘गांधीजींचं एक चुकलंच.’ माझी उत्सुकता ताणली. विचारलं, ‘काय?’
तो उत्तरला, ‘फाळणी झाली तेव्हा ‘त्या’ लोकांना पाकिस्तानात पाठवायला पाहिजे होतं. भांडणाचं कारण राहिलंच नसतं.’

हे ऐकून मी सर्द झालो. हा माणूस काही कडव्या, अंगावर येऊन बोलणाऱ्या ‘भक्तगणा’तला नव्हता. त्याचा हिंदूंवरही राग होता. वेगळ्या कारणासाठी. पण संदर्भ तसाच. तो म्हणाला, ‘एकगठ्ठा पडतात ‘त्यांची’ मतं. आमची वाटली जातात.’ ‘त्यांची’ म्हणजे मुसलमानांची. त्यानं एकदाही थेट मुसलमान असा उल्लेख केला नाही. हा सर्वसामान्य हिंदू त्याची व्यथा, खंत मोकळेपणाने मांडत होता.

बऱ्याच लोकांशी बोललो, त्यातले हे दोन प्रातिनिधिक. एकच माणूस मोदींच्या विरोधात बोलणारा मिळाला. पण तो अखिलेश यादवच्या समाजवादी पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होता. एका यादव नावाच्या तरुणाला त्याचं यादव नाव लक्षात घेऊन समाजवादी पार्टीबद्दल विचारलं तर तो म्हणाला, ‘हा दंगली भडकावणारा पक्ष आहे.’

हेही वाचाः साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?

मोदीप्रेमाचा डंका चोहीकडे

आमच्या शिबिरात शिबिरार्थींच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या अनुभव कथनाचं एक सत्र होतं. हे शिबिरार्थी वाराणसीच्या बाजूच्या चार जिल्ह्यांत चार गट करुन गेले होते. वेगवेगळ्या थरातल्या लोकांना भेटणं, अनौपचारिक गप्पा मारणं, तिथली सामाजिक-राजकीय स्थिती, दृष्टिकोन समजून घेणं हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या कथनात आमच्या या अनुभवाला दुजोराच मिळाला.

लोकांना महागाई, कोरोना, नोटबंदी याचं फार काही वाटत नव्हतं. नोटबंदीचं तर समर्थनच होतं. वरच्या समजल्या जाणाऱ्या जातींचा तर मोदींना पाठिंबा होताच. पण खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींतही मोदींबद्दल आस्था होती. या माणसाला घर-संसार नाही. तो चोरी-लबाडी किंवा भ्रष्टाचार कुणासाठी करणार, हा त्यांचा प्रश्न होता.

योगींपेक्षा मोदींचं पारडं जड

हे सगळं ऐकताना योगी आदित्यनाथनी काय केलं, ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हा मुद्दाच कोणाच्या लेखी नव्हता. उत्तर प्रदेशचे पालक मोदीच आहेत, ही भावना होती. ‘बनारसची माणसं मुंबईला नोकरीसाठी का येतात? इथं उद्योगधंदे मोदींनी का सुरु केले नाही?’ असा एकाला प्रश्न केला तर तो म्हणाला, ‘त्याचं कारण इथले बाहुबली! कंपनी आली तर हे बाहुबली त्यांना त्रास देतात. कशी थांबणार कंपनी इथं?’

म्हणजे दोष मोदींचा नाही. मोदींची इच्छा आहे, प्रयत्न आहेत. पण ते सफल होऊ न देणारे इतर कोणी आहेत. मोदींनी काशी कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. त्यावेळी धर्माबरोबरच ऑप्टिकल फायबरचं जाळं आम्ही कसं विणतोय असा विकासाचा शंखही फुंकला. पण त्याहून वेगळ्या कारणासाठी हे लोक मोदींना मानतात. त्यांना वाटतं हा माणूस आम्हा हिंदूंचा, आमच्या अस्मितेचा राखणदार आहे.

मोदी जे काही करतोय त्यात यश येईल, अपयश येईल; पण तो खराखुरा आमचा माणूस आहे. उद्घाटनावेळी दिवसातून त्याने किती कपडे बदलले, ते किती महागडे होते, ५५ कॅमेरे कशी त्यांची छबी टिपत होते, तिजोरीत खडखडाट होत चाललेला असताना किती कोटी खर्च या कार्यक्रमावर झाला.. ही सगळी टीका ‘आमचा माणूस’, ‘हिंदूंच्या अस्मितेचा रक्षक’ प्रतिमेच्या तुलनेत फिकी पडते.

भांडवल देणारा कॉरिडॉर

गल्ल्यांचं पुरातनत्व, मंदिरांचं प्राचीनत्व कॉरिडॉरच्या बांधकामात चिणलं गेलं हे खरं. पण भरभक्कम नुकसान भरपाई दिली गेली. मोदींच्या जवळच्या भांडवलदारांनी यात मोठी साथ केली, त्यात वावगं काय? या गल्ल्यांतून म्हाताऱ्या माणसांनी, इतर काही कारणांनी ज्यांना चालणं कठीण जातं अशांना घाटावर येणं, गंगेत स्नान करुन मग काशी विश्वनाथाचे दर्शन घेणं आधी खूप अवघड होतं. आता गंगेत स्नान करुन थेट बाबा विश्वनाथाला भेटता येतंय.

ही गोष्ट किती महत्वाची आहे हे ईश्वरपूजेशी, तीर्थस्थळांशी घेणंदेणं नसणाऱ्यांना कळणार नाही. मोदी म्हणतात तसा परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम या कॉरिडॉरमधे आहे. त्यात धंदाही आहे. अर्थात, श्रद्धा आणि धंदा ही जुनीच गोष्ट. मोदींनी त्याला आणखी आधुनिक रूप दिलं. पण लोकांची सोय किती झाली! तीर्थस्थळी येणारे लोक सोयींसाठी खर्च करायला तयार असतात. यातले भिकारी, अतिगरीब वगळू. ते तसेही कमीच असतात.

खर्च करणाऱ्यांना बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी जो वेळ लागायचा, जी गैरसोय सहन करावी लागायची, ती आता नक्कीच कमी होईल. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेलं तीन हजार चौरस फूटांचं मूळ मंदिर आता ५ लाख चौरस फूटाच्या सुसज्ज, भव्य प्रांगणात दिमाखात उभं आहे. हिंदूंवरच्या आक्रमणाचं प्रतीक असलेली औरंगजेबाने बांधलेली मशीद बापुडी होऊन कॉरिडॉरच्या भव्य भिंतींच्या मागे कशीबशी टिकून आहे. हे अहिल्याबाईंनंतर मोदींचंच कर्तृत्व!

हेही वाचाः राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग

गंगा आरतीचा थाटमाट

आम्ही प्रसिद्ध गंगा आरती बघायला अस्सी घाटावर एके संध्याकाळी गेलो. आरतीच्या लांबट आयताकृती मंचावर पूजेच्या वस्तूंची नेटकी मांडणी. आरती करणाऱ्या तरुणांचे आखीव-रेखीव वेश आणि समान हालचाली. एका सुरात शंख फुंकणं. सगळं प्रभावित करणारे. गंगेतून, घाटावरुन सगळ्यांना या हालचाली दिसाव्यात म्हणून आरती करणारा चमू सर्व दिशांनी फिरणे. आरतीला आलेल्यांना खुर्च्या. नंतर प्रसाद, देणग्या, दानधर्म वगैरे. सगळे शिस्तीत. हा रोजचा परिपाठ.

एक शंका होती. हिंदूंच्या आरत्या इतक्या लयबद्ध, एका सुरात सिनेमातच दिसतात किंवा रेकॉर्डवर ऐकू येतात. प्रत्यक्ष होणाऱ्या आरत्या अशा नसतात. पण असेल इथली खास तयारीची परंपरा असं मला वाटलं. आरत्यांचे हे मंच एकाचवेळी चार ठिकाणी होते. मी जिथं होतो, तिथंच मागं एक हनुमानाचं मंदिर होतं. तिथूनही आरतीचा आवाज येत होता. ते चारच लोक होते. देऊळही अगदी लहान होते. दोन्ही आरत्या एकत्र सुरु झाल्या आणि संपल्या. पण त्यांचे मिश्रण रसभंग करत होते.

आमच्यातल्या एकाने आरती संपल्यावर हनुमानाची आरती करणाऱ्यांना विचारलं, ‘हा काय प्रकार आहे?’ त्यावर या हनुमान भक्तांनी गंगा आरतीवाल्यांवर बरंच तोंडसुख घेतलं. त्यांच्या मते गंगा आरती ही जुनी परंपरा. पण अलीकडे मोदींनी जपानी पंतप्रधानांना इथं आणल्यापासून त्याचं व्यावसायिकीकरण सुरु झालंय. त्यांना दाखवण्यासाठी आरतीचे सुबक, सुंदर नाटक रचलं. तेव्हापासून या रोजच्या आरत्यांची संख्या वाढलीय.

गंगा आरतीचा व्यवसाय

याचे कंत्राटदार तरुणांना प्रशिक्षण देऊन हा कार्यक्रम सादर करतात. हे कोणी भक्त नाहीत. तो त्यांचा व्यवसाय झालाय. त्याचा निषेध म्हणून गंगा आरतीच्या वेळी हे हनुमान भक्त आपली आरती करतात. नंतर आम्ही पाहिलं. गंगा आरती करणारी मुलं आरती संपल्यावर एका खोलीत गेली. आपला झकपक पोशाख नाटकातल्या कलाकारांसारखा त्यांनी उतरवला. बाहेर येऊन चहा घेऊन, मुठीत शंकराला वर्ज्य नसणारा पदार्थ चोळत ती निघून गेली. उद्या संध्याकाळी परतण्यासाठी.

नंतर आणखी एक मुद्दा कळला. इथल्या पंड्यांचा दावा आहे की काशीच्या घाटांवर आरती करण्याचा अधिकार केवळ त्यांना आहे. त्यामुळे इतरांना गंगा आरती करायला मनाई करावी म्हणून त्यांनी अशा आरत्यांसमोरच आंदोलनं केली. आता घाटावरच्या आरतीला येणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची संख्या वाढलीय. त्यामुळे आरतीवाल्यांची कमाईही वाढलीय. हे भांडण त्या कमाईसाठी आहे.

प्रशासनानं यावर तोडगा काढलाय. त्यानुसार गंगा आरतीच्या नावाखाली घाटावर होणारं अतिक्रमण आणि मनमानी चालणार नाही. एका घाटावर एकाच व्यक्ती किंवा संस्थेला गंगा आरतीचा एक वर्षाचा परवाना मिळेल. त्यासाठी नावनोंदणी करावी लागेल. पण या सगळ्यामुळे काय फरक पडतो? हे सगळं पडद्यामागे राहतं. लोकांना गंगेच्या विशाल पात्राकाठचा हा सुरेल, झगमगीत परफॉर्मन्स अधिकची आध्यात्मिक किक देत असेल, तर त्याला लोकांनी का म्हणून नावाजू नये?

अखिलेश यादवांचा टोमणा

१३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन झालं. तेव्हा देश गुलामीच्या न्यूनगंडातून बाहेर पडत असल्याची द्वाही नरेंद्र मोदींनी फिरवली. या उद्घाटनाच्या निमित्ताने एक महिनाभर भाजप बनारसमधे कार्यक्रम करणार आहे. त्यावर अखिलेश यादव यांनी टोमणा मारला, ‘शेवट आला की माणसं काशीला येऊन राहतात.’ मला प्रश्न पडला, या विधानाचा लोकांवर काय परिणाम होईल?

लोकांना भेटायचं, बोलायचं, त्यांची मानसिकता समजून घ्यायची हे आमचं ठरलं होतं. आम्ही घाटांवर लोकांशी बोलत, भेटत, हिंडत होतो. आमच्यातल्या एकाला एकजण भेटला. तो इथं कशासाठी आलाय हे विचारलं तर सरळ म्हणाला, ‘मरायला.’ तो आणि त्याची बायको इथं मरायला आले होते. कारण इथं मेल्यावर मोक्ष मिळतो, ही धारणा. बायको मेली. तिला मोक्ष मिळाला. त्याला आठ वर्ष झाली. तेव्हापासून हा माणूस इथंच आपल्या मरणाची म्हणजेच मोक्षाची वाट बघतोय.

इथल्या अंत्यविधीच्या घाटांवर दिवसरात्र चिता धडधडत असतात. ‘मसान’ याच घाटांवर शूट झालाय. इथल्या अंत्यविधी करणाऱ्या डोंब या अस्पृश्य समाजातल्या शिक्षित युवकाचा होणारा कोंडमारा दाखवणारा हा सिनेमा. मणिकर्णिका घाटाची दुरुस्ती पेशव्यांनी केलीय. त्याची नोंद करणारा दगडी फलक तिथे आहे. त्यावर लिहलंय, ‘मणिकर्णिका घाटावर पेटणाऱ्या असंख्य चितांची आग काशीतल्या मृत्यूलाही एक सोहळा बनवते.’

अंत्यविधी करणारे इथले डोंब समाजातले लोक सांगत होते, ‘इथं दिल्ली, मुंबईहून प्रेतं दहनासाठी आणली जातात.’ यामागे मोक्षाची धारणा आहे. तो मुक्तीचा उत्सव आहे. म्हणूनच बहुधा इतर स्मशानात दिसतो तसा शोक इथं दिसत नाही. यामुळेच, अखिलेशच्या टोमण्याचा त्याला अपेक्षित परिणाम होईल याची मला खात्री वाटत नाही. अशी टर उडवणं सर्वसामान्य हिंदूंच्या पचनी पडणं कठीण आहे.

हेही वाचाः मैं भी चौकीदारला विरोधक काऊंटर कसं करणार?

राहुल गांधींची भूमिका

मोदींच्या काशीतल्या भाषणाआधी राहुल गांधींनी जयपूरच्या भाषणात हिंदू आणि हिंदुत्वाचा भेद मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदूपणावर दावा करत मोदींच्या विद्वेषी, खुनशी हिंदुत्वापासून सहिष्णू, समावेशक हिंदूपण वेगळं काढलं. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण आताच्या वातावरणात तो कसरत वाटू शकतो.

स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचं लांगूलचालन आणि दिखाऊ धर्मनिरपेक्षतेचं संगोपन करणाऱ्या नेहरु-गांधी घराण्याच्या सत्तेमुळे इथल्या हिंदूचं स्वत्व हरवलं होतं. तो गुलामीच्या न्यूनगंडात जखडला गेला होता. त्याचं स्वत्व जागवून त्याला गुलामीच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्याची दमदार ऐतिहासिक कामगिरी मोदींनी केली, ही त्यांची प्रतिमा घट्ट होतेय.

अशावेळी मोदींच्या हिंदुत्वापासून वेगळं होऊन राहुल गांधींचं सर्वसमावेशी हिंदूपण स्वीकारायला आजच्या घडीला किती लोक पुढे येतील, ही शंकाच आहे. राहुल गांधींना त्यांचं म्हणणं गंभीरपणे विकसित करावं लागेल. त्यांच्या राजकारणाला आधार देणारा पाया मजबूत करावा लागेल. नाहीतर हे सगळा फक्त प्रासंगिक विचार ठरेल. त्यातून ठोस असं कुठलंही चित्र तयार होणार नाही.

धर्मनिरपेक्ष राजकारणाचा वारसा

गांधींजी सर्वधर्मसमभावी सनातनी हिंदू होते. त्याचवेळी या देशावर बहुसंख्याक धर्मीयांचा नाही, तर देशातल्या सगळ्यांचा समान अधिकार असेल, यावर ते अढळ होते. म्हणूनच तर हे मंजूर नसणाऱ्यांनी त्यांची हत्या केली. मी गाईला पवित्र मानतो, लोकांनी स्वतःला पटून तिची हत्या थांबवायला हवी असं गांधींचं मत होतं. पण ते आज इतरांचे खाद्य असल्याने गोवंश हत्याबंदी कायद्याला त्यांचा पाठिंबा नव्हता.

नेहरु ईश्वरवादी नव्हते. पण त्यांनी भारतीय संस्कृतीचा शोध घेऊन अनेक विविधतांना सामावणाऱ्या समृद्ध भारतीयत्वाची ओळख जनतेत रुजवली. सेक्युलर सरकारशी हे अजिबात विसंवादी नव्हतं. त्यांना कधी सेक्युलरपणाशी तडजोडही करावी लागली नाही. जेव्हा जवळच्या सहकाऱ्यांकडून असे प्रसंग आले, तेव्हा त्यांनी हस्तक्षेपही केला. त्यात अपयश आलं असलं तरी त्यांची भूमिका सुसंगत होती. पक्षातल्या लोकांचे तसंच जनतेचे ते त्याबाबत शिक्षण करत असत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे’ असं घोषित केलं. या भारतीयत्वाच्या ओळखीला धर्म, प्रदेश, जात, भाषेच्या अस्मितांनी छेद जाता कामा नये, असं बजावलं. आपल्या भारतीयत्वाच्या ओळखीला आणि तिच्या व्यवहाराला आधार देणारं, मार्गदर्शन करणारं संविधान रचलं. त्यातून सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची हमी दिली.

गांधी, नेहरु, आंबेडकर यांच्या या भूमिकांनी जी फळी तयार होते, तिच्यावर राहुल गांधींनी भक्कम पाय रोवून आपला विचार विकसित आणि प्रसारित करायला हवा. हे काम लांब पल्ल्याचं आहे. पण तेच करावं लागेल. याला कसलाही शॉर्टकट नाही. सेक्युलर, पुरोगामी म्हणवणाऱ्या शक्तींनी शॉर्टकट वापरत बेसावधपणा दाखवला. तर दुसरीकडे धिम्या गतीने पण चिवटपणाने गेली ९७ वर्ष संघ परिवाराने काम केलं. यामुळेच मोदी आजची मुसंडी मारु शकले आहेत.

हर हर मोदीचा जोर

बहुसंख्य हिंदू ज्या देशात आहेत, ते हिंदूंचं राज्य असण्यात काहीही चूक नाही. इतर धर्माच्या लोकांना आम्ही काही त्रास देत नाही. त्यांनीही हिंदू प्रमुख आहेत याचं भान ठेवून गुण्यागोविंदाने ठेवून नांदावं, ही भावना सर्वसामान्य हिंदूंच्या मनात खोलवर रुजलीय. या हिंदूंनी त्यांचं मत कुठल्याही स्थानिक पक्षाला दिलं तरी त्यांच्या मूळ भावनेत फरक पडत नाही. आपल्या देशाच्या सेक्युलरपणापुढं हे मोठं आव्हान तयार झालंय.

विविध जुळण्या, फेरजुळण्या, आर्थिक असंतोष, हिंदीवरुन पेटणारा दक्षिण-उत्तर भेद अशी नीट मोट बांधली गेली तर मोदी, भाजप कदाचित निवडणुकांमधे हरतीलही. पण हे आव्हान त्यामुळे संपत नाही. दुःखाचं, कष्टाचं हरण करणारा या अर्थाने ‘हर हर महादेव’ हा घोष काशीच्या घाटांवर दुमदुमत असतो. मोदींनीही तो आपल्या काशीतल्या भाषणावेळी वारंवार दिला.

काही एका प्रमाणात हिंदू मानसिकतेत ‘हर हर मोदी’ जोर धरतंय. ते रोखलं गेलंच पाहिजे. हे आव्हान पेलण्यासाठी सगळा कार्यक्रम मुळापासून विकसित करावा लागेल. तोपर्यंत त्या दिशेने जाताना आध्यात्मिकतेचा, हिंदू तसंच सर्व संप्रदायांतल्या पुढे जाणाऱ्या परंपरांचा आब राखत, त्यात संवाद घडवत, या परंपरांतल्या घातक गोष्टींना समान रीतीने विरोध करत भारतीयत्वाचा जागर मांडणं आपल्याला शक्य आहे.

हेही वाचाः 

चौकीदार ऑल इज वेल

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

(लेख मुक्त संवाद मासिकातल्या जानेवारी २०२२च्या अंकातला आहे)