दिल्लीच्या दंगलीने भारताच्या दिलावरच आघात केलेत. आपल्या धर्माचे किती जण मेले आणि त्यांच्या धर्माचे किती जण मेले, याचा हिशेब मांडून द्वेषाच्या भिंती उभारण्यात हजारो जण गर्क आहेत. पण त्यात असेही कितीतरी हिरो आहेत, ज्यांनी जातधर्माच्या पल्याड जाऊन मदत केलीय. म्हणून या माणुसकीच्या धर्माच्या आदर्शांना आपण थँक्यू म्हणायला हवं.
‘रविवार म्हणजे २३ फेब्रुवारीपासूनच दिल्लीतलं वातावरण तापायला लागलं होतं. सोमवार सकाळपासून त्याची झळ छोट्या छोट्या गल्लांनाही बसू लागली. सोमवारी संध्याकाळी बाबरपूर भागाकडून एक टोळी शिव विहार भागातल्या १२ नंबरच्या गल्लीत घुसली आणि घरांवर दगडफेक चालू केली. घराचं सेफ्टी डोअर बंद करून नरेश चंद्र त्यांनी बायको, मुलं आणि नातवंडांसह घरातल्या सगळ्यात शेवटच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं.
दगडफेक होतच राहिली. दंगलखोरांना या सगळ्या कुटुंबासोबत त्यांचं घरही जाळायचं होतं. नरेश चंद्र यांनी त्यांच्या ओळखीच्या काही जणांना फोन केला. ते लोक लगेचच मदतीसाठी धावून आले. तेव्हा त्यांना तिथून बाहेर पडता आलं. ते गेल्यावर दंगलखोरांनी घरातले कपडे आणि दागिने लुटले आणि घर पेटवून दिलं. तीन दिवसांनी नरेश चंद्र परत आले तेव्हा घराचा कोळसा झालेला होता.’ दैनिक जागरण` या पेपरच्या वेबसाईटवरल्या एका बातमीत हा प्रसंग लिहिण्यात आलाय.
ते ओळखीचे लोक आले नसते तर आमचं काय झालं असतं असे विचार मनात येऊन आजही नरेश चंद्र यांचे डोळे पाणावत असतील. सुपरमॅन, बॅटमॅनच्या आधी या ओळखीच्या लोकांचा नंबर लागतो. हे तर आमचे हिरोच, असंही त्यांना वाटत असेल.
सोमवारपासून दिल्लीत पेटलेली दंगल गुरूवारी शांत झाली. दिल्लीत झालेल्या या हिंसेच्या आपण अनेक बातम्या वाचल्या. त्याचे अनेक फोटोही पाहिले. कुठल्या धर्माचे किती लोक मेले याच्या चर्चा चघळत आपण त्या दंगलखोरांनाच हिरो बनवलं. पण दुसऱ्याला मदत करणाऱ्यांविषयी आपण फारसं बोललो नाही.
आपल्या माणसांना मदत करताना या हिरोंनी मागचा पुढचा विचार केला नाही. अनेकांनी तर ओळख नसलेल्या माणासालाही मदत केली. आपल्या घरात त्या माणसाला आश्रय देताना या लोकांनी त्या माणसाचा धर्म पाहिला नाही. जात पाहिली नाही की दिसणं पाहिलं नाही. माणुसकी या एकाच कॉमन धाग्यावर फोकस करून दंगलखोरांपासून त्यांचं रक्षण केलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे हे लोक म्हणजे दंगलीचे खरे हिरो आहेत.
हेही वाचा : दंगलीतून वाचण्यासाठी मला गळ्यातली रूद्राक्षाची माळ दाखवावी लागली!
फेसबुकच्या एका वीडियोत स्वराज्य भारत या राजकीय पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी दंगलीतल्या या हिरोंना सलाम ठोकलाय. ‘जेव्हा दंगली किंवा अशी हिंसा होते तेव्हा आपण लगेचच चूक कोणाची हे शोधायला जातो. यानं असं केलं त्यानं तसं केलं म्हणून दंगल भडकली वगैरे बोलत राहतो. नेमकी चूक कोणाची हे शोधणं गरजेचं आहेच. पण त्याचसोबत अशा प्रत्येक दंगलीत लोकांना मदत करणारी अशी काही माणसं, असे काही लोक असतात. त्यांना एकदा तरी सलाम ठोकलाच पाहिजे.’ असं योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.
या वीडियोत यादव तीन लोकांचं खास नाव घेतात. त्यातले एक तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे आहेत. या ओळखीच्या हिरोचं नाव आपण ऐकलं नसेल. पण शाहरूख नावाच्या एक तरूण हातात बंदूक घेऊन रस्त्यावर जातानाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय. त्या फोटोत त्याच्या बंदुकीला सामोरे जाणारे कॉन्स्टेबल दीपक दहिया पाठमोरे दिसतायत.
डोक्यात राग घालून, हातात बंदूक घेऊन रस्त्यावर उतरलेला हा तरूण आपल्यालाही गोळी मारू शकतो याची भीती न बाळगता दीपक दहिया त्याला सामोरे गेले आणि त्याच्या हातातून बंदूक काढून घेतली.
दीपक दहिया ऑन ड्युटी कॉन्स्टेबल होते. पण शिव विहार भागात राहणारे प्रेमकांत बघेल हे तर सामान्य माणूस आहेत. तरीही आपल्या मुस्लिम शेजाऱ्याच्या घराला आग लागलीय, हे दिसताच त्या कुटुंबाला वाचवायला ते आगीत उतरले. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना बाहेर काढल्यानंतर म्हातारी अम्मी घरात पडली होती तिला वाचवायला ते गेले.
या सगळ्या बचावकार्यात प्रेमकांत यांना खूप भाजलं. इतकंच नाही, तर अम्बुलन्स वेळेवर पोचू शकली नाही म्हणून अख्खी एक रात्र त्यांनी घरात तळमळत काढली. आजही ते हॉस्पिटलमधे अडमिट आहेत.
हिंदू मुस्लिम सलोख्याची अशी अनेक उदाहरणं या दिल्लीच्या दंगलीतून दिसली. भागीरथी विहारच्या गल्ली नंबर ४ मधे राहणारे हाशिम साहब, फरीद आणि इरफान हेसुद्धा आपल्या हिंदू भावांसाठी टोळीवर चालून गेले. मुस्लिम दंगलखोरांची टोळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या हिंदूंना मारहाण करायला आली होती. तेव्हा हाशिमजी स्वतः त्यांच्या पुढे गेले आणि त्यांना मारायचं असेल तर आमच्या प्रेतावरून जावं लागेल, अशी ताकीद देऊन दंगलखोरांना परत पाठवलं.
हेही वाचा : खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे?
असे असंख्य हिरो दिल्लीत सापडतील. दंगलीच्या वेळी दिल्लीतच नाही तर शेजारच्या उत्तर प्रदेशमधेही हे हिरो तयार झालेत. उत्तर प्रदेशमधल्या एका एसपीनं तर राज्याच्या सीमा ओलांडत दंगल रोखण्याचा प्रयत्न केला.
गाझियाबाद हे दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरचं एक शहर. तिथे नीरज जादोन हे एसपी म्हणून काम बघतात. बॉर्डरवरच्या एका चेकपॉइंटवर ते गस्त घालत असताना २५ फेब्रुवारीला त्यांना गोळ्यांचे आवाज येऊ लागले. त्यानंतर लगेचच ४०-५० लोकांची टोळी आसपासच्या गाड्यांना आग लावत चालली होती. त्यांच्यातल्या एकानं तर पेट्रोल बॉम्ब घेऊन शेजारच्या घरात उडी मारली. हे पाहून राज्याची सीमा ओलांडत ते त्या दंगलखोरांकडे गेले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागले असं बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं.
‘मी तिकडे जायचं ठरवलं. राज्याच्या सीमा ओलांडून तिकडे जाणं धोक्याचं ठरेल हे माहीत असतानाही मी एकटाच तिकडे निघालो. माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात भीतीदायक १५ सेकंदं होती. नशीबानं माझ्या सगळ्या टीमने माझी साथ दिली. माझ्या वरिष्ठांनीही नंतर माझं कौतूक केलं,’ असं नीरज जादोन या मुलाखतीत सांगत होते.
ईशान्य दिल्लीत राहणाऱ्या मोहिंदर सिंग या सच्च्या खालसानं आपल्या मुलाला सोबत घेऊन ७० ते ८० मुस्लिमांचे प्राण वाचवले. हफपोस्ट या वेबसाईटवर याचा डिटेल वृतांत छापून आलाय.
१९८४ च्या शीख दंगलीची आठवण करून देणाऱ्या घटना दिल्लीत घडत असताना मोहिंदर सिंग आणि त्यांच्या मुलगा इंद्रजित सिंग या दोघांनी आपली स्कुटी आणि बुलेट बाईक बाहेर काढली. आणि आसपासच्या जवळपास ८० मुस्लिमांना त्या गाडीवरून सुरक्षित ठिकाणी हालवलं.
हिंदूबहुल गोकलपुरी भागात या मुस्लिमांच्या जीवाला धोका आहे हे या दोघांनी ओळखलं होतं. तेव्हा आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांपैकी दोघातिघांना गाडीवर बसवून त्यांनी एक किलोमीटर लांब असणाऱ्या करदामपुरी या मुस्लिमबहूल भागात नेऊन सोडलं. साधसं इलेस्ट्रिक्सचं दुकान चालवणारे मोहिंदर तितक्याच साधेपणाने ‘मला हिंदू मुस्लिम दिसत नाहीत. मला फक्त माणसं दिसतात’ असं म्हणतात.
हेही वाचा : दिल्ली दंगलीत काय काय झालं, हिंदू-मुस्लिम नसलेल्या पत्रकाराची आँखो देखी
आपल्या एका कृतीतून, एका वाक्यातून या हिरोंनी जगण्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडलंय. यात फक्त माणसंच नाही तर संस्थांचाही समावेश होतो. दंगलीत सापडलेल्या लोकांसाठी दारं उघडणारे गुरूद्वारे असोत किंवा जखमी झालेल्या माणसांची दिवस रात्र सेवा करणारी हॉस्पिटल आणि त्यातला स्टाफ असो. अशा हिंसक वातावरणातही ग्राऊंडवर जाऊन रिपोर्टिंग करणारा, सत्य दाखवणारा मीडिया असो की रात्री दोन वाजता अम्बुलन्स अडवू नका असा आदेश देणारे हाय कोर्टाचे जस्टिस मुरलीधरन असो, अशी कित्तीतरी उदाहरणं देता येतील.
धर्माच्या, कर्तव्याच्या आणि राज्याच्याही सीमा ओलांडत हे सगळे माणुसकीला गवसणी घालण्यासाठी धावले. दिल्लीतल्या दंगलीचा आपल्या काहीही परिणाम झाला नसला तरीही आपण या सगळ्यांना एक थॅंक्यू म्हणायला हवं.
हेही वाचा :
२९ फेब्रुवारीला जन्मलेल्यांनी बड्डे कधी सेलिब्रेट करायचा?
दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल
ओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला!
सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?