चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल.
हिमालयाची कन्या पार्वती ही उपवर झाल्यावर तिच्या वडलांनी तिच्यासाठी नवरा म्हणून विष्णूची निवड केली. विष्णूशी लग्न करायचं नाही म्हणून पार्वती वनात पळून गेली. तिकडे झाडाची पानं सोडल्यास आणखी काहीही न खाता, पाण्याचा थेंबही न पिता तिने वनात बसून कठोर व्रत केलं. त्यावर शंकर तिला प्रसन्न झाला. पार्वतीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या तपश्चर्येवर शंकर खूष झाला असल्याने त्याने ती मान्य केली. म्हणून चांगला आणि हवा तो नवरा मिळावा यासाठी पार्वतीने केलं ते हरतालिकेचं व्रत सर्व कुमारिकांनी करावं, पूजा मांडावी, त्याला सात प्रकारच्या पत्री वहाव्यात, उपवास करावा, अशी प्रथा पडली.
हरतालिकेची ही कथा आई दरवर्षी वाचत असे. पण यावेळी मात्र ती ऐकताना नुसतीच कानावर पडत नव्हती. तिच्यातले वेगवेगळे गाभार्थ कळत होते. उसनी सजगता आणून ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचावी असं वाटत होतं.
कोणतंही मिथक हे अज्ञानातून पुढे आलेलं असत. अशाच एका नॉर्वेईन मिथकाची एक गोष्ट! पाऊस पडून गेल्यावर अचानक वांझ पृथ्वीला कोंब कुठून येतात, हे बदल होतात तर का होतात अशा प्रश्नांची उत्तरं या नॉर्वेईन लोकांना कळत नव्हती. त्यांना बस इतकं कळत होतं की हा पाऊस आपल्या पिकांसाठी आणि परिणामी जगण्यासाठी गरजेचा आहे. म्हणून या नॉर्वेईन लोकांनी एक मिथक रचलं.
थोर नावाचा त्यांचा देव. हातोडा, हॅमर हे त्याचं शस्त्र. जेव्हा थोर हॅमर चालवत असतो तेव्हा आकाशात युद्ध चालू असतं. आणि म्हणून आकाशात विजेचा कडकडाट होतो असं या नॉर्वेईन लोकांना वाटायचं. तर, सांगायचा मुद्दा असा की मनातले प्रश्न स्वस्थ बसून देत नाहीत तेव्हा हा मिथकाचा आधार घेणं कोणत्याही संस्कृतीत होतंच. हरतालिकेचं व्रत अशाच मिथकातून वर आलं असावं असं मला वाटत.
या सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्यात लोकपरंपरेचा अविर्भाव असतो. या गोष्टी लोकांनी रचलेला असतात. प्रदेशानुसार, भाषेनुसार त्या बदलत जातात. या गोष्टी लोकांच्या मनाचा आरसा असतात. कमी अधिक प्रमाणात त्या लोकांच्या भावविश्वाचं दर्शन आपल्याला करून देतात म्हणून त्या आवडतात. या गोष्टी अंतिम सत्य आहेत असा क्लेम कुणाही करू शकत नाही.
हेही वाचाः सुखकर्ता दुखःहर्ता ही आरतीच्या पलीकडे छान कविताही
हरतालिकेच्या या व्रतात एक विलक्षण गोष्ट जाणवत राहते. श्रीमंत विष्णू नाकारून पार्वती गरीब, वनात राहणाऱ्या शंकरशी लग्न करण्याचा हट्ट करते. त्यासाठी ती घरातून पळून जाते. आणि तिचे बाबासुद्धा तिचं प्रेम समजून घेऊन ऑनर किलिंग न करता लग्नाचा स्वीकार करतात. शिव आणि पार्वतीचं प्रेम हे जगातलं पहिलं आंतरजातीय लग्न होतं हेच अधोरेखित होत राहतं. या मिथकात आणखीही काही महत्वाच्या गोष्ट दिसून येतात.
आधुनिक काळातही हरतालिकेचं हे व्रत गरजेचं आहे. आजही हे व्रत प्रत्येक माणसाने अंगीकारावं. उपवर झाल्यावर पार्वती वनात जाते. ध्यान करते, म्हणजे नक्की काय करते? प्रार्थना करणं, ध्यान करणं हे स्वतःचा स्वतःशी संवाद घडवून आणण्याचं साधन असतं.
डिजिटलायझेशनच्या युगात स्वतःशी हरवलेला संवाद पूर्ण करण्याची गरज आहे. या संवादातून नात्याची उकल होते. आपलं, आपल्या शरीराचं, आपल्या जोडीदाराचं, त्याच्या शरीराचं अशी कित्ती नाती एका नात्यात अंतर्भूत असतात. नात्यांची गुंतागुंत, त्यातले नानाविविध रंग समजून घ्यावे लागतात. जोडीदाराचा सन्मान करायला शिकावं लागतं. प्रेम करायलाही शिकावं लागतं. या सगळ्या अतिमहत्वाच्या गोष्टींचा कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात साधा उल्लेखही नसतो.
शाळा-कॉलेजातही या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. साधं मोकळेपणाने या गोष्टींविषयी बोललंही जात नाही. मग पॉर्नोग्राफी आमच्या लैंगिक शिक्षणाचं साधन होऊन बसतं. पण पॉर्नग्राफीतून मिळणारं लैंगिक शिक्षण हे चुकीचं असतं हे कधी उमजतंच नाही. जोडीदाराकडून अवाजावी अपेक्षा ठेवल्या जातात. मुळात जोडीदारासोबतचे नातेसंबंध सुदृढ करायला लैंगिक शिक्षण गरजेचं नसून लैंगिकता शिक्षण गरजेचं आहे हेसुद्धा कधी कळत नाही.
लैंगिकता असं काही वेगळं असतं आणि त्यात सेक्सच्या पलिकडे अनेक गोष्टींचा समावेश असतो हे आपल्या गावीही नसतं. या सगळ्या गोष्टी स्वतःशी आणि जोडीदाराशी संवाद करून उलगडता येतात. जोडीदाराशी संवाद होण्याआधी स्वतःशी संवाद होणं गरजेचं आहे.
हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच
आपल्याला कसा जोडीदार हवाय? मुळात हवा आहे का? हवा असेल, तर का? नको असेल, तर का नको? हवा असेल तर त्याच्या कडून आपल्या कुठल्या अपेक्षा आहेत? त्या ठेवणं, न ठेवणं कितपत योग्य आहे? आपल्या आणि जोडीदाराच्या नात्यात कुठल्या रंगांना महत्व आहे? कुठल्या रंगांना कमी महत्व आहे? विश्वास, आपुलकी, स्पेस असे रंग किती गडद, किती फिके हवेत. हे इंद्रधनुष्य सुंदर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आणि अशा गोष्टींचा विचार आधुनिक काळ्यातल्या मुलांना आणि मुलींना करणं गरजेचं आहे.
हेच ते आधुनिक काळातलं हरतालिकेचं व्रत! या व्रतात कर्मकांड नाहीत. उपास, तापास नाहीत. झाडं, पान, फुलं तोडणं नाही. पूजा अर्चा नाही. पण इफेक्ट १०० टक्के दिसणारंच! परंपरेकडून काही घ्यायचंच असेल तर तिचा मतितार्थ घ्यावा. स्वतःबद्दल आणि हव्या असणाऱ्या जोडीदाराबद्दल विचार होणं हा हरतालिकेच्या व्रताचा मतितार्थ. तो घेऊन, उरलेल्या अविवेकी गोष्टी सोडून देऊन आपण अंतिम सत्याच्या आणखी जवळ जाऊ शकू.
आपलं नात समृध्द करू शकू. पूजा अर्चा म्हणजे स्वतःसाठीचा वेळ. देवाशी संवाद म्हणजे स्वतःशी संवाद. देव मूर्त की अमूर्त याने काही फरक पडत नाही. आपला आपल्याशी संवाद होणं महत्वाचं.
याला व्रत म्हणायचं की नाही हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं. हे वर्षातून एकच दिवस करायचं का संपूर्ण वर्षात गरज पडेल तेव्हा तेव्हा करायचं हेही प्रत्येकाने आपलं आपलंच ठरवावं. पण या व्रतात चांगला आणि हवा तो जोडीदार मिळणार हे नक्की. कहाणी सुफळ संपूर्ण होणार हे नक्की!
हेही वाचाः
'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न
(कोरं पान! ब्लॉगवरून साभार)