दिल्लीच्या सरकारी शाळांमधे आनंदी राहण्याची गोष्ट शिकवली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शाळेतल्या हॅपीनेस क्लासमधे काय धडे दिले जातात हे बघण्यासाठी आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मिलेनिया ट्रम्प येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून भारतात आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या बायकोला सरकारी शाळा बघावी वाटावी एवढं काय या शाळेत आहे?
आपण लहानपणी शाळेत जायचो तेव्हा आपल्याला काय वाटायचं? शाळेत जायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळा यायचा. अजूनही काही मुलांना शाळेत जायचं असलं की पोटात दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं. रडू येतं. शाळा अगदी नको नको वाटते. एरवी हसणारी, खेळणारी मुलं शाळेचं नाव काढलं की अगदी रडवेली होतात!
पण दिल्लीत असलं काहीही होत नाही. दिल्लीतल्या मुलांना सरकारी शाळेत जायला खूप आवडतं. कारण शाळेच्या हॅपीनेस क्लासमधे त्यांना खळखळून हसायला मिळतं ना! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं दिल्लीतल्या शालेय अभ्यासक्रमात हॅपीनेस क्लासची भर घातलीय. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच तासाला हा क्लास घेतला जातो.
२४ फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनीया ट्रम्प भारत भेटीवर येतायत. दोन दिवसात अहमदाबाद, दिल्ली आणि आग्रा अशा तीन शहरांचा दौरा त्यांना करायचाय. विशेष म्हणजे, २५ तारखेच्या दिल्ली दौऱ्यात मिलेनिया यांनी दिल्लीतल्या शाळांमधे घेतल्या जाणाऱ्या हॅपिनेस क्लासला हजेरी लावण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे सध्या हा हॅपीनेस क्लास आणि दिल्लीच्या शाळा फारच चर्चेत आल्यात.
हेही वाचा : इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं
आपल्याकडे सरकारी आणि खासगी शाळा यामधे एकप्रकारची दरी पडलेली स्पष्ट दिसते. सरकारी शाळांची अवस्था इतकी वाईट असते की पाचवीत गेलेल्या काही मुलांना धड लिहिता वाचताही येत नाही. तर खासगी शाळांच्या मोठ्या मोठ्या फीया आणि युनिफॉर्म, पुस्तकांचा खर्च अनेक पालकांना परवडत नाही. त्यामुळे शिक्षणाविषयी कितीही तळमळ वाटली तरी पालकांना आपल्या मुलाला खासगी शाळेत टाकता येत नाही. मग शिक्षणामुळे समाजातली दरी कमी होण्यापेक्षा ती वाढतच जाते. हे चित्र अगदी पुणे मुंबईसारख्या शहरातही दिसतं.
पण दिल्लीमधे असं चित्र नाही. सरकारी बजेटमधला सर्वाधिक पैसा केजरीवाल शिक्षणावर खर्च करतात. एकूण बजेटच्या २६ टक्के खर्च हा शिक्षणावर केला जातो. एवढा खर्च देशातल्या दुसऱ्या कुठल्याही राज्यात केला जात नाही. दिल्लीमधे एक हजार सरकारी शाळा आहेत. यातल्या ५४ शाळांना दिल्ली सरकारनं 'मॉडेल स्कूल' म्हटलंय. हळूहळू सगळ्याच शाळांना मॉडेल स्कूल बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
एखाद्या खासगी शाळेलाही लाजवेल अशा सोयी या सरकारी मॉडेल शाळेत दिल्या जातात. स्विमिंग पूल, जिम, एसी क्लासरूमपासून ते अगदी प्रोजेक्टरच्या सोयीपर्यंत सगळं काही इथं उपलब्ध असतं. पण महत्त्वाची गोष्ट अशी की भौतिक सुविधा आणि पुस्तकातलं शिक्षण पुरवतानाच विद्यार्थांची भावनिक पातळी सुधारण्यासाठीही या शाळेत प्रयत्न केले जातात. यासाठीच दिल्लीच्या या सरकारी शाळांमधे २०१८ पासून हॅपीनेस क्लास म्हणजेच आनंद शिकवायचे वर्ग घेतले जातात.
कुणी म्हणेल आनंद ही तर भावना आहे. ती काय शिकवावी लागते का? तर हो! माणसाला आनंदाची भावना निर्सगानं उपजतच दिली असली तरी प्रत्येक काम, रोजच्या जिवनात ताण न घेता, आनंदानं कसं वागायचं हे त्याला शिकावावं लागतं. आणि हेच दिल्लीतल्या या हॅपीनेस क्लासमधे शिकवलं जातं.
‘गेल्या ३० वर्षांपासून आपण खूप चांगलं काम करणारी माणसं तयार करत होतो. उद्योग धंद्यांसाठी काम करणारे, फॅक्टरीसाठी काम करणारे अनेक कामगार यातून तयार होतायत. आपण खूप चांगले ह्युमन रिसोर्स निर्माण केलेत. पण ह्युमन बिंग निर्माण करायला आपण कमी पडलोय,’ असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी वॉशिंगटन पोस्ट या अमेरिकन पेपरला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. यातूनच शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.
हॅपीनेस क्लास चालू होतो ते मेडिटेशन करून. शाळेत आल्यावर अवघड गणितं, इतिहासातल्या लढाया, भूगोलाचे नकाशे आठवत बसण्याऐवजी आधी मुलं डोळे बंद करून शांत बसतात. ध्यान लावतात. त्यांच्या आसपास येणारे बारीकसारीक आवाज ऐकतात. मग हात एकमेकांवर चोळत त्याची ऊब डोळ्यांना दिली जाते आणि सावकाश डोळे उघडले जातात. कधी कधी मेडिटेशनसोबतच प्राणायम घेतला जातो.
एरवी भरपूर मस्ती करणारी मुलं मनातून खऱ्या अर्थाने शांत असतात. फक्त ‘श्वास अंदर, श्वास बाहर’ अशा सूचना देणारा शिक्षकांचा आवाज वर्गात घुमत राहतो. यानंतर मात्र नुसती धम्माल असते. काही वर्गात एखाद्या विषयावर चर्चा सुरू असते. काही वर्गात खेळ घेतले जातात. काही वर्गात गोष्ट सांगणं सुरू असतं. काही वर्गात चित्र काढणं, क्राफ्ट करणं सुरू असतं. कुठं मुलं ओरडत असतात. कुठं गाणं सुरू असतं. कुठं खूप हसत असतात. असा ४५ मिनीटांचा एक हॅपीनेस क्लास रोज मुलं शिकतात.
हेही वाचा : दिल्ली विधानसभा निकालाचे सरळ सोपे पाच अर्थ
‘मॉस्कोमधे मी एका वर्ल्ड कॉन्फरन्सला गेलो होतो. तिथं सगळ्या देशातले शिक्षण मंत्री आम्ही शिक्षणात टेक्नॉलॉजीचा वापर कशाप्रकारे करतो हे सांगत होते. तेव्हा जगातली हिंसा, द्वेष यावर मात करता येईल अशी शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करू शकतो का असा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर मांडला,’ असं सिसोदीया बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणतात. आणि यातूनच आता जगभरात ओळखल्या जाणाऱ्या हॅपीनेस क्लासची निर्मिती झालीय.
या हॅपिनेस क्लासमधे कोणत्या गोष्टी शिकवाव्यात याचा सगळा अभ्यासक्रम सरकारनं स्वतः तयार केलाय. यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांची, संशोधकांची आणि जीवनमूल्य शिकवणाऱ्या संस्थांचीही मदत घेतली गेलीय. याची सगळी माहिती नेटवर उपलब्ध असलेल्या हॅपीनेस क्लासच्या अभ्यासक्रम पुस्तिकेत मिळते.
नर्सरीपासून ते आठवीच्या मुलांपर्यंत सगळ्या वर्गात हा हॅपीनेस क्लास घेतला जातो. फक्त ध्यान, प्राणायाम सगळ्यांसाठी असतो. बाकी नर्सरी ते आठवीपर्यंत सगळ्या इयत्तांसाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. नर्सरीच्या मुलांना स्वतःच्या भावनांची ओळख करून देण्यावर भर दिला गेलाय. यासोबतच प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक पद्धतीने बघायलाही त्यांना शिकवलं जातं.
मुलांची मानसिक वाढ होईल तसतसं थोड्या गुंतागुंतीच्या आणि अवघड विषयांकडे मोर्चा वळवण्यात आलाय. तिसरीसाठीच्या अभ्यासक्रमात ‘एखाद्या वादात दोष देण्यापेक्षा जवाबदारी घ्यायला शिकवावं’ असं सांगितलंय.
पुढच्या इयत्तेत त्यांना आपल्या शरीरासोबत असणारं नातं शोधायला शिकवलं जातं. शरीरच काय तर आपल्या आजुबाजूच्या वस्तूंसोबत, आपल्या आई वडलांसोबत, बहिण भावांसोबत आपलं नातं कसं आहे इथपासून ते आदर, सन्मान, आपुलकी काळजी अशा मोठ्या भावनांबद्दलही त्यांना आठवीपर्यंत जागृत केलं जातं.
इयत्ता वाढेल तसा मुलांच्या भावविश्वाचा विस्तारही वाढवला जातो. पहिली दुसरीच्या मुलांनी फक्त आईवडलांबद्दल बोलणं, त्यांच्याबद्दल विचार करणं अपेक्षित असतं. पण सातवी आठवीत शिकणाऱ्या मोठ्या मुलांनी आईवडलांसोबतच शेजारीपाजारी आणि समाजातल्या महत्त्वाच्या घटकांचाही विचार करायचाय, हे सांगितलं जातं.
मुलांच्या शारीरिक, मानसिक वाढीनुसार त्यांच्या वयाला झेपेल असा अभ्यास प्रत्येक इयत्तेला दिला जातो. बरं, पुन्हा या विषयावरची काही अभ्यासाची पुस्तकं वाचा, होमवर्क करा असली भानगड मुलांच्या मागे लावली जात नाही. या विषयाची परीक्षाही मुलांना द्यायची नसते. त्यामुळेच पूर्णपणे मुलं या हॅपिनेस क्लासचा अनुभव घेऊ शकतात.
शिक्षकांना मार्गदर्शन व्हावं म्हणून एक हॅपीनेस क्लास हॅण्डबुक काढण्यात आलंय. यात गोष्टी, कहाण्याही दिलेल्या असतात. मुख्य म्हणजे, शाळा सरकारी असल्या तरी बाकी सरकारी कामांची फार जबाबदारी शिक्षकांवर टाकली जात नाही. त्यामुळे शिक्षकांना पूर्णपणे मुलांवर लक्ष देता येतं. हे जास्तीचं काम त्यांना कटकट वाटत नाही. तर त्याचा मुलांच्या वागण्यावर झालेला परिणाम शिक्षकांनाही स्पष्ट दिसतो.
हेही वाचा : दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार
टीआरटी वर्ल्ड या टर्कीश मीडिया कंपनीनं दिल्ली स्कूल मॉडेलबद्दल एक वीडियो पब्लिश केलाय. त्यात युवराज जोशी या विद्यार्थ्याने आपलं मनोगत व्यक्त केलंय. ‘मला खूप पटकन राग यायचा. शाळेत आणि घरीसुद्धा मी खूप भांडण करायचो आणि लगेच हाणामारीवर यायचो. पण हॅपीनेस क्लासमधून शांत कसं रहायचं हे मला कळलं. आता माझं घरच्यांसोबतचं नातं खूप छान झालंय.’
याच वीडियोत प्राची नावाची विद्यार्थीनी म्हणते, ‘मला हॅपीनेस क्लास खूप आवडतो. या क्लासमधे आम्हाला ओरडतंही नाहीत आणि ऑर्डर्सही सोडत नाहीत. आम्ही खूप खेळतो. खूप मजा येते. या क्लासमुळे मला फार शांत वाटतं. माझा आत्मविश्वासही वाढतो.’
सरकारचा हा उपक्रम वरवरचा नाही. त्याचे परिणाम मुलांच्य वागण्यात, बोलण्यात आणि अभ्यासातही दिसतात. हॅपीनेस क्लासमुळे शाळेतल्या इतर तासांमधेही पूर्ण लक्ष लागतं, असंही अनेक मुलांनी सांगितलंय. पण या क्लासचा मुलांच्या करीअरला आणि अभ्यासाला काय फायदा होईल एवढी संकुचित विचारसरणी ठेवून दिल्ली सरकारनं हा अभ्यासक्रम आणलेला नाही. आपली उद्याची पिढी ही एक चांगला माणूस म्हणून विकसित व्हावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
केजरीवालांचा हा दिल्ली पॅटर्न संपूर्ण देशात लागू व्हायला हवा. त्यांच्या या हॅपीनेस स्कूलची महती परदेशातही पोचलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आलेले पाहुणे दिल्लीच्या साध्या सरकारी शाळेत जातात. ही हॅपीनेस क्लासला मिळालेली आणखी एक कौतुकाची पावतीच म्हणायला हवी.
हेही वाचा :
दिल्लीच्या निकालावर कोण काय म्हणालं?
मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!
मोदी मास्तरांचे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ७ गुरूमंत्र