कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

१७ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत.

चीनमधल्या वुहान शहरातून कोरोना वायरसची निर्मिती झाल्याचं म्हटलं जातं. तोही नेमक्या लुनार न्यू इयरच्या सुट्ट्या सुरू असतानाच. या सुट्ट्यांसाठी जगभरातले प्रवासी इकडून तिकडे फिरत असतात. त्यामुळे कुणाला काही समजायच्या आतच हा वायरस वुहानमधून बाहेर पडून सगळ्या जगभर पसरला.

आज जगभरातल्या जवळपास दीडशे देशात कोरोना वायरस जाऊन पोचलाय. दक्षिण कोरिया, इटली या देशांत तर कोरोना वायरसने हाहाकार माजवलाय. आता भारतातही हा वायरस धडकी भरवतोय. पण गंमत म्हणजे, चीनच्या शेजारीच असेल्या तैवान नावाच्या देशात मात्र या वायरस तग धरू शकलेला नाही.

हेही वाचाः सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?

चीन आणि तैवानचं का बिनसलं?

तैवान हा चीनच्या दक्षिणेला असणारा छोटासा देश आहे. साधारण हजार चौरस किलोमीटर एवढीच त्याची लांबी असेल. अंदाजे २३ मिलियन लोकसंख्येचा. यात तैवानचे मूळ रहिवासी आणि काही मंगोलियन लोकांचाही समावेश होतो. तैवानच्या नागरिकांची चीनमधे सतत ये जा असते. जगभरात तैवानला आयलॅण्ड तर चीनला मेनलॅण्ड असं म्हटलं जातं. तैवानचं जगाच्या दप्तरी नावही रिपब्लिक ऑफ चायना असंच घेतलं जातं.

साधारण १९४९ पर्यंत तैवानवर चीनचं राज्य होतं. चीनी कम्युनिस्ट पार्टी तैवानवर आपला हक्क सांगत असे. पण १९४९ मधे चीन आणि तैवानमधे यादवी युद्ध झालं. त्यानंतर तैवान बाहेर पडला आणि तिथल्या नागरिकांनी लोकशाही स्वीकारली. मात्र आपल्याइकडे अखंड भारताचा घोष केला जातो, तसंच तिकडे वन चायनाच्या घोषणा देत तैवानला आपल्यात सामावून घ्यायची चीनची अजूनही इच्छा आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचं वर्चस्व आहे. त्यामुळेच अनेक जागतिक संस्थांमधे चीन तैवानला येऊ देत नाही. याचाच परिणाम म्हणून तैवान आजपर्यंत डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचाही सदस्य बनू शकला नाही, अशी माहिती द डिप्लोमॅट या वेबसाईटवर देण्यात आलीय.

तैवानमधे फक्त ५० कोरोनाग्रस्त

डब्ल्यूएचओकडून अजूनही तैवानला चीनचा भाग म्हणूनच ट्रिट केलं जातं. यामुळे मध्यंतरी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी डब्लुएचओवर टीकाही केली होती. कोरोनाची लागण झालेल्या देशांचा नकाशा बनवताना डब्लुएचओनं चीनचा भाग म्हणून तैवानचाही त्यात समावेश केला होता. डब्ल्यूएचओनं असं केल्यानं पाश्चिमात्य देशांनी जर कोरोनापासून बचावासाठी चीनवर बंदी घातली तर त्यात तैवानचीही नाहक फरफट होईल, असं तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी सुनावलं होतं.

आता आरोग्य आणीबाणीच्या काळात स्वतंत्र ओळख आणि डब्लुएचओची साथ नसतानाही देशातली कोरोना रूग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात तैवानला यश आलंय. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना जगभर पसरायला सुरवात झाली तेव्हा चीननंतर सगळ्यात जास्त रूग्ण तैवानमधेच आढळतील असा अंदाज बांधण्यात आला होता. पण चीनमधे आत्तापर्यंत ८० हजार लोकांना लागण झाली असताना तैवानमधे कोरोनाचे फक्त ५० रूग्ण आढळलेत.

भारतात सध्या १०० पेक्षा जास्त रूग्ण कोरोनाग्रस्त आहेत. म्हणजेच तैवानच्या दुप्पट. त्यामुळे भारताला कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर आपण तैवानकडून काहीएक धडा घ्यायला हवा.

हेही वाचाः तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

१८ वर्षांपूर्वीच केली पूर्वतयारी

खरंतर, अशा जागतिक साथीची तयारी तैवानने १८ वर्षांपूर्वीच सुरू केली असल्याचं वृत्त तैवान न्यूज या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलंय. ‘२००२ आणि २००३ मधे सार्सचा प्रसार होऊ लागला होता तेव्हाच तैवानने नॅशनल हेल्थ कमांड सेंटरची स्थापना केली. पुढच्या काळात अशी परिस्थिती आली तर त्याचा सामना करण्यासाठी केलेली ही पूर्वतयारी होती.’ असं या बातमीत म्हटलंय.

चीनमधे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यावर लगेचच तैवाननं चीन, हाँगकाँग आणि मकाऊवरून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली. इतकंच नाही तर तोंड झाकण्यासाठी लागणाऱ्या सर्जिकल मास्कच्या निर्यातीवरही लगेचच बंदी घातली. देशात या मास्कचा तुटवडा जाणवू नये म्हणून ही बंदी होती.

कोरोनासाठी नव्या अ‍ॅपची निर्मिती

उपलब्ध साधनसंपत्तीचा तैवान सरकारनं खूप विचारपूर्वक वापर केला. ‘विमा कंपन्या, स्थलांतरण विभाग आणि कस्टम डाटा यांचं एकत्रीकरण केलं गेलं. लोक कुठे कुठे प्रवास करतायत याची सगळी माहिती म्हणजेच ट्रॅवल हिस्ट्री विचारात घेऊन कुठल्या कुठल्या नागरिकांना लागण होऊ शकते याची माहिती काढली गेली,’ असं स्टॅन्फोर्ड युनिवर्सिटीतल्या डॉक्टर जेसन वॅंग यांचं म्हणणं डीडब्ल्यू न्यूजच्या वेबसाईटवर प्रकाशित झालंय.

‘बाहेरून येणाऱ्या लोकांची आरोग्याविषयक माहिती गोळा करण्यासाठी तात्काळ एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आलं. त्यातला क्यूआर कोड स्कॅन करून माहिती भरली की सगळा डेटा सरकारजमा राहात होता. त्यामुळे कुणामधे कोरोनाची लक्षण दिसली तर त्याच्यावर लक्ष ठेवणं कस्टम अधिकाऱ्यांना सोप्पं गेलं,’ अशी माहिती वॅंग यांनीच दिलीय.

हेही वाचाः कोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू

खरं श्रेय नागरिकांचं!

गेल्या काही वर्षांपासून तैवानमधे बायोमेडिकल रिसर्च म्हणजे जैववैद्यकशास्त्रातल्या संशोधनावर प्रचंड पैसा खर्च केला जातो. अनेकजण यात गुंतवणूक करतात. कोरोना वायरसच्या बाबतीतही सरकारने लोकांना लागण झालीय की नाही हे तपासण्यासाठी लगेचच लॅब चालू केल्या. आता ही टेस्ट लवकरात लवकर होऊन रूग्ण कोरोना पॉझिटीव आहे की नाही हे २० मिनिटांत कळावं यासाठी तैवानमधे प्रयत्न चालू आहेत.

नव्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तैवान सरकारनं कोरोनाला सध्या तरी यशस्वीरित्या रोखून धरलंय. फक्त सरकारच नाही तर तैवानमधल्या नागरिकांनाही याचं पुरेपूर श्रेय जातं. सरकारने सांगितलेल्या सूचना आणि आदेशांचं नागरिकांनी वेळोवेळी पालन केलं. त्यामुळेच हे शक्य झालंय.

तैवान बरोबरच सिंगापूर, मलेशिया हे देश अत्यंत समंजसपणे कोरोनाचा सामना करत आहेत. भारताच्या तुलनेत हे देश लहान असले आणि त्यांची लोकसंख्या कमी असली तरी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे, एवढं नक्की!

हेही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार 

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?