भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

२४ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


शिबू सोरेन यांनी झारखंडी अस्मितेचा बिगुल वाजवत मोकळंढाकळं राजकारण केलं. पण तीनदा मुख्यमंत्री बनूनही त्यांना पाच महिन्यांपेक्षा जास्तवेळ सत्तेत राहता आलं नव्हतं. आता हेमंत सोरेन यांनी मात्र मोठा विजय मिळवून नवं राजकारण उभं केलंय. क्षमतांविषयी शंका बाळगणाऱ्यांचे दात घशात घालण्याचं काम त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा `घर में घुस के मारेंगे` हा डायलॉग खूप फेमस आहे. टीवीवर, भाजप समर्थक मौका मिळाला की हा डायलॉग वापरतात. झारखंडमधे भाजपने विरोधकांना घरात घुसून मारण्याची स्ट्रॅटेजी अवलंबली. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनने झामुमोच्या हेमंत सोरेन यांना आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलंय. त्या हेमंत यांनाच भाजपने घरात घूसून हरवण्याची स्ट्रॅटेजी आखली.

घर में घुसे और मारे गये

गेल्यावेळी झामुमोचा बालेकिल्ला संथाल परगण्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. तीच कामगिरी कायम राखण्यासाठी भाजपने यंदा जोरदार तयारी केली. हेमंत सोरेन लढत असलेल्या दुमका आणि बरहेट या दोन्ही जागांवर नरेंद्र मोदींनी लाखभर गर्दीच्या सभा घेतल्या. दुमक्याच्या सभेने तर सोरेन आता पुन्हा एकदा हरणार असंच चित्र उभं केलं. पण मोदींची `घर में घुस के मारेंगे` स्ट्रॅटेजी यावेळी फेल गेली. वडलांकडूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या हेमंत यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला.

संथाल परगण्यातल्या आदिवासींमधे आदराचं स्थान असलेल्या शिबू सोरेन यांचा वारसा चालवणं तसं कुणाच्याही बस की बात नाही. झारखंडमधे शिबू सोरेन यांना आदराने गुरुजी म्हणून संबोधलं जातं. पण मोठा भाऊ दुर्गा सोरेन यांच्या अकाली निधनाने हेमंत यांच्यावर वडलांचा राजकीय वारसा चालवण्याची जबाबदारी आली.

हेही वाचाः झारखंड ट्रेंडः भाजपच्या हातातून आणखी एक राज्य निसटतंय

सगळ्या शंका दूर केल्या

इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्ध्यावर सोडलेला हा पोरगा आदिवासींमधे देवासारखं पूजल्या जाणाऱ्या गुरुजींचा वारसा काय चालवणार असं म्हटलं जायचं. आताच्या निवडणुकीतही एका वर्गामधून हेमंत काय नेता आहे का? अशी कुजबूज सुरू होती. शिबू गुरुजींचा वारसा धुळीस मिळवेल, असं म्हटलं जात होतं. या सगळ्या शंका कुशंका आज निकालात निघाल्यात. सर्वशक्तिमान भाजपला पराभूत करून ४४ वर्षांच्या हेमंत सोरेन यांनी आपण कच्च्या गुरूचा चेला नसल्याचं सिद्ध केलंय.

झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळालंय. भाजपच्या हातातून आणखी एका राज्यातली सत्ता गेली. झामुमो २८, काँग्रेस १४ आणि राजद १ अशा ४३ जागांवर आघाडी घेत महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केलाय.

गेल्यावेळी ३७ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता केवळ २८ जागांवरच समाधान मानावं लागतंय. ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन ३, झारखंड विकास पार्टी ३, राष्ट्रवादी काँग्रेस १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी लेनिनवादी) एक आणि अपक्ष दोन जागांवर पुढे आहेत.

सौ सुनार की एक लोहार की

भाजपने महाराष्ट्रात हातातली सत्ता गेल्यामुळे झारखंड राखण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली होती. कारपेट बॉम्बिंग करावी तसं छोट्याशा झारखंडमधे पंतप्रधान मोदींपासून अमित शाह आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी निव्वळ तालुकेच नाही तर मोठमोठ्या गावांमधेही सभा घेतल्या. रोडशो केले.

दुसरीकडे महागठबंधनचं नेतृत्व करणाऱ्या झामुमोची सारी धुरा हेमंत सोरेन यांच्या खांद्यावर होती. शिबू सोरेन यांना तब्येतीच्या कारणामुळे प्रचारदौरे करण्यात मर्यादा होत्या. हेमंत यांनी आज निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यावर मीडियाशी बोलताना दिलेली एक प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.

ते म्हणाले, ‘भाजपसाठी नरेंद्र मोदींपासून अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी एकापाठोपाठ एक सभा घेतल्या. आम्हीही न थांबता, न थकता मैदानात उतरलो होतो. माझ्यासाठी ही खूप मजेशीर लढाई होती. ते १० दिवसांत करू शकले नाहीत, ते आम्ही एक दिवसात करून दाखवलं. एखाद्या वन मॅन आर्मीसारखी मी काम केलो. आमच्याकडे स्टार प्रचारकांची फौज नाही. मी स्वतःच उमेदवार, प्रचारक आणि कार्यकर्ता आहे. हे म्हणजे, एक प्रकारे सौ सुनार की एक लोहार की असंच काहीसं घडलं.’

हेमंत यांनी गेल्या चारेक महिन्यांत राज्यभरात जवळपास दीडशे सभा, रोडशो केले. निव्वळ झामुमोच्या ४३ उमेदवारांचाच नाही तर महागठबंधनमधला मोठा भाऊ म्हणून काँग्रेस, राजद यांच्यासाठी प्रचार केला. अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचार केला. मित्रपक्ष राजदला निव्वळ जागाचं दिली नाही तर दोनेक ठिकाणी जिंकून येतील असे आपल्या पक्षातले उमेदवारही दिले. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आजचा निकाल आहे.

हेही वाचाः झारखंडमधल्या एक्झिट पोलच्या आकड्यांचा अर्थ काय?

गुरुजींच्या पोरानं करून दाखवलं

२००० मधे झारखंडची स्थापना झाली. यंदा चौथ्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. यात २००५ मधे १७, २००९ मधे १८ आणि २०१४ मधे १९ जिंकलेल्या झामुमोला यंदा ३० जागांवर आघाडी मिळालीय. यंदाचं हे यश झामुमोच्या २० वर्षांच्या इतिहासातलं रेकॉर्ड ब्रेक यश आहे. जे वडलांच्या नेतृत्वात झालं नाही ते हेमंत यांनी करून दाखवलं.

२०१४ मधे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना हेमंत सोरेन हे काँग्रेस, राजदसोबत मिळवून बनवलेल्या सरकारचे दीडेक वर्ष मुख्यमंत्री राहिले. त्याआधी ते २०१० मधे अर्जून मुंडा यांच्या नेतृत्वातल्या भाजप, जेएमएम यांच्या सरकारमधे उपमुख्यमंत्री राहिले. मावळत्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सोरेन यांनी रघवुर दास सरकारविरोधात रान उठवलं. स्थानिक मुद्यांवरून सरकारला घेरलं.

शिबू गुरूजी हे तीनवेळा मुख्यमंत्री राहिले. १० दिवस, पाच-पाच महिने त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहता आलं. या तुलनेत हेमंत हे बाप से बेटा सवाई ठरले. आता तर स्पष्ट बहुमत मिळाल्यावर हेमंत सोरेन यांना सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होण्याची संधी मिळालीय.

हेही वाचाः काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियांकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं

महाराष्ट्रात ठाकरे, झारखंडमधे सोरेन

सोरेन कुटुंब महाराष्ट्रातल्या ठाकरे कुटुंबासारखंच आहे. बाळासाहेबांना शिवसैनिक जसं पूजतात आणि बहुसंख्य मराठी माणसं त्यांचा आदर करतात. तेच स्थान शिबू सोरेन यांनाही आहे. शिबू सोरेन यांनी झारखंड राज्यनिर्मितीची चळवळ यशस्वी करून, आदिवासींच्या हक्कांसाठी लढून हे स्थान कमावलंय. आदिवासींना आत्मसन्मान मिळवून दिलाय. महाराष्ट्रात जसा मराठी अमराठी वाद आहे. तसंच झारखंडमधेही झारखंडी आणि बाहरी असा वाद आहे.

स्थानिकांच्या अस्मितेवरच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांचं राजकारण टिकलंय. त्यांचा वारसा हेमंत चालवू शकतील का, असा प्रश्न कायम विचारला गेला. तो प्रश्न अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याविषयीही विचारला जायचा. पण हेमंत हेदेखील उद्धव यांच्यासारखेच शांत आहेत.

आपापल्या वडलांच्या तुलनेत बरेच मवाळ आहेत. पण दोघांच्याही पक्षाचं मूळ रूप चळवळींचं होतं. त्यांना संघटनेतून राजकीय पक्ष बनवण्याचं काम अत्यंत शांतपणे पार पाडलं. दोघांनीही भाजपला चारीमुंड्या चीत करून मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातलीय. दोघांच्याही धनुष्यबाणाने देशाला राजकारणाची नवी दिशा दाखवून दिलीय.

हेही वाचाः 

वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!

शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

झारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार

भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कोयलांचल जिकावं लागणार, कारण