सातवीच्या पुस्तकातलं संविधान वाचलंय?

२६ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आपल्याला इयत्ता सातवीतच संविधानाची ओळख करून देण्यात आलीय. रोजच्या जगण्यासाठी संविधानाचा बेसिक धडा नागरिकशास्त्राने आपल्याला दिला. सध्या एक दिवस असा नाही की त्यादिवशी संविधानाबद्दल काही घडत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच रोज संविधान, त्यातली मुल्यं, कलमं यांच्याशी संबंध येतोय. म्हणून सातवीच्या पुस्तकातल्या संविधानाची ही नव्याने उजळणी.

क्यां आप पाचवी पास से तेज हैं? असा एक क्‍विज शो शाहरूख खान दहा वर्षांपूर्वी टीवीवर करायचा. आता आपल्याला इयत्ता सातवीच्या पुस्तकात शिकलेली संविधानाची माहिती आहे का, असा प्रश्‍न आपणच स्वतःला विचारायला हवा. त्यासाठी महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र पुस्तकातली संविधानाविषयीची माहिती इथे देत आहोत.

संविधानाचा अर्थ काय?

देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असं म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे.

संविधान कशासाठी?

♦ सरकारला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते.

♦ संविधानात नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. सरकारला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत.

♦ संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचं पाहून सामान्य माणसाचा सरकारवरचा विश्‍वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात.

♦ संविधान देशासमोर राजकीय आदर्श ठेवतं. त्या दिशेने वाटचाल करण्याचं बंधनही त्या राष्ट्रावर असतं. त्यातून जागतिक शांतता आणि सुरक्षितता, मानवी हक्कांचं संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होतं.

♦ नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्‍चित होते.

संविधान कसं तयार झालं?

स्वतंत्र भारताचा कारभार ब्रिटिशांच्या नाही, तर भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा यासाठी संविधान सभा या समितीची स्थापना झाली. त्यामधे देशाच्या विविध प्रांत आणि संस्थानं यांचे प्रतिनिधी होते. त्यात एकूण २९९ सदस्य होते. डॉ. राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

त्यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचं, त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देण्याचं तसंच आलेल्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करून प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.

संपूर्ण संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी २ वर्षं, ११ महिने आणि १७ दिवस इतका कालावधी लागला. मूळ संविधानात २२ भाग, ३९५ कलमं आणि ८ परिशिष्टं आहेत.

संविधानाची उद्देशिका कशासाठी़?

संविधानामागील उद्दिष्टांची एकत्रितपणे थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे उद्देशिका होय. तिलाच संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असंही म्हटलं जातं. त्याची सुरवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलंय.

हेही वाचाः सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःस अर्पण केलंय. आपण सर्व भारताचे नागरीक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचं आहे, हे उद्देशिका सांगते. यातील मूल्यं, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसं प्राप्त करायचं याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्यात.

संविधानाची वैशिष्ट्यं कोणती?

♦ केंद्र आणि राज्य अशा दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याची पद्धत भारताने स्वीकारलीय. याला संघराज्य पद्धत म्हणून ओळखलं जातं.

♦ संसदेला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार देणारी संसदीय शासनपद्धती आपल्याकडे आहे.

♦ आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे.

♦ आपल्याकडे राज्याचं आणि देशाचं नागरिकत्व वेगवेगळं असा प्रकार नाही. भारतीय नागरिक याचाच अर्थ एकेरी नागरिकत्व आहे.

♦ वेगवेगळे कायदेकानून तयार करण्यासाठी संविधानात घटनादुरुस्तीची तरतूद आहे. ही आपल्या संविधानातली वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.

♦ आपला निवडणूक आयोग स्वायत्त आहे.

संविधानाने दिलेले मूलभूत हक्क कोणते?

समानतेचा हक्क: कायद्यापुढे सर्व समान आहेत. उच्च-नीच, श्रेष्ठक-निष्ठ, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद कायदा करत नाही.

स्वातंत्र्याचा हक्क: भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघटना स्थापना, देशात कुठेही फिरणं आणि वास्तव्य करणं, कोणताही व्यवसाय करणं याचं स्वातंत्र्य संविधान प्रत्येक भारतीयाला देतं.

शोषणाविरुद्धचा हक्क: वेठबिगारी, बालकामगार, गुलामी नाकारणारा पिळवणूक न होऊ देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क: कोणत्याही धर्माची उपासना करण्याचं आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचा हक्क.

सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क: प्रत्येक लोकसमूहाला आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क आहे.

संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क: आपल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास  न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलाय.

हेही वाचाः संविधान म्हणजे काय रे भाऊ!

संविधानातली मार्गदर्शक तत्त्वं कोणती?

♦ सरकारने उपजीविकेचं साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावं. स्त्री आणि पुरुष असा भेद करू नये. स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावं.

♦ लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

♦ पर्यावरणाचं रक्षण करावं.

♦ देशाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणं म्हणजेच स्मारकं, वास्तू यांचं संरक्षण करावं.

♦ समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

♦ वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचं संरक्षण करावं.

♦ भारतातल्या सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा.

नागरिकांची मूलभूत कर्तव्यं कोणती?

♦ प्रत्येक नागरिकाने संविधानाचं पालन करावं. संविधानातली आदर्श, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करावा.

♦ स्वातंत्र्यांच्या चळवळीला प्रेरणा देणार्‍या आदर्शांचं पालन करावं.

♦ देशाचं सार्वभौमत्व, एकता आणि अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावं.

♦ आपल्या देशाचं रक्षण करावं. देशाची सेवा करावी.

♦ सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा आणि बंधुभाव जोपासावा.

♦ स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील, अशा प्रथांचा त्याग करावा.

♦ आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करावं.

♦ नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करावं. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी.

♦ वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासा अंगी बाळगावी.

♦ सार्वजनिक मालमत्तेचं जनत करावं. हिंसेचा त्याग करावा.

♦ देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिककार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा.

♦ ६ ते १४ वर्ष वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.