कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या साऱ्या यंत्रणांना, माणसांना उघडं पाडलंय. नाचता येईना अंगण वाडकं म्हणतात तसं राजकारणी कोरोनाचं बिल दुसऱ्याच्या नावावर फाडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना वायरसला चिनी वायरस म्हणत जबाबदारी झटकत आहेत. निदान साथीच्या रोगांकडे पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहायला नको. नवीन काही समजून घ्यायचं तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे आधी मान्य करावं लागतं.
कोरोना वायरसचं संकट वाढत चाललंय. जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीच कोरोनाला साथीचा रोग म्हणून घोषित केलंय. जगभरातले शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत वेगवेगळ्या पद्धतीने या विषयावर लिहितायंत. वेगवेगळी विश्लेषणही पुढे येताहेत. साथीच्या आजारांचं मूळ हे शेती आणि संस्कृतीच्या उत्क्रांतीत असल्याचा वेगळा अँगल मांडणारा लेख पत्रकार सोपान जोशी यांनी लिहिलाय. सोबत राजकारणातले पूर्वग्रह अशा काळात धोक्याचे असल्याचं मतंही त्यांनी मांडलंय.
पेशानं पत्रकार असलेले सोपान जोशी पर्यावरणवादी, गांधीवादी कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. वेगवेगळ्या माध्यमांतून ते पर्यावरण, शेती, राजकारण अशा अनेक विषयांवर लिहित असतात. २०१८ मधे त्यांचं 'जल थल मल' पुस्तक आलं. चर्चेतही राहीलं. हे पुस्तक समाज, विज्ञान आणि पर्यावरणाच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतं. साथीचे रोग आणि पूर्वग्रह यावर प्रकाश टाकणारी एक लेखवजा फेसबूक पोस्ट त्यांनी लिहिलीय. मूळ हिंदीत असलेल्या या पोस्टचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला अनुवाद इथं देतोय.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी SARS-CoV-19 ला चिनी वायरस म्हटलंय. पूर्वग्रह हे अशा पद्धतीने काम करत असतात. एखादी नवीन घटना जाणून घ्यायची तर त्यासाठी आपल्या समजुतदारपणाची व्याप्ती वाढवायला हवी. त्याऐवजी पूर्वग्रह मनात ठेवून आपण प्रत्येक नवीन घटनेला छोटं करण्याचा प्रयत्न करतो. हे सोयीचंही असतं म्हणा! कारण त्यात काही नवं समजून घ्यायची मेहनत नसते.
नवीन काही समजून घ्यायचं तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे आधी मान्य करावं लागतं. ज्ञानाचा अभाव आहे हे नम्रतेनं स्वीकारता यायला हवं. आपल्याला पहिल्यापासून सगळं काही माहितीय, विश्लेषण झालंय असं आपल्यातले पूर्वग्रह सांगत असतात. आता फक्त कर्म बाकी आहे. ते केलं की बस! मग काय जग आदर्श बनेल. प्रत्येक पूर्वग्रह अशाच आधारावर आपलं एक आदर्श जग बनवण्याचा प्रयत्न करतं.
हेही वाचा : कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती
ट्रम्प यांचं आदर्श जग हे जास्तीत जास्त फायद्याचं अर्थात नफा कमवणारं आणि उपभोगवादी आहे. ट्रम्प यांचा इतिहास याआधी नीट तपासायला हवा. अमेरिकेतल्या मूळ रहिवाशांच्या कत्तली करून युरोपातले लोक अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांच्या मरणामागचं महत्वाचं कारण युरोपातल्या लोकांनी अमेरिकेत आणलेले रोग होतं. देवी, प्लेग, कॉलरा, सर्दी, खोकला, डिप्थीरिया, मलेरिया, टीबी, टायफॉइड सारख्या अनेक रोगांचा सामना हजारो वर्षांपासून अमेरिकेत राहिलेल्या लोकांना करावा लागला. या सगळ्याशी कसं लढायचं हेसुद्धा त्यांना माहीत नव्हतं.
युरोपियनांनी स्थानिक लोकांना जाणूनबुजून अनेक संसर्गजन्य रोग दिलेत. अशी असंख्य उदाहरणं आहेत. साथीच्या रोगातून जे वाचले त्यांना युरोपातल्या गुलामी आणि साम्राज्यशाहीतून निर्माण झालेल्या हिंसेनं मारलं. त्यामुळं पुढच्या काही वर्षांमधे लोकसंख्येत ९० टक्क्यांची घट झाल्याची उदाहरणं दिसतात. इतिहासातली ही सगळ्यात मोठी कत्तल आहे. तर १०० वर्षांमधे सुमारे ५.५ कोटी लोक मेल्याचा अंदाज आहे.
युरोपियन साम्राज्यवादाच्या जहाजातून जगाभरात अनेक साथीचे रोग युरोपमधे पोचले. सिफलिस अर्थात गुप्तरोग अमेरिकेतून युरोपात आणणारेही युरोपियनच आहेत. कॉलरा हा साथीचा रोग भारतातल्या बंगालमधून युरोपातल्या अनेक मोठ्या शहरात पसरला. लाखो लोक मरण पावले. युरोपच्या शहरांमधे आधुनिक ड्रेनेजची व्यवस्था होईपर्यंत कॉलरानं लाखोंना मारलं. मलमूत्र जाण्याचं ठिकाणही तेच होतं. शिवाय त्याच ड्रेनेजमधून पिण्याचं पाणीही यायचं.
साम्राज्यवाद आणि साथीच्या रोगांचा संबंध जुना आहे. प्लेगची लागण ही मंगोलिया, उत्तर चीनमार्गे मंगोल साम्राज्य आणि पुढे युरोपमधे पोचली. सिल्क रोडनं आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडलं. पहिल्यांदाच युरोपचा संबंध आशियाशी आला. त्याच मार्गाने प्लेगचा युरोपात प्रवेश झाला. एक असंही उदाहरण आहे की, मंगोल सैन्यानं प्लेगमधे मेलेल्यांचे मृतदेह क्राइमिया देशाच्या एका तटबंदी असलेल्या शहरात फेकले. तिथून पळून जाणाऱ्या लोकांनी ही साथ इटलीला नेली. मग इटलीमधून प्लेग अख्ख्या युरोपात पसरला.
१९१८ ते १९२० च्या दरम्यान इन्फ्लूएंजाच्या साथीनं जगभरात ५ ते १० करोड लोकांचा मृत्यू झाला. असा अंदाज आहे की जगभरातल्या लोकसंख्येचा ५ टक्के भाग याचा बळी ठरला. याला स्पॅनिश फ्लू नाव पडलं कारण याची चर्चा पहिल्यांदा स्पेनमधे झाली. स्पेनवर दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम झाला नव्हता. दुसऱ्या महायुद्धामुळे मात्र इतर देशांपासून ही माहिती लपवली गेली. हळूहळू याला स्पेनच्या नावानं ओळखलं गेलं. त्याचा उगम कुठं झाला याबद्दल निश्चित अशी माहिती नाही.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
बहुतेक संसर्गजन्य साथीचे रोग हे प्राण्यांकडून माणसांमधे आलेत. मानवी संस्कृतीच्या विकासामुळे, मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी मारले गेले. त्यातल्या शेकडो प्रजाती नष्ट झाल्या. जंगलतोडीमुळेही आजही नष्ट होताहेत. साथीच्या आजाराची उत्पत्ती ही शेती आणि संस्कृतीतून झाली. माणूस हा मुळात वन्य प्राणी आहे. त्याच्या इतिहासातला बराच मोठा काळ तो आदिवासी समाज जगतोय तसंच जगलाय.
शेती आणि संस्कृतीमुळे यात दोन मोठे बदल झाले. एक, मोठ्या संख्येनं तो छोट्या भागात राहू लागला. दोन, शेती आणि मांस यासाठी वन्यजीवांना पाळीव प्राणी म्हणून सांभाळू लागला.
या प्राण्यांमधे बरेच जीवाणू होते. त्यांच्यासाठी हे रोगाचं कारण नव्हतं. पण त्यांच्यातल्या संसर्गामुळे पुढे माणसाला हा आजार झाला. शेतीत घेतलेलं उत्पादन गोदामांमधे ठेवल्याने, उंदरासारखे प्राणी वस्त्यांजवळ राहू लागले. यामुळे रोगांचा प्रसार झाला. संसर्गजन्य रोगांचा प्रसार होणं हे विकासाशी संबंधित आहे. यानं औद्योगिक, आर्थिक विकासाला मर्यादा असल्याचं दाखवून दिलंय ज्याला आपण अमर्याद मानलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प हे विकासाच्या गलिच्छ राजकारणात माहीर आहेत. भांडवलशाही, नफेखोरी आणि उपभोग प्रवृत्तीचे ते प्रबळ दावेदार आहेत. अशा विकासामुळे निर्माण झालेला ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जगासाठी धोकादायक बनलाय. त्याची ऐतिहासिक जबाबदारी अमेरिकेवर आहे. मात्र ट्रम्प याचं खापर चीन आणि भारतावर फोडतात. राजकारण करण्याची ही एक कला आहे.
आपल्या देशात राजकीय यंत्रणेला प्रश्न विचारले जातात, तेव्हा प्रश्नांचा सामना करण्याऐवजी पाकिस्तानचं नाव घेतलं जातं. सरकार आणि सत्ता हाच आपला धर्म मानणारे पत्रकार आपल्या देश आणि समाजाबद्दलची माहिती गोळा करण्याऐवजी पाकिस्तान पाकिस्तान अशी आरडा ओरड करतात. दहशतवादासारख्या गोष्टींमधे पाकिस्तानची भूमिका सर्वश्रुत आहे. आपल्या दुर्दशेची कारणं पाकिस्तानात नाहीत तर आपल्या समाज आणि राजकारणात आहेत.
दुसऱ्या देशांवर सध्याच्या कोरोना साथीची जबाबदारी टाकणं म्हणजे ट्रम्प याकडे कसं बघतात हे सांगणारं आहे. सध्याच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर न करण्याचा हा संकेत आहे. राजकारणात ते काही असंच यशस्वी झाले नाहीत. राजकारणात पूर्वग्रह वाढतात कारण सत्ता या सगळ्या पूर्वग्रहांना पोसण्याचं काम करत असते.
हेही वाचा : अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
कोरोना वायरसमुळे पसरलेल्या या साथीच्या रोगाकडे तुम्ही, आपली राजकीय विचारसरणी? स्वतःचा धार्मिक कल? स्वतःची संस्कृती? आपली स्वतःची भाषा? स्वतःची जात? स्वतःचं क्षेत्र? आपला स्वतःचा व्यवसाय? अशा स्वतःच्या पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहणार आहात का? ही साथ आपल्या मूळ स्वभावाकडे इशारा करतेय. त्या गोष्टींकडे जिकडे आपलं सर्वसाधारणपणे लक्ष जात नाही. का जात नाही. कारण आपण आपलं राजकारण, धर्म, संस्कृती, भाषा, जाती, प्रदेश, व्यवसाय, देश यालाच जगाचं केंद्र मानलेलं असतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ओळखीवर आधारलेल्या राजकारणाचे फासे या आपत्तीच्या काळातही टाकलेत. हे सगळं अशा काळात घडतंय जेव्हा आंतरराष्ट्रीय नेतृत्व आणि सहकार्याची आवश्यकता आहे. आज ट्रम्प जे करतायत तेच तुम्ही कराल? की आपण आपल्या चौकटीबाहेर पडून हे जग नवीन डोळ्याने बघाल?
रोजचं आपलं आयुष्य आपण धावपळीत जगत असतो. या आजारामुळे जे धोके निर्माण झालेत त्यामुळे आपण थांबलो आहोत. आपला वेग मंदावलाय. या साथीने विकासातले धोके दाखवलेत. आपल्यालाही काही मर्यादा आहेत त्याचे परिणामही दिसू शकतात हे सांगितलंय. आपण अभ्यास करू शकतो. या धोक्याच्या आडून आपण आपला दृष्टीकोन ठरवू शकतो. विकासाचे पूर्वग्रह आपल्याला जे दाखवू शकत नाही ते आपण पाहायला हवं. हे केलं तर आपत्ती ओसरल्यानंतर आपण अधिक चांगल्या स्थितीत असू.
हेही वाचा :
कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?
आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट