पुस्तक माणसाला कसं घडवतं?

२३ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट.

माझ्या आठवणीतलं पहिलं दृश्य आई पुस्तक वाचतानाचं आहे. माझं वय ४ वर्षांचं होतं. मला आणि मोठ्या बहिणीला आई मिशनरीनं ख्रिस्ती धर्म प्रचारासाठी काढलेल्या छोट्या चित्रांच्या पुस्तकातून आई येशूचा संदेश वाचून दाखवत होती. मुंबईच आईचं दुसरं माहेर, इथंच ती दुसरी शिकली, तिला गाणं गाता यायचं. मुंबईतून ती कायमस्वरुपी आमच्याच घरी आली. आमच्या पिढीजात दारिद्र्यानं तिला शेतमजूर केलं.

शाळा सुरु झाल्यावर

इथं कांबळे गुरुजींची रात्रीची प्रौढ शाळा होती. नाव घालण्यापूर्वीच तिनं मला धुळाक्षरं, बाराखडी आणि शंभरपर्यंतचे पाढे शिकवलेले. पहिलीत मी हुशार होतो. आई माझा शाळेचा अभ्यास जवळ बसवून घ्यायची. ती म्हणायची, वाचन हे पोहण्यासारखं असतं. पहिलीच्या वर्गात मला सातवीतला धडा वाचता यायचा.

कुठल्याशा अपघातानं माझे वर्गशिक्षक आय. ए. पाटील एका डोळ्यानं आंधळे झालेले पण ते चालतानाही पुस्तक वाचत. सातवीपर्यंतची इंटरच्या त्यांच्या अभ्यासक्रमातली सर्व पुस्तकं त्यांनी वाचून दाखवलेली. मर्चंट ऑफ वेनिस, अॅनिमल फार्म, शाकुंतल या प्रसिद्ध पुस्तकांचं वाचन ते करायचे. त्यावेळी आम्ही पारायणाला आलेल्या श्रोत्यांसारखे ते ऐकायचो. 

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

पाटील गुरुजींनी वाचायला प्रोत्साहन दिलं

पाटील गुरुजींचा वाचन लेखनावर त्यांचा प्रचंड जोर. २५ पानं वाचली म्हणजे एक तास झाला असं त्यांचं मत. रात्रीच्या तासाला ते विचारात आज दिवसभरात किती पानं वाचली. सलग वाचण्याच्या सरावानं मराठीत अनुवादित झालेल्या डोस्टोव्हसकींची अपराध आणि दंड, कारमाझाप बंधू, इडियट, मॅक्झिम गोर्कींची मदर, शरदचंद्र चॅटर्जींची चरित्रहीन, शोलोखाची डॉन माय, संथ वाहते तसंच दोन खंडातली सुनील गंगोपाध्यायांची पहिली जाग, रशियन लेखक फेदीनची अग्नेय वर्ष अशा मोठ मोठ्या कादंबऱ्या वाचायला मला त्रास झाला नाही. 

मी पाटील गुरुजींचा विद्यार्थी. त्याकाळी पाचवी ते सातवी या तीन वर्षात एका शिक्षकाच्या हाती असायची. त्यामुळं एक भावनिक आणि कौटुंबिक नातं बनलेलं जे आजूनहू टिकलंय. जगण्याच्या संघर्षात त्यांचा एकही विद्यार्थी फारसा फेल गेलेला मी बघितलेला नाही

माझं फिरतं वाचनालय

साधारणत: चौथीला असताना मी कविता करायला लागलो. श्यामची आई आणि साने गुरुजींनी अनुवाद केलेली जगातली चांगली पण छोटी पुस्तकं या काळात वाचीत होतो. 

राम गायकवाड नावाचा माझा एक सातवील असलेला लांबचा मावसभाऊ. त्यालाही वाचनाची आवड होती, त्याचं वाचून झालं की ते पुस्तक तो मला द्यायचा. अजून एक लोहार नावाचा मुलगा. कुठून कुठून मिळालेली पुस्तकं आम्ही एक दुसऱ्याला द्यायचो साखळी पद्धतीचं ते आमचं फिरतं वाचनालय. 

हेही वाचा: आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

आमच्या गावात मात्र कसलंही वाचनालय नाही. वाईट वाटतं. नंतर समाजप्रबोधन नावाचं माझ्या पुढाकारानं एक संघटन तयार केलं. पण ही खूप उशिरानंतरची गोष्ट. तेव्हा मी तरुणांकडून जाणीवपूर्वक काही पुस्तकं वाचून घेतली. माझा मित्र जे. एस. पाटील यालाच फक्त वाचनाची आवड राहिली. अजून एक तरुण रिक्षा ड्रायवर त्याला खरंच खूप वाचनाचं वेड. बऱ्याच कादंबऱ्या माझ्याकडून घेऊन त्यानं वाचल्यात. वाचनाची आवड जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते. 

गावात पुस्तक विकत घेऊन वाचण्याची क्वचितच कोणाची मानसिकता असेल. त्यासाठी कोणाच्याही मालकीचं नसलेलं सार्वजनिक वाचनालय हवंच. 

वाचन ही वडलोपार्जित इस्टेट

माझे वडील मुंबईला. सुटीसहामाशीच ते घरी येत. गिरणी कामगार होते. वडिलांना वाचनाची आवड. वाचनाची माझ्या घरात आधीच शिक्षण का असेना एक परंपरा होतीच. वडील मामा वरेरकरांची धावता धोटाम ही कादंबरी वाचीत होते. जाताना ते घरी विसरून गेले. शरदचंद्र चॅटर्जी हे त्यांचे आवडते लेखक. माझा सुरवातीपासून जगभरातले अनुवादित केलेलं साहित्य वाचणं हा लहानपणीच विकसित झालेला कल असावा. 

मुंबईतल्या वा. वि. भटांच्या अभिनव प्रकाशनाच्या पुस्तकांच्या दुकानात जात थोरल्या मामासोबत चोखा कांबळे त्यांचं नाव. पिंपळपान नावाचा त्यांचा प्रकाशित झालेला कवितासंग्रह. मुंबईच्या मामाच्या घरी पुस्तकांचं मोठं कपाट. मुंबईला गेलो की दिवसभर मी पुस्तक वाचत असायचो. उन्हाळ्यात बी. डी. डी चाळीत रात्री दाखवणारे फुकटचे चांगले हिंदी आणि मराठी सिनेमा हा माझ्यासाठी चांगला खुराक. 

थोरले चुलते माझे खरे पालक. त्यांनीच मला पांडव प्रताप. शिवलीला अमृत, रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. वाचनाच्या अनुषंगानं लिहिताना हे सारं मला आठवतं. वडिलांवर मी एक दीर्ध कविता लिहिलीय. त्यात मी म्हणतो, 

हेही वाचा: लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

मी परत परत जन्म घेतोय. वाचन हे माझ्या वडलोपार्जित इस्टेटीतून आलंय. हायस्कूलमधे पुस्तक मिळतं. पन्हाळे सर आम्हाला मराठी शिकवीत, मला भेटलेले ते पहिले सामाजिक जाणीवेचे शिक्षक. केशवसुतांच्या कविता त्यांना खूप आवडत. एक तुतारी द्या मज आणून. त्यांनी मला जाणीव करून जातीय वास्तव. याआधीच सातवीला मी बाबासाहेबांचं चरित्र वाचलेलं आणि त्यावर सुविचार सांगितलेला. 

आणि मी बी. ए झालो

अकरावीनंतर मला मुंबई विद्यापीठात शिकायचं म्हणून मुंबईला गेलो. तीन चार महिने पण खूपच वाईट दिवस गेले ते. इतर सर्व माझ्या वर्गाचे मित्र कॉलेजला जात, अन मी मात्र वरळीत शिक्षणापासून वंचित फुटपाथवरील झाडांच्या सावलीत, कधी मैदानात, समुद्रावर भरदुपारी. पूर्णता विमनस्क.

सप्टेंबरला मी गावी आलो. खूप रडलो. आई खूप करारी, जिद्दबाज आणि मानी. म्हणाली रडू नकोस वर्ष फुकट नाही घालवायचं. मजुरीचे पैसे हातात देऊन म्हणाली कराडला जा, कुणाचीही ओळख काढ. वाचनालयात नाव नोंदव. पुस्तक घेऊनच घरी परत ये. 

कराड नगरपालिकेचं वाचनालय खूप प्रसिद्ध. गेलो. ओळखीशिवाय मी सभासद झालो. खूप मोठं आहे हे वाचनालय. समृद्ध वीस, पंचवीस पुस्तकांची कपाटं. लवकरच त्यांच्या लक्षात आलं माझ्या वाचनाचं वेड. त्यांनी मला ते ग्रंथालय सहज वावरण्यासाठी मोकळं केलं. आजवरच्या आयुष्यात गावच्या देवळातही मला मुक्त प्रवेश कधी मिळाला नव्हता.

हे संपूर्ण वर्ष माझ्या आयुष्यात महत्त्वाचं ठरलं. या दरम्यान एकाहून एक सरस पुस्तकं मी वाचली. विंग ते कराड अंतर आठ ते नऊ किलोमीटरचं रोजच शहरात येणं शक्य नसायचं. मग मला नगर वाचनालयवाले तीन तीन पुस्तकं देत. पैसे नसताना कित्येकदा मी चालत गेलोय कराडला. 

हेही वाचा: प्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती

याचवेळी मी कवितेची वही केली. एक म्हैस मी राखायला जायचो. सोबत पुस्तकं. खूप आनंदाचे दिवस. भोवताली मोकळं रान, समोर डोंगर, खळाळते ओढे. मी प्रेम करायला शिकलो. आई, निसर्ग आणि प्रेयसी. दहावीला होती ती. नंतर आम्ही तळमावलेच्या कॉलेजला गेलो. तिनंच प्राचार्यांच्या केबिनमधे नेलं. सासनुर त्यांचं आडनाव. कानडी, मराठी यायचं नाही. इंग्लिशमधेच बोलत. सुरवातीलाच विचारलं त्यांनी, आर यू पोयट? त्यांच्यामुळेच मी बी. ए झालो.

स्वत:च पुस्तक ही खरी इस्टेट

माझ्यासारखीच वाचनाची आवड असलेला इथं मला आयुष्यभरासाठी मित्र मिळालेला, नाव त्याचं राम साळुंखे. अभ्यासाची पुस्तकं आम्ही इतरच पुस्तकं वाचायचो जास्त. इथली लायब्ररी आमच्या मालकीची. नवीन पुस्तकांच्या रजिस्टर नोंदीपूर्वीच ती आमच्या हातात असायची. पाटील सर होते ग्रंथपाल. सहामाही परीक्षेत पेपर लिहिण्याऐवजी पुरवण्या लावून एक दीर्घ पत्रच लिहिलं. हे माझं पहिलं दीर्ध गद्य लेखन. याच काळात मी एक कथा लाहिली.

पत्र लेखन ही लेखक बनण्याची पहिली सुरवात. पत्र ही आत्मकथनाची सुरवात. आता लेखक बनण्याची सहजसाध्य संधी मोबाईलमुळे जवळपास नामशेष झाली. अलीकडे ती जागा फेसबुकच्या वॉलनं घेतलेली आहे.

बी. ए. नंतर नोकरीसाठी परत मुंबई. पुस्तकासाठी मामाचं घर होतं. त्याहून मोठी उपलब्धी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. बेकारीत नायगावच्या मुंबई मराठीनं मलाच नाही तर शेकडो तरुण होतकरू बेकार कवी, लेखकांना तयार केलं. 

मुंबईनंच माझ्यात पुस्तकांविषयीचं प्रेम वाढवलं फोर्टची फूटपाथं जगभरच्या लेखकांनी भरलेली. इथंच मला निग्रो साहित्याची गोडी लागली. टोनी मारिसनची बिलव्हड, रिचर्ड राइटचं नेटीव सन, राल्म एलीसन इनव्हिजीबल यांची पुस्तकं वाचलीत. स्वत:चे पुस्तक ही आपली खरी इस्टेट या दौलतीची सुरवात मुंबईच्या फूटपाथवरून झाली. 

हेही वाचा:

मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

(लेखक हे मराठीतले प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार आहेत. हा लेख २०१८च्या प्रतिभा दिवाळी अंकात आलाय.)