इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

१८ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


निसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत.

सोनिया शाह या अमेरिकेतल्या शोधपत्रकार. सायन्स रिपोर्टींग हे त्यांचं क्षेत्र. ४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मधे त्यांचं 'द पॅंडेमिक' हे साथरोगांचा मागोवा घेणारं पुस्तक आलं. इसवीसन पूर्व काळात आलेल्या कॉलरापासून ते २०१५ मधे आफ्रिकेत आलेल्या इबोला वायरसपर्यंत साथरोगाचा सगळा इतिहास त्यांनी या पुस्तकात दिलाय. त्यांचं हे पुस्तक बाजारात आलं तेव्हा पुढचं जागतिक संकट हे झिका वायरसचं असेल अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांना वाटत होती. मात्र, हा अंदाज साफ खोटा ठरवत एक नवीनच वायरस तयार झाला आणि आज त्याने सगळ्या जगाला पछाडलंय. तो वायरस म्हणजे कोरोना वायरस.

सीएनएन या अमेरिकन न्यूज चॅनेलवर आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार पत्रकार फरीद झकेरिया ‘ऑन जीपीएस’ नावाचा साप्ताहिक कार्यक्रम करतात. या कार्यक्रमात झकेरिया यांनी सोनिया शाह यांची छोटेखानी मुलाखत घेतली. सीएनएनच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या या मुलाखतीत सोनिया शाह यांची मुलाखत घेण्यात आलीय. या मुलाखतीत सोनिया शहा यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे.

हेही वाचा : फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल

१. वायरससाठी जग इतकं अनुकूल कसं?

कोरोनापूर्वी अनेक वायरस येऊन गेलेत. स्वाईन फ्लू, प्लेग, झिका असे अनेक जागतिक आजार आपण पाहिलेत. हे नव्याने निर्माण होणारे आणि आधीच अस्तित्वात असलेले पण पुन्हा पुन्हा डोकं वर काढणारे वायरस हे प्राण्यापासून विशेषतः जंगली प्राण्यांपासून निर्माण झालेत. प्राण्यांच्या शरीराशी आपला संपर्क येण्याचे मार्ग बदलत असल्याने असं होतंय.

आपण वन्यजीव अधिवास नष्ट करत सुटलोय. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी जवळपास निम्मी जमीन आपण आपली घरं, शहरं, खाणी, शेतं इत्यादी गोष्टींसाठी वापरलीय. वन्य प्राण्यांसाठी राहण्यायोग्य जागा फार कमी उरलीय. त्यामुळे जैवविविधेतवरही संकट आल्याचं आपण वाचलं असेल. प्राणी, पक्षी, किटक, किडे, सरपटणारे प्राणी यांच्या जुन्या, दुर्मिळ प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा १५० प्रजाती आपण दररोज गमावतो. त्यामुळेच नव्या वायरससाठी हे जग जास्त अनुकूल बनत चाललंय, असं शाह सांगतात.

हेही वाचा : एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

२. पक्षी दुर्मिळ झाल्यानं वायरसचा प्रसार

वेस्टनाईल सॅम्पल हा वायरस गेल्या काही वर्षांपासून आपल्याला छळतोय. आता जैवविविधता कमी झाल्यामुळे हा वायरस आधीपेक्षा जास्त प्राणघातक झालाय. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील.

हा वेस्टनाईल वायरस प्रामुख्याने आफ्रिकेतून स्थलांतरीत झालेल्या पक्षांमधून आला. हे पक्षी आफ्रिकेतून स्थलांतर करून उत्तर अमेरिकेच्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी येऊन राहत असत. गेली शेकडो, हजारो वर्ष हे स्थलांतर होत असेल. पण १९९९ च्या आधी कधीही या वायरसचं संक्रमण अमेरिकेतल्या माणसांमधे झालं नाही. का?

कारण अगदी २०, ३० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे भरपूर प्रजातीचे पक्षी होते, हे त्याचं एक कारण असू शकेल. सुतारपक्षी, रेल्सपक्षी अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आपल्या राष्ट्रीय पक्ष्यांच्या मोजणीत येत असतं. वेस्टनाईलसारख्या वायरसला माणसांपासून दूर ठेवण्याचं काम या पक्ष्यांमुळे आपोआप होत होतं.

पण गेल्या ५० वर्षांत आपण पक्ष्यांच्या बाबतीतली ही जैवविविधता पुष्कळ प्रमाणात गमावली. सुतार पक्षी, रेल्स पक्षी आता खूप दुर्मिळ झालाय. त्याऐवजी आपल्याला रॉबिन म्हणजे दयाळ पक्षी किंवा कावळे सर्वत्र दिसतात. हे पक्षी वातावरण कितीही खराब झालं तरी जगू शकतील असे आहेत. आपल्याकडे आता तेवढेच पक्षी राहिलेत. सुतारपक्षी, रेलपक्षी हे वेस्टनाईल सारख्या वायरसला लांब ठेवणारे वायरस आहेत तसे रॉबिन, कावळे हे पक्षी वायरसला माणसापर्यंत पोचवणारे पक्षी आहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

३. कोरोना वायरसनंतर जग शहाणं होईल?

कोरोना वायरस नेमका कशामुळे आला आणि कशामुळे तो जगभर पसरला या प्रश्नांची उत्तरं आपण काय देतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. हा वायरस म्हणजे बाहेरचं काहीतरी, माणसाचं नियंत्रण नसलेला आणि बिचारा माणूस म्हणजे त्याची शिकार, असं आपण म्हणणार असू तर जगात काही मुलभूत बदल होतील, अशी आशा मला वाटणार नाही.

आपण या संसर्गजन्य रोगांचा इतिहास पाहिला तर आपली चीडचीड होते. कितीही मोठी साथ आली तरी आपण स्वतःला, समाजाला बदलायचं नावच घेत नाही. आपण अमेरिकेत आता मलेरियामुक्त झालोय. पण ही मुक्ती कशी मिळवायची हे माहीत असूनही आपण मलेरियासोबत शेकडो वर्ष झुंजत राहिलो. आताही, आपण काही प्रयत्न केले म्हणून मलेरिया गेला असं झालं नाही. तर दक्षिण अमेरिकेतल्या ग्रामीण भागात वीज पुरवठा केल्यामुळे मलेरिया कमी झाला. हेच कॉलरा आणि इतर आजारांबद्दलही झालं. आपण अपघाताने त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकलो.

त्यामुळे या कोरोना वायरसनंतर जग बदलेल, शहाणं होईल ही अतिशोयक्ती आहे. याचा प्रसार कमी झाला, एखादं औषध मिळालं, एखादी लस निघाली, या वायरसला परिघावरच्या लोकांच्या अंगावर ढकलण्यात त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडून त्यांचं घेट्टोआयझेशन करता आलं की पुन्हा सगळं पहिले पाढे पंचावन्न सुरू होईल. साथरोगांचा आजपर्यंतचा इतिहास आपल्याला तेच सांगतो. आपण सहज करू शकतो तो सामाजिक बदल आजपर्यंत केलेला नाही.

हेही वाचा : संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?

४. याआधीही दिलेला इशारा

२०१६ मधे पॅंडेमिक हे पुस्तक प्रकाशित झालं. तेव्हा सोनिया शहा ऑन जीपीएस या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी नवा साथरोग पसरू नये यासाठी आपण काय करायला हवं, असा प्रश्न झकेरिया यांनी विचारला.

त्यावर आपण आत्तापासून एकत्र येऊन काम करायला हवं, असं सोनिया शाह म्हणाल्या होत्या. आपल्याला पशुवैद्य, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ आणि आपले जैववैद्यकीय तज्ञ यांची गरज आहे. या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं आणि नवा दृष्टीकोन घेऊन उभं राहण्याची गरज आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी २०१५ मधेच कोरोनासारख्या साथीचा इशारा दिला होता. पण तो कुणीही मनावर घेतला नाही. तसंच सोनिया शाहांचं म्हणणंही कुणाला महत्त्वाचं वाटलं नाही.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट