प्लेगला आटोक्यात आणण्यासाठी लोक शेतात राहायला गेले होते!

२७ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात.

भारतात कोविड-१९ चा पहिला पेशंट सापडून तीनेक महिने झाले. कोरोना वायरसचा कहर सुरूच आहे. दररोज कोरोनाचे नवीन पेशंट सापडत आहेत. राज्यात तर कोरोनाग्रस्तांची संख्या पुणे, मुंबई, नागपूरसह बहुतांश जिल्ह्यांमधे वाढतानाच दिसतेय. खरंतर, कोरोनातून बरं होण्याऱ्या लोकांची संख्याही उल्लेखनीय आहे. पण तरीही कोरोनाचा धोका कमी झालाय, असं लगेच म्हणता येणार नाही.

कोरोनाचा धोका कमी करायचा असेल तर अजून किमान ७ ते ८ महिने आपल्याला काळजी घ्यावी लागेल, असं भारतातल्या मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात. ज्येष्ठ पत्रकार अभ्युदय रेळकर यांनी देखमुख यांची मुलाखत घेतलीय.

या मुलाखतीत लॉकडाऊन हे पॉज बटण आहे, या राहुल गांधी यांच्या मताला देशमुख यांनी दुजोरा दिला. मात्र लॉकडाऊन गरजेचं असल्याचंही ते सांगतात. मुद्देसूद मुलाखत इथे देत आहोत.

हेही वाचा : तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र

प्लाझ्मा थेअरपीचा वापर

भारतात लोकसंख्येची घनता खूपच जास्त आहे. म्हणजे कमी जागेत खूप जास्त लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात लॉकडाऊनमुळे काहीसा ब्रेक लागलाय. पण लॉकडाऊन संपवल्यानंतरही जास्त काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊनचा काळ हा सरकारी तयारीसाठी उपयोगी ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांना हाताळण्याची तयारी करतायत. कोरोनाची तपासणी मोठ्या प्रमाणावर करता यावी, यासाठी प्रयत्न केले जातायत. अगदी जिल्ह्या-जिल्ह्यात त्याची तयारी सुरू आहे. खासगी हॉस्पिटल आणि लॅबमधेही तपासणी चालू करायचा सरकारचा प्रयत्न चालू आहे.

यासोबतच ज्यांना आधीच कोरोनाची लागण झालीय त्यांनाही चांगल्या दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार झटतंय. मास्कचं उत्पादन वाढवणं, टेस्ट किट्सचं उत्पादन करणं, वेंटिलेटर्सचं उत्पादन वाढवणं, आरोग्य सुविधा वाढवणं, अशा अनेक पातळ्यांवर सरकार काम करतंय. शिवाय, आता कोरोनावर उपायांसाठी प्लाझ्मा थेअरपीचा वापर करण्याचं सरकारनं ठरवलंय. त्यासाठी खासगी पातळीवरही प्रयत्न सुरू होणार आहेत.

हेही वाचा : क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?

कोरोनाग्रस्तांची नेमकी संख्या किती?

लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात आपल्याला यश आलंय. पण त्याचबरोबर हातावर पोट असणाऱ्या लाखो लोकांचे लॉकडाऊनमुळे हाल होतायत. त्यावरही सरकार उपाययोजना करतंय. त्यामुळे धान्य, अन्न, निवारा याची सुविधा गावोगावी, त्यातल्या त्यात शहरांमधे केली जातेय. मात्र लोकांच्या सुरक्षिततेसाठी, जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं आहे.

भारताची लोकसंख्या पाहता आपली तपासणी करण्याची क्षमता फारच कमी आहे. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्यांच्या नेमक्या संख्येबद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध होत नाही.

दररोज काही शे कोरोनाग्रस्तांची भर पडते. टेस्ट वाढतील तसं कोरोनाग्रस्त वाढतच जातील यात शंकाच नाही. म्हणूनच त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सरकार लॉकडाऊनच्या माध्यमातून वेळ घेतंय. मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या जातायत. भविष्यात होणारी जीवितहानी टाळायची असेल तर या उपाययोजनांची नितांत गरज आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी या लॉकडाऊनचा उपयोग होणार आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

घरातल्या वृद्धांची काळजी घेणं गरजेचं

सध्याच्या काळात कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांनी काळजी घेण्याचीृ गरज आहे. त्यामधे म्हातारे, डायबेटीस असणारे, ह्रदयरोगी, किडणीचा आजार असलेले पेशंट, गरोदर बायका, ब्लड प्रेशरचे पेशंट तसंच अस्थमा असणाऱ्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाची लागण झालेल्या मृतांमधे आधीच काही रोग किंवा आजार असणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

साठीपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांची तर सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे. घरातच वृद्धांची वेगळी सोय करता आली तर ती केली पाहिजे. घरातल्या लहान मुलांना वृद्धांपासून दूर ठेवलं पाहिजे. कारण लहान मुलं कोरोनावर सहज मात करतील. मात्र त्यांच्या माध्यमातून वृद्धांना कोरोनाची लागण झाली तर त्याचे परिणाम गंभीर होतील. त्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे, असं डॉ. देशमुख सांगतात.

पूर्वी प्लेगच्या काळात लोक आपली घरं सोडून माळरान किंवा आपल्या शेतात रहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. त्यामुळे शक्य आहे त्यांनी शेतात राहावं. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे केली तरी त्याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

कोरोना हा वायरस आहे. साधी सर्दी आणि ताप अशी त्याची प्राथमिक लक्षणं आहेत. उत्तम प्रकृती असणाऱ्या व्यक्ती आपल्यातल्या प्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करू शकतील. पण वृद्धांची प्रतिकारशक्ती वयामुळे आधीच कमकुवत झालेली असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा : अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

माळरानावर राहायला जा

देवीच्या आजाराचं उच्चाटन जगभरातून झालंय. आता कुठेही त्याचे वायरस जिवंत राहिलेले नाहीत. कुठल्याही माणसाच्या शरीरातही ते नाहीत. त्यामुळे त्याची लस देणंही बंद करण्यात आलंय. पण हे वायरस प्रयोगशाळांमधे साठवून ठेवण्यात आलेत. ते कडेकोट बंदोबस्तात असले तरी तिथून ते अपघाताने बाहेर पडण्याची भीती आहे. असं झालं तर हाहाकार माजू शकतो. पण म्हणून हे वायरस मानवनिर्मित आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल.

चीन किंवा अमेरिकेने कोरोना वायरस प्रयोगशाळेत तयार करून तो जगभर पसरवला, असं म्हटलं जातं. पण त्यात तथ्य नाही. कोरोना वायरसची प्रयोगशाळेत निर्मिती केलीय, असं आज तरी ठामपणे सांगता येणार नाही. त्यावर झालेल्या संशोधनातून हेच लक्षात येतं की कोरोना कुटुंबातलं हे सातवं अपत्य आहे. त्याच्या आरएनए सिक्वेन्सचा पूर्णपणे अभ्यास झालाय. त्यामधे कोणत्याही प्रकारे बदल किंवा इंप्रोवायझेशन केल्याचं आढळून आलेलं नाही.

अजून सात ते आठ महिने कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सरकारला नागरिकांनी सहकार्य करायला हवं. जास्तीत जास्त जीव वाचावेत यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांना लॉकडाऊनचा कंटाळा आलाय. पण जीव जाण्यापेक्षा हा कंटाळा परवडणारा आहे, हे समजून घ्यायची गरज आहे.

हेही वाचा : 

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

महिनाभराच्या लॉकडाऊनपासून या देशांनी घेतला मोकळा श्वास

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

ग्रेट लॉकडाऊन: आत्ताची आर्थिक मंदी १९३०च्या जागतिक महामंदीहून वाई

आपण ऑफिसमधे काम केल्यानंच आज वर्क फ्रॉम होम शक्यः सुंदर पिचाई

फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल