महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं.
काही व्यक्तींनी समाजजीवनात आणि सामाजिक सुधारणेत भरीव योगदान देऊनही त्यांच्याविषयी जनमानसात कमी माहिती आहे. असे अनेक नायक काळाच्या पडद्याआड अक्षरशः गडप झाले. त्यांच्या वैचारिक आणि कौटुंबिक वारसदारांचंही अशा नायकांच्या कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष झालं. त्यांच्या कार्याचा परिचय होणारी माहिती किंवा चरित्रंही लिहिली गेली नाहीत. असं काम करणाऱ्या लोकांच्या यादीत पुण्यातल्या गंगारामभाऊ म्हस्के यांचा समावेश होतो.
नाशिक जिल्ह्यातल्या रंगराव ओढे खेडेगावातून म्हस्के कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी १८३३-३४ ला पुण्यात स्थलांतर केलं. याच कुटुंबातल्या गंगारामभाऊंनी उच्चशिक्षण घेतलं. ज्या समाजात आपण वाढलो, घडलो त्या समाजाचं काहीएक देणं लागतो या भावनेतून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ही सर्व कामं नोकरी करत केली.
सुरवातीच्या काळात महात्मा जोतीबा फुलेंच्या कार्यात सामील होऊन लोकांच्या मनातला अज्ञानरुपी अंधःकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे सत्यशोधक समाजाला मदत केली. महात्मा जोतीबा फुलेंनी सुरू केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीमधे त्यांचा मोठा वाटा होता.
तसंच त्यांनी शिक्षण संस्थांची स्थापना केली. वाचनालय, सार्वजनिक बाग, ड्रेनेज सिस्टीम, दुष्काळग्रस्त लोकांना मदत, टाऊन हॉल, धर्मशाळा बांधणं अशी अनेक लोकोपयोगी कामं केली.
हेही वाचा: परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण
एवढी कामं करून गंगारामभाऊ थांबले नाहीत. त्यांनी नोकरीचा राजीनामा देत वकिलीचा अभ्यास केला. वकिलीच्या माध्यमातून जनसेवा सुरू केली. अनेक राष्ट्रीय नेत्याचे खटले चालवले. त्यात त्यांना न्याय मिळवून दिला. अशी कामं करत असताना त्यांना समाजोन्नतीसाठी शिक्षण महत्त्वपूर्ण वाटत होतं. त्यासाठी त्यांनी काही विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शिष्यवृत्ती देणं सुरू केलं. या मदतीच्या मर्यादा त्यांच्या लगेच लक्षात आल्या.
ही मदत मोठ्या प्रमाणात सुरू करण्यसाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू करणं गरजेचं वाटल्याने त्यांनी १८८३ ला ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन केली. पुढे न्यायमूर्ती रानडे आणि इतर मित्रांच्या मदतीने या संस्थेला बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांचा राजाश्रय मिळवला.
संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेकांना शिष्यवृत्ती दिली. या शिष्यवृत्तीतून शिक्षण घेतलेल्या तत्कालीन पदवीधरांनी आपापल्या भागात शिक्षण संस्था सुरू केल्या. शिष्यवृत्ती घेतलेल्यांमधे महर्षी वि.रा. शिंदे, कोल्हापूर संस्थानातले भास्करराव जाधव, दाजीराव विचारे यांचा समावेश होता. ही नावं बरीच मोठी आणि सर्वक्षेत्रीय व्यापक आहे.
गंगारामभाऊंमुळे अनेकांना शिक्षण घेता आलं. महात्मा जोतीबा फुले, महाराजा सयाजीराव, राजर्षी शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले अशा एकापेक्षा एक समाजधुरिणांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
ही सगळी मंडळी अडचणीच्या वेळी त्यांचा सल्ला घेत होती. त्यामुळे एवढा मोठा वैचारिक आणि सामाजिक पैस असणाऱ्या गंगारामभाऊ म्हस्के यांच्याविषयी जनमानसात कमी माहिती होती. ही कमतरता अलीकडेच ‘महानायक गंगारामभाऊ म्हस्के’ या चरित्राने डॉ. राजेंद्र मगर यांनी भरून काढली आहे.
हे चरित्र लिहिण्याचं धाडस करणं ही सोपी गोष्ट नव्हती. कारण चरित्र नायकाचा मृत्यू होऊन जवळपास १२० वर्षे होऊन गेली होती. चरित्रासाठी आवश्यक असणारी अत्यावश्यक साधनसामग्री मिळणं दुरापास्त होतं. पण चरित्रकारांनी दुर्मिळ साधनसामग्रीचा शोध घेत अत्यंत चिकाटीने हे चरित्र साकारलंय.
गंगारामभाऊंनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे अहवाल, इतिहास आणि त्या संस्थेची आजची परिस्थिती याविषयी माहिती जमा करून त्यासंबंधीचं निवेदन केलंय. यातून गंगारामभाऊंचं अफलातून व्यक्तिमत्त्व समजतं.
हेही वाचा: डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?
गंगारामभाऊंनी सत्यशोधक समाजाला केलेली मदत, महात्मा जोतीबा फुलेंशी त्यांचा असलेला स्नेह, राष्ट्रीय सभा स्थापनेतला त्यांचा सहभाग, राष्ट्रीय सामाजिक परिषद, पब्लिक सर्विस कमिशनमधे दिलेली साक्ष, प्लेगच्या साथीत लोकांना केलेली मदत, द नॅशनल इंडियन असोसिएशन मधला सहभाग, आर्थर कॉफर्ड कमिशनमधला सहभाग अशा अनेक राष्ट्रीय स्तरांवरच्या कामात त्यांचा असणारा सभाग हा सर्व या चरित्राचा गाभा आहे.
चरित्रात गंगारामभाऊंच्या कौटुंबिक जीवनाविषयी कमी माहिती आली आहे; तरीसुद्धा त्यांच्या सर्वव्यापक क्षेत्रातल्या व्यापक परिचयामुळे लेखक प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे ‘कार्यात्मक चरित्र’ खरोखरच सत्यनिष्ठ आणि तटस्थ झालंय. चरित्र नायकाच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत क्रमाक्रमाने सामान्य ते असामान्य असा जीवनप्रवास अगदी अलगदपणे चरित्रकारांनी उलगडला आहे.
यात जास्त भाग डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचा असला तरी या संस्थेच्या माध्यमातून गंगारामभाऊंनी जास्त काम केलं त्यामुळे त्याविषयी माहिती येणं साहजिक आहे.
गंगारामभाऊ म्हस्केंची महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ओळख करून देण्याचं श्रेय बाबा भांड यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतले संशोधक डॉ. राजेंद्र मगर यांनी केलंय. साधनसामग्रीची प्रचंड उणीव खांद्यावर घेवून डॉ. मगर यांनी संदर्भ साधनांची जुळणी करून मराठी चरित्र साहित्याला ऐतिहासिक योगदान दिलं.
अशा प्रसिद्धीविन्मुख राहिलेल्या गंगारामभाऊ म्हस्के यांच्या चरित्रात सतरा प्रकरणं, सात परिशिष्टं आणि एकोणीस फोटो आहेत. चरित्राला आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांनी युक्त असं हे चरित्र एकदा वाचायला हवं.
पुस्तक - महानायक गंगारामभाऊ म्हस्के
लेखक - डॉ. राजेंद्र मगर
प्रकाशक - महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
पानं - २३२, किंमत - २५०
हेही वाचा:
'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?
व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!