अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील.
पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. राष्ट्रनिर्माती असलेल्या एका प्रजाहितदक्ष शासिकेवरच्या मालिकेचं महत्त्व सर्वार्थानं मोठंय. अठराव्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ प्रशासिका या शब्दात ब्रिटीश पार्लमेंटनं ज्यांचा गौरव केला होता त्या अहिल्याबाई होळकरांवरची ही मालिका म्हणजे त्यांच्याबद्दल दाखवलेली कृतज्ञता आहे. शिवाय त्यांच्या महान कार्याची आठवण आजच्या पिढीला करून देण्याचं काम या मालिकेमुळे होणार आहे.
त्यांच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील. अहिल्यादेवींची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. इतिहासात सखोल जाण्याची नावड असलेल्या या देशानेही तीच त्यांची एकमेव प्रतिमा असल्याचं मानलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचा निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला.
हा समज चुकीचा नव्हता पण त्यांची त्यामागची प्रेरणा चर्चेत आली नाही. त्यामुळे राष्ट्रनिर्माती हे सार्थ बिरूद लोकांमधे पोचलं नाही. त्यापलीकडेही त्या एक कुशल योद्धा होत्या, राजानितीज्ञ होत्या, राज्याचा आर्थिक पाया सुदृढ केल्याशिवाय लोकांचं हित होणार नाही हे समजलेल्या अठराव्या शतकातल्या एकमेव द्रष्ट्या आणि कृतीशील राज्यकर्त्या होत्या. स्त्री आणि जनहिताचे कायदे करणाऱ्या एकमेव शासक होत्या. हे असे आणि इतरही अनेक पैलू जनतेसमोर आले नाहीत. ते या मालिकेमुळे जगासमोर येणार आहेत.
हेही वाचा : राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड
१७३३ मधे अहिल्यादेवींचं लग्न थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला. खंडेराव १७४५ पासून सातत्याने राजपुताना आणि दिल्लीच्या मोहिमांवर असायचे. जयपूर आणि बुंदी इथला वारसाहक्क वाद त्यांनी युद्ध करून सोडवला. दोआबातल्या अनेक युद्धात सहभाग घेतला. दिल्लीच्या पातशाहीच्या रक्षणाचा करार झाल्यानंतर त्यांना दिल्लीच्या रक्षणासाठी नियुक्त करण्यात आलं. १७५३ मधे सुरजमल जाट यांनी दिल्लीवर आक्रमण केल्यावर खंडेराव होळकरांनी फिरोजशहा कोटला इथं त्याचा दारुण पराभव केला आणि त्याला पळवून लावलं.
बादशहाने जाटांचा पाठलाग करायचं सुचवलं. त्यासाठी खंडेराव यांची मिन्नतवारी केली. पण पित्याच्या आदेशाशिवाय आपण दिल्ली सोडू शकत नाही असं खंडेराव यांनी उत्तर दिलं. बादशहाने त्यांना आपलं ऐकायला लावण्यासाठी खिल्लत देण्याचा प्रयत्न केला. खंडेराव यांनी बादशहाला तलवार आपल्या कमरेला बांधायला सांगितली. तसं केलं असतं तर बादशहाला वाकावं लागलं असतं. त्यामुळे बादशहाची पंचाईत झाली. खंडेराव खिल्लत न स्वीकारता निघून गेले.
पण जाटांच्या कारवाया वाढल्यावर मल्हाररावांनी खंडेरावला जाटांचा बिमोड करण्याची आज्ञा दिली. खंडेराव अवघे दोन हजार सैन्य घेऊन निघाले. जाटांचा प्रदेश उध्वस्त केला. घाबरलेले जाट कुंभेरीच्या किल्ल्यात लपले. तिथंच कुंभेरीचा जगप्रसिद्ध वेढा सुरु झाला.
या किल्ल्याची तटबंदी उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात खंडेराव यांना तोफगोळा लागला. एका वीर सेनानीचा त्यात मृत्यू झाला. अहिल्याबाई सती जायला निघाल्या होत्या. पण मल्हाररावांनी आर्त टाहो फोडत, 'आता तूच माझी खंडेराव. राज्याला तुझी गरज आहे.' अशी विनवणी केली. अहिल्याबाईंनी सती जायचा विचार रद्द केला.
मल्हारराव अहिल्याबाईंचे खऱ्या अर्थाने गुरु, मार्गदर्शक बनले. राजकारणात त्यांना कुशल बनवलं. त्या शस्त्रकुशल तर होत्याच. मल्हारराव सतत वेगवेगळ्या युद्धमोहिमांवर असायचे. त्यांना रसद पुरवण्याची जबाबदारी अहिल्याबाईंवर होती. या कामात गोहदच्या सुभेदाराने अडथळा आणणं सुरू केलं. अहिल्याबाईंनी त्याच्यावर स्वारी केली. तिथला किल्ला उद्ध्वस्त करून त्याचा पराभव केला आणि दिल्लीकडे जाणारा राजमार्ग सुरक्षित केला. माळव्याचा कारभार त्यांच्या हाती आला. इंदूर हे एक छोटं खेडं व्यापारी राजधानीत बदललं.
या काळातलं त्यांचं महत्वाचं काम म्हणजे त्यांनी महिलांना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. हा भारतातलाच नाही तर जगातला स्त्रीमुक्तीचा पहिला जाहीरनामा होता. त्या नुसतं प्रशिक्षण देऊन थांबल्या नाहीत. तर पाचशे महिलांचं सैन्य उभं केलं. राघोबादादा पेशव्याला अहिल्याबाई सडेतोड प्रतुत्तर देत माघार घ्यायला लाऊ शकल्या त्या आपल्या या महिला लष्करी सामर्थ्याच्या बळावर!
हेही वाचा : पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी
पुढे मल्हाररावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंचा एकुलता मुलगा मालेराव याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अहिल्याबाई डिसेंबर १७६७ मधे गादीवर आल्या. एक महिला शासक बनणं सनातन्यांना पचणारं नव्हतं. पण अहिल्याबाई खंबीरपणे सगळ्या कट कारस्थानांना पुरून उरल्या. आणि माळव्याच्या इतिहासातला एक दैदिप्यमान कालखंड सुरू झाला. कोणाच्या हातून काही काढून घेतलं तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिलं.
भिल्ल समाज त्या काळात यात्रेकरुंना लुटून उदरनिर्वाह चालवायचा. अहिल्यादेवींनी त्यांचं मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. यात्रेकरुंकडून भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. त्यांना कसायला जमिनीही दिल्या. हुंडा प्रथेवर त्यांनी बंदी तर आणलीच पण त्या काळातल्या निपुत्रिक विधवा स्र्त्रियांच्या विरोधातले कायदे रद्द केले. अहिल्यादेवींचं प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होतं. समाजातल्या सगळ्या घटकांना समान न्याय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना कमी प्रमाणात आणि समानतेच्या तत्वावर ठेवली होती. इंग्रजांनी आपली सत्ता देशात आल्यावर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली. राज्यातला व्यापार वाढावा यासाठी भरपूर कष्ट घेतले. महेश्वरला वीणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिलं. ते इतकं यशस्वी ठरलं की, माहेश्वरी साड्या आणि इतर कपड्यांनी भारतीय बाजारपेठ व्यापली. आजही ती ओळख पुसलेली नाही.
इंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचं मत आणि धोरण दूरदृष्टीचं होतं. १७७७ साली पेशव्याला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, 'इंग्रज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करुन मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याच्या तोंडावरच आघात करावा लागतो.' सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महत्त्वाचं काम हाती घेतलं ते म्हणजे देश जोडण्याचं. त्यांना राष्ट्रनिर्माती म्हटलं जातं ते त्यामुळेच. अहिल्यादेवींनी देशभर केलेली कामं आजही प्रेरक आहेत.
खरंतर शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या भारताला त्यांनी मंदिरं, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचं अचाट काम केलं. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतानाही त्यांनी फक्त आपल्या होळकर संस्थानाचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षिणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या भागात आपली कामं केली. त्याबद्दल त्यांचा आजही सन्मान केला जातो आणि त्यांना त्यासाठी 'राष्ट्रमाता' म्हटलं जातं.
पण इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेला भाग म्हणजे बहुसंख्य भागातले राज्यकर्ते मुस्लिम असतानाही अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरं उभारायच्या परवानग्या कशा मिळवल्या हा. यातली काही मंदिरं इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केली होती. त्याच्याजवळ अहिल्यादेवींनी काही मंदिरं उभी केली. त्यावेळीही राज्यकर्ते मुस्लिमच होते. केवळ पैशाच्या जोरावर आणि दानशूरता, धार्मिकता आहे या बळावर ही मंदिरं उभारणं अशक्य होतं हे उघड आहे.
हेही वाचा : आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?
आपल्या शासनकाळात त्यांनी एका महिलेचं शासन कोण स्वीकारतो असे उद्दामपणे म्हणणाऱ्या रामू-याच्या जहागीरदारावर स्वत: स्वारी करत त्याला यमसदनाला पाठवलं. या कृतीनं पुणे दरबारही चकीत झाला. 'ही फक्त साध्वी नाही. ही तर रणरागिणी.' या शब्दात नाना फडणविसानी त्यांचा गौरव केला. अहिल्याबाईंच्या थोर व्यक्तित्वाचे असंख्य पैलू आहेत.
आता त्यांच्यावरच्या मालिकेमुळे ते रोज समोर येत राहतील. दशमी प्रोडक्शनने या मालिकेची अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात निर्मिती केलीय. ही मालिका जेवढी अहिल्याबाईंची आहे तेवढीच त्यांना घडवणाऱ्या थोर मल्हाररावांची आणि त्यांच्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या राजनीती आणि युद्धकुशल खंडेराव यांची आहे. राष्ट्र निर्माण करणारी, स्त्रियांना आत्मभान देणारी आणि प्रसंगी शस्त्रही उचलणारी अशी दुसरी महिला या देशात झाली नाही. त्यामुळे ही मालिका आजच्या पिढ्यांना आत्मभान देणारी ठरेल.
हेही वाचा :
सरकारी अधिकारी का व्हायला हवं?
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे
(लेखक ज्येष्ठ इतिहासकार आहेत.)