सुखविंदर सिंग सुक्खू : दूधवाला ते मुख्यमंत्री

१३ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे फायरब्रँड नेते समजल्या जाणाऱ्या सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याकडे हिमाचलचं मुख्यमंत्रीपद आलंय. लहानपणी दूध विकणारा बस ड्रायवरचा मुलगा, नेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वीरभद्र सिंग यांच्यासारख्या तगड्या काँग्रेसी नेत्याला भिडण्याची क्षमता त्यांनी दाखवली होती. त्यामुळेच सुखविंदर सिंग सुक्खू यांचं मुख्यमंत्री होणं काँग्रेसचे अनेक ट्रेंड मोडणारं ठरतंय.

८ डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. गुजरातमधे भाजप तर हिमाचलमधे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. गुजरातमधे भुपेंद्र पटेल यांचं पुन्हा मुख्यमंत्री होणं हे जवळपास निश्चित होतं. उत्सुकता होती ती हिमाचल प्रदेशची. इथं प्रतिभा सिंग, सुखविंदर सिंग सुक्खू, मुकेश अग्निहोत्री असे काँग्रेसचे तीन दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण प्रतिभा सिंग आणि सुखविंदर सिंग सुक्खू यांच्यामधेच सर्वाधिक चढाओढ पाहायला मिळाली.

मागची पाच दशकं हिमाचल काँग्रेसचं राजकारण राजघराण्यातून येणाऱ्या वीरभद्र सिंग यांच्याभोवती फिरत राहिलंय. सहावेळा त्यांनी या पहाडी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. त्यांचं खासगी निवासस्थान असलेलं 'हॉली लॉज' हे कायमच हिमाचल प्रदेशचं सत्ताकेंद्र राहिलंय. गेल्यावर्षी वीरभद्र सिंग यांचं निधन झालं. त्यामुळे प्रतिभा सिंग यांच्या रूपाने पुन्हा एकदा 'हॉली लॉज' सत्ताकेंद्र बनेल अशी चर्चा होती. पण काँग्रेस हायकमांडनं सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या बाजूने कौल देत वेगळा डाव टाकलाय.

हेही वाचा: राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग

कॉलेजमधेच राजकारणात एण्ट्री

मागची चार दशकं हिमाचलच्या राजकारणात असलेले सुखविंदर सिंग सुक्खू सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेत. त्यांचा जन्म हिमाचलच्या हमीदपूर जिल्ह्यातल्या शेरा गावात झाला. त्यांना एकूण तीन भावंडं. त्यात सुखविंदर दुसरे. लहानपणी त्यांनी दूध विकण्याचं कामही केलं होतं. त्यांचे वडील हिमाचलची राजधानी असलेल्या शिमला इथं रस्ते आणि वाहतूक मंडळात ड्रायवर होते. त्यामुळे सुखविंदर यांचं एलएलबीपर्यंतचं सगळं शिक्षण शिमलामधेच झालं.

सुखविंदर यांनी सरकारी सेवेत जावं असं त्यांच्या आईला वाटायचं. पण पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्यांची राजकारणात एण्ट्री झाली. काँग्रेसची युवक संघटना असलेल्या एनएसयूआयमधून त्यांनी कामाला सुरवात केली. युवकांचं संघटन बांधलं. कॉलेजमधेच क्लास रिप्रेझेंटेटीव ते महासचिव अशी जबाबदारीही सांभाळली. याच काळात एक तरुण नेता म्हणून सुखविंदर नावारूपाला येऊ लागले.

त्या काळात हिमाचल प्रदेशमधे वीरभद्र सिंग, पंडित सुखराम शर्मा अशा दिग्गज नेत्यांची चलती होती. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सुखविंदर यांच्याकडे १९८८ला एनएसयूआयचं हिमाचल प्रदेशचं अध्यक्षपद आलं. त्यांनी हळूहळू आपला जम बसवायला सुरवात केली होती. शिमला महानगरपालिकेत दोनवेळा नगरसेवक म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती.

युवक आघाडी ते राज्याची विधानसभा

राजकीय क्षेत्रातली दिग्गज मंडळी समोर असतानाही आपलं म्हणणं कोणतीही भीडभाड न ठेवता मांडणं हे त्यांच्या स्वभावाचं मुख्य वैशिष्ट्यं होतं. अशा पार्श्वभूमीवर सुखविंदर युवक आघाडीमधे आपली छाप पाडत होते. त्यांच्यातल्या संघटन कौशल्यामुळे १९९८ ते २००८ या काळात युवक काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. या काळात त्यांनी राज्यभर तरुण कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभं केलं.

हिमाचल काँग्रेसमधे पंडित सुखराम शर्मा आणि वीरभद्र सिंग असे दोन गट होते. असं म्हटलं जातं की वीरभद्र सिंग यांच्यामुळेच केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुखराम यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. सुखविंदर सिंग सुक्खू हे याच सुखराम गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. इतकंच नाही तर सुखविंदर हे सुखराम यांना आपला राजकीय गुरूही मानायचे.

२००३ला त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी हमीदपूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा. याच भागातून सुखविंदर यांनी पहिल्यांदा विजय मिळवला. याच काळात वीरभद्र सिंग यांच्याशी त्यांचे मतभेदही झाले. तरीही २००८ला त्यांना प्रदेश काँग्रेसचं महासचिव करण्यात आलं. पुढं २०१२ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. २०१३ ते २०१९मधे त्यांच्याकडे हिमाचल काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. त्यावेळीही त्यांच्या निवडीला वीरभद्र सिंग यांचा विरोध होता.

हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

प्रियांका गांधींच्या मर्जीतला चेहरा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा राज्यभर नेटवर्क उभं केलं. २००३ नंतर २००७ला ते हमीदपूरच्या नादौन विधानसभा मतदारसंघातून ते निवडून गेले. २०१२ला त्यांचा भाजपच्या विजय अग्निहोत्री यांनी पराभव केला. पण २०१७ आणि आता २०२२च्या विधानसभा निवडणुकीत सुखविंदर पुन्हा एकदा निवडून आले. सुखविंदर यांची ही चौथी टर्म आहे. यावेळच्या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे देण्यात आलं होतं.

१९९८पासून सातत्याने हमीदपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विजय मिळवलाय. हिमाचलचं दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या प्रेमकुमार धुमल यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. धुमल यांचे पुत्र आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. अशा पार्श्वभूमीवर हमीदपूर लोकसभेतल्या १७ पैकी १० विधानसभा मतदारसंघांमधे सुखविंदर यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिलाय.

हिमाचल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी स्वतः लक्ष ठेवून होत्या. त्यांच्या टीमने केलेलं मॅनेजमेंट इथं कामी आलं. सुखविंदर स्वतः प्रचार समितीने अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडेही विशेष जबाबदारी होती. सुखविंदर हे प्रियांका गांधी यांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळे हिमाचल काँग्रेसच्या विधिमंडळ दलाने जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हायकमांडकडे टोलवला तेव्हाच सुखविंदर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं.

ट्रेंड बदलवणारे सुखविंदर

हिमाचल प्रदेशचे निवडणूक निकाल लागले तसे प्रतिभा सिंग आणि सुखविंदर सिंग सुक्खू असे दोन गट काँग्रेसमधे दिसत होते. दोन्हीकडचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करावं म्हणून आंदोलन करताना पहायला मिळाले. प्रतिभा सिंग या स्वतः मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. निवडणूक निकालानंतर त्यांच्यामागे हवंतसं आमदारांचं पाठबळ उभं राहिलं नाही. त्यामुळे काँग्रेस हायकमांडनं सुखविंदर यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. अर्थात त्याला विशेष अशी कारणंही होती.

सुखविंदर हे काँग्रेसच्या तिकीट वाटप समितीचेही सदस्य राहिलेत. त्यामुळे आपल्या अधिकाधिक समर्थकांना तिकीट मिळवून देण्यातही त्यांना यश आलं. हा समर्थकांचा गट अपेक्षेप्रमाणे सुखविंदर यांच्या बाजूने उभा राहिला. हिमाचलच्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांवर नजर टाकली तर हे नेते प्रामुख्याने हिमाचलच्या वरच्या पर्वतीय भागातून आलेले दिसतात. यावेळी शिवालीक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमीदपूरसारख्या मध्य हिमालयीन भागाचा विचार करण्यात आलाय. त्यासोबतच सुखविंदर यांच्या रूपाने राजपूत-ठाकूर असं जातीचं समीकरणही जुळवलं गेलंय.

काँग्रेस आमदारांचं मोठं संख्याबळ आज सुखविंदर यांच्यामागे उभं आहे. आजपर्यंतच्या हिमाचल प्रदेशच्या राजकारणावर 'हॉली लॉज'चा कंट्रोल होता. निवडणुकीच्या प्रचार काळात काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप झालाय. त्यामुळेच आजपर्यंत एका घराण्याभोवती फिरणारा हिमाचलचा रिमोट कंट्रोल काँग्रेस हायकमांडनं आपल्या हाती घेतला. त्याची चुणूक सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या निवडीने काँग्रेसनं दाखवून दिली. आणि जुण्याजाणत्या नेत्यांना योग्य तो संदेशही दिलाय.

हेही वाचा: 

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?