शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

२१ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी.

पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. दोस्त राष्ट्रांचे सैनिक आपापल्या देशात परतू लागले होते. याचवेळी स्पॅनिश फ्ल्यू म्हणजेच एनफ्ल्यूएन्झा नावाच्या एका भयानक साथीच्या रोगाचा उद्भव झाला. सुरवातीच्या काळात या रोगाची अमेरिकन सैनिकांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली. ब्रिटिशांचं राज्य असल्याने भारतीय सैनिकही ब्रिटिशांच्या बरोबरीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढत होते. यामुळे अमेरिकन सैनिकांबरोबरच ब्रिटीश आणि भारतीय सैनिकांनाही या भयानक रोगाची लागण झाली.

जगभर हाहाकार उडाला

संपूर्ण जगात लाखो लोक मृत्यूमुखी पडले. युद्ध समाप्तीनंतर जे सैनिक मुंबई किंवा मद्रासच्या बंदरावर जहाजाने आले त्यांच्यामार्फत या जीवघेण्या एनफ्लूएन्झाचा भारतातही शिरकाव झाला. याची सुरवात मुंबई प्रांतातून झाली तरी पुढे संपूर्ण भारतात या रोगाने एवढं उग्र रूप धारण केलं की जवळ जवळ सतरा लाख लोक केवळ मृत्यूमुखी पडले.

छत्रपती शाहू महाराज त्यावेळेला मुंबईतच होते. आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र तळमळणाऱ्या राजाला या भयानक साथीची कल्पना आली. या रोगाची लागण आपल्या कोल्हापूरच्या लोकांना होऊ नये म्हणून त्यांनी मुंबईहून तारेने कोल्हापूरला संदेश दिले. भविष्यात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची ते कळवलं. तरीही पाहता पाहता एनफ्ल्यूएन्झाने कोल्हापुरात शिरकाव केलाच.

वर्तमानपत्रांचे रकाने या रोगाच्या बातम्यांनी आणि मृत्यू पावलेल्यांच्या संख्येनं भरू लागले. संपूर्ण कोल्हापुरात अचानक भीतीचं वातावरण पसरलं. भास्करराव जाधव आणि नगरपालिकेतले इतर सर्व अधिकारी अहोरात्र काम करू लागले. यावेळी शाहू महाराजांनी या एनफ्ल्यूएन्झाला थोपवण्यासाठी एक आगळा वेगळा प्रयोग केला. हा प्रयोग होता स्वयंसेवक मंडळाचा.

हेही वाचा : शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

विद्यापीठ स्वंयसेवक मंडळाची स्थापना

शाहू महाराजांचे एक विश्वासू कार्यकर्ते, भक्ति सेवा विद्यापीठ हायस्कूलचे संस्थापक वा. द. तोफखाने यांना या कामी विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं. मग काय तोफखाने आणि त्यांचे मित्र, विद्यापीठ हायस्कूलचे संस्थापक गं. य. दीक्षित गुरुजी यांनी एनफ्ल्युएन्झाबरोबर लढा देण्याची मोहीमच सुरू केली. शाळांना सक्तीने सुट्टी दिली असल्याने शाळेतच विद्यापीठ हायस्कूल एनफ्ल्युएन्झा स्वयंसेवक मंडळ स्थापन केलं.

आता गरज होती उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांची. दीक्षित गुरुजींनी आपल्या सर्व सहकारी शिक्षकांना याबाबत आवाहन केलं. शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा बोलावून त्यांनाही आवाहन करण्यात आलं. तोफखाने यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने उपस्थितांना स्वयंसेवक मंडळाची का आवश्यकता आहे ते सांगितलं. दीक्षित गुरुजींनी स्वयंसेवक म्हणजे काय यावर विवेचन केलं.

तोफखाने आणि दीक्षित यांच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी सुमारे ५० स्वयंसेवक विद्यापीठात जमले. तोफखाने मास्तरांच्या विनंतीस मान देऊन डालोपंत सोहनी, राजवैद्य यशवंतरावजी गुणे, होमिओपाथीचे डॉ. हरिभाऊ पटवर्धन हेही आले. उपस्थित स्वयंयेवकांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली. घरोघरी जाऊन नागरिकांचं सर्वेक्षण कसं करायचं, सर्वेक्षणाच्या नोंदी कशा ठेवायच्या, आजारी माणसांच्या नोंदी, आजाराचं स्वरूप, ताप, आर्थिक परिस्थिती नोंद याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.

शाळा झाली एन्फ्युएन्झा निर्मूलन केंद्र

डॉक्टरांनी अगदी अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटला कसं उचलायचं, आजारी माणसाला कोमट पाण्यानं कसं पुसून घ्यायचं, पेशंटचे कपडे कसं बदलायचे हे सर्व करत असताना स्वयंसेवकास रोगाची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केलं.

शाहू महाराज यावेळी मुंबईत होते. त्यांनी तोफखाने यांना तार करून कोणकोणती औषधे आणि साहित्य लागणार आहे याची यादी तयार करून पाठवण्यास सांगितलं. तोफखान्यांनी कोल्हापुरातील आणखी काही डॉक्टरांशी चर्चा करून औषधं, बेडपॅन, स्टेथास्कोप, थर्मामिटर, एनिमाचे साहित्य, फिडिंग कप, गरम पाण्याने शेकण्याच्या रबरी पिशव्या, रक्तदाब मोजण्याची उपकरणे, तोंडाला बांधायचे मास्क आदींची यादी महाराजांना तारेनं कळवली.

साथीची भीषणता एवढी वाढत चालली होती की, मुंबईहून औषधं येईपर्यंत कदाचित अनेक लोकांना जीव गमवावा लागला असता. परंतु राजवैद्य यशवंतरावजी गुणे यांनी आपल्याजवळचा आयुर्वेदिक औषध साठा विद्यापीठात पाठवून दिला. डॉ. हरिभाऊ पटवर्धन यांनीही होमिओपॅथीची औषधं विद्यापीठ शाळेत पाठवून दिली. आता विद्यापीठ शाळा खऱ्या अर्थाने एन्फ्युएन्झा निर्मूलनाचं केंद्र बनली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

रात्रीच्या रेल्वेनंच औषधी कोल्हापूरला

शाहू महाराज मुंबईत तोफखान्यांच्या तारेची वाटच बघत होते. तार येण्यापूर्वीच या प्रजाहितदक्ष आणि जनहितासाठी तळमळणाऱ्या राजाने वैद्यकीय साहित्य घेण्यासाठी आवश्यक ती तयारी करून ठेवली होती. मुंबईत औषधं आणि साहित्य खरेदी केल्यापासून विनाविलंब कोल्हापूरपर्यंत पोचवण्याचीसुद्धा व्यवस्था केली होती. 

महाराजांच्या सुचनेनुसार डॉ. कारखानीस सर्व साहित्य घेऊन रात्रीच्याच मेलने निघाले आणि दुसऱ्यांच दिवशी सकाळी कोल्हापूरला पोचले. इतक्या तत्परतेने एका दिवसात महाराजांनी साहित्य पाठवल्यामुळे स्वयंसेवकांचा हुरुप प्रचंड वाढला. आलेल्या सर्व साहित्याची नोंद करून घेतली. कोणतं औषध द्यायचं, त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे हे डॉक्टर मंडळींनी स्वयंसेवकांना समजावून सांगितलं.

गंभीर रुग्णांना डॉक्टर स्वतः येऊन भेटतील असा निरोप देण्यात आला. औषधं घरपोच करताना दीक्षित गुरुजींच्या असं लक्षात आलं की, बऱ्याच रुग्णांची प्रकृती गंभीर बनलीय आणि त्यांना चोवीस तास नजरेखाली ठेवणं आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून विद्यापीठ शाळेतला एक हॉल रिकामा करण्यात आला. गंभीर रुग्णांना शाळेतल्या या तात्पुरत्या दवाखान्यात हलवण्यात येऊ लागलं. रुग्णांना हलवण्यासाठी दोन स्ट्रेचर मिळाले होते. परंतु रुग्णाला त्याच्या घरातून शाळेपर्यंत घेऊन येणं म्हणजे एक दिव्य काम होतं.

अडचणींचा सामना

कोल्हापुरातले रस्ते आणि बोळ एवढे अरूंद होते की, दोन माणसं स्ट्रेचर उचलून नेताना कसरत करावी लागायची. तसंच बोळ इतके अस्वच्छ होते की, रुग्णाला वाटेत जमिनीवर ठेवणं शक्यच नव्हतं. घरापाशी उचललेले स्ट्रेचर दोघाजणांनी शाळेत उचलून आणताना हात भरून येत. पण दीक्षित गुरुजींची अशा प्रसंगी तग धरण्याची शक्ती अफाट होती. अगदी थोडीही दमछाक न होता ते रुग्णाला शाळेपर्यंत घेऊन येत. पाहता पाहता शाळेतील दोन हॉल रुग्णांनी भरून गेले.

सर्व रुग्णांना सकाळी उठवून त्यांचे दात घासण्याची व्यवस्था, गरम पाण्याने अंग पुसून घेणं, त्यांचे कपडे बदलणं, तापाच्या नोंदी ठेवणं, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्यावेळी देणं या सर्व कामाबरोबरच दीक्षित गुरुजींनी एक अत्यंत महत्त्वाचं काम सुरू केलं. ते म्हणजे, या रुग्णांचे कपडे स्वतंत्रपणे गरम पाण्यात धुण्याचं. यासाठी शाळेच्या आवारातच एक मोठी चूल पेटवण्यात आली. त्या चुलीवर गरम पाणी सतत मिळत राहील अशी व्यवस्था करण्यात आली. एखाद्या रुग्णाचं मलमूत्र काढतानाही दीक्षित गुरुजींनी कधी तक्रार केली नाही. उलट या प्रकारचं सेवा काम करण्यास मिळालं म्हणून ते स्वतःला धन्य मानत.

हेही वाचा : आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये

फोटो : दीक्षित गुरूजी

आणि शाहू महाराज कोल्हापुरात दाखल झाले

दोनच दिवसांनी महाराजांची आणखी एक तार तोफखान्यांच्या नावे आली. ‘औषधे आणि साहित्य मिळाले असेल. आता आणखी काय पाहिजे ते कळवा.’ आजाराची भीषणता पाहून तोफखाने आणि दीक्षितांनी असा निर्णय घेतला की या कठीण प्रसंगी खुद्द महाराजच इथे असणं आवश्यक आहे. महाराजांचा प्रत्यक्ष आधार आपल्याजवळ असेल तर आपण सर्वजण या संकटावर मात करू. तोफखान्यांनी महाराजांना त्वरित तार केली. सदरची तार मिळाल्यावर महाराजांनी तात्काळ उत्तर दिलं. ही उत्तराची तार दुसऱ्याच दिवशी सकाळी तोफखान्यांना मिळाली.

आणि खरोखरच हा प्रजाहितदक्ष, कनवाळू राजा जनतेच्या सेवेसाठी कोल्हापुरात लगेचच आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराज विद्यापीठात आले. विद्यापीठ एन्फ्लुएन्झा मंडळ कशा पद्धतीने काम करंय, या पुढील कामाची योजना काय आहे हे बारकाईने पाहिलं. तोफखाने आणि दीक्षितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. कोल्हापूर म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढले.

कोल्हापुरातल्या सगळ्या डॉक्टर मंडळींना एक सर्क्युलर काढून विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा स्वयंसेवक मंडळाला सहकार्य करायला सांगितलं. सगळी सरकारी वाहनं श्री. तोफखाने, ऑर्गनायझर, एन्फ्युएन्झा मंडळ यांना ते मागतील तशी विनाविलंब देण्याचे आदेश काढले. स्वयंसेवी डॉक्टर मंडळींना घरापासून शाळेत आणि परत घरी जाण्यासाठी सरकारी वाहनांनी सोय केली.

राजवाड्यातलं दूध विद्यापीठ शाळेवर

एवढी व्यवस्था लावून हा कर्मयोगी राजा नव्या राजवाड्यावर आला. त्या ठिकाणी राजकुटुंबाला आवश्यक तेवढंच दूध ठेवून घेऊन सरकारी भट्टीतलं सगळं दूध विद्यापीठ शाळेत पाठवण्यास सांगितलं. महाराज सायंकाळी पुन्हा शाळेत आले आणि यापुढे दररोज येणाऱ्या दुधाचं वाटप कसं करायचं याचं नियोजन सांगितलं. सर्व प्रकारची व्यवस्था सुरळीत लागल्याचं पाहून महाराज उशिरा सोनतळीला रवाना झाले.

दुसऱ्याच दिवशीपासून रोज दहा घागरी दूध शाळेत येण्यास सुरवात झाली. दुपारपर्यंत दुधाचं वाटप होईपर्यंत कदाचित दूध नासेल म्हणून तोफखाने, दीक्षितांनी एक स्वतंत्र चूल पेटवून ते दूध तापवायला सुरवात केली. सर्वेक्षणाच्या नोंदीमधून जे अतिशय गरीब होते त्यांना दूध घरपोच देण्याचं काम स्वयंसेवक मंडळी करू लागली. सरकारी भट्टीमधून इतकं दूध येत होतं की गरीब कुटुंबाला वाटूनसूद्धा शिल्लक राहू लागलं.

वैद्य हरिभाऊ पटवर्धन म्हणाले, या शिल्लक दुधाचं विरजन लावून दही करूया. एन्फ्युएन्झा बाधीतांना ताजं ताक मिळालं तर पेशंटला शक्ती येण्यास फार मदत होणार आहे. आता कामाची एक निश्चित दिशा स्वयंसेवकांना मिळाली. दूध तापवणं, विरजन लावणं, दही लावणं, ताक करणं आणि त्याचं वाटप लगेच करणं ही कामं स्वयंसेवक मंडळी करू लागली. तोफखान्यांच्या घरातली सगळीच मंडळी या कामी पूर्णपणे झोकून देऊन कामाला लागली.

हेही वाचा : कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

तोफखाने-दीक्षित यांचं नियोजन

दूध तापवल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात साय जमा होत असे. या सायीपासून आणि दह्यापासून मोठ्या प्रमाणात लोणी जमा होऊ लागले. या लोण्यापासून कढवलेले उत्तम दर्जाचे तूप भरपूर प्रमाणात जमा झाले. शाहू महाराजांच्या सुचनेनुसार हे तूप गरोदर महिला आणि एन्फ्युएन्झामुळे दुर्बल झालेल्या महिलांना पोचवण्यात आलं. धन्य तो राजा ज्याने आपल्या रयतेची अशा प्रकारे काळजी घेतली.

या सर्वांचं अतिशय योग्य नियोजन तोफखाने-दीक्षित करत होते. यासाठी त्यांना दिवसाचे तासही कमी पडत होते. दीक्षित गुरुजींची नेहमीची चाकोरीबद्ध दिनचर्या अगदी बदलून गेली होती. पहाटे चार वाजता एकदा का धावपळ सुरू झाली की रात्री झोपण्यास कधी अकरा तर कधी बारा वाजायचे. पण दीक्षित गुरुजींना कंटाळा किंवा थकवा माहिती नव्हता. त्यांनी तपोवन आश्रमातल्या त्यांच्या राहणीमानात मूलभूत तत्वांचं आचरण कधीच सोडलं नाही.

विद्यापीठ स्वयंसेवकांचं काम पाहून विविध पेठातल्या तालमीचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून येऊ लागले. कोल्हापुरातल्या व्यापारी वर्गालाही स्फुरण आलं. व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने साबुदाणा आणि साखरेची पोतीच्या पोती शाळेत जमा केली. एन्फ्ल्युएन्झा पेशंटला पचनास सोपं जावं म्हणून साबुदाणा खीर बनवण्याचा नवा उपक्रम सुरू झाला. सरकारी भट्टीमधून येणारं दूध, व्यापारी बंधूंकडून आलेला साबुदाणा आणि साखर यापासून बनवलेल्या खिरीचा चांगला परिणाम दिसून येऊ लागला.

राजा कसा असतो, त्याचं मूर्तीमंत उदाहरण

महाराज रोज विचारणा करत असत. अजून काय पाहिजे असेल ते सांगा. मी लगेच आणून देण्याची व्यवस्था करतो. महाराजांच्या या तळमळीच्या शब्दाने तोफखाने-दीक्षितांना काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळत असे. महाराजांनी एवढ्या विश्वासाने आपल्यावर हे अत्यंत जोखमीचं काम सोपवलंय. त्यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरलं पाहिजे म्हणून तोफखाने-दीक्षितांसह सर्व शिक्षक आणि स्वयंसेवकही भारावून काम करत होते.

प्रत्येकाच्या मनात रुग्णसेवा करण्याची एक प्रचंड उर्जा निर्माण झाली होती. या अनामिक उर्जेमुळे स्वयंसेवकांना उन्हा तान्हाचा त्रास होत नव्हता की भुकेची पर्वा नव्हती. या सर्वांवर कळस म्हणजे खुद्द शाहू महाराज आपल्या प्रजेची विचारपूस करायला स्वतः रस्त्यावर आले. चौकाचौकात उभं राहून त्यांनी नागरिकांशी बोलण्यास आणि त्यांना धीर देण्यास सुरवात केली.

औषधं, दूध, खीर, ताजं ताक इत्यादी गोष्टी मिळतात काय? पुरेशा मिळतात का? आणखी कशाची गरज आहे? हा रयतेचा राजा अशा पद्धतीने कोल्हापूरच्या गल्ली बोळातून फिरू लागला. तेव्हा लोकांच्या मनातही एक आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली. महाराज सकाळी साडेसातला रविवार चौकात आले की तेथून मंगळवार पेठ, सणगर गल्ली, वरुणतीर्थ वेस, शिवाजी पेठ, रंकाळा वेश, धोत्री गल्ली, उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ, नदी वेस असं फिरत टाऊन हॉलच्या मागे असणाऱ्या  हेडक्वार्टरमधे जात असत. सकाळी साडेसातला सुरू झालेला हा दौरा पूर्ण होण्यास दुपारचा एक वाजायचा.

आपल्या प्रजेच्या दुःखाने दुःखी होणारा राजा करवीरच्या जनतेला लाभला हे केवढं भाग्य. परमेश्वरही नेहमी प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीशी राहतो असं म्हणतात. शाहू महाराजांपासून तोफखाने-दीक्षित आणि विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा स्वयंसेवक मंडळ यांनी रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला फळ आलं. एन्फल्युएन्झाची साथ जशी आली तशी हळूहळू कमीही झाली.

या संकटकाळी संपूर्ण कोल्हापूरकरांना शाहू महाराजांबरोबरच भक्तीसेवा विद्यापीठ स्वयंसेवक मंडळाचं एक अनोखं दर्शन घडलं. विशेषतः तोफखाने-दीक्षित या दोघांचं नाव घरोघरी आदरानं घेतलं जाऊ लागलं. या नंतरच्या काळात विद्यापीठ हे एक सेवा केंद्र होऊन गेलं. शाहू महाराजांच्या कल्पनेतून निर्माण झालेलं स्वयंसेवक मंडळ शंभर टक्के यशस्वी झालं.

हेही वाचा : 

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

(शाहू लेखक हे कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूलमधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेत.)